October 27, 2020

मरणाने केली सुटका…

 “शारदा, उठ… शारदा, अय, शारदा,” शैला सिस्टरने शारदाच्या दंडावर चापट्या मारत तिला जागं केलं. शारदा ग्लानीतून जागी झाली. तिचं अंग प्रचंड ठणकत होतं. दोन बेडशीट घालून जमिनीवरच झोपल्यामुळे अंग अवघडलंही होतं. मोठ्या कष्टाने तिने डोळे उघडले. शैला सिस्टरांच्या हातात गोळ्या होत्या. पीपीइ किटच्या आतला त्यांचा चेहरा तिला नीट दिसला नाही, पण त्यांच्या आवाजात काळजी होती. शारदाने     चेह-यावर खोटीखोटी हुशारी आणली.

“सिस्टर, मी उठणारच होत्ये तशी. किती वेळ झोप्ले, काई पत्ताच लागला नाई. ते मागले दोन दिवस जरा जास्त काम पडलं आनं झोप पन नीट नाई लागली ना… जरा सकाळपास्नं कन्कन वाटत हुती, आत्ता पाय अगदीच दुखायला लागले म्हणून टेकले, तर झोपच लागली…स्वारी हां” चेह-यावर मास्क असूनही ती बोलत सुटली. 

शैला सिस्टरांनी एक निश्वास सोडला. शारदाचं अंग दुखत होतं. बहुतेक हिची आजची टेस्ट पॉझिटिव्ह येणार! आधीच स्टाफची कमी, त्यात जे टिकवले आहेत तेही आजारी पडायला लागलेत!

“गप जरा. हे घे, या टॅब्लेट्स घे. बघू… टेम्परेचर तर नाहीये तुला. घसा दुखतोय का? थोड्या वेळाने टेस्ट करून घे. उद्याच रिझल्ट्स येतील. या पेशन्टचं बघते मी, तू वर जाऊन पड.”

“नाई नाई. मी बरीये.” शारदाने विरोध केला. “कफ नाई, काई नाई. या गोळ्या घेते आनं बघते मी ह्यो वार्ड. खरंच. आनि टेस्ट पन करून घीन ना. मला तसं फार नाई होते काई, फक्त जरा पाय दुखतात, गोळ्या घेतल्यावर थांबतीन ते. तुमी जा, दोन नंबर वार्ड तुमच्याकडेच हाए ना. डाक्टर आले का इक्डे राऊंडला? मी झोपलेली पाह्यलं तं नाई ना त्यांनी?” शारदाने घाबरत विचारलं.

“नाही पाहिलं. त्या आधी मीच पाहिलं. शारदे, खरंच होईल का तुला? फक्त हा वॉर्ड बघ. आणि मास्क नवा घे आणि हात धू सारखा, काय? डॉक्टर येतील आत्ता, त्या आधी सगळं नीट आहे ना ते बघ काय. संगीता आली नाहीये आज, मला तेही पेशन्ट पाहायचेत. तू फक्त हे सहा बघ, तसे स्टेबल आहेत. कोणाला श्वास लागला तर मला बोलाव. आणि हो, झाडून सॅनिटाइज पण करून घे नेहेमीसारखं, काय? आणि अधूनमधून बस थोडा वेळ. मी चहा पाठवते.” शैला सिस्टरचाही नाईलाज होता. आभाळच फाटल्यागत झालं होतं, ठिगळ तरी कुठेकुठे लावणार?

***

पंचवीस बेड्जचं साधं हॉस्पिटल होतं ते, बघता बघता छोटं कोविड सेंटर झालं होतं. हॉस्पिटलचे प्रमुख होते डॉक्टर शेटे आणि त्यांच्या हाताखाली तीन-चार तरुण डॉक्टर मुलं-मुली होत्या. थोड्या नर्सेस, बॉइज होते. सहा महिने झाले, हॉस्पिटल फुल्ल होतं. खूप पेशन्ट बरे होत होते, काही मरतही होते. खरंतर, शारदा नर्स नव्हती, साधी धुणं-भांडी करणारी बाई होती, पण लॉकडाऊनमुळे तिचं काम सुटलं होतं. शैला सिस्टर तिच्याच वस्तीत राहायची, हॉस्पिटलमध्ये स्टाफ कमी होता, सफाई कर्मचारी तातडीने हवे होते. मग तिनेच हिला आणि हिच्यासारख्या आणखी काहीजणींना हॉस्पिटलमधल्या कामाबद्दल विचारलं. पैसे भरपूर मिळणार होते म्हणून सगळ्या तयार झाल्या. पण कामाचा डोंगर पाहून आणि पेशन्टची परिस्थिती पाहून पहिल्याच दिवशी बाकीच्या दोघी-तिघी ज्या घाबरल्या त्या काही परत आल्याच नाहीत. शारदा मात्र टिकली. अर्थात, तिचं कारण फार वेगळं होतं…

रडणारे, विव्हळणारे, ओरडणारे पेशन्ट पाहून शारदाही आधी घाबरली होती. ती कामाला लागली आणि दुस-याच दिवशी तीन ’डेथ’ झाल्या, ते पाहून तर तिचे हातपाय गळाले होते. पण शेटे डॉक्टर एकदम चांगले होते. कमी बोलायचे, पण कामाचं बोलायचे. सगळ्यांनी कसं वागायचं, काय काळजी घ्यायची, हा रोग कसा आहे, त्यामुळे काय काय होऊ शकतं हे त्यांनी नीट समजावलं होतं. हळूहळू शारदा सरावली, पटापट कामं शिकली. आता एक महिना झाला, ती शैला सिस्टरला विचारून आणखीही थोडं काम शिकली होती- गोळ्या देणं, ऑक्सिजन लावणं, सलाईन लावणं, बीपी बघणं… ती पेशन्टशी नीट वागायची. आपल्या हातून काही चूक होणार नाही ना, याची भीती असल्यामुळे काळजीपूर्वक काम करायची. कामाला वाघ होती. ब-याच पेशन्टना घरून डबा यायचा, तो ती प्रेमाने त्यांना द्यायची, पेशन्टचा व्हिडिओ कॉल लावून द्यायची. घरच्या लोकांचे चेहरे दिसले की पेशन्ट निम्मा बरा व्हायचा हे पाहून तिलाही फार बरं वाटायचं. कधीकधी तपासल्यानंतर डॉक्टर आणि सिस्टर कुजबुजायचे, की ती समजायची, पेशन्ट सिरियस आहे. ती त्या पेशन्टचं बारकाईने निरिक्षण करायची. एखाद्या पेशन्टची डेथ झाली, की ती नक्की कशी झाली, कशाने झाली याचं तिला खूप कुतुहल वाटायचं.

करोना एकदम जानलेवा आहे, त्यापासून धोका आहे हे तिला माहित होतं. बघताबघता साथ पसरतच होती, पेशन्टचा पूर आला होता. आता सगळा स्टाफ जवळपास तिथे राहायलाच आला होता, त्यात शारदाही होती. तिची वाट पाहणारं तिच्या घरी कोणीच नव्हतं. कुचकट बोलणारी सासू, टाकून बोलणारा, कधीकधी मारणाराही बेवडा नवरा, बेपर्वा मुलगा, स्वत:तच गुंग असलेली मुलगी आणि फक्त तिच्या पैशावर डोळा ठेवणारे ते सगळेच. घरापासून जितकं लांब राहता येईल तितकं बरं...

शारदाने मान झटकली आणि ती उठली. उठताना तिच्या पायात गोळे आले, पण तिने दुर्लक्ष केलं. सिस्टरने दिलेल्या गोळ्या घेऊन ती कामाला लागली. त्या छोट्याशा वॉर्डमध्ये सहा कॉट्स होत्या, सहाहीवर करोनाचे पेशन्ट होते, सगळे सिरियस होते. सहा नंबरचा ऑक्सिजन नीट सुरू होता, थोड्या वेळाने तोच काढून पाच नंबरला द्यायचाय, तोवर पाचवर सतत लक्ष ठेवायचं... चार नंबरला डबा आलेला. म्हातारी जाम खायची नाही काही, तिने गोड बोलून तिला खायला लावलं. तीन नंबरला शुगरच्या गोळ्या दिल्या. दोन नंबरला दमा होता, अंगात शक्ती नव्हती आणि खोकलाही बराच होता. ही बाई आत्ता शांत पडून होती, तिचा एरवीही काही त्रास नव्हता, पण ढास लागली की भयंकर घाबरीघुबरी व्हायची; या पेशन्टचं नाव होतं रोहिणी कुलकर्णी. शारदाला एरवी कोणाच्या नावाशी घेणंदेणं नसायचं, पेशन्टही सतत बदलायचे, नावं लक्षात ठेवायची तरी किती? पण का कोण जाणे, या बाईबद्दल तिला आत्मीयता वाटत होती. ती शारदाच्याच वयाची असेल, तिची मुलगी किंवा मिस्टर यायचे, आले की फोन करायचे, काळजीने बोलायचे…ते कुटुंब प्रेमाने बांधलेलं आहे असं वाटायचं, शारदाला ते सगळे फार आवडत. एक नंबरचा पेशन्ट एक अगदी तरुण मुलगा होता... तिच्या योग्याच्या वयाचा. याच्या हातात कायम मोबाईल असायचा, योग्यासारखाच. आत्ताही तो गेम खेळत होता, बाकी स्टेबल होता. योगेश, तिचा मुलगा… योग्याची आठवण आल्यावर शारदाच्या हृदयात एक कळ आली, डोळ्यात पाणी आलं. मोठ्या कष्टाने ते मागे सारून तिने राऊंड पूर्ण केला, रूम झाडली, पुसली, सॅनिटायझरने बेड पुसून घेतले आणि अखेर ती स्टुलावर बसली. तिचे पाय दुखत होतेच, आता एवढ्या श्रमांनी कंबरही दुखायला लागली. मगाशीच बॉय थर्मास ठेवून गेला होता. तिने चहा प्यायला, दोन बिस्किटं खाल्ली, तशी तिला परत गुंगी यायला लागली.

अर्धवट झोप-अर्धवट जाग या सीमारेषेवर असलेलं तिचं दमलेलं मन भरकटायला लागलं- ’आत्तापातूर झाला आसंल नाई का मला करोना? उद्या टेस्टवर कळेलच. उद्याच टेस्ट करू का, गोळ्या घेऊन टेस्ट आनी चार दिसांनी करू? तोवर तर नक्की हुईल करोना. किती दिवस रेटलं की मी सिरेस हुइन? पटकन मरंन का? कसं वाटत आसंल जीव जाताना? मध्ये चार नंबरवर होता तो लै तळमळला, मग सुटला, आन परवा ती एक नंबरची बाई कदी गेली कळ्ळंच नाई. मलाबी आसंच मरण हावं, कदी ऑफ झाले, समजलंच नाई पाईजे… आनं नसंल झाला करोना तर? नाय नाय, करोना व्हायलाच हवा मला… आत्ता नाई मेलं तर परत चान्स नाई गावणार असा…’

तिला परत एकदा मुलाची तीव्र आठवण झाली. ’योग्या! का रं बापासारका झालास तू? तू बरा निघला असतास ना योग्या, तर शप्पत मी राहिली असते. पन नाई, तूही तसलाच… खोटार्डा, मवाली. फार वाटाय्चं रे की तू बारावी तरी कर, नोकरी बघ, कोम्पूटर शिक, चांगला मानूस हो, पन नाई. पाया पडलो तुज्या, पन अक्कल आली नाई ती नाईच तुला. बारावीची फी उधारीवर आनली मी कामावरून आनि ती तू भरली नाईस, बारावीला बसलाच नाईस. पैशे कुटं उडवलंस रं ते? आं? मित्रांवर? पार्ट्यांवर? चूप बसून सगळे उद्योग केलेस, कालेजातून फोन आला तवा कळ्ळं! आसं का केलंस योग्या? का भरोसा तोडलास रं? तवापासूनच मी हाय खाल्ली बग. मग पाठुपाठ चिंगीपन म्हन्ली, मला पन नाई शिकायचं! मी काऽऽई बोल्ले नाई. फायदाच नवता. गप बसले. तवाच ठरवलं, काई उरलं नाई आता. याच्या बापानं एक दिस कदी सुख दावलं नाई. मारहाण, शिविगाळ, लाथा आनं बुक्क्या. त्येला म्हाईत होतं न, मला कोनी नाई, कुटं जाऊ शकत नाई, त्यामुळं कायम धमक्या- घरात घेनार नाई, चालती हो, तोंड काळं कर… ऐकलं की भीती वाटाय्ची. कुटं जाऊ? खरंच हाकलून दिलं तर काय करू? जीव द्यावा वाटायचा, पर कदी हिम्मत नाई जाली. पोरांकडं बघत सोसत राहिले. तर पोरंबी कुलक्शनी निघाली. मग काय राम राहिला योग्या, तूच सांग. मी पाहत्ये ना इक्डं, इक्डं मरनं सोपं हे. थोडा तरास होतो, पन ऑफ होतोय मानूस नक्की. आदी म्हाईत नव्हतं, पन नंतर आलं लक्शात की मरायचंच आसंल तर ह्ये नक्की जमन्यासारखंए. तवाच ठरवलं, शेवा करायची जमंल तितकी, आणि गुमान रामनामसत्यए… योग्या, चिंगी मी तर इथून परत येत न्हाई, पन परत सांगते, नीट व्हा रं पोरांनो, ह्ये झोपडपट्टीतलं जगनं काय खरं न्हाई, नीट –हावा…’ शारदाला पोटातून हुंदका आला. ती गदगदून रडायला लागली.

इतक्यात पाच नंबरवर तिला हालचाल वाटली. झटकन डोळे पुसून ती तिकडे गेली. पेशन्टचं बीपी वर गेलं होतं, तिने लगोलग बेल दाबली, पाठोपाठ दाराकडे धावत जाऊन सिस्टरना हाकही मारली. एवढ्यात डॉक्टरही आले, त्यांनी सिस्टरला भराभर सूचना दिल्या. बॉयने बाहेरून नवीन ऑक्सिजन सिलिंडर आणला, पेशन्टला लावला, तो नीट श्वास घ्यायला लागला. डॉक्टरांनी मग बाकीचे पेशन्टही तपासले. ते सगळे ठीक होते. दहा-वीस मिनिटं नुसता गलका झाला होता, तो थांबला. अचानक डॉक्टर तिच्याकडे वळून म्हणाले, ’शारदाताई, एकदम नीट काम करताय हां तुम्ही. सिस्टरने सांगितलंय मला. असंच काम करा. आणि हो, रोज टेस्ट करताय ना? आणि वेळेवर जेवाही, काय?’ इतकं कौतुक! सेकंदभर शारदाला काहीच कळेना. तोवर डॉक्टर गेलेदेखील. ती नुसतीच माना डोलावत राहिली.

***

“सिस्टर दोन नंबरची हालत खराबए” शारदा रोहिणी कुलकर्णीकडे बघत म्हणाली. ती तिच्यावर सतत नजर ठेऊन होती. तिला आता सगळा वेळ ऑक्सिजन होता. पांढरी फटक पडली होती बिचारी. मास्कच्या आतही तिला सारखा खोकला येत होता. शारदालाही थकवा वाटत होता, पण तिने कोणाला तसं जाणवू दिलं नाही.

“चेस्ट कन्जेशन आहे. न्यूमोनिया झाला नाही म्हणजे मिळवली. ऑक्सिजन तरी किती वेळ चालेल काय माहित? नवे सिलेंडर येत नाहीयेत. डॉक्टर त्याच्याच मागे आहेत माहिते? सगळंच शॉर्ट आहे! तू लक्ष ठेव तिच्यावर. उद्यापर्यंत स्टेबल राहिली तर वाचेल. नाहीतर… तिची बाकी औषधं आहेत ना? डायटचं काय?”

“टिफिन येतो न तिला, मुलगी नायतर मिस्टर येतात. भले वाट्टात.”

“आले, की पेशन्टशी बोलून, बघून दे त्यांना. पुढचं माहित नाही.” निर्वाणीचं बोलून शैला सिस्टर बाकी पेशन्ट पाहायला गेली. शारदा मात्र दोन नंबरपाशीच घुटमळत राहिली. तिने आपणहोऊन तिला गरम पाणी प्यायला दिलं. तिला तिच्या मुलीला मेसेज करायला लावला आणि एक शाल आणि गरम पाण्याची पिशवी आणायला सांगितली. तिची मुलगी आणि मिस्टर थोड्या वेळाने ते सामान घेऊन आले तेव्हा तिने त्यांना लगेच व्हिडिओ कॉल लावून दिला, बाहेर जाऊन त्यांना धीर दिला, पाणी गरम करून पिशवी तिच्या छातीवर ठेवली, तिच्या पायावर शाल पांघरली. एवढं सगळं केल्यावर तिलाही आराम पडला, ती शारदकडे पाहून फिकट हसली. शारदाला फार बरं वाटलं. ’किती चांगलीए ही रोहिनी कुलकर्नी. ही लवकर बरी व्हायाला हवी, मरन्याआधी हिला बरं केल्याचं पुन्य माला मिळूदे गं देवीमाय’ ती मनाशी म्हणाली. एवढ्यात तिच्या मुलीने तिला बाहेर बोलावलं. जरा नवलानेच ती बाहेर गेली.

“मावशी, तुम्ही सगळा डबा नीट देता न आईला? आणि तिची औषधं पण? ती बरी का होत नाहीये मग?” मुलीनं जरा रागावूनच विचारलं, तसा शारदाचा चेहरा खर्रकन उतरला. रात्रंदिवस कामं करून वर असे प्रश्न? इतका संशय? तिला काहीतरी खरमरीत बोलावं असं वाटलं तिला, पण पेशन्टच्या नातेवाईकांनी प्रश्न विचारले तर ’डॉक्टरांना विचारा’ एवढंच म्हणायचं, बाकी काहीही बोलायचं नाही, असं शेटे डॉक्टरांनी सगळ्यांना बजावून ठेवलं होतं. जिभेच्या टोकावर आलेलं उत्तर मागे सारून तिने तिला ठराविक उत्तर दिलं आणि ती आत जायला वळणार, इतक्यात तिला हाक ऐकू आली, “शुक, शुक, शारदे…” तिने कुतुहलाने पाहिलं. कंपाउंडजवळ तिचा नवरा उभा होता! इतक्या दिवसांनी नव-याला पाहून एखादीला आनंद झाला असता… पण शारदा पूर्ण विझलेली होती.

“कदीपासून उभे हाय इक्डे?” जवळ जात तिने कोरडेपणाने विचारलं. जवळ जाताच तिच्या लक्षात आलं, हा पिऊन आलाय! मळके कपडे, वाढलेली दाढी, दुपार झाली नाही तोवर टाईट!

“झाला थोडा वेळ. शारदे, कशी हायस? तू इक्डे आली आनं इकडचीच झालीस होय गं, विसारली नाईस ना मला?” वेडगळागत हसत तो म्हणाला.

“मी डूटीवर हाए. का आलाय?” त्याला तोडत ती म्हणाली.

“हेच की, तुला बघायला.”

“बरी हाय. तुमी पन बरेय ना सगळे? त्यो मास्क लावा ओ… बर, जाऊ का मग मी कामाला?”

“जाशील गं, कामच करत्येस की इत्के दिवस. बोल की पाच मिन्टं.” तो दोन सेकंद थांबला. “त्ये कामावरनं आठावलं, शारदे जरा पैसं दे ना… फार नाई, दोनशे रूपये. आस्तील ना तुज्याकडं? द्ये जरा, निकडए.”

संतापाचे अनेक स्फोट झाले तिच्या डोक्यात. ’यासाठी आला होता तर! हरामखोर! कस्ली निकड? दारूच्या बाटलीची का मटक्याची? ह्येच क्येलं याने जलमभर. मी मरमर मरायचं आनं याने पैशे उडवायचे. मनात आलं तर काम करनार, नाई तर नाई. दारू, जुगार याला मात्र पैसे हवेत. बायको कशीए, बरीए ना, इत्का भयांकर रोग, कशी राहतेय, काय खातेय काऽई काऽऽई फिकीर न्हाई. फिकिर फकस्त पैशांची!’

“आवो, गेल्या म्हईन्यातला आख्खा पगार दिलता ना मी, पाच हजार दिलते, आज नऊ तारीखए. संपले पैशे?” तिने जाब मागितला.

“ते हायेत गं, पन आत्ता मला अर्जन्टमदे पायजेलेत. तू काय हिशेब मागते आनि आं? सा का सात हज्जार भेटतात तुला इक्डे. दिलेस किती? पाच! वरचे कुठाय्त?” त्याचा आवाज चढायला लागला, तोल तर जात होताच.

“आवो मला नकोत का थोडे पैशे? दोन वेळचा डबाए, चहा, बिस्किटए. काय औशदपानी लागलं तर पैशे नकोत का? का तुमी देणाराय?” उसळून ती म्हणाली.

“बर्बर, आत्ता त्यातले दोनशे दे मग.”

“आत्ता नाईयेत. खर्च झाले.”

“सगळे? हजारच्या हजार? मग या आठ दिसांचा पगार झाला आसंल ना? तो दे.” त्याचा हेका चालूच होता.

“असा आठ दिवसांचा पगार देत नसतात. म्हयन्याचा देतात एकदम.” त्याला टाळायला ती पुढे म्हणाली, ”आवो, इक्डे खूप कामए. मी कोनाला बोल्ले पन नाईये, मला जावं लागंल.”

“जा ना. जा की. तुला कोनी आडवलंय, तेवडे पैशे दे आन जा.”

“आवो, कुठून आनू मी तरी? देवीमायशप्पत, माज्याकडे नाईयेत पैशे, जा तुमी.” ती काकुळतीला आली.

“नाईयेत? बरऽऽऽ, म मी डॉक्टरकडं जातो. त्येला विचारतो… म्हन्तो माजी बायको ठेवून घेत्ली हाएस, तर त्याचे पैशे तरी सोड…” तो कुचकट हसला.

शारदाला नव-याची किळस आली. हलकट, नालायक, नीच, राक्षस! या क्षणी त्याच्या डोक्यात एखादा दगड घालावा आणि त्याला संपवावा असं वाटलं तिला! संताप आणि घृणा यांमुळे तिला रडायला यायला लागलं. पण ती हतबल होती आणि तो निर्लज्ज होता. त्याने खरंच तमाशा केला असता. स्वत:ला सावरत ती वर हॉलमध्ये गेली, तिच्या पिशवीतल्या शंभराच्या दोन नोटा घेऊन घेऊन भराभर खाली आली, ते पैसे तिने अक्षरश: त्याच्या अंगावर फेकले आणि मागे वळूनही न बघता ती पळतपळत वॉर्डच्या बाथरूममध्ये शिरली.

 बाथरूममध्ये ती शिरली तेव्हा पूर्णपणे थरथरत होती. तिने मास्क काढला आणि अश्रूंना वाट करून दिली. दोन महिन्यात तिने माणसांचे इतके प्रकार पाहिले होते… दु:खी, रोगी, त्रासलेली माणसं, शेवटचा श्वास घेणारी माणसं, त्यांची काळजी घेणारी माणसं, आपल्या माणसाला वेदना होताना पाहून हताश झालेली, प्रसंगी रडणारी माणसं. पण तिच्या नव-याइतका स्वार्थी, ऐदी, प्रेताच्या टाळूवरचं लोणीही खाणारा माणूस तिने पाहिला नव्हता. या रोगामुळे उलट नवरा-बायको, मुलं एकमेकांची काळजी घेताना दिसत होते, म्हाता-यांना तरणे लोक सांभाळत होते. तिच्या नशीबात मात्र प्रेमाचा मागमूस नव्हता. प्रेम सोडा, माणूसकीही नव्हती. ’मी का जगू? कोणाकरता? कशाकरता?” हा प्रश्न गेले आठ दिवस ती स्वत:ला सतत विचारत होती. “नको जगूस. या जगात तुजं कोनी नाई शारदे…” आज तिला पक्कं उत्तर मिळालं.

***

पहाटे तीनला सुशीला सिस्टर तिला उठवायला आली.

“शारदे, ए शारदे, उठ. हां, तुझ्या वॉर्डातली दोन नंबर सिरियसे. फार तळमळतीये, तुला बोलावतीये. चल बाई चल, इच्छा पूर्ण कर तिची.” ग्लानीत असलेली शारदा एकदम जागी झाली. तोंडावर पाणी मारून ती पळतच दोन नंबरपाशी गेली. ऑक्सिजन लावूनही श्वास जोरात चालला होता तिचा, बीपी वाढलं होतं, घामानं भिजली होती बिचारी. शेजारी नर्स होती, ज्युनिअर डॉक्टरही होते, उपचार चालू होते, पण तिची शेवटची घटका जवळ आली होती. शारदा झटकन पुढे झाली. तिने तिचा हात घट्ट धरला, कपाळ चोळू लागली. “धीर धर गो बाय”, ती पुटपुटली. रोहिणी कुलकर्णीने डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं, हसल्यासारखं केलं, हातानेच तिला नमस्कार केला आणि शेवटचा श्वास घेतला…

असह्य होऊन शारदाने डोळे मिटले. तिला तिथे थांबवलं नाही. कशीबशी वर येऊन ती तिच्या बेडवर पडली. इतके पेशन्ट आले न गेले, पण ही जवळची वाटायला लागली होती. ती नुसती दोन नंबर नव्हती, ’रोहिनीताई’ होती तिची. तिचा चेहरा सतत तिच्यासमोर तरळत होतं. ’देवीमाय, का नेलीस तिला? बरी झाली अस्ती न ती. तिच्या लेकीचं कसं हुईल आता? कधीपास्नं मागनं मागतेय मी, मला ने! मला ने गं, पार कट्टाळले मी आता. माजं कोऽऽनी नाई. मला जगायचंबी नाई. मला सोडंव माय, किरपा कर बाय…’ तिने टाहो फोडला.

***

“व्हायटल्स आर नॉट लुकिंग गुड. सिव्हिअर थ्रोट आणि चेस्ट इन्फेक्शन आहे. इन्जेक्शनचा स्टॉक आला की पहिला यांना द्या डोस.” शारदाला तपासत शेटे डॉक्टर शैला सिस्टरला म्हणाले. स्टाफची कमी, औषधांची कमी, ऑक्सिजनची कमी, पैशाची तंगी, नातेवाईकांची अरेरावी, मिडियाचा भोचकपणा, अधिकारी आणि राजकारणी यांचे रोजचे बदलणारे आदेश आणि काहीही झालं तरी आटोक्यात न येणारा रोग! सगळ्या बाजूंनी घेरल्यासारखं झालं होतं, एक बधीरपणा आला होता. तरीपण, फारशी ओळख नसूनही त्यांना सालस शारदाताईंबद्दल वाईट वाटलं जरा.  

“ऍक्च्युअली सर, तिने खूपच हलगर्जीपणा केला. अंगावर दुखणं काढलं. तिच्या वॉर्डमधल्या एका पेशंटची डेथ झाली गेल्या आठवड्यात तेव्हापासून ती जास्त खचली. खरंतर तिला घर आहे, घरी सगळे आहेत, पण  डोमेस्टिक अब्यूज होता सर. त्यामुळे तिला जगण्यासाठी काही मोटिव्हेशन नव्हतं.”

“आय सी, फील सॉरी फॉर हर. अशा कितीतरी मेन्टल स्ट्रेसच्या केसेस तर आपल्याला माहीतच नाहीयेत!” शारदाकडे पाहत डॉक्टर म्हणाले, “ठीक आहे. मेडिसिन, ऑक्सिजनची काही हयगय करू नका. लेट्स होप फॉर द बेस्ट.”  

***

शैला सिस्टरना भेटायला चार जण आले होते.

“ते… मम्मीला भेटता यील का आमाला? म्हन्जे शारदा टोके…”

सिस्टरना आश्चर्य वाटलं. आज पहिल्यांदाच शारदाला कोणीतरी भेटायला आलं होतं. त्यांनी निरखून पाहिलं… शारदाची दोन्ही मुलं आली होती.

“त्या ऍडमिट हायेत ना? मी मुलगाए त्यांचा. भेटायला आलोय.”

“काय रे? आज कसा काय आलास, इतक्या दिवसांनी. दहा दिवस झाले, तुझी आई तिथे पडली आहे, तुम्हाला आज आठवण आली?” त्यांनी काहीशा रागातच विचारलं.

“नाय, ते पप्पा म्हनाले की आपन गेलो तर आपल्यालाबी करोना हुईल.” योगेश कसनुसं हसत म्हणाला. मग हातातला मोबाईल पुढे करत म्हणाला, “ह्ये दाख्वायला आलेलो. एका साईटवर मम्मीवर ल्हिऊन आलंय, कसं चांगलं काम करतेय ती, तिचा फोटोपन हाए, तिला दाख्वायचा होता.”

सिस्टरने मान झटकली. तोवर एका मुलीचा आवाज आला…

“शारदाताई आहेत ना इथे सहा नंबर वॉर्डला कामाला? त्यांना भेटता येईल का?”

“तुम्ही कोण?” सिस्टरच्या कपाळावर आठी उमटली.

“मी शलाका कुलकर्णी. माझी आई ऍडमिट होती इथे काही दिवसांपूर्वी. ती एक्स्पायर झाली. पण शारदाताईंनी खूप सेवा केली तिची. तेव्हा गडबडीत त्यांच्याशी बोलायला काही सुचलं नाही. त्या आधी आमच्या बिल्डिंगमधले दोन जणही त्याच वॉर्डमध्ये होते. ते बरे झाले. तेव्हाही शारदाताईच होत्या. आम्हाला सगळ्यांना त्यांना थॅंक यू म्हणायचं होतं, भेटता येईल का त्यांना?” 

सिस्टरने खेदाने मान हलवली. धडधाकट होती तेव्हा एका शब्दाने ना कोणी कौतुक केलं बिचारीचं, ना कोणी विचारपूस केली तिची. आणि आता, ती ऐकू शकत नाही, पाहू शकत नाही तेव्हा आलेत गुणगान करायला!

***

सहा नंबर वॉर्डच्या दरवाज्याच्या काचेतून एक घोळका शारदाला शोधत होता, तिला बघायचा प्रयत्न करत होता. आज तिच्या सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्या होत्या… तिची मुलं तिची आठवण काढत होती, ज्या पेशन्टची सेवा तिने केली ते तिला भेटायला येत होते… पण शारदा त्या सगळ्याच्या पलीकडे पोचली होती. आता कशानेच फरक पडणार नव्हता. देवीमायच्या संगतीनं तिचा पुढचा प्रवास कधीच सुरू झाला होता…

***

समाप्त.

0 comments: