May 7, 2021

बापमाणूस

 

“रोहित, अरे ते गेल्या महिन्याचं दूध बिल भरायचं आहे. तुझं बिल तू ऑनलाईनच भरतोस ना? माझंही भरशील का रे या वेळी?” बाबांचा अजिजीयुक्त आवाज ऐकून रोहितला कसंसंच झालं.

“हो भरतो की बाबा. कधीपासूनच म्हणतोय मी की ऑनलाईन भरा. पण तुम्हालाच जायचं असतं मेहेंदळ्यांकडे दुकानात. त्याच नाही, तर सगळ्याच!” तो एकदम बोलायलाच लागला, इतक्या दिवसांचा वैताग एकदम बाहेर पडला त्याचा. “ भाजी, फळं, किराणा, मिठाई काय हवं ते ऑनलाईन मागवून घरपोच येतं. आता आपण वीजबिल, केबल, टेलिफोन, मोबाईलची बिलं नाही का ऑनलाईन भरत? पण तुम्हाला आणि आईला पटतच नाही! कधीपासून सांगतोय मी की बाबा, स्वत: उठून कुठेही जाण्याची आता काहीही गरज उरलेली नाहीये.”

“हो! खरं तर जगण्याचीच काही गरज उरलेली नाहीये!” बाबा एकदम उद्वेगाने म्हणाले.

“अहो काहीही काय बाबा! कुठून कुठे जाता तुम्ही!” रोहित एकदम सटपटला.

“अरे... एक बिल भर म्हणलं, तर किती ऐकवतोस! आम्हाला कळत नाही असं का वाटतं तुम्हाला? पण जुने संबंध असतात. दर महिन्याला मेहेंदळे दिसतात, ख्यालीखुशाली विचारली जाते. भाजीवाली, फळवाला... कित्येक वर्षांचे बांधलेले आहेत. चार-दोन शब्द बोलतात, बरं वाटतं. आईच्या तेवढ्याच गप्पा होतात तिच्याशी. आजोबा-आजोबा म्हणत किराणावाला बेस्ट क्वालिटीचा माल देतो. हे ऑनलाईन मिळतं का रे? लॉकडाऊन-लॉकडाऊन करत आमची प्रभात फेरी बंद, बागा बंद, हास्यक्लब बंद, पोहोणं बंद. आता नेहेमीच्या चार दुकानांतही जाणं बंद करा म्हणताय! अरे विरंगुळा असतो तो आमचा. पाय मोकळे होतात, हवा बदलते, विषय बदलतो... त्याची किती गरज असते ते तुला आत्ता नाही कळणार...” बाबांच्या स्वराला दु:खाची किनार होती.  

“अहो, तुमच्याच तब्येतीसाठी...”

“काय अर्थय हे असं भिऊन जगण्यात?”

“बाबा, अहो असं नका ना बोलू...” रोहित आता रडकुंडीला आला.

“बर, ठीके.” रोहितचा हतबल आवाज ऐकल्यावर बाबांनीच स्वत:ला सावरलं. “ते बिल भर. आणि इतकंच वाटतं बापाबद्दल, तर आमच्या मनूला पाठव रोज दुपारी. माहिताय तिची शाळा असते वगैरे. पण आता संपली ना तीही? मग रोज दुपारी तास-दोन तास येऊदे तिला. आमची नात आली की तुझी आईपण काहीतरी खाऊ वगैरे करते, तेवढीच आमची चैन!" बाबा सगळं विसरून त्यांच्या पद्धतीने खो-खो हसले.   

रोहितचा जीव भांड्यात पडला. वयाची चाळिशी आली, नोकरीत हुद्दा, पैसा आला, परदेश हिंडून झाले, स्वत: बाप झाला, तरी तरी सत्तरी गाठलेल्या बाबांशी नक्की कसं डील करायचं हे त्याला कधीच उमजलेलं नव्हतं. पण शेवटी बाबा ते बाबाच. रोहितला नसलं, तरी त्यांना तर माहीत होतंच... कधी रागवायचं, कधी रुसायचं, सावरायचं आणि हसवायचंही!

***

0 comments: