March 4, 2021

आजोबांचं श्रवणयंत्र

 आजोबा गेले तेव्हा मी सात वर्षांची होते, त्यामुळे माझ्याकडे बोटावर मोजता येतील इतक्याच आठवणी आहेत त्यांच्या. त्यापैकी एक म्हणजे त्यांचं ’श्रवणयंत्र’ , तेव्हा आम्ही त्याला कानाचं मशीन म्हणायचो.

आजोबा शिक्षक होते, विद्यार्थीप्रिय, पण एकदम कडक होते म्हणे. चिडले की त्यांचा गोरापान रंग लालेलाल व्हायचा. घरचे सगळे मोठेही त्यांना ब-यापैकी बिचकून असायचे. पण मी नाही! मी त्यांचं सगळ्यात धाकटं नातवंडं. मी एकदम खोडकर, बिनधास्त. त्यामुळे दादांचा काळा कोट घालून हिंडणं, त्यांची काळी टोपी घालून घरभर नाचणं हे उद्योग मी न बिचकता करत असे. ते बाहेर जायला निघाले की त्यांचा हात धरून मी त्यांना जाऊ द्यायचे नाही. ते बाहेरून आले, की धुण्याची काठा दाराला आडवी धरून मी त्यांना आत येऊ द्यायचे नाही! सत्तर वर्ष वयाच्या, सर्वार्थाने मोठ्या, करारी, लोकांमध्ये दरारा असणा-या या माणसाशी अशी जवळीक दाखवण्याची प्राज्ञा कोणाचीच नव्हती, त्यांच्या आधीच्या नातवंडांचीदेखील! पण माझ्या दृष्टीने ते ’सर’ कुठे होते? ते होते माझे आजोबा आणि मी त्यांची नात. माझे सगळे ’अत्याचार’ बिचारे हसून सहन करायचे :)    

माझी बहिण माझ्यापेक्षा वयाने आणि ताकदीने बरीच मोठी होती आणि मी अतिच्शय आगाऊ! मी तिला भयंकर त्रास द्यायचे. माझा अगाऊपणा सहन करण्यापलीकडे गेला की खूप रागावून ती माझे हात जोराने पिरगाळायची. मग अर्थातच मी भोकाड पसरायचे, कारण मी दुसरं काही करूच शकायचे नाही! पण मी कुठली हार मानायला. मेरे पास दादा थे ना! तिच्या सगळ्या तक्रारी त्यांच्यापाशी मी करायचे. मग ते तिला रागवायचे. तेव्हा कुठे मला फिट्टमफाट झाल्यासारखी वाटायची! 

तर ते कानाचं मशीन! त्यांना वयोमानाने ऐकायला कमी यायचं, म्हणून ते कानाचं यंत्र वापरत. तेव्हाचं यंत्र अगदीच प्राथमिक स्वरूपाचं होतं. मोठ्या काडेपेटीसारखी डबी, त्यात बहुदा ऍम्प्लिफायर आणि बॅटरी असावी, टेलिफोनसारखी बारिक वायर आणि वायरच्या टोकाला इयरपीस- जो कानात घालायचा. या यंत्रातून सतत जबरदस्त खरखर ऐकू यायची; तो कानात नसला तरी! ते यंत्र म्हणजे माझं आवडतं खेळणं होतं. ’दादांचं यंत्र’ म्हणून इतर कोणीही त्याला लावत नसत, अर्थात मी सोडून! ते कानात घालायचं, मग कोणालातरी बोलायला लावायचं, मग त्याच्या खरखरीतून कर्कश आवाज येणार, मग मी फिदीफिदी हसणार हा नेहेमीचा खेळ :) :) त्या खरखरीमुळे बहुतेक दादा घरात ते यंत्र काढूनच ठेवत. त्यामुळे हाक मारली किंवा प्रश्न विचारला, तर त्यांना चटकन ऐकायला यायचं नाही. पण मी त्यांना हाक मारली की मात्र माझ्याकडे ते अतिशय प्रेमाने, लक्षपूर्वक बघत असत. त्यांना माझाच आवाज बरोब्बर कसा काय ऐकू येतो?- घरच्यांना फार नवल वाटायचं.

३ मार्च हा जागतिक श्रवण दिवस आहे असं वाचलं. त्यानिमित्ताने हे सगळं आठवलं. बालपणीच्या अनेक आठवणी अंधुक झाल्या आहेत आता. पण या काही आठवणी आणि दादांचा चेहरा मात्र स्पष्ट आठवतो. मी एरवीही खूप बोलते, खूप ऐकवते, ओरडतेदेखील. पण माझं म्हणणं नेहेमीच दुस-यापर्यंत पोचतं असं नाही. दादांना कळलं असतं बहुतेक. दर वेळी.

***   

0 comments: