April 24, 2021

बाई जाते...

 

भरल्या घरातली बाई

संसार अर्धवट टाकून जाते तेव्हा...

तेव्हा ती मागे नेमकं काय काय सोडून जाते...

तिची जिवाभावाची, रक्तामांसाची, जिव्हाळ्याची माणसं,

सगेसोयरे, मैत्रिणी, शेजारणी...

भाजीवाला, दूधवाला, किराणावाला...

आणि सोडून जाते ती आख्खं भरलेलं घर.

तिने स्वत: भरलेलं घर- धान्य, डाळ, तांदूळ...

काही विकतचा, काही तिने स्वत: केलेला खाऊ,

उरलेला स्वयंपाक, भरलेला फ्रीज

तिचे कपडे... रोजचे, खास, समारंभाचे

साड्या, दागिने- खरे, खोटे

चपला, पिशव्या, पर्सेस...

सजावटीच्या वस्तू, कामाचे कागद, पैसे...

 

भरल्या घरातली बाई

संसार अर्धवट टाकून जाते तेव्हा...

माणसं आणि वस्तू एका क्षणात होतात पोरके.

माणसं आधीसारखी रहात नाहीत.

ती जगतात, पण पर्याय नसल्यासारखी.

तिचा हात लागलेलं धान्य शिजत नाही

भाज्या कोमेजतात, फळं, मिठाई कडू होतात.

तिने ल्यायलेले कपडे भासतात फिकट

दागिन्यांचं जातं तेज आणि

वस्तू मोडकळीला येतात.

 

 

भरल्या घरातली बाई

संसार अर्धवट टाकून जाते तेव्हा...

तेव्हा ती एकटी जात नाही.

भरल्या घरातली बाई

संसार अर्धवट टाकून जाते तेव्हा...

तेव्हा जातं आख्खं घरच.

0 comments: