दर्शन घेऊन बाहेर पडताना, देवळाच्या आवारात कोप-यातल्या बाकावर अदिती बसली आहे असं तिला वाटलं. तिने निरखून पाहिलं. त्या मुलीने मान खाली केली होती, हाताची घट्ट घडी होती, खांद्यांना कंप सुटला होता. ती मुलगी रडत होती! आणि ती अदितीच होती!! तिच्याच बिल्डिंगमध्ये राहणारी तिची तरुण मैत्रिण.
तिची चलबिचल झाली. छान करियर, गोंडस मुलगा, उत्तम संसार करणारी आधुनिक अदिती देवळात येते, तिथल्याच कोप-यात बसून मन हलकं करते... काय दु:ख असेल बिचारीला? काय त्रास होत असेल, जो एकटीनेच सोसतेय? जवळ जावं का? विचारावं का?
नको!
तिला खूप खूप वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. नवीन संसार, नवीन लग्न, तिचंही सूनपण नवंच होतं. सासूबाई तिला सतत तिरकं बोलत. तिला उलट उत्तर द्यायला जमत नसे. एक दिवस त्या असंच काहीतरी लागट बोलल्या आणि आईची अनावर आठवण येऊन ती घराजवळच्या देवळात येऊन अश्रू ढाळत बसली. एवढ्यात शेजारच्या लिमयेकाकू तिच्याशेजारी येऊन बसल्या. त्यांनी पाठीवर हात ठेवून मायेने तिची विचारपूस केल्यावर ती हमसून हमसून रडली, तिने निष्पापपणे त्यांना सासूबाईंच्या वागण्याबद्दल सांगितलं. त्यांच्याशी बोलल्यावर तिला खूप बरं वाटलं. तिची समजूत काढून त्याही उठल्या. बाजारहाट करून घरी पोचते, तोवर काकूंनी झाला प्रसंग आडवळणाने सासूबाईंच्या कानावर घातलेला होता. मग तर उघडपणे खरडपट्टी निघाली होती. तेव्हापासून कानाला खडा! त्या देवळात जायचं नाही, कोणापाशी आपलं काही सांगायचं नाही. रडायचं, पण एकटीने. त्या हळव्या क्षणाला आपल्याला पूर्ण समजून घेईल असं कोणीही नसतं.
खरं तर, प्रत्येक वेळी फार काही मोठी ठेचही लागलेली नसते, पण रडू येतं खरं. कधी एखादा अपमान असतो, कधी डाववल्याची भावना, कधी पराभव, कधी अपयश, तर कधी एखादी तीव्र आठवण. रडायचं कोणासमोर पण? आणि कुठे? फार गुंतागुंतीचे प्रश्न, त्यापेक्षा देवळातला एखादा कोपरा किंवा एखादा झाडाखालचा पार बरा. दोन घटका बसा, मळभ दूर जाऊद्या, मोठा श्वास घ्या, दोन घोट पाणी प्या... निघा! मनही हलकं होतं, कोणाला काही समजतही नाही. त्या नाजूक वेळेला मात्र कोणी बघायला नको आणि हटकायला तर त्याहून नको!
नकोच.
अदितीकडे मायेने बघत ती बाहेर पडली.
दुस-या देवळातला तिचा तो ठरलेला बाक तिची वाट बघत होता.
***
1 comments:
chan
Post a Comment