October 9, 2020

स्नेहबंध

 स्वयंपाकघरातली मोठी ट्यूबलाईट अचानक बंद झाली, अभि जोरात ’आई शप्पथ’ असं ओरडला, त्याने हातातला मोबाईल तपासायला सुरुवात केली, इतक्यात इन्व्हर्टरवर असलेला छोटा मिणमिणता दिवा सुरू झाला, आणि त्याच वेळी अभिच्या खिशातला मोबाईल खणखणायला लागला. एका मागोमाग एक इतक्या गोष्टी घडल्या, की साहजिकच शिल्पाताई विचलित झाल्या. समोरचं सुरळीच्या वड्यांचं मिश्रण अगदी होतंच आलं होतं. अभिने हातातला फोन ओट्यावर ठेवला, स्वत:चा खिशातला फोन काढला आणि बाहेर गेला. शिल्पाताईंना माहित होतं… ’फोन इशाचाच असणार. एक मिनिटही या मुलीला धीर नाही, सारखी घाई घाई…’ असं म्हणत त्यांनी परत लक्ष पातेल्याकडे वळवलं… आणि त्याच वेळी घरातला लॅंडलाईन खणखणायला लागला!  

त्यांचा अंदाज खरा निघाला. इशाचाच फोन होता. अभिने पाच सेकंदात त्याचा मोबाईल न घेतल्यामुळे इशाने आता त्या फोनवर हल्लाबोल केला होता! सुहासरावांनी फोन घेतला खरा, पण इशाला बाबांशी नाही, आईशीच बोलायचं होतं. सुहासराव स्वयंपाकघरात आले.

“ए बघ गं, तुलाच काय काय विचारायचंय तिला…”

एव्हाना मिश्रणाला सुरेख तकाकी यायला लागली होती. आता तर प्रत्येक सेकंदाला महत्त्व होतं.

“अहो, तिला सांगा, मी नंतर करेन फोन, धीर धर जरा. आणि तुम्ही किंवा अभि या माझ्या मोबाईलमधला टॉर्च लावून द्या आधी पटकन.” काहीशा उतावीळपणे पातेल्याकडे बघतच त्या म्हणाल्या. इतक्यात अभि बाहेरून इशाशी बोलायला लागला.

“ताई, चिल! तू काय फोन करत सुटलीयेस इकडून तिकडे? अगं लाईट गेले, वायफाय बंद पडलं आणि त्यामुळे आपला कॉलही. पण तुझ्या ऑर्डरच्या सुरळीच्या वड्या चालूच आहेत. आई त्यातच बिझी आहे, करेल तुला कॉल थोड्या वेळाने… बाकी बोल…”

तोवर शिल्पाताईंनी ताटांवर मिश्रण पसरवलं, उलथन्याने अगदी पातळ, एकसारखं केलं, बघता बघता चार ताटं झाली... मगाशीच केलेली खमंग फोडणी त्यांनी चारही ताटांवर पसरवली, त्यावर ताजं खोबरं आणि कोथिंबीर भुरभुरवली आणि सुरीने काप केले. मग हलक्या हाताने त्या एकेक सुरळी करायला लागल्या. हे काम करताना त्या इतक्या तल्लीन झाल्या होत्या की स्वयंपाकघरातला मिणमिणता उजेड, टॉर्चचा एकाच ठिकाणी पडणारा प्रकाश आणि शेजारी उभं राहून त्यांच्याकडे विस्मयाने पाहणारे सुहासराव… काही-काही त्यांना जाणवलं नाही. सगळ्या सुरळ्या पातळ, एकसारख्या, सुरेख झाल्या. एका मोठ्या बाऊलमध्ये त्या ठेवून त्यांनी परत त्यावर खोबरं-कोथिंबीर भुरभुरवली आणि आता कुठे त्यांच्या चेह-यावर समाधानाचं हास्य फुललं. ’निगुतीचे, नाजूक पदार्थ असतात हे, शांतपणे, वेळ देऊन करावे लागतात. एका परीनं बरंच झालं दिवे गेले ते, नाहीतर व्हिडिओ कॉलवर इशाने काही सुचू दिलं नसतं’, त्यांच्या मनात आलं.

“फक्कड जमलेला दिसतोय पहिला घाणा…” सुहासरावांचं लक्ष होतंच.

“हो, जमला बाई. इतक्यांदा केल्या असतील, पण दर वेळी करताना धाकधुक असते, नीट होतील ना?”

“हेच तुमचं कळत नाही. मापानं घेतलं असशील व्यवस्थित, तर न व्हायला काय झालंय?”

“असं कसं? नुसते चार जिन्नस एकत्र केले की पदार्थ तयार होतो वाटतं?”, शिल्पाताई उसळून म्हणाल्या. “अहो, डोळ्यांचा अंदाज असतो, अनुभव असतो, जिन्नस कसे आहेत, काय क्वालिटीचे आहेत हेही असतंच की. उगाच का तुमची मॉडर्न लेक मला व्हिडिओ कॉल करून हे करायला लावते? आणि काय हो, इतकं सोपं वाटतं तुम्हाला, तर पुढचा घाणा तुम्हीच करा बरं…”

बाजी आपल्यावरच उलटतेय हे पाहून सुहासराव चपापले.

“छे! मी आपला सहजच म्हणालो गं. काही करायचंच असेल, तर मी फक्कडसा चहा करतो. तू बस जरा. माझ्या हातचा चहा पी.”

शिल्पाताईंनी हसून मान उडवली आणि त्या टेबलाशी बसल्या.

“पण इशाच्या डोक्यात हे सुरळीच्या वड्यांचं आलं कुठून?”

“आता काय सांगायचं? या मुलीचा उतावीळपणा तर माहितच आहे तुम्हाला. एक काहीतरी डोक्यात आलं, की तेच. ऑफिसमध्ये म्हणे सगळ्यांनी काहीतरी खास, वेगळा पदार्थ करून आणायचा आहे. तर हिला सुरळीच्या वड्या सुचल्या! मी साबुदाण्याची खिचडी किंवा बटाटेवडे कर असं म्हणत होते. करायला सोपे आणि जरा कमी-जास्त झालं तरी चालतं त्यात. या वड्यांना जरा सराव लागतो, एकदा पाहिल्या आणि जमल्या असं होत नाही. पण समजावून सांगितल्यावर ऐकेल अशी शहाणी लेक नाही ना तुमची?”

“ओ मॅडम, माझ्या लेकीला काही म्हणायचं नाही हां. इंजिनिअर आहे, मल्टीनॅशनल कंपनीत कामाला आहे आणि आता तर एकटीच परदेशातही राहतेय!” सुहासरावांना लेकीचं किती कौतुक करू आणि किती नको, असं झालं.

“हो, हो. तुमची लेक चांगली शहाणी आहे, हुशार आहे, पण हिच्या उतावीळपणाचं काय करायचं सांगा… आत्ताचंच बघा, फर्मान सोडलं, आई, सुरळीच्या वड्या कर, लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड कर, मला बोलता बोलता ट्रिक्स सांग, तो कॅमेरा असाच धर, अभिला सांग, तमुकच सेटिंग ठेव… एक ना शंभर…”

“आणि वडी नाही, तर वडा झाला ताईचा…” अभि टेबलपाशी येऊन बसला. “इकडचे दिवे अधूनमधून जातात, नेट बंद पडतं वगैरे विसरली वाटतं ताई जर्मनीत राहायल्या गेल्यानंतर…”

“बघ की. तो कॉल बंद पडत नाही, तोवर तुला फोन, तू घेत नाहीस म्हणल्यावर लॅन्डलाईनवर फोन. एक सेकंद चैन नाही मुलीला…” शिल्पाताई लटक्या रागाने म्हणाल्या.

त्या विचार करायला लागल्या, ’खरंच तिला धीर म्हणजे काय हे माहितच नाही हिला. एक क्षण काही शांत बसायची नाही मुलगी, ना तिला वाट पाहण्याची सवय होती कधी. ही बहुतेक या पिढीचाच प्रॉब्लेम होता. यांना पर्यायांचा सुकाळ आहे, हे नाहीतर ते, ते नाहीतर तिसरं काहीतरी. कशानेच अडत नाही, अडू देत नाहीत. पण त्यामुळे कशात जीवही अडकत नाही…’ त्यांनी एक सुस्कारा सोडला आणि चहा प्यायला लागल्या.

“आई, मी फोन केला होता, तीन तास तरी लाईट येणार नाहीयेत आता. बाबा, मी माझ्या मित्राला विचारून आपलं वाय-फायपण घेतो इन्व्हर्टरवर एक-दोन दिवसांत. लाईट्सचा हा फारच वैताग व्हायला लागलाय.”

“नसेल काही वेळ ते नेट तर काय होतं रे? या मुलांचं सगळं आयुष्य त्या नेटमध्ये गुंतलेलं आहे बघा…” अभित आणि इशात काही फरक नाही हे परत एकदा शिल्पाताईंना जाणवलं.

“असुदे गं. त्यांचं जग फार वेगळं आहे, आपण ते मान्य करून त्यांच्याबरोबरीने बदलायला हवं. अभि, पण नीट विचारून कर हां. पण करून टाकूया ते सेटिंग. आपल्याकडे रेंजचाही प्रॉब्लेम आहे, वाय-फाय हवंच कायम, यू आर राईट”.  

झालं! बाबाही मुलाच्याच बाजूचे! शिल्पाताई उठल्याच. त्यांनी ओट्यावरचा सगळा पसारा आवरला. आता दिवे आले, की मगच पुढचा घाणा. सुरळीच्या वड्या करायला लागल्यापासूनच त्यांना लोढाकाकी आणि श्रीचैतन्य बिल्डिंग आठवत होती. आता अचानक रिकामा वेळ मिळाल्यावर त्या आठवणी तीव्र व्हायला लागल्या. अवचित त्यांना त्यांच्या आईचीही फार आठवण आली.

शिल्पाताई बेडरूममध्ये आल्या. कपाटात खाली त्यांनी आईची एक साधी साडी ठेवली होती. ती हातात घेतली की जणू आईच्या जवळ बसल्यासारखं वाटायचं.

’आई बिचारी जाऊनही तीन वर्ष झाली, तरी तिची पोकळी जाणवते…संसार नवा होता, तिची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा ना फोन होता, ना मनात आलं की आईकडे जायची सोय होती… फक्त आठवणींवर दिवस काढायचे, पत्र लिहायची आणि वेड्यासारखी उत्तराची वाट बघत बसायचं…’ आईच्या साडीचा स्पर्श होताच आठवणींच्या लगडी अलगद उलगडायला लागल्या…

*** 


 

आईच्या साडीचा स्पर्श होताच आठवणींच्या लगडी अलगद उलगडायला लागल्या…

शिल्पाताईंचं माहेर नगरजवळच्या वडणेरचं, अगदीच अडनिडं गाव, नगरपासून बावीस किलोमीटरवर. वडिलांची शेती होती, खाऊनपिऊन सुखी असलेलं माहेर, पण जुन्या वळणाचं. शाळेत दहावी झाली आणि त्या हट्टाने नगरला राहून बारावीही झाल्या. पण वडिलांनी पुढे शिक्षण बंद केलं. दोनच वर्षात सुहासरावांशी लग्न झालं. त्यांचं सासर होतं जामखेडला, पण सुहासराव नोकरीनिमित्त चिंचवडला राहत होते. लग्न झाल्यावर एक महिनाभर जामखेडला राहून शिल्पाताई चिंचवडला राहायला आल्या.

काहीच नव्हतं चिंचवडला तेव्हा, अतिशय उजाड भाग होता. त्यांचं दोन खोल्यांचं भाड्याचं घर एका चाळवजा, जुनाट बिल्डिंगमध्ये होतं, तेव्हा तिथे जास्तकरून बॅचलर्सच राहायचे. शेजार नव्हता. शिल्पाताई सुरुवातीला अगदी बुजून गेल्या. तेव्हा सुहासरावांची कमाई तशी बेताची होती, पैसे वाचवणं आवश्यकच होतं. या जागेचं भाडं कमी होतं आणि वस्ती तशी बरी होती त्यामुळे घर फारसं मनाला आलं नाही, तरी शिल्पाताईंनी कुरकुर केली नाही. तसंही, समजुतदारपणा आणि तडजोडीच्या रुळांवरच तेव्हाच्या संसारांची गाडी चालायची.  

त्यांची आजी म्हणायची, ’पाण्यात पडल्याशिवाय पोहायला आणि लग्नाशिवाय संसार करायला यायचा नाही’. किती खरं होतं ते! शिल्पाताईंना मोठ्या घराची, भरपूर माणसांची सवय होती. दोन माणसांचा, दोन खोल्यांचा संसार असणार तरी कितीसा मोठा? तरीही सुरुवातीला त्यांचीही अगदी रीतसर धांदल उडाली. बाजारहाट किती करावा, कुठून करावा, कोणता जिन्नस किती लागतो काही-काही माहित नव्हतं! सांगणारंही कोणी नव्हतं. त्यांना तर पोळ्याही करता येत नव्हत्या; त्या आपल्या सकाळ-संध्याकाळ भाकरी करत, पण सुहासराव म्हणाले की डब्यात भाकरी कोरडी होते. मग काय, पोळ्यांचे प्रयोग सुरू झाले. पातळ कणीक, विविध नकाशांचे वेगवेगळे आकार, जाड पोळ्या, जळक्या पोळ्या… सगळं काही साग्रसंगीत झालं. हीच गत भाज्या-आमट्यांचीही झाली. मग करत-करत हळूहळू अंदाज येत गेला. सुहासरावांनी मात्र कधी तक्रार केली नाही, उलट कधीकधी रडकुंडीला आलेल्या शिल्पाताईंना गंमतीचं काहीतरी बोलून हसवायचे. त्या चाणाक्ष होत्या, फार लवकर त्यांनी संसारज्ञान आत्मसात केलं. लग्नाला सहा महिने झाल्यावर त्यांना पहिल्यांदा सुहासरावांच्या शब्दात ’फक्कड’ रव्याचे लाडू जमले. त्या आधीच्या फसलेल्या कित्येक प्रयोगांचं दु:ख या ’जमलेल्या’ लाडवांमुळे दूर पळालं! छोट्या छोट्याच गोष्टी, पण आनंद अपार वाटायचा.

दिवसभर बोलायलाच कोणी नाही, ही मात्र त्यांची एकमेव तक्रार होती. सुहासराव सकाळी आठला डबा घेऊन जे जायचे, ते एकदम संध्याकाळी सहाला यायचे. शिल्पाताईंना फार एकटं वाटायचं. आईची वरचेवर आठवण येऊन कढ यायचे. मग त्या मोठमोठी पत्र लिहायच्या… आईला इकडची बारिकसारिक बित्तंबातमी लिहायच्या, प्रश्न विचारायच्या, स्वत:ची फजिती सांगायच्या. त्यानेही पोट भरलं नाही, की बहिणीला वेगळं पत्र, भावाला वेगळं लिहायच्या, मैत्रिणींना लिहायच्या, सासू-सास-यांना, मावश्यांना, नातेवाईकांना खुशालीची पत्रही लिहायच्या… जवळपास रोज एक पत्र. आणि मग सुरू व्हायची पत्रोत्तराची वाट बघणं. पत्र पोचायलाही पाच-सहा दिवस लागायचे आणि उत्तरालाही तितकेच. उलट टपाली उत्तर म्हणून एखादं पोस्टकार्डही आलं तरी त्या दिवशी त्यांना कोण आनंद व्हायचा!

शिल्पाताईंची आई बिचारी अर्धशिक्षित होती, तिला लेकीला खूप काही सांगायचं असायचं, पण तिला नीट लिहिता यायचं नाही. मग त्या कधी त्यांच्या बहिणीकडून, कधी भावाकडून पत्र लिहून घ्यायच्या. हे दोघेही चांगले द्वाड होते, लिहायचा कंटाळा करायचे. मग आईला त्यांना अनेक आमीषं दाखवावी लागायची. असं करत करत, एक पत्र लिहायचा सोहळा चांगले सात-आठ दिवस चालायचा! मध्येच शिल्पाताईंना बहिणीचं वेगळं पत्रही यायचं, ज्यात ती मजेने लिहायची, ’आईने तुला पत्र लिहायला घेतलंय’… काय नसायचं आईच्या त्या पत्रांत? घरातल्यांची खानेसुमारी, शेतावरची खबर, एकट्या राहणा-या लेकीची काळजी, जावईबापूंचा योग्य तो मान राखण्याबद्दल दटावणी, अनेक सल्ले, छोट्यामोठ्या आजारपणांसाठी घरगुती औषधांचे नुस्खे आणि स्वयंपाकघरातल्या युक्त्या आणि विविध पाककृतीदेखील! स्वत:ला आवडणा-या अनेक पदार्थांची कृती शिल्पाताई आईकडे मागायच्या आणि त्यांची आई अगदी प्रेमाने मुलीचा हट्ट पुरवायची. पण आईचं प्रमाण असायचं किलोत! दोन माणसांसाठी ते करताना शिल्पाताईंची धांदल उडायची, पण फार आनंदही व्हायचा; आई जणू शेजारी उभी राहून सांगते आहे असा भास व्हायचा. अनेकदा पहिला प्रयत्न फसायचा, मग तो पदार्थ जमेपर्यंत शिल्पाताई नेटाने प्रयत्न करत राहायच्या. शेवटी तो पदार्थ आईसारखा झाला, की अगदी जग जिंकल्यासारखं वाटायचं. चकली, शंकरपाळे, पुरण हे सगळं त्या आईच्या पत्रातून शिकल्या! आईची पत्र म्हणजे शिल्पाताईंच्या ’मर्मबंधातली ठेव’ होती, अतिशय मौल्यवान, हृदयाच्या अगदी जवळची. अजूनही त्यातली बरीचशी पत्र त्यांनी जपून ठेवली होती.  

आई त्यांना दोन-तीन महिन्यातून एक ’डबोलं’ पाठवायची. त्यासाठीही किती व्याप करायला लागायचे बिचारीला. गावाकडून पुण्याला येणारा कोणी पाहुणा शोधावा लागायचा, तो वाकडी वाट करून चिंचवड बस स्टॅन्डवर यायचा. शिल्पाताई त्याला तिकडे भेटायच्या आणि तेव्हा कुठे आईच्या हातचा खाऊ मिळायचा. साध्या पंचात बांधलेला पितळी डबा पाहिला की एखादा खजिना हाती लागल्यासारखं शिल्पाताईंना वाटायचं. सगळे पदार्थ तसे साधेच असायचे, तेही कोरडे आणि टिकाऊ- कधी शेंगाची चटणी, कधी भाजणी, कधी गूळपापडी… पण त्यातूनही आईची माया पाझरत असायची.

इशाचा जन्म झाल्यावर सुहासरावांनी ’श्रीचैतन्य’ बिल्डिंगमध्ये घर भाड्याने घेतलं. इथे शिल्पाताई ख-या अर्थाने रमल्या. ही बिल्डिंग तशी नवी होती आणि सगळे ’फॅमिलीवाले’ लोक होते. इथेच त्यांना भेटल्या लोढाकाकी. त्यांच्या सख्ख्या शेजारी. तान्हं बाळ घेऊन एकटीनेच संसार करणा-या शिल्पाला काकींनी खूप माया लावली. आईला शिल्पाताईंची फार काळजी वाटायची; बिचारी एकटी पोर तान्ह्या बाळाचं कसं निभावेल? पण, वडिलधा-या काकींमुळे आई अगदी निश्चिंत झाली. ज्या माहेरापासून त्या वंचित होत्या, ते माहेर शिल्पाताईंना लोढाकाकींच्या रूपात मिळालं. काकींकडून शिल्पाताई त्यांचे खास पदार्थ शिकल्या, विणकाम शिकल्या, सजावटीच्या वस्तू करायची दृष्टीही काकींकडून त्यांना मिळाली. दोन्ही घरांची दारं एकमेकांसाठी कायम खुली असायची. अभि पाच वर्षांचा झाल्यावर शिल्पाताईंनी जिद्दीने पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं, ते काकींच्या भक्कम पाठिंब्याच्या आधारावरच. काकींची सून हेतलही त्यांची छान मैत्रिण होती, दोघींची मुलं एकमेकांच्या बरोबरीने वाढली. अडीअडचणी, दु:खद प्रसंग, सणसमारंभ सगळे एकत्रच साजरे व्हायचे. जवळपास चौदा वर्ष हा स्निग्ध सहवास त्यांना लाभला. चौदा वर्षांचा खरंतर वनवास असतो असं म्हणतात, पण शिल्पाताईंसाठी हा कालावधी ’सुखवासा’चा होता. मग सुहासरावांनी चिंचवडमध्येच एक प्लॉट विकत घेतला. तिथे छोटासा बंगला बांधल्यावर बि-हाड हलवताना दोघींनाही एकमेकींचा निरोप घेणं फार जड गेलं होतं…

****

सुहासराव बेडरूममध्ये आले. हातात आईची साडी घेऊन बसलेल्या बायकोकडे पाहून ते हसले.

“कसला विचार चाललाय इतका?”

“अं? काही नाही…” शिल्पाताईंची तंद्री भंगली. “असाच विचार करत होते. बघता बघता परिस्थिती किती बदलली नाही? आपण इथे राहायला आल्यावर दोन-तीन वर्षांनी आपल्याकडे फोन आला. वडणेरला तर त्याच्याही नंतर… आईशी बोलायला अगदी व्याकूळ व्हायचे मी, तिचा चेहरा पाहायला आसुसायचे. मी एकटीच नाही, अशा कितीतरी जणी असतील आपल्या पिढीतल्या. आणि आताच्या या मुली… खरंच किती भाग्यवान आहेत. इशा किती लांब आहे, पण मनात आलं की तिला तिची आई दिसते. जणू आमच्यात अंतरच नाही… समोरच असल्यासारखी बोलते, रागावते आणि चिडतेही!” शिल्पाताई किंचित हसल्या. मग पुढे चिंतेने म्हणाल्या, “पण त्यामुळे ती मला फार गृहित धरते का हो?”

“मुलींनी आईला गृहित नाही धरायचं तर कोणाला धरायचं?” सुहासराव गंमतीत म्हणाले. ”हे बघ, आपण तरुण असतानाची परिस्थिती आणि आताच्या तरुण पिढीची परिस्थिती यात जमिन-आस्मानाचा बदल झालेला आहे. आपण वयाची तीस वर्ष टेलिफोनशिवाय जगलो, आता रांगत्या बाळाच्या हातातही फोन आहे! आपण कोंड्याचा मांडा केला, मनाला मुरड घालत जगलो, आणि या पिढीला कोंडाही माहित नाही अन मांडाही! आपल्याला खरी गरज होती, तेव्हाही आपण आपल्या मोठ्यांना कधी मदत मागितली नाही. संकोच वाटायचा, भीती होती. पण आपल्या मुलांचा कम्फर्ट बघ ना… हक्काने मागण्या करतात. मला आवडतो हा मोकळेपणा. इशा परदेशात पटकन रुळली, तिथली हवा, माणसं, काम शिकली. पण या छोट्या छोत्या गोष्टींसाठी मात्र तिला तूच लागतेस!”

“हो, ते मात्र आहे. इथे नाही का, अभ्यास आपापला करायची, जागरणं करायची, एकटी एकटी सगळीकडे जायची… पण ’चहा मात्र आई तूच दे!’ किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये काही बिनसलं की सल्ले मागायला, तक्रारी सांगायला आणि वेळप्रसंगी रडायला आईच पाहिजे.” त्या कौतुकाने म्हणाल्या. “शिक्षण विनासायास पूर्ण झालं, नोकरी लागली, भरपूर पैसे कमावू लागल्या इशाबाई. तिला मारे वाटतं आपण स्वतंत्र झालो, मोठ्या झालो, पण आहे अजून लहानच माझी बाळी.” त्यांना मुलीच्या प्रेमाचं भरतं आलं.  

“आणि म्हणूनच तिचे सारखे फोन! कारण तिला माहितेय ना, तू तिच्यासाठी कायम उपलब्ध आहेस. तू विचारलंस मगाशी, ते गृहित नाही धरत ती. उलट तुझ्यावर भिस्त आहे तिची म्हणून ती किती निश्चिंत आहे बघ! पण मला वाटतं, तुला बघतबघतच ती मोठी झाली आहे… तशीच वेळ आली तर तुझाच कित्ता गिरवत तीही शिकेल सगळं आपसुक.” आणि मग त्यांच्या नेहेमीच्या गंमत्या स्वभावाने त्यांनी पुस्ती जोडली,

“काय गं, समज आपलं वाय-फाय चार दिवस बंदच पडलं, तर काय करेल गं ही बया? सुरळीच्या वड्या शिकायला विमामानं इकडे तर येणार नाही ना?”

“नाही… बहुतेक स्वत: येणार नाही, पण फोनवर फोन करून भंडावून सोडेल नुसती…” दोघेही हसले.

सुहासरावांचं बोलणं ऐकून शिल्पाताईंच्या मनावरचं दाटून आलेलं मळभ अगदी हलकं झालं. ’खरंच की! सारखी फोन करते म्हणून मी रागावते खरी, पण ही फोनची सोय नसती तर? जीव निम्मा झाला असता माझा. इशा रोज दिसते, बोलते… किती बरं वाटतं. आई कित्येक वर्ष न बोलता माझी नुसती काळजी करत राहिली बिचारी आणि मीही तिच्या आठवणी मनातल्यामनातच काढत राहिले. आता खरे दिवस बदललेत. मी काही आईइतकी खंबीर नाही, मला काही तिचा दुरावा इतका सहज सोसला नसता. आणि इशाचं तर विचारायलाच नको! जवळ होती तेव्हा आई लागत नव्हती, आणि आता लांब गेली तर सारखं ’आई, आई!’’ त्या हसल्या आणि पटकन उठल्या.  

“चला, अजून दोन घाणे होतील वड्यांचे. मगाशी केलेल्या पहिल्या घाण्याचा फन्ना उडवलात बाप-लेकाने मिळून. आता हा घाणा काकींसाठी आहे हं. ढोकळा किंवा सुरळीची वडी केली आणि त्यांची आठवण आली नाही असं होतंच नाही, नाही? इशा गधडी पण मला सांगते, ’आई, काकींसारख्या वड्या मला शिकव!’ त्यांना आणि हेतलला उचक्या लागल्या असतील तिकडे. संध्याकाळी त्यांच्याकडे थोड्या वड्या घेऊन जाते. किती दिवस झाले दोघींना भेटून …”

“हो तर! गुरुमाऊलींना गुरुदक्षिणा वेळेत अर्पण करून ये. पण, माझ्या लेकीला कधी शिकवणार मग?”

“काय गंऽ बाई ती लेकीची काळजी! आहे तेही लक्षात. एक आयडिया आलीये, कशी वाटते बघा… दिवे यायची वाट बघायला नको. मी लगेच वड्या करायला घेते. तुम्ही आणि अभि माझ्या शेजारी उभे रहा, आपल्या तिघांच्याही मोबाईलच्या टॉर्चचा प्रकाश बरोब्बर कढईवर येईल असे धरा. वड्या करता करता मी बरोबरीने कॉमेन्टरी करते. असा सगळा व्हिडिओ एका मोबाईलवर रेकॉर्ड करा. आपण इशाला ते रेकॉर्डिंगच पाठवूया ना. पाहिजे तितक्या वेळा तिला ते बघता येईल. तिच्या कॉलची कशाला वाट पहायची, नाही का? मग तिला काही समजलं नाही, तर सांगेन परत. बिचारीला खाता येणार नाहीत, तर निदान नीट शिकवते तरी. चला, चला, परत तिचा फोन यायच्या आत तिला हे सरप्राईज देऊया… ए, अभिऽऽ…”

त्या एका पुलावर उभ्या आहेत, ज्याच्या एका टोकाला आई आणि काकी, तर दुस-या टोकाला इशा उभी आहे असं शिल्पाताईंना वाटलं. प्रत्येक पिढी वेगळी असली तरी त्यांच्यात एक अतूट स्नेहबंध आहे असंही त्यांना जाणवलं. वेगवेगळे पदार्थ, त्यांची कृती, पदार्थ साध्य करायच्या युक्त्या आणि त्यानिमित्ताने होणा-या गप्पा यामुळे त्या सगळ्या जोडल्या गेलेल्या असल्या, तरी ते कारण फक्त वरवरचं… वय, भाषा, प्रांत, अंतर, अडचणी यांना लांघून एकमेकींची लागलेली ओढ, मिळणारा सहवास, प्रेम आणि माया हेच काय ते संचित!

शिल्पाताईंच्या डोळ्यांत पाणी आलं आणि अंगात उत्साह संचारला. लेकीसाठी काय करू, कसं करू आणि किती करू असं त्यांना झालं. अभि, सुहासराव यांना भराभर सूचना देत लगबगीने त्या स्वयंपाकघरात शिरल्या…

***

समाप्त

***

 

2 comments:

इंद्रधनु said...

छान कथा, आवडली :)

poonam said...

Thank you for leaving a comment and expressing your appreciation Prachi ji! Means a lot :)