#BookReview
आजच्या स्पर्धात्मक जगात विद्यार्थ्यांसाठी अकरावी-बारावीची दोन वर्ष प्रचंड खडतर जातात. दहावीपर्यंतच्या फुलपाखरी आयुष्याचं उलटं वळून अचानक सुरवंट होतं. आयुष्याला दिशा देणारं करियर करायचं असेल, तर बारावीनंतर हव्या त्या शाखेला प्रवेश मिळायला हवा, आणि त्यासाठी हीच दोन वर्ष जीव तोडून अभ्यास करायला हवा. तो करून, एकदाची हवी तिथे ऍडमिशन मिळाली की मगच सुस्कारा सोडला जातो; पण तेव्हाच ही लख्ख जाणीव होते, की शाळा आणि ज्युनिअर कॉलेजमधले आपण आणि आत्ताचे आपण ही जणू दोन वगवेगळी माणसं आहेत! उच्च शिक्षणाबरोबरच आता आपण जणू काही आपल्या अस्तित्वाचाच करणार आहोत- ’मुळारंभ’!
डॉ. आशुतोष जावडेकर यांची ही पहिली कादंबरी. ओंकार जोशी या साध्या, मध्यमवर्गीय पण हुशार मुलाची ही गोष्ट आहे. डेन्टिस्ट्री कॉलेजमध्ये त्याला प्रवेश मिळाला आहे. प्रत्येक मुलाला असते तशीच थोडी हुरहुर, थोडी उत्सुकता, थोडी भीती त्यालाही पहिल्या दिवशी जाणवते. रॅगिंगपासून वाचण्यासाठी तो लपून बसतो... आणि सुरू होतो प्रवास ओंकारचा... मोठा होण्याचा. अर्थातच त्याला भेटतात नवे मित्र, नव्या मैत्रिणी आणि हो, गर्लफ्रेन्डसुद्धा! मित्र म्हणजे कोण असतात? ज्यांच्याबद्दल सगळं काही माहित असणं, मारामा-या, शिव्या, ब्ल्यू फिल्म्स बघूनही ज्यांच्याबरोबर अवघडल्यासारखं वाटत नाहीत ते... का आणखी काही? गर्लफ्रेन्ड असणं म्हणजे नक्की काय असतं? हक्क, स्पर्श, एकांत, जवळीक... आणि आणखी काही? मोठं होणं म्हणजे काय असतं? अभ्यास, करियरचा सिरियसनेस, जबाबदारीची जाणीव... आणि आणखी काही? आई-बाबा, आजी, अनेक नातेवाईक, भावंडं यांचं आपल्या आयुष्यात काय स्थान असतं? ते आपल्याला नक्की किती हवे असतात? हवे असतात, का नको असतात? अठरा-एकोणीस वर्षाचा प्रत्येक जीव या प्रश्नांच्या भेंडोळ्यात अडकतो, फिरत राहतो, उडतो, आपटतो आणि अखेर स्थिरावतो. ओंकारची कथाही या सगळ्या वळणांवरून प्रवास करते.
ही कथा प्रत्येक ’फ्रेशर’ची कथा आहे, म्हणूनच ती अतिशय आपलीशी वाटते. माझं कॉलेज संपून वीसपेक्षा जास्त वर्ष झाली, तरीही ओंकारचे मित्र, त्यांच्यातले गैरसमज, इगो, कॉलेजचे ’डे’ज, प्रेमप्रकरणं वाचताना मीही विस्मरणात गेलेले ते माझे दिवस परत एकदा जगले. साध्या मुलाची साधी कथा आहे, म्हणून ही कथा जास्त आवडली. ओंकारचे आई-बाबा हे नॉर्मल पालक आहेत. त्यांचे स्वत:चे काही प्रश्न आहेत, पण त्या तिघांच्या नात्यात एक मोकळेपणा आहे, एक कम्फर्ट आहे- जो ख-या आयुष्यात आपल्या घरातही असतो. सध्या ओटीटी, सिनेमे, टिव्हीवरून ’नॉर्मल’ कुटुंब एकदम हद्दपारच झालेली असल्याने हे वास्तवदर्शी कुटुंब एकदम दिलासाच देऊन जातं. हां, सुरूवात काहीशी लडखडत होते आणि काही ठिकाणी कथानक खूप साधं, कन्व्हिनिअन्ट आहे ही एक बारिकशी तीट. ऑल्सो, कथानक ’लॅन्डलाईन’च्या दिवसांतलं आहे, मोबाईलच्या जमान्यातलं नाही. आजच्या जमान्यात मैत्री आणि प्रेम, किंवा कुठलंही नातं इतकं गुंतागुंतीचं झालेलं आहे, की बास! त्यामुळे हीच कथा आशूतोष यांनी आज लिहिली तर ते कशी लिहितील याचं कुतुहलही वाटलं. दहा वर्षातच जग ज्या सुपरफास्ट वेगाने बदललं आहे, की उलट ही कथा आणखीनच आपलीशी वाटली. हळूहळू मॅच्युअर होत जाणारा ओंकार, त्याचं विश्व मला अतिशय आवडलं. वयात येणा-या मुलींबद्दल अनेकदा लिहिलं, बोललं जातं. पण वयात येणा-या ’मुलग्यां’ची अवस्था अतिशय गुंतागुंतीची असते. बिचारी एकाच वेळी अनेक पातळ्यांवर लढत असतात, आणि त्यांना समजणं फार अवघड जातं. या सगळ्या गोंधळाचं जवळपास पर्फेक्ट चित्रण आशूतोष यांनी ओंकारच्या माध्यमातून केलं आहे- हे मला पुस्तकाचं बलस्थान वाटलं.
कारण, शेवटी काय आहे... टेक्नॉलॉजी असो-नसो, गॅजेट्स असोत-नसोत, मूळ प्रश्न हा मानवी भावनांचा आहे, मूल्यांचा आहे, ’स्व’ सापडण्याचा आहे... पौंगंडावस्था संपताना, काही नाती मागे सोडताना, काही हट्ट विरघळवून टाकून नवीन आकलनाच्या बळावर आयुष्याचा ’मुळारंभ’ करण्याचा हा प्रवास आहे.
***
0 comments:
Post a Comment