अभिलाष पाटणकर. ठरलेल्या जागी, ठरलेल्या वेळी उभा होता. एका हातात हेल्मेट, एकात ऑफिस बॅग… फोटोतल्यापेक्षा जास्त हॅन्डसम दिसत होता. त्याला प्रत्यक्ष पाहिलं आणि मधुची चिडचिड बरीच कमी झाली. एक तर तो सांगितलेल्या वेळेला हजर होता, हेल्मेट घालणारा होता आणि एकूणात त्याचं व्यक्तीमत्त्व रुबाबदार वगैरे वाटत होतं.
खरं तर या भेटीकरता ती अगदी मनाविरुद्ध आली होती. पण बाबा नेहेमी म्हणायचे त्या प्रमाणे, ’मधुताई, एकदा या बाजारात उतरलं की इलाज नाही! लग्न करायचंय ना, मग या अशा भेटीगाठी कराव्याच लागणार!’ आणि आई यावर लगेच ’तरी आमच्यावेळी असं नव्हतं…’ची पुस्ती आणि त्यापुढचे ठरलेले डायलॉग जोडायची.
पण अभिलाषला पाहिल्या पाहिल्याच मधुच्या हृदयातली धडधड का कोण जाणे वाढली होती. एक मोठा श्वास घेऊन ती त्याच्याजवळ पोचली.
“हाय! मी…”
“माधुरी दिक्षित!” तो हसतच म्हणाला. मधु खट्टू झाली. उफ्फ! हे नाव!
“एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचं नाव हेच आपलंही नाव असणं म्हणजे काय असतं याची कल्पना आहे मला! तुझं दु:ख मी समजू शकतो.” तो आत वळतावळता म्हणाला आणि त्याचं हे पहिलंच वाक्य ऐकून मधु त्याच्या प्रेमातच जवळपास पडलीच.
फूडकोर्टमध्ये ते बसले.
“आमचे बाबा माधुरीचे प्रचंड फॅन. अनायसे आमचं आडनावही दिक्षितच. त्यामुळे माझं नाव त्यांनी अगदी ठरवून माधुरी ठेवलं. पण या नावाचा मला लहानपणी किती त्रास झाला आणि त्यापायी काय काय सहन करायला लागलं आहे हे त्यांना नाही माहित. आताही, माझी किती चिडचिड होते हे बाबांना सांगितलं तरी त्यांना पटत नाहीच. ते उडवून लावतात. म्हणतात, इतक्या सुंदर हिरॉइनचं नाव आहे तुझं, उगाच कटकट करतेस! अरे, उगाच कशी कटकट करेन? ’एक दो तीन वर डान्स येतो का तुला’ हा प्रश्न तर मला अजूनही विचारतात. कुठेही नाव सांगितलं, की सगळ्यात आधी “अय्या”, “ओह” अशा प्रतिक्रिया तर अगदी कॉमन! आमच्या प्रिन्सिपल तर म्हणतात, की म्हणे तुझं नाव ऐकल्यामुळेच आपल्याकडे निम्मे प्रवेश होतात. जसं काही खरी माधुरी दिक्षितच मुलांना शिकवायला येणार आहे की नाही!”
मधुच्या मनातली खदखद आज अनेक दिवसांनी अचानकच बाहेर पडली. पण ती जराशी खजिलही झाली. हा काय लग्नाकरता भेटायला गेलेल्या मुलाशी बोलायचा विषय होता का? तोही पहिल्याच भेटीत? काय वाटलं असेल त्याला? कधी नव्हे ते आवडलेल्या मुलासमोर हे असं पाल्हाळ लावून तिने स्वत:च्याच पायावर कु-हाड तर मारून घेतली नव्हती ना? धास्तावून तिने हळूच अभिलाषकडे पाहिलं तर तो तिच्याकडेच बघत होता. जोरात हसत तो म्हणाला,
“इमॅजिन कर, खरंच माधुरी तुझ्या शाळेत शिकवायला यायला लागली तर काय होईल? मला वाटतं तुझ्या मॅडम तुला मुद्दाम चिडवत असतील. असं काही नसतं. नावात काय आहे? शेवटी तुमचं काम कसं आहे ते महत्त्वाचं. पण प्रायमरी टीचर म्हणजे प्रचंड पेशन्सचं काम… मुलांचं ऐकून घ्यायचं, मग आपलं त्यांना ऐकवायचं…” हसल्यावर हा आणखीनच मस्त दिसतो… मधुचं लक्ष भलतीकडेच होतं!
“अं, हो ना! पण मुलं भारी असतात. एस्पेशली ही ८ ते १० वर्षाची मुलं मला जाम आवडतात. म्हणजे ती अतिशय दंगेखोर असतात, पण त्यांचं डोकं भन्नाट चालतं. कसले कसले विचार करतात, कसलं पर्फेक्ट लॉजिक लावतात! एकदम भारी. आणि अरे, त्यांचं नीट ऐकून घेतलं ना, की तीही आपलं नीट ऐकतात.”
आपण खूपच बोलतोय असं मधुला परत एकदा वाटलं आणि ती ब्रेक लागल्यासारखी गप्प बसली. तीच संधी साधून त्याने विचारलं,
“तू काय घेणार?”
“इथला ’चाय एक्स्प्रेस’चा चहा मला फार आवडतो. मी आणते ना. तुलाही आणू का?”
“मीही येतो ना बरोबर. बाय द वे, तू कधी तो तंदूर चहा प्यायली आहेस? कसा वाटला तुला?”
“छे! काहीतरी नवीन म्हणून ट्राय केला तर कुठून तो चहा प्यायला असं वाटलं. तो काय चहा आहे का? किती जळका लागतो. काही चवच नाही...”
“ग्रेट! म्हणजे हे जुळलं आपलं! त्याची जितकी हाईप आहे तितका काही मला तो आवडला नाही. त्यापेक्षा टपरीवरचा चहा बरा! तू बस, मी आणतो आपल्यासाठी मसाला चहा. बनमस्का खाशील?”
“आनंदाने!”
तो परत एकदा हसला आणि चहा आणायला गेला.
मधुच्या कानात त्याचं ’हे जुळलं आपलं’ हे वाक्य अजूनही वाजत होतं. जुळेल का याच्याशी आपलं? किती कूल आहे हा. आणि किती हसरा. आणि हॅन्डसम. आणि हुशार तर आहेच. हा आवडतोय नक्की. याच्याशी खूप खूप बोलावंसंही वाटतंय. नाहीतर आधी पाहिलेली मुलं! कधी एकदा ती भेट संपतेय असं वाटायचं.
चहा पीतापीता संभाषण एकमेकांच्या आवडीनिवडींवर आलं.
“मला शास्त्रीय संगीत ऐकायला अतिशय आवडतं. म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच. दर वर्षी सगळ्या संगीत महोत्सवांमध्ये हजेरी लावतो आम्ही. बाबांकडे अनेक नामवंत गायकांचं मस्त कलेक्शनही आहे. आणि या पिढीतला राहुल देशपांडे मला भयंकर म्हणजे भयंकरच आवडतो.”
मधुचं वाक्य संपतं ना संपतं तोवर अभिलाषला जोऽऽरात ठसका लागला. त्याला टिश्युपेपर देताना त्याच्या हाताचा निसटता स्पर्श झाला आणि मधुला उगाचच लाजल्यासारखं झालं.
पुढे त्यांचा गप्पा परत रंगल्या. अनेक गोष्टी जुळत होत्या. ही भेट लवकर संपूच नये असं वाटत होतं. पण निघायची वेळ कधी ना कधीतरी होणारच होती. तशी ती झाली.
अगदी निघताना तो म्हणाला, “मधु, मला वाटतं, आपण आणखी भेटायला हवं. तू तुझ्या आई-बाबांशी बोलशील का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तू जसं तुझ्या मुलांचं पेशन्टली ऐकतेस…तसंच आपल्याबाबतीतही करशील का प्लीज?”
त्याला नक्की काय म्हणायचं आहे ते मधुला स्पष्ट समजलं नाही, पण तिला हे मात्र समजलं की त्याला तिला परत भेटायची इच्छा आहे. तिलाही तेच तर हवं होतं. तिने मान डोलावली.
***
मधु तरंगतच घरी आली. आई-बाबा तिची वाटच बघत होते.
“आई, थँक्यु, थॅंक्यु, थॅंक्यु! मला जबरदस्तीने आज पाठवलंस म्हणून मला आज अभिलाष भेटला. आई, आम्ही खूप गप्पा मारल्या. आमची मतं ब-यापैकी जुळतायेत. परत एकदा भेटायचं का असं त्याने मला विचारलंय. आई-बाबा, मला हा अभिलाष खूप आवडलाय… मला याच्याशीच लग्न…”
“ए बाई! जरा थांब. काय हा उतावीळपणा. एक भेट झाली नाही तोवर एकदम लग्न…” आईने मधुच्या फुग्याला टाचणी लावली.
“आई, काय गं! अगं खरंच मला आवडलाय हा. आणि तुम्हालाही त्याची माहिती चांगली वाटली म्हणून तुम्ही मला भेटायला पाठवलंत ना? मग आता थांब काय? बाबा, तुमच्या माधुरीच्याच भाषेत सांगायचं, तर ’हम सब के लिए उपरवाले ने कोई ना कोई बनाके भेजा है’… उपरवाल्याने माझ्यासाठी अभिलाषला पाठवलं आहे असं मला वाटतंय…आता कधी एकदा लग्न करून या माधुरी दिक्षितपासून सुटका होते असं झालंय मला!”
मधु लाजत होती, गिरक्या घेत होती, स्वप्न रंगवत होती आणि आई-बाबा मात्र हैराण झाले होते. काहीही न सुचून दोघेही गप्पच बसले. मधुलाही ते जाणवलं.
“काय झालं आई? तुम्ही काहीच का बोलत नाही?”
“मधु, नाही म्हणजे हा मुलगा चांगलाच आहे. तुझ्यासाठी अगदी योग्य वाटला आम्हाला. म्हणूनच तू त्याला एकदा तरी भेटावंस असा आमचा आग्रह होता. आता हे बरंच झालं की तुला तो आवडला. पण तुझ्या उतावळ्या स्वभावाचं काय करायचं? मागे एक दोन मुलं परत भेटीसाठी विचारत होती, तेव्हा कोणतंही स्पष्ट कारण न देता नाही म्हणजे नाही म्हणालीस. आता हा जरा बरा वाटला तर थेट लग्नाची स्वप्न! अगं जरा धीर, जरा संयम राखायला शीक. अहो, तुम्ही तरी समजावा तिला जरा…”
आईचा रोख नक्की कोणत्या दिशेला आहे हेच मधुला समजलं नाही. एखादा मुलगा तिला पसंत आहे ही खरी तर आई-बाबांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट असायला हवी होती, नाही का? तर आईचं काहीतरी वेगळंच चालू होतं. अचानक तिच्या स्वभावाकडे गाडी का सरकली होती? तिने गोंधळून बाबांकडे पाहिलं. बाबांनीही उगाचंच घसा साफ केला. आता मात्र तिला टेन्शन आलं. काय प्रॉब्लेम तरी काय होता नक्की?
“आई म्हणते ते बरोबर आहे. तू जरा सावकाशीने घे बाळा. हे असं आम्ही म्हणतोय कारण या मुलाबद्दल एक गोष्ट आधी माहित असूनही आम्ही ती तुला मुद्दामच आधी सांगितली नव्हती. कारण, सांगितली असती तर तू त्याला भेटायला तयारच झाली नसतीस. आणि बघ, आता तुझा आनंद पाहून वाटतंय की बरंच झालं तुला सांगितलं नाही ते. पण ती गोष्ट लपवूनही ठेवू शकत नाही ना… कसंय बाळा, आपण उगाच अनेक छोट्या छोट्या, बिनमहत्त्वाच्या गोष्टी कवटाळून बसतो. व्यापक विचार केला, तर त्या किती किरकोळ आहेत हे नंतर लक्षात येतं…”
आता मात्र मधु पूर्ण गोंधळली. आई-बाबांनी अभिलाषची अर्धवट माहिती दिली, मुद्दामच. पण आता तो मला आवडलाय म्हटल्यावर ते लपवलेलं जे काय आहे ते सांगायला तयार आहेत. म्हणजे तो व्यसनी बिसनी आहे की काय, का शिकलेला नाहीये का नोकरी नाहीये? या बाबतीत व्यापक बिपक विचार नाही हां करू शकत मी! अभिलाष खरंच व्यसनी असेल? सिगारेट ओढत असेल का दारू पीत असेल? छे! शक्यच नाही. मग त्याचा प्रेमभंग झाला असेल का? हां, हे शक्य आहे! धुळीचे लोट उठावेत तसे मधुच्या मनात विचारांचे लोट उठायला लागले. तिला असह्य झालं.
“बाबा, तुम्ही प्लीज आणखी न ताणता जे काय आहे ते मला एकदाचं स्पष्ट सांगता का? मगाचपासून तुम्ही जे काय गोल गोल बोलताय त्यातून मला काहीही कळलेलं नाहीये.”
“अगं म्हणजे तू एक स्थळ म्हणून, तुझा साथीदार म्हणून या मुलाचा नीट विचार कर. तो तुला अगदी अनुरूप आहे असं आम्हाला वाटतंय. आणि तुलाही तो आवडलाय. पण मेख अशी आहे, की अभिलाष हे त्याचं खरं नाव नाहीये. त्याचं खरं नाव आहे -राहुल देशपांडे!”
अं? मधुच्या पायाखालची जमिनच सरकली. ती मटकन खालीच बसली. दारू-सिगारेट-प्रेमभंगापेक्षाही हे अनपेक्षित होतं! ओह गॉड! म्हणजे एका प्रसिद्ध नावाकडून दुस-या प्रसिद्ध नावाकडे? तोच आयडेंटिटी क्रायसिस? तेच ते ’ओह’, ’अय्या’, ’कसली गंमत ना’चे शेरे? लग्न झाल्यावर तरी एका प्रसिद्ध नावापासून सुटका होईल या आशेवर असताना परत एक नवीन प्रसिद्ध नाव चिकटवून घ्यायचं? नको बाबा!
मधुच्या डोळ्यापुढे त्यांच्या भेटीचे सगळे तपशील सरकायला लागले. तरीच त्याने आपली बडबड शांतपणे ऐकली, चिडचिड समजून घेतली कारण त्यालाही हेच अनुभव येत असणार. आणि ’राहुल देशपांडे आवडतो’ असं म्हणल्यावर त्याला लागलेला तो ठसका… अय्या! अनवधानाने आपण आपलं मनच उघडं केलं की काय? खरंच आवडलाय हा. काहीतरी स्पेशल आहे असं वाटतंय आमच्यात. हेच असतं का ते अरेंज्ड मॅरेजमधलं ’मनं जुळणं’? त्याचं हसणं, त्या पुसट खळ्या आणि त्याचे ते शब्द- ’शांतपणे विचार कर’… ओह! आता त्यांचा खरा अर्थ तिला उमगला. माणूस महत्त्वाचा का त्याचं नाव? बाबा म्हणतात तसा व्यापक विचार करायला हवा. एरवी मी अजिबात ऐकून घेतलं नसतं, पण त्याच्याखातर शांतपणे विचार करावासा वाटतोय खरा. नाव तर महत्त्वाचंच, पण ते धारण करणारा ’हा’ माणूस जास्त महत्त्वाचा वाटतोय आता.
मधु खुदकन हसली. आई-बाबा तिच्या साशंकतेने बघतच होते. त्यांच्याकडे पाहून ती म्हणाली,
“इतकंच ना? बाबा, नाहीतरी तुम्ही नेहेमी म्हणताच ना, ’नावात काय आहे?’ आणि तसंही तुम्ही दिलेल्या ’माधुरी सतीश दिक्षित’ पेक्षा ’माधुरी राहुल देशपांडे’ छानच वाटतंय!”
“म्हणजे?”
“म्हणजे ’हम आपके है कौन?’, म्हणजे ’साजन’, म्हणजे ’दिल तो पागल है’ आई!” माधुरी परत एकदा लाजायला, नाचायला, हसायला लागली.
“आचरट आहे नुसती”, असं म्हणत आई-बाबाही तिच्या आनंदात सामील झाले.
******
समाप्त
-
0 comments:
Post a Comment