April 29, 2021

चैत्रांगण

 

गुढीपाडवा झाला, की तीन दिवसांनी चैत्रगौर बसते. या गौरीचं, तिच्या साधेपणाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. बघा हं- गौर शक्यतो पाळण्यात बसते, तिला आरास असते फुला-फळांची... फुलं कोणती, तर या दिवसात येणारी मोगरा, चाफा अशी सुगंधी आणि फळं तर साधी- टरबूज, कलिंगड, काकडी! खाऊ म्हणून कैरीची डाळ आणि पन्हं, बत्तासे आणि चणे- म्हणजे उन्हाच्या तलखीपासून थंडावा देणारे, इतकंच नाही, तर मन उल्हसित करणारे पदार्थ. गौर पाळण्यात बसवतात, म्हणजे संध्याकाळच्या वेळी उन्हं कलल्यावर गार वारं सुटतं तेव्हा तिलाही मंद झोके घेत माहेरपणाचा आनंद घेता यावा... किती गोडवा लपला आहे या परंपरांत! हळदीकुंकवाला मैत्रिणी, बहिणी येतात तेव्हा त्यांचं स्वागत करतात चंदनाचा लेप लावून- पुन्हा उष्णतेचा आणि सुगंधाचा विचार केलाय.

गौर बसली की त्यावेळी हे चैत्रांगण, म्हणजेच ही पारंपरिक रांगोळी काढली जाते. या एका रांगोळीत तर काय काय सामावलंय! तिच्या detailing आणि symbolism मला भूल पडलीये... मध्यभागी चैत्रागौरीची स्थापना, तिला वारा घालणारे दोन पंखे, दिवा, गायीची पावलं, लक्ष्मीची पावलं, निरांजनं, दिवे, समया, मग आपला हक्काचा, लाडका, सगळीकडे प्राधान्य असलेला गणपती, त्याचा छोटुकला उंदीर आणि मग शंख, चक्र, गदा अशी शुभचिन्ह, चैत्राचं द्योतक असलेली गुढी, बुद्धीची देवता सरस्वती, तुळशीवृंदावन, दिवा... अशी असंख्य शुभचिन्ह. ती बघताना, रेखताना फार प्रसन्न वाटतं. 


 

गौर चांगली एक महिनाभर माहेरी बसते. चैत्रासारखा प्रसन्न महिना, कैरी-फणस-आंब्याचे निवांत दिवस, कोणतीही इतर सणांची गडबड नाही. सहसा उन्हाळ्याने आपला जीव दमतो, वैतागतो. पण चैत्रातला उन्हाळा जरूर अनुभवावा असा, गरम, पण सोसवेल असा. वैशाखातल्यासारखा ऊग्र नाही. म्हणूनच  लेकीबाळींना माहेरी आवर्जून बोलवण्याचा हा महिना. त्याही वाळवणं, साठवणं करत, आईला मदत करताकरता गप्पा, खेळ, गाणी म्हणत माहेरपण अनुभवतात, हळदीकुंकवाच्या निमित्ताने एकमेकींकडे जातात, हसतात, खिदळतात. चैत्रगौरीचा साधेपणा आणि त्यातही असलेली संपन्नता, संतुष्टी याचा मोह मला पडतो. आणि चैत्रांगण तर इतकं आवडलंय, की रांगोळी नाही, यावेळी चित्रच काढून आता ते देवाजवळ ठेवलं आहे. अशी शांतता, आनंद आणि समाधान आपल्या सर्वांनाच लाभो हीच देवीकडे प्रार्थना _/\_

***  

0 comments: