August 20, 2020

Andre Agassi- (out in the) Open

 

आन्द्रे अगासीला पहिल्यांदा टीव्हीवर टेनिस खेळताना पाहिलं तेव्हा ’ईईई’ हा उद्गार आपोआप निघाला होता… माझ्या एकटीकडूनच नाही, तर जगभरातल्या टेनिसप्रेमींकडून! कसेतरीच लांब वाढलेले त्याचे ’ब्लॉन्ड’ केस, दाढीचे वाढलेले खुंट, कानात डूल, कपाळावरचा हेअरबॅन्ड… त्याचा एकंदर ’लुक’ अत्यंत घाणेरडा आणि किळसवाणा होता. जॉन मॅक्रेन्रो, इव्हान लेन्डल या तेव्हाच्या ’जंटलमन’ खेळाडूंच्या तुलनेने अगासीचं हे विसंगत रूप म्हणजे एखाद्या सेन्सेशनल स्कॅन्डलसारखं होतं. पण त्यातून तो काहीतरी सांगू पाहत होता. व्यावसायिक टेनिसपटू असूनही टेनिसबद्दल त्याला कमालीचा तिरस्कार वाटायचा. हाच तिरस्कार त्याच्या राहणीमानातून तो परावर्तित करत होता. आन्द्रे अगासीचं आयुष्य अशा टोकाच्या विरोधाभासांनी भरलेलं आहे. त्याचंच शब्दरूप म्हणजे त्याचं आत्मकथन- Open: An Autobiography

 

आन्द्रेने टेनिसपटू व्हावं हा त्याच्या वडिलांचा अट्टहास होता. आन्द्रेला दोन मोठ्या बहिणी आणि एक मोठा भाऊ होता. त्यांच्यापैकी कोणीही टेनिसपटू झाले असते, तर आन्द्रेवर हे ’संकट’ आलं नसतं. पण वरचे तिघेही टेनिसमध्ये चुणूक दाखवू शकले नाहीत, त्यामुळे वडिलांचं स्वप्न आणि इच्छा पूर्ण करायची जबाबदारी या बिचा-यावर आली. आन्द्रेला नंबर वनचा टेनिसपटू करायचं या भावनेने त्याचे वडील झपाटलेले होते. या त्यांच्या इच्छेसाठी त्यांनी शक्य ते सगळं केलं. घरामागे टेनिसकोर्ट बांधलं, आन्द्रेला बॉल सर्व्ह करणारं मशीन बांधलं, त्याला शक्य त्या सगळ्या टूर्नामेन्ट्समध्ये खेळवलं आणि परवडत नसतानाही त्याला टेनिस ऍकॅडमीत घातलं. कळायला लागल्यापासून आन्द्रे फक्त टेनिसबॉल टोलवत होता. शाळेतल्या कुठल्याच विषयात त्याला गती नव्हती, त्यामुळे वडिलांना विरोध करणार कशाच्या जोरावर? तो हतबल होता. त्याच्या नशीबातच टेनिसच होतं.

या नशीबाचा त्याने शक्य तितका, शक्य तेव्हा, शक्य तिथे रागराग केला. त्याचा पेहराव, त्याचं वागणं, त्याच्या सवयी, त्याचं जीवनमान, त्याचा टेनिसकोर्टवरचा वावर… सगळ्यात एक धुम्मस होती. त्याची मानसिकता सतत दोलायमान असायची. जेव्हाजेव्हा तो जिद्दीने पेटून उठला, तेव्हातेव्हा त्याने नेत्रदीपक यश कमावलं. टेनिसच्या जागतिक क्रमवारीत त्याने पहिलं स्थान पटकावलं, चारही ग्रॅन्ड स्लॅम विजेतेपदं त्याने मिळवली, तो देशाकडूनही खेळला, अनेक विक्रम त्याने स्वत:च्या नावावर अगदी ठरवून जमा केले, त्यासाठी त्याने अथक कष्टही घेतले. हे यश त्याला फार संघर्षानंतर मिळालं, पण त्यातलं फोलपणही त्याला उमगलं. मग, लंबकाचा हाच लोलक विरुद्ध दिशेने गेला. दिवसचे दिवस तो बंद पडला, पहिल्या स्थानावरून तो थेट १४१व्या स्थानावर फेकला गेला, लिंबूटिंबू खेळाडूंकडून त्याने पराभव स्वीकारले, दारू त्याने नेहेमीच जवळ ठेवली होती, पण वाहवत जाऊन तो अंमली पदार्थांच्याही आहारी काही काळ गेला. शिखरावरून गडगडत तो खोल दरीत पडला. प्रत्येकाच्याच जीवनात चढ-उतार येतात, पण आन्द्रे आगासीच्या जीवनातले हे चढ-उतार स्तिमित करतील असे आहेत.

आन्द्रे अगासी माध्यमांचा लाडका होता यात नवल नाही. त्याच्याकडे चिकार उपद्रवमूल्य होतं, ते तो स्वत:ही जाणून होता, त्यामुळे तो सतत प्रकाशझोतात राहिला. स्पर्धा जिंकत असताना तर त्याच्याबद्दल लिहिलं जात होतंच, पण त्याच्या हरण्याचीही बातमी व्हायची. त्यातून, त्याचं वैयक्तिक आयुष्यदेखील ’बातमी’लायक होतं. त्याच्यापेक्षा २८ वर्षांनी मोठ्या असलेल्या गायिका बार्बरा स्ट्रीसॅन्डबरोबर त्याचं काही काळ अफेअर होतं. पुढे मॉडेल आणि अभिनेत्री ब्रुक शील्ड्जशी त्याने लग्न केलं आणि दोनच वर्षांनी ते मोडलंही. या दोन्हींमुळे ऑन-कोर्टपेक्षा ऑफ-कोर्ट प्रसिद्धी त्याला जास्त मिळाली.

’ओपन’मध्ये अगासी उघडपणे त्याच्या सगळ्याच प्रवासाबद्दल बोलला आहे. यशाबद्दलच नव्हे, तर अपयशाबद्दल, त्याच्या चुकांबद्दलही तो अगदी प्रांजळपणे बोलला आहे. त्याने त्याच्या अनेक स्पर्धकांबद्दल लिहिलेलं आहे. पीट सॅम्प्रासने कायमच त्याच्या तोंडाशी आलेला विजयी घास हिरावून घेतला. पीटबद्दलचा रागही त्याने मोकळेपणाने शब्दबद्ध केला आहे, तेव्हा तो थोडा स्वार्थीही वाटतो. पण, त्यामुळे त्याचं माणूसपण अधोरेखित होतं.

टेनिसमधलं प्रावीण्य, जिंकण्याचं कौशल्य, पैसा, मानमरातब…सगळं असूनही आन्द्रेला प्रश्न पडायचे- का खेळायचं? कोणासाठी पैसे मिळवायचे? आयुष्याला दिशा नव्हती, त्यामुळे तो कुठेही रमत नव्हता. मग दोन गोष्टी घडल्या. वंचित, शोषित लहान मुलांना सर्वोत्तम शिक्षण देणारी एक शाळा सुरू करायची असं त्याने ठरवलं. तो स्वत: फक्त ’आठवी पास’ आहे याचा सल त्याला कायमच वाटायचा. ज्या मुलांना शिक्षण मिळू शकत नाही, अशांसाठी जगातल्या सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कल्पनेने तो रोमांचित झाला. आता त्याच्या टेनिसला, त्यातून मिळणा-या पैशांना एक किनारा मिळाला. पुढे त्याच्या आयुष्यात आली स्टेफी ग्राफ! टेनिसच्या या साम्राज्ञीची भुरळ कोणाला पडली नव्हती? त्यालाही पडली. नवलाची गोष्ट अशी, की तीही याच्यावर भाळली! जे स्थैर्य त्याला ब्रुकबरोबर कधीही मिळालं नाही ते त्याला ’स्टेफनी’च्या रूपात मिळालं. या दोन गोष्टींमुळे त्याचं टेनिस, त्याची क्रमवारी परत एकदा सुधारली. परत एकदा लंबकाचा लोलक दुस-या दिशेने फिरला.

निवृत्ती. कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यातला अतिशय अवघड निर्णय. खेळाडू ’निवृत्त’ होत असला, तरी वयाने तो तरूण असतो. पुढच्या आयुष्यात काय करायचं आहे, याचं उत्तर ज्याला सापडतं, तो खेळाडू समाधानाने निवृत्त होऊ शकतो. शाळेमुळे आन्द्रेला जगण्यासाठी एक ध्येय मिळालं होतं. स्टेफनीशी लग्न केल्यानंतर पाठोपाठ झालेल्या दोन मुलांमुळेही त्याच्या सुखाचा प्याला काठोकाठ भरला होता. आन्द्रे अगासी स्पर्धात्मक टेनिसमधून निवृत्त झाला. व्यावसायिक टेनिस क्षेत्रात वीस वर्ष एक वादळ कमी-जास्त प्रमाणात घोंघावत होतं, ते त्याच्या निवृत्तीनंतर शमलं.

आन्द्रे अगासीने त्याच्या कारकिर्दीत आठ ग्रॅन्ड स्लॅम टायटल्स जिंकली. रॉजर फेडररच्या वीस, राफेल नदालच्या एकोणीस टायटल्सपुढे ही आठ अगदीच किरकोळ वाटतात. पण २००९ साली प्रकाशित झालेलं त्याचं  हे आत्मकथन मात्र आजही कालबाह्य वाटत नाही. खेळाडू सतत स्वत:ला प्रश्न विचारत असतो, सतत स्वत:ला जोखत असतो. अगासीने स्वत:चे अनुभव लिहिलेले असले, तरी ते सार्वत्रिक आहेत. खेळ सुरू असताना त्याच्या मनात जी खळबळ चालायची, तीच घालमेल, तेच दडपण, तीच भीती प्रत्येक खेळाडू कमी-जास्त प्रमाणात अनुभवत असणार. अगासीचे शब्द एका अर्थी प्रातिनिधिक आहेत. त्याचे शब्द अतिशय प्रभावीही आहेत. ३६ वर्षांचा त्याचा जीवनपट खरोखर विस्मयकारक आहे. अपयशाच्या खोल गर्तेत गेल्यावरही तो तिथे रुतला नाही; उलट सावरला, ’मार्गाला लागला’. त्याच्या विजेतेपदांपेक्षा त्याचा हा ’टर्न अराउंड’ अधिक मौल्यवान आहे.

२०२० मध्ये अगासी काय करत आहे, याचा सहज शोध घेतला, तर तो आजही टेनिसचे प्रदर्शनीय सामने खेळतो आहे. त्याच्या शाळा छानपैकी चालू आहेत आणि त्यांचा विस्तारही वाढतोय. टेनिसचा आणि स्वत:च्या वलयाचा वापर करून तो शाळांसाठी आजही पैसे उभे करत आहे. छान वाटतं हे पाहून. आन्द्रे अगासी शब्दाला जागला, जागत आहे. एक खेळाडू म्हणून तो आदर्श नव्हता, पण एक माणूस म्हणून तो त्याच्या चुकांमधून शिकला, त्या ओलांडून तो पुढे गेला आणि मग मोठा झाला. An ’open’ inspiration indeed!

***

 

0 comments: