December 9, 2020

शेअर बाजार: काही युक्तीच्या गोष्टी- माझा अनुभव


 

श्री. अन्नामलाई स्वामीनाथन लिखित ’Secrets to know about Stock Market Investment and Trading’ हे पुस्तक ’अनुवादासाठी योग्य आहे का?’ अशी विचारणा मला मनोविकास प्रकाशनाकडून झाली. हे पुस्तक माझ्या हातात आलं तेव्हाच त्याचा सुटसुटीतपणा लक्षात आला. वाचता-वाचता हेही लक्षात आलं की पुस्तक अतिशय सोप्या मांडणीचं आणि समजायला सुलभ असं आहे. शेअर मार्केटबद्दल इतकं छान पुस्तक मराठीत तरी नव्हतं, त्यामुळे ते अनुवादासाठी अगदी योग्य होतं. शेअर बाजार हा माझ्या वैयक्तिक आवड आणि अभ्यासाचा विषय असल्यामुळे उत्साहाने ’अनुवाद मीच करेन’ असाही आग्रह मी केला, आणि तो प्रकाशकांनीही तो आनंदाने मान्य केला.

माझ्याप्रमाणे प्रत्येक भारतीय गुंतवणूकदाराला भारतीय शेअर बाजाराबद्दल प्रचंड आकर्षण असते. वर्तमानपत्रात रोज शेअर बाजाराबद्दल बातम्या असतात. त्यांचे मथळेही ’शेअर बाजारात कोट्यवधींची उलाढाल’, ’परदेशी गुंतवणुकीमुळे शेअर बाजार वधारला’ असे आकर्षक असतात, किंवा कधीकधी ’शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे अब्जावधींचे नुकसान’ असे भीतीदायकही असतात. दूरचित्रवाणीवर शेअर बाजारातल्या घडामोडी आणि त्यांचे विश्लेषण करणा-या अनेक वाहिन्या २४ तास सुरू असतात. इंटरनेटवर एका क्लिकवर शेकडो संकेतस्थळे शेअर बाजारातली आकडेवारी घेऊन हजर असतात. त्यामुळे शेअर बाजाराबद्दल कायमच ’हवा’ असते.

भारतीय शेअर बाजार सध्या एकदम तेजीत आहे. त्याची कारणे समजण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल. १९९१च्या आर्थिक सुधारणांनंतर भारतीय अर्थव्यवस्था खुली झाली. अनेक जागतिक कंपन्या हळूहळू भारतात यायला लागल्या. २००० सालानंतर शतक तर बदललेच, पण भारताप्रती जागतिक दृष्टीकोनही बदलला. याचं प्रमुख कारण होतं- संगणक क्रांती. या क्रांतीमुळे कष्टाळू आणि गुणी भारतीय तरुणांनी जागतिक बाजारपेठेत नाव आणि लौकिकही कमावला. भारत हा एक वेगाने विकसित होणारा देश म्हणून जागतिक पटलावर आला. कधीही अपेक्षा न केलेले पैसे अचानकच लोकांच्या हातात नियमितपणे यायला लागले. २५ ते ४५ च्या वयोगटाचे जीवनमान कमालीचे सुधारले. पैसे आले त्यामुळे खर्चही वाढले. हे साहजिकच असते. भारतीय बाजार याच लाटेवर स्वार झाला. मोठी घरे, गाड्या, ब्रॅन्डेड कपडे, वस्तू, परदेश सहली, हिरे-सोने या सर्व चैनीच्या हौशी पुरवून झाल्यावर मग हाच मध्यमवर्ग उपजत शहाणपणाने आता पैसे सुरक्षित ठेवण्याचे पर्याय शोधू लागला. जमिन, घरं, बॅंकेत डिपॉझिट्स, सोनं हे पारंपरिक पर्याय होतेच, पण हा खेळता पैसा उत्तम रीतीने गुंतवला जाईल अशा नवीन पर्यायांची बाजाराला तातडीने गरज होती. ’म्युचुअल फंड’ हा एक सशक्त पर्याय याच वेळेला उदयाला आला आणि आजघडीलाही तो गुंतवणुकीचा सगळ्यात सुलभ आणि त्यातल्यात्यात खात्रीशीर पर्याय म्हणून गुंतवणुकदारासमोर आहे. या सगळ्यात भारतीय शेअर बाजार कुठे होता?

शेअर बाजार आणि देशाची राजकीय स्थिती याचाही थोडाफार संबंध असतो, हा मुद्दा इथे लक्षात घ्यायला हवा. राजकीयदृष्ट्या देश मजबूत असेल, गुंतवणुकीसाठी देशातलं वातावरण पोषक असेल, देशात परदेशी कंपन्यांच्या मालासाठी ग्राहक असतील, तर देशाची आर्थिक स्थिती भराभर वधारते. १९९१ नंतर भारतीय बाजारपेठेत हे सगळे घटक उपस्थित होते. २००० सालानंतर परदेशी गुंतवणूकदारांचा एकसंध पैसा आपल्या देशात यायला लागला आणि भारतीय शेअर बाजार ख-या अर्थाने उदयाला आला. त्या आधी बाजाराचा विस्तार तसा मर्यादित होता, तो आता अधिक व्यापक झाला. २००० सालाआधी सामान्य गुंतवणूकदार शेअर बाजाराच्या फारसा वाट्याला जात नव्हता, तो आता हळूहळू शेअर बाजाराकडे वळायला लागला.

पण हा शेअर बाजार तसा समजायला अवघड असतो. भलेभले इथे चकतात, प्रचंड पैसा कमावतात आणि गमावतातदेखील. त्यामुळे अनिवार आकर्षण आणि गुंतवलेल्या पैशाचा अतिशय उत्तम परतावा मिळण्याची हमी असूनही साधासुधा माणूस इथले ताकही फुंकून पीतो. शेअर बाजारात व्यवहार सुरू करण्यासाठी चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. पण इंटरनेट असो, टीव्ही वाहिन्या असोत किंवा या विषयावरची उपलब्ध पुस्तकं असोत... सहसा अगदी प्राथमिक बाबी तुम्हाला कोणी सांगत नाही. सगळ्यांची माहिती ही एका किमान पातळीच्या वरची असते. साहजिकच, या बाजारात पहिल्यांदा प्रवेश करणारा गुंतवणूकदार बिचकतोच. त्याच्याकडे पैसा असतो, गुंतवण्याची इच्छा असते, पण योग्य मार्गदर्शनाच्या अभावी तो माघारी जातो.      

हीच पोकळी श्री. स्वामीनाथन अन्नामलाई यांनाही जाणवली. स्वामीनाथन हे स्वत: शेअर बाजारात व्यवहार करतात. त्यांनीही अगदी प्राथमिक पायरीपासून सुरू केली आणि अतिशय कष्टाने शेअर बाजारातले तंत्र आणि मंत्र शिकून घेतले. हळूहळू त्यांनी स्वत:च्या व्यवहारांची व्याप्ती वाढवली आणि अनुभवातून यशस्वी झाले. आपल्याला असलेली माहिती अनेकांना सांगावी, त्यांना शेअर बाजाराची किमान माहिती द्यावी आणि त्यांनाही या बाजारातून उत्तम कमाई मिळवून द्यावी या उद्देशाने त्यांनी हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचा उद्देश विशद करताना स्वामीनाथन लिहितात-

किमान माहितीही न घेता, अधिकचे पैसे मिळवण्याकरता, अनेक जण शेअर बाजारात उडी मारतात आणि हात पोळून घेतात. शेअर बाजारासारख्या गुंतागुंतीच्या विषयाला थोडे सुलभपणे समजावून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी या पुस्तकाच्या माध्यमातून केलेला आहे. यात मी इतक्या सोप्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, की कसलीही आर्थिक पार्श्वभूमी नसलेल्या साध्या माणसालाही शेअर बाजारातल्या संज्ञा समजू शकतील.”

पुस्तकात हा उद्देश पुरेपूर सफल झालेला आहे. ’शेअर बाजाराचे गमभन’ इथपासून सुरूवात करून हुशार गुंतवणूकदार आणि हुशार ट्रेडर या दोघांसाठीही काही खास ’टिप्स’, ’आयपीओ’ (Initial Public Offer) आणि ’डिमटेरिअलायजेशन’, ’डिलिस्टिंग’ ’हिंदू अविभाजित कुटुंब (HUF)’ असे अनेक मुद्दे लेखकाने विस्तृतपणे लिहिले आहेत. लेखकाने संपूर्ण पुस्तकाचे आरेखन फार हुशारीने आणि मुद्देसूदपणे केलेले आहे. वाचकाला प्राथमिक माहिती आपण देत आहोत याचे भान कायम ठेवलेले आहे. त्यामुळे पुस्तक कुठेही क्लिष्ट होत नाही, उलट वाचायला आणि समजायलादेखील सोपे होते.

केवळ भारतीयच नाही, तर जगातला कोणताही शेअर बाजार नेमका कधी आणि कशामुळे उसळेल किंवा पडेल याचे गणित भल्याभल्यांना सुटलेले नाही. पण त्यात सावधगिरीने पैसे गुंतवणे आणि चांगला परतावा मिळणे मात्र शक्य आहे. त्यासाठी थोडी चिकाटी आणि अभ्यास मात्र हवा. यातला अभ्यासाचा भाग या पुस्तकातून नक्की साध्य होऊ शकतो.

अनुवादकाच्या दृष्टीतून पाहिलं, तर ’शेअर बाजार’ हा विषय तसा किचकट आहे. पण हा क्लिष्ट विषय सोपा करून लिहिण्याचे श्रेय मूळ लेखकाला द्यायलाच हवे. एकेक मुद्दा, एकेक संकल्पना त्यांनी सुटीसुटी करून लिहिली आहे, अनेक उदाहरणंही दिलेली आहेत. त्यामुळे मला अनुवाद करताना कुठेही अडखळायला झालं नाही. मला या विषयातली थोडाफार माहिती असल्यामुळे उलट एकेक संकल्पना पुन्हा समजून घेताना, ती स्वत:शीच तपासताना आपोआप अभ्यास होत गेला. त्या सुमारास शेअर बाजारात जे काही चढ उतार सुरू होते त्यांच्याकडे डोळसपणे पाहता आलं. त्यामुळे अनुवाद अतिशय सहजतेने झाला. या अनुवादाने एक वेगळंच समाधान मला दिलं. हा विषय सगळ्यांच्याच कुतुहलाचा असल्यामुळे, हे पुस्तक प्रकाशित झाल्याबरोबर खूप जणांनी मला शुभेच्छा तर दिल्याच, पण सल्लेही विचारले आणि पुस्तकही विकत घेतलं. या पुस्तकाची मी मूळ लेखक नसले, तरी ’पुस्तकाला मागणी’ आल्यावर लेखकाला किती आनंद होतो, याचा प्रत्ययच मला या पुस्तकामुळे आला! 

हे माझं तिसरं अनुवादित पुस्तक आहे. अनुवादाच्या या रम्य वाटेवर सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागला. पण ही अवघड तरी मोहक वाट आता आपलीशी वाटू लागली आहे. या वाटेवरचा पुढचा प्रवास आणखीही काही सुंदर टप्पे घेऊन येईल अशी आशा आहे. बघूया, देवाच्या मनात काय आहे!

***

 

 

0 comments: