November 28, 2020

कॅसेट पर्वाचा अस्त

परवा दिवाळीच्या आधी एका स्वच्छता मोहिमेतल्या ’ई-कचरा संकलन’ अभियानात घरातल्या सगळ्या कॅसेट्स मनावर दगड ठेवून दिल्या. हे कधी ना कधी करायचंच होतं, पण जेव्हा ती वेळ येते, तेव्हा आपण त्यासाठी तयार नसतो, हेच खरं. कॅसेट्स देऊन टाकल्यावर मग काय-काय एकेक आठवायला लागलं...

ऑडियो कॅसेट्सनी साठ-सत्तर वर्ष तरी आपल्यावर अनिर्बंध राज्य केलंअसेल. ग्रामोफोनवर गाणी ऐकणं हा फक्त श्रीमंतांना परवडेल असा शौक होता,पण  कॅसेट्समुळे संगीत मधयमवर्गाच्या घरात वसलं. कॅसेटवर गाणी ऐकणं ही जगभरातल्या मध्यमवर्गातली एक कॉमन परंपरा होती असं म्हणता येईल, नाही? व्हिडिओ प्लेयर्स, पेजर्स, व्हॅक्यूम क्लीनर्स- मध्यमवर्गाला भुरळ पाडतील अशी अनेक फॅडं आली आणि गेली, पण ऑडियो कॅसेट्सच्या लोकप्रियता आणि टिकाऊपणाजवळ कोणीही जाऊ शकलं नाही. मध्यमवर्गीयाच्या खिशाला परवडेल असं स्वस्त तरीही मनाला आनंद देईल असं दुसरं होतंच काय? 

मला आठवतंय तेव्हापासून आमच्याही घरी कॅसेट प्लेयर होता, साधासुधा नाही, असेम्बल्ड, विथ स्पीकर्स ऍन्ड एक्वलायजर ऍन्ड ऑल. माझ्या वडिलांना गाणं ऐकायला खूप आवडतं, विशेषकरून पन्नास-साठच्या दशकातल्या ’गोल्डन एरा’मधलं संगीत. लता, आशा, तलत, किशोर, अनिल विश्वास, नौशाद, कुमार गंधर्व, भीमसेन यांची नावं घरात अशी घेतली जात, की जणू हे सगळे पपांचे मित्रच! पपांचे मित्रही संगीतप्रेमी होते. त्यामुळे सगळे भेटले की संगीत, संगीतकार, गायक (विशेष प्रेम: लता) यांच्यावर गप्पा, गाणी, किस्से, कॅसेट्सची देवाणघेवाण अगदी रूटीन आणि नॉर्मल होती. शास्त्रीय संगीताच्याही अनेक कॅसेट्स घरी होत्या. बिस्मिल्ला खां, अमजद अली खान, रवीशंकर, हरीप्रसाद चौरसिया ही नावं किती महान आहेत याची जाणीव होण्याआधी त्यांचं भरजरी, अभिजात संगीत ऐकलेलं होतं मी. याचाच एक मजेशीर दाखला म्हणजे- मी बहुतेक चौथी-पाचवीत होते, शाळेत एक ’फ्री पिरियड’ होता, म्हणजे मुलांच्या कलागुणांना ऊतच! ’गाणं गा’ असं मला बहुतेक टीचर म्हणाल्या असाव्यात. मी समोर जाऊन, कोणतीही भीडभाड न ठेवता, संकोच न करता चक्क कुमारांचं ’ऋणानुबंधाच्या…’ गायलं होतं, त्यातल्या आलापांसकट! :) :) आपण कोणाचं गाणं गातोय, तो कलाकार किती मोठा आहे, आपण कोण आहोत- इतका विचार करायचं वयही नव्हतं आणि समजही. ’गाणं गा’ म्हणल्यावर कुमारांचं गाणं मला म्हणावंसं वाटलं या निखळ निरागसपणाचं सगळं श्रेय घरातल्या कॅसेट्सना आणि पपांच्या उत्तम संग्रहाला!

ब्लॅन्क कॅसेटवर आपल्याला हवं ते गाणं रेकॉर्ड करून घेणं हेदेखील कॅसेट्सचं एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य होतं! मोस्टली कॅसेट प्लेयर विकणारे, किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू विकणारे/ दुरुस्त करणारे साधे दुकानदार आपल्या कॅसेटवर आपल्याला हवी ती गाणी रेकॉर्ड करून देत असत. ज्यांच्या घरी डबल कॅसेट प्लेयर होता, ते घरच्याघरीदेखील हे रेकॉर्डिंग करू शकत असत, फक्त त्या वेळी ’पिनड्रॉप सायलेन्स’ ठेवायला लागायचा. त्यामुळे, ब्लॅन्क कॅसेट्सनाही प्रचंड मागणी असायची. मला आठवतंय, ’सोनी’च्या रिकाम्या कॅसेट्सचा आख्खा बॉक्सच होता आमच्याकडे. पपांनी क्लासिकल आणि फिल्मी अशी त्यांच्या आवडीची अनेक रेकॉर्डिंग्ज त्यांवर करवून घेतली होती.

माझ्या आयुष्यात कॅसेटचा प्रवेश झाला ’आशिकी’मुळे! शाळेत अनेक मुलींकडे आशिकीची कॅसेट आणि अन्नू अगरवालने बांधलेली चांदण्यांची पांढरी झिरझिरीत रिबिन होती! जिच्याकडे कॅसेट असायची, ती मुलगी उदार मनाने दोन दिवस स्वत:ची कॅसेट दुसरीला ऐकायला द्यायची. अशी ती कॅसेट मी ऐकली होती. मग वेड लागल्यासारखी एक स्वतंत्र वही केली होती, त्यात त्या गाण्यांचे लिरिक्स लिहिले होते. पुढे शाळेत फ्री पिरियड मिळाला, की आम्ही मैत्रिणी हळू आवाजात आशिकीची गाणी गायचो!! सुरुवात आशिकीने झाली, आणि नंतर तर प्रत्येकच सिनेमातली गाणी जबरदस्त वाटायला लागली. मला वाटतं तेव्हा मुद्दाम आठ गाणी तरी असलेले सिनेमे काढले जात, म्हणजे त्याची कॅसेट काढणं सोपं जाई. साईड ए ला एक पॉप्यूलर गाणं आणि साईड बी ला एक. मग बाकी कमी चांगली गाणी अशीच पेरलेली, एक रिमिक्स, एक रीपीट… असं करत दहा-अकरा गाण्यांची दणदणीत कॅसेट मिळायची, फक्त २० रुपायांना! वर सिनेमाचं कव्हर आणि आकर्षक पोजमध्ये हीरो-हीरॉइनचे फोटो फुकट! :D और क्या चाहिये! ज्या सिनेमांमध्ये इतकी गाणी नसायची, त्यांच्या ’तेजाब-त्रिदेव’, ’दिल-बेटा’, वगैरेसारख्या कॉम्बो कॅसेट्स मिळायच्या. ए साईडच्या ’उमराव जान’च्या उच्च गजल ऐकण्यासाठी बी साईडचा सलमा आगाचा ’निकाह’मधला आवाज (आणि फोटोही!) सहन केलेला आहे! तेव्हा तर एका दमात २० रु. ही खर्च करायची ऐपत नव्हती, पण एखाद्या मैत्रिणीला वाढदिवसाला स्पेशल गिफ्ट देण्यासाठी म्हणून चौघीजणी ५ रुपये कॉन्ट्री काढायचो आणि एक जबरदस्त कॅसेट विकत घ्यायचो. वाढदिवस हे फक्त निमित्त, ती कॅसेट खरंतर सगळ्यांचीच असायची.

हे झालं शाळेत. कॉलेजमध्ये इंग्लिश पॉप ऐकायचं वेड लागलं. ’नथिंग्ज गॉना चेंज माय लव्ह फॉर यू’ हे मी ऐकलेलं पहिलं इंग्लिश गाणं. ’एम’ टिव्हीचा उदयाचा काळ होता. या चॅनेलवरची पॉप गाणी ऐकून ती पाठ करायची, एकमेकींबरोबर ऐकायची आणि गायची हा कार्यक्रम तर सतत व्हायला लागला. मग आवडत्या इंग्लिश गाण्यांच्या कॅसेट्स रेकॉर्ड व्हायला लागल्या. रूपा नावाची माझी मैत्रिण फार उत्साहाने कुठून-कुठून इंग्लिश गाणी शोधून आणायची, फार मेहनतीने एका कॅसेटवर रेकॉर्ड करायची, त्यावर ग्लिटर, स्टिकर्स वगैरे वापरून पर्सनलाईज्ड गिफ्ट द्यायची. तिने दिलेल्या कॅसेट्सवरची गाणी ऐकताना फार स्पेशल वाटायचं 💓      

’दिल से’च्या कॅसेटचा किस्सा आज आठवतानाही मला फार भारी वाटतं. आमच्या ऑफिसची ट्रिप गेली होती मुळशी बॅकवॉटर्सला. कोणीतरी टेपरेकॉर्डर आणि ही एकदम कोरी करकरीत ’दिल से’ची कॅसेट आणली होती. मला सिनेमा, स्टोरी, कास्ट, गाणी काहीही माहित नव्हतं. हिंडणं, खाणं-पिणं झाल्यावर सगळे दुपारी जरा सुस्तावले. एक सहकारी थोडीशी लांब बसून एकटीच गाणी ऐकत बसली होती. मी सहज तिच्याजवळ गेले, आणि सुरू झालं ’ए अजनबी’! ते गाणं ऐकताना माझा शब्दश: ’स्टॅच्यू’ झाला होता. तिची तर तंद्री लागलेलीच होती. गाणं संपलं, पुढचं ’सतरंगी रे’ सुरू झालं, पण ’ए अजनबी’ने आलेली बेचैनी जाईचना. कोणी गायलंय हे? कॅसेट कव्हर वाचलं, तर उदित नारायण! छे! शक्यच नाही, हा काही उदित नारायणचा आवाज नाही. एव्हाना मी तिच्याशेजारी ठिय्या मारून बसले होते. कॅसेट रिवाइंड केली, परत ऐकलं, परत वेड्या झालो, परत रिवाइंड केलं, परत ऐकलं… मनच भरत नव्हतं… दुपारची स्तब्ध शांतता, ढगाळ आकाश, धरणाच्या पाण्याजवळ बसलेल्या आम्ही आणि ’तू कहीं, टुकडों में जी रही हैऽऽऽऽऽ ?” असं आर्त स्वरात विचारणारा उदित! आह! 💟

अशा अनंत आठवणी. लग्न ठरलं तेव्हा मी मुंबईला रहात होते, दर शनिवारी पुण्याला यायचे, रविवारी मुंबईला परत. माझ्या होणा-या नव-याने मला त्याचा वॉकमन दिला होता. दर प्रवासात वॉकमनवर आपल्या आवडीची गाणी ऐकताना पुणं सोडून जाण्याचं दु:ख जरा बोथट व्हायचं. संदीप खरेची ’दिवस असे की’ याच वॉकमनवर ऐकली होती. पुढे लग्न होऊन आम्ही अगदी थोडा काळ अमेरिकेत गेलो, तेव्हा पहिल्या दिवशी सोबतीला याच वॉकमनवर मी ऐकले ’पु.ल.’! :) माझ्या मुलगा कॅसेट ऐकूनच बडबडगीतं शिकला आणि ’हम तुम’ आणि ’वीर झारा’ या कॅसेट्स ऐकत कारने आम्ही अमेरिका दर्शन केलं! इथेही, लांबच्या प्रवासात साथ केली कणेकरांच्या ’फिल्लमबाजीने’! त्यांच्याबरोबर ’बेटा, मैने तुम्हारे लिए गाजर का हल्ल्ल्वा बनाया है’ असं म्हणताना प्रत्येक वेळी काय धमाल यायची! सेम विथ वपुंची कथाकथनं! किती आठवणी, कितीतरी आठवणी!  

इतके सुखद अनुभव, इतकं संचित असूनही एक दिवस कॅसेटी निघणंच बंद झालं. चकचकीत, स्लिम आणि तांत्रिकदृष्ट्या सफाईदार असलेल्या सीड्यांनी कॅसेटला हळूहळू पण निश्चितपणे संपवलं :( पुराणकाळातल्या गोष्टींत नवीन, सुंदर राणी आली की पहिली, सर्वगुणसंपन्न राणी राजाला आवडेनाशी व्हायची… अगदी तसंच. सगळ्या कंपन्याचं लक्ष सीडी आणि सीडीप्लेयर्सकडे वळलं. कॅसेट्स बंद झाल्या, म्हणून नावाजलेल्या कंपन्यांचे नवीन कॅसेट प्लेयर्स तयार होणंही बंद झालं. घरात टीव्हीशेजारी दिमाखाने विराजमान असलेल्या कॅसेटप्लेयरची जागा होम थेटर आणि साउंड सिस्टिमने घेतली. बंद पडलेले आणि दुरुस्त होऊ न शकणारे कॅसेट प्लेयर्स आणि कॅसेट्स ’भंगार’ झाले. अनेकांनी आपल्या कॅसेट्सना सीडीमध्ये कन्व्हर्ट करून घेतलं. पण आम्हाला काही ते जमलं नाही. तीच गाणी इतरत्र ऐकण्याचे अनेक पर्याय असल्याने ते प्रोजेक्ट कधी गांभीयाने घेतलंच नाही आम्ही.

आपली भावनिक गुंतवणूक जितकी माणसांमध्ये असते तितकीच वस्तूंमध्येही असते. घरातले माळे अशा इमोशनल गोष्टींनी भरलेले असतात, आमचाही होता. या गोष्टींचा काही उपयोग नसतो, पण त्या टाकवतही नाहीत. दर वर्षी वार्षिक सफाईत त्यांच्याकडे बघून फक्त एक सुस्कारा सोडला जातो. या वर्षी मात्र मनाचा हिय्या करून हा एक दोर कापला. अशा वेळी ’क्लोजर’ फार गरजेचं असतं. कॅसेट्स देण्याआधी एकदा तरी त्यातली एखादी अत्यंत आवडती कॅसेट ऐकता आली असती तर? तर जरा कमी त्रास झाला असता का? अंहं. संकलन करणारा माणूस समोर येऊन उभा होता. आणखी रेंगाळलो असतो, तर कदाचित त्याला ’पुढच्या वर्षी बघू’ असंच म्हणालो असतो, हे नक्की. ही सर्जरी गरजेचीच होती, ती केली. पण या ऑपरेशनची जखम दीर्घ काळ राहील. Out of sight, but definitely in our minds… cassettes, you will be fondly remembered forever! 💞 

***

 

0 comments: