ही गोष्ट आहे यास्मिन आणि रॉबची. त्यांची दुसरी ’डेट’ आहे, रॉबच्या घरी ते चाललेत. यास्मिन कोणाच्याही नजरेत भरेल अशी आहे- सडपातळ, ब्लॉन्ड, लक्षवेधक. आणि रॉब अतिशय साधारण, गर्दीत सहज लपून जाईल असा. येणारेजाणारे लोक यास्मिनकडे बघतात, रॉबकडे आणि परत यास्मिनकडे- ’ही याच्याबरोबर?’ – अशा अर्थाने! रॉब आणि यास्मिन दोघांनाही याची कल्पना आहे., एकमेकांच्या आवडीनिवडी विचारत, एकमेकांचा अंदाज घेत ते दोघं न्यू यॉर्कमधल्या रॉबच्या अपार्टमेन्टमध्ये, म्हणजे खरंतर एका खोलीत पोचतात. त्यांच्या या डेटबद्दल यास्मिन सतत सोशल मीडीयावर अपडेट्सही देतेय! दोघांच्याही हातात मार्टिनीचे ग्लास येतात. आता काय? ती अपरिहार्य शारीरिक जवळीक. त्यासाठीच तर डेटिंग असतं ना? तशी ती सहजपणे सुरूही होते. आणि तितक्यातच होतो एक अपघात. मार्टिनीचा ग्लास फुटतो आणि रॉबच्या दंडात काच घुसते, त्याच्या हातातून अक्षरश: रक्त गळायला लागतं. आता? अर्धवट ओळख, अर्धवट विवस्त्रावस्था आणि ही ध्यानीमनी नसताना उद्भवलेली इमर्जन्सी!
यास्मिनच्या दृष्टीने पाहिलं तर किती विचित्र परिस्थिती ही! तसं म्हणलं तर रॉब अनोळखी, पण त्याच्याबरोबर शारीरिक संबंध जवळजवळ येणारच होते, इतका जवळचाही. त्याला सोडून जायचं? का त्याच्याबरोबर राहायचं? कोणत्या नात्याने? तिचं मन ग्वाही देतं- मैत्रीच्या! आणि अर्थात, सोशल मीडियाच्याही! ती त्याच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये येते, त्याला सोबत करते, त्याचा आधार होते.
रॉबला प्रश्न पडतो. ही इतकं का करतेय? तो साधारणसा माणूस आहे. अनेक गंड असलेला. यास्मिनच्या पूर्ण विरुद्ध व्यक्तिमत्त्वाचा. या त्याच्या अवस्थेत त्याच्या ’डेट’ने त्याला बघणं किती लाजिरवाणं आहे. पण यास्मिनला हे सगळं स्वाभाविक वाटतं. का वाटतं? ती का करते हे सगळं? ही फक्त अनुकंपा आहे का आणखी काही?
याची उत्तरं मिळतील At the Hospital, an Interlude of Clarity या गोष्टीत. Amazon Prime वर Modern Love नावाची एक वेब सीरीज आहे, त्यातली ही एक कथा. या सीरीजमध्ये अशा आठ प्रेमकथा आहेत. अतिशय वेगळ्या. तरीही प्रेमाच्या धाग्याने बांधलेल्या. या कथांमधलं सेटिंग ’मॉडर्न’ आहे. सगळ्या कथा न्यू यॉर्कसारख्या लखलखत्या, सतत धावणाऱ्या महानगरात घडतात. सगळ्या सत्यकथा आहेत.
सांगण्यासाठी मी हीच गोष्ट का निवडली? कारण तरुण मुलं, casual dating करणारी, सोशल मीडियासाठी जगणारी मुलं मी पाहते, पाहिली आहेत. सारं काही देखाव्यासाठी, सारं काही दुसऱ्यांना दाखवण्यापुरतंच होत चाललंय की काय असा प्रश्न या मुलांना पाहून पडतो. गुन्हेगारी, राजकारण, कट, कारस्थानं, ड्रग्ज या अतिशय गंभीर विषयांचं या पिढीला काहीही वाटत नाही. Link ups, break ups ही सहज होतात. मैत्री आणि प्रेमाबद्दल काय वाटतं यांना नक्की? कोणतीच भावना मनात खोल उतरत नाहीत की काय? मला काही टोटलच लागत नाही; किंवा जे उत्तर समोर येतं ते सहन होत नाही. पण अशा ’सत्यकथा’ पाहिल्या की कुठेतरी दिलासा मिळतो.
इकडे, हॉस्पिटलमधली रात्र सरते. सगळे मुखवटे उतरले आहेत. यास्मिन प्रत्यक्षात इतकी फटाकडी नाहीये, तर अगदी साधी, हाडामांसाची मुलगी आहे. तिलाही गंड आहेत, भीती वाटते, दु:ख आहे, रॉबसारखंच. पण ती प्रचंड 'sorted' आहे. रॉबच्या रक्ताने माखलेला तिचा सुंदर ड्रेस ती एका मौल्यवान भेटवस्तूसारखा मिरवते. एक विचित्र रात्र आणि त्या नंतर उगवलेला नवीन, प्रसन्न दिवस यांच्या interlude नंतर त्या दोघांचं काय होईल? यास्मिनला त्याची clarity पहिल्यापासूनच होती, पण आता रॉबलाही जाणवतं- या नंतर जे होईल ते होईल, पण या आधी जे झालं ते फार सुंदर होतं. ते तर नाकारता येणार नाही ना?
’प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं’- या ओळी घासून गुळगुळीत झालेल्या असल्या, तरी त्याच शाश्वत आहेत. प्रेम सुंदर असतं. ती भावना माणसाचं माणूसपण जागृत ठेवते हेच काय ते खरं. माझ्यासारख्या ’मॉम’ पिढीच्या बाईचा तर यावर विश्वास आहेच, पण सर्वार्थाने गॅजेट्सच्या अधीन झालेल्या आधुनिक पिढीचं आधुनिक प्रेमही याच मूल्यांवर बहरतं आहे
आणखी एक मस्त गोष्ट म्हणजे, ऍमॅझॉन प्राईमवर या पहिल्या सीझनचे आठही भाग एकाचवेळी रीलीज झाले आणि त्यांना पहिल्याच आठवड्यात इतका दणदणीत रिस्पॉन्स मिळाला, की ऍमॅझॉनने लगोलग दुसऱ्या सीझनचीही घोषणा केली होती. कोविडमुळे तो जरा मागे पडला, पण आता लवकरच येईल. मला इतकंच सांगायचंय, की प्रेम जेव्हा केव्हा, कुठल्याही परिस्थितीत भेटायला येतं ना , तेव्हा त्याला आलिंगन द्यायचं असतं त्यामुळे, दुसरा सीझन यायच्या आधी हा सीझन पहायलाच हवा. प्रत्येक गोष्टीमध्ये हटके मांडणी, जबरदस्त कास्ट आणि रोमान्सचा प्रसन्न शिडकावा आहे. त्या पाहून तुमच्या हृदयातल्या तारा झंकारणारच आहेत. कारण, एक नक्की आहे... अन्न, वस्त्र, निवारा यांच्याबरोबर प्रेम ही सुद्धा माणसाची मूलभूत गरज आहे. All you need is love
0 comments:
Post a Comment