March 18, 2021

अधिक सुजाण पालकत्वासाठी ’पालकशाळा’

 

Parenting is the easiest thing in the world to have an opinion about,

but the hardest thing in the world to do!

-Matt Walsh

पालक होणं सोपं, पण पालकत्व निभावणं कठिण याचा प्रत्यय मूल जन्माला आल्यापासून प्रत्येक क्षणाला प्रत्येक पालकाला येत असतो. ’मी माझ्या मुलांचा मित्रच होणार आहे, मी त्यांना कधीही रागावणार नाही, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असेल’ इत्यादी ’वल्गना’ करणारे पालक मुलाच्या वाढीच्या विविध टप्प्यावर ’हे असं करू नकोस, मी सांगतोय तसंच व्हायला पाहिजे, आई-वडिलांशी असं बोलतात का?’ अशी भाषा कधी करायला लागतात हे त्यांना समजतदेखील नाही.

प्रत्येक मूल म्हणजे एक कोडं असतं. सामान्यपणे आनंददायक, रोमहर्षक असणारं हे कोडं, वेळप्रसंगी पालकांना मात्र चांगलंच कोड्यात टाकतं. पालकांनी कधीही न अनुभवलेले, कधी कल्पनाही न केलेले प्रश्न, प्रसंग, समस्या त्यांच्या पाल्यांच्या निमित्ताने जेव्हा दत्त म्हणून समोर उभ्या राहतात, तेव्हा पालकत्वाचा खरा कस लागतो.

पालकत्व म्हणजे नेमकं काय? ते कधी सुरू होतं? मूल जन्माला आल्यापासून, का ते प्राथमिक शाळेत जायला लागल्यावर? का पौगंडावस्थेत? आपल्या पाल्याला भविष्यासाठी कसं तयार करायचं? त्याला कुठवर संरक्षण द्यायचं? त्याला संकटांचा सामना समर्थपणे नाही करता आला तर? प्रश्नांची ही जंत्री न संपणारी आहे; आणि हेही तितकंच खरं, की यातल्या एकाही प्रश्नाला ’मॉडेल’ उत्तर नाही. पण, यापैकी अनेक प्रश्नांचा अभ्यासपूर्ण, वैज्ञानिक उहापोह करणारं, पालकांच्या समस्यांना भिडणारं एक पुस्तक मात्र आपल्या भेटीला आलेलं आहे- ’पालकशाळा- अधिक सुजाण पालकत्वासाठी.’ पालकत्वाशी संबंधित विविध पैलूंवर श्री. प्रसाद मणेरीकर, डॉ. सुनील गोडबोले, डॉ. वैशाली देशमुख, डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. अनघा लवळेकर, डॉ. शिरीषा साठे आणि डॉ. श्रीराम गीत या सात मान्यवरांचे लेख यात समाविष्ट आहेत

 


 

प्रयोगशील शिक्षणात २००५ सालापासून कार्यरत असलेले श्री. प्रसाद मणेरीकर यांच्या लेखाने पुस्तकाची सुरूवात होते. मूल वाढण्यासाठी पोषक वातावरण कसं तयार करावं, त्यांची कौशल्य कशी विकसित करावीत आणि त्यांना भविष्यकाळासाठी कसं तयार करावं याबद्दल मणेरीकरांनी विस्तृत लेखन केलं आहे. मुलांच्या पंचेंद्रियांचा, ज्ञानेंद्रियांचा विकास वयाच्या दहा वर्षापर्यंत अतिशय वेगाने सुरू असतो. मुलांना या वयात मुक्तपणे वावरू द्यावे. रंग, स्पर्श, चव, वास, श्रवण, भाषा याचे जितके अधिक अनुभव मुलांना मिळतील तितकी ती संवेदनशील होतात. निसर्गाच्या सान्निध्यात राहणारी, त्यांच्या वयाच्या सवंगड्यांशी खेळणारी मुलं आपोआप घडतात. मुलांना पालकांचं, कुटुंबाचं विनाअट, भरपूर प्रेम आणि संरक्षण मिळालं की त्यांचं व्यक्तिमत्त्व बहरतं. निकोप वाढलेली अशी मुलं स्वत:चा भविष्यकाळ ख-या अर्थाने घडवू शकतात.

 

स्मार्ट पालकत्व’ या लेखात डॉ. सुनील गोडबोले यांनी मुलांच्या वैशिष्ट्यांचाच मुद्दा अधोरेखित केला आहे. प्रत्येक मूल वेगवेगळ्या आघाड्यांवर कमी-जास्त असतं. कोणाची गणिती बुद्धिमत्ता उत्तम असते, तर कोणाची सांगीतिक, कोणी चपळ असतो, तर कोणाला अप्रतिम कल्पनाशक्तीची भेट मिळालेली असते. आपलं मूल नेमकं कशात ’स्मार्ट’ आहे हे ओळखणं म्हणजे ’स्मार्ट पालकत्व’. मुलाच्या या विशिष्ट पैलूंना आणखी चमक मिळण्यासाठी पालक म्हणून सजगतेने कसे प्रयत्न करावेत याचं मुद्देसूद विवेचन डॉ. गोडबोले यांनी केलं आहे.

अडनिड्या वयातली मुलं आणि त्यांचे पालक यांच्यात अनेकदा अवघडलेपणा येतो, कारण त्यांच्यात संवादच होत नाही. घाई, वेळ नसणं, मुलांच्या विश्वाशी समरूप होता न येणं अशी अनेक कारणं असतात. त्यातून मग पालक म्हणजे ’सारख्या सूचना’ आणि मुलं म्हणजे ’सूचना नकोत’ इतक्याच मर्यादित भूमिका दोन्ही बाजू निभावत बसतात. खरंतर, पौगंडावस्थेच्या नाजूक काळात मुलामुलींचे खऱ्या अर्थाने मित्र होण्याची फार छान संधी पालकांकडे असते. मुलांची संवादाची गरज पालकांमार्फत घरातच पूर्ण झाली, तर या काळातल्या भावनिक आंदोलनांतून ती सहजपणे पार पडू शकतात. अहेतूक संवादाचं हेच महत्त्व आणि त्याचं तंत्र विशद करून सांगितलंय समुपदेशक डॉ. वैशाली देशमुख यांनी.

वयात येणाऱ्या मुलांमधल्या शारीरिक बदलांचा अर्थ त्यांना नेमका कसा समजावून सांगायचा हा प्रश्न प्रत्येक पालकाला भेडसावतो. अर्धवट वयातल्या आपल्याच मुलामुलींशी लैंगिकतेबद्दल बोलायला कोणत्याही आई-बाबांना संकोच वाटतोच. पण, हा विषय टाळूनही चालत नाही. मग ही तारेवरची कसरत कशी पार पाडायची? त्यांच्या स्वप्रतिमेला धक्का न लावता स्वभावाला कसं वळण लावायचं याचं अतिशय नेमकं विवेचन डॉ. अविनाश भोंडवे यांच्या लेखातून होतं.

समाजातलं एकल पालकत्वाचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. मृत्यू, घटस्फोट या कारणांच्या बरोबरीने एकाच घरात असूनही, कामाच्या अतिशय व्यग्र वेळापत्रकामुळे एकाच पालकावर पाल्याची पूर्ण जबाबदारी असण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. अशावेळी पाल्याला अधिकचं स्वातंत्र्य द्यायचं, का त्याच्यावर अधिकची बंधनं घालायची या दोलायमान अवस्थेत एकल पालक अडकतो. एकल पालकत्वाच्या अनेक बाजू डॉ. अनघा लवळेकर यांनी त्यांच्या लेखात मांडलेल्या आहेत. हे आव्हान थकवणारं असलं, तरी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली, तर एकल पालकत्वही नॉर्मल आणि अत्यंत समृद्ध बनू शकतं अशी सकारात्मक बाजूही त्यांनी आवर्जून मांडलेली आहे.

दारू-सिगारेट, अंमली पदार्थ यांबरोबरच माध्यमांचंही ’व्यसन’ आता मुलांना लागत आहे. ’व्यसन’ म्हणजे नेमकं काय? आपल्या पाल्याला ’व्यसन’ लागलंय हे कसं ओळखायचं? ज्येष्ठ समुपदेशक डॉ. शिरीषा साठे यांनी या अतिशय गंभीर समस्येचा वेध त्यांच्या ’मुलं, व्यसन आणि पालकत्व’ या लेखातून घेतला आहे. व्यसनांमुळे शरीरावर परिणाम होतो, संवेदना बोथट होतात, मूल एकटं पडतं, त्याची स्व-प्रतिमा खालावते, त्याच्या भविष्यावर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. कोणत्याही मुलावर ही वेळ येऊ नये आणि आली, तर काय करावं यासाठी हा लेख वाचायलाच हवा.

 

पाल्याचं ’करियर’ हा सगळ्याच पालकांच्या जिव्हाळ्याचा आणि काळजीचा विषय असतो. पण कोणतंही करियर करण्यासाठी मूल सक्षम करण्याची जबाबदारी पालकांवर असते; आणि ती जबाबदारी अचानक पाल्याच्या बारावीनंतर सुरू होत नाही! मुलाच्या जडणघडणीतच काही गोष्टी लहानपणापासूनच बिंबवल्या, तर पुढे जाऊन त्याच्या आवडत्या करियरमध्ये कसा फायदा होऊ शकतो हे विशद केलं आहे लेखक आणि काउन्सेलर डॉ. श्रीराम गीत यांनी. ’सुजाण पालकत्व’ या त्यांच्या लेखातली ’करियरची दशसूत्री’ ही तर विशेष मननीय आहे.

आपलं मूल फक्त आकाराने लहान असतं. पण, त्याला त्याचा स्वत:चा स्वभाव असतो, आवडीनिवडी असतात, कल असतो. पालक म्हणून आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीला जसं समजून घेतो, तसंच , किंबहुना त्यापेक्षा अधिक सजगतेने आपण आपल्या मुलाला समजून घेणं गरजेचं आहे. पालकत्व ही एक ’प्रोसेस’ आहे. हा एक वसा आहे, जो एकदा घेतला की टाकता येत नाही. हा वसा थकवणारा आहे, कस पाहणारा आहे, पण मन:पूत समाधान देणाराही आहे. पालकत्व या अवघड विषयावर सात ज्येष्ठ अभ्यासकांचं एकत्रित लेखन वाचायला मिळणं म्हणजे पालकांना मिळालेली अपूर्व भेट आहे. प्रत्येक वयोगटातल्या पालकाच्या संग्रही ’पालकशाळा’ असायलाच हवं.

 

***

0 comments: