July 25, 2020

आपण मदत मागायला घाबरतो का?


हा प्रश्न तसा वैश्विक आहे, प्रत्येकाला कमी-जास्त प्रमाणात लागू आहे, पण आज मी हा प्रश्न मुख्यत्वे बायकांना विचारत आहे, त्यातही संसारी बायकांना. म्हणजेच, एका अर्थाने, मी हा प्रश्न मलाच विचारत आहे.
लॉकडाऊनच्या काळात धुणं, भांडी, केर, फरशी, चहाची भांडी, कॉफीची भांडी, स्वयंपाक, चमचमीत खाणं, कपड्यांच्या घड्या, बाथरूम घासणं, डस्टिंग, फॅन पुसणं, गच्ची/ गॅलरी धुणं, धान्य साठवणं, याद्या करणं, भाजी-फळं आणणं… यातली किती कामं आपण स्वत: केली आणि किती कामं करण्यासाठी आपण घरातल्या इतर सदस्यांची मोकळेपणाने मदत घेतली? (मुख्य रोख नवरा आणि मुलं यांच्यावर आहे.)
पैसे देऊन मदतनीस ठेवणं आपल्याला सहज सोपं वाटतं. पण तीच कामं घरच्यांकडून घेताना आपण घाबरतो का? संकोच करतो का? insecurity असते का? सगळेच जण स्वावलंबी झाले तर, आपलं घरातलं स्थान डळमळीत होईल असं वाटतं का?
१)      भांडी घास असं नव-याला कसं सांगू? तो किती मोठ्या हुद्द्यावर काम करतो. तो केवढे पैसे कमावतो.
२)      नव-याला घरकाम सांगितलं तर सासू काय म्हणेल? तिच्याशी या दिवसात कोण वाद घालणार?
३)      पिंटूला आणि मिनीला तर घरात कुठे काय असतं हेही माहित नाही. त्यांना कसं काम सांगणार? किती लहान आहेत ती.
ही वाक्य ओळखीची वाटतात ना? वाटतीलच! कारण आपण ती मनात म्हणतच असतो. आणि या प्रत्येक वाक्यानंतरचं एक वाक्य कॉमन असतं- “प्रत्येक काम मलाच करावं लागतं. मला कोणाचीच मदत होत नाही”. या बायकांना मला विचारायचं आहे- का नाही करत कोणी मदत? तुम्ही कधी मदत मागून पाहिली आहे का???
खरं सांगा, साधारणपणे बारा वर्ष पूर्ण असलेली प्रत्येक व्यक्ती आपापलं ताट-वाटी-भांडं-चमचा-कप स्वत: धुवू शकत नाही का? आपापल्या अंथरुणाची घडी घालू शकत नाही का? एका खोलीचा केर काढू शकत नाही का? कपड्यांच्या घड्या घालू शकत नाही का? त्यांनी तसं केलं तर आपल्यालाच मदत होणार नाही का? मग आपण मदत का मागत नाही?
 “माझ्यासारखं कोणाला जमत नाही”, हेही एक नेहेमीचं कारण! अहो, लगेच कसं जमेल? थोडा वेळ द्या, नीट शिकवा. येईल की. पण नाही! आपल्याला धीर तर नसतोच आणि समोरच्यावर विश्वासही नसतो. शिवाय, आपण काणाडोळा करायला शिकत नाही. नाही घासली लगेच भांडी, नाही काढला एक दिवस केर, काय होईल? पण इथेही आपला जीव गुंतलेला असतो!
खरं सांगू का, इतकं मायक्रो मॅनेजमेन्ट कोणीच करू नये. पण बायका करतात, आणि म्हणूनच घरचे वैतागतात. ’तुला काहीच पसंत पडत नाही’, हे त्यांच्याकडून आलेलं वाक्य अगदीच दुर्लक्ष करण्याजोगं नसतं. हां, काही बायका कौतुकाने, लटक्या रागानेही ही अशी वाक्य म्हणतात, त्यांना मदत नकोच असते. पण बहुतांश बायका अशा असतात, की ज्यांना खरंच घरच्यांना मदत मागायला संकोच वाटतो, भीती वाटते, गैरसमज होईल असंही वाटतं. त्यांचं चूक नसेलही, प्रत्येक घरातली पद्धत निराळी. पण मला काय वाटतं, ती आपलीच माणसं आहेत, पाषाणहृदयी राक्षस वगैरे नाहीयेत. सगळी कामं एकटीवर पडल्याने आपण दमतो हे त्यांनाही समजतं की. त्यामुळे आपण नीट मदत मागितली, तर ते नक्की करतील. पण ’मी करते तसंच झालं पाहिजे, याच वेळेला व्हायला हवं’सारखे अट्टहास केलेत, तर मात्र अवघड आहे, तुमचं!
घरकामासाठी मदत मागणं म्हणजे कमीपणा नसतो, ते तुमच्या कर्तृत्वावरचं प्रश्नचिन्हही नसतं. पण मदत मागताना काही गोष्टींकडे दुर्लक्षही करता यायला हवं. काय महत्त्वाचं आहे, काय नाही याचं ’लार्जर पिक्चर’ बघता यायला हवं. आपण इतक्या तारेवरच्या कसरती निभावतो, ही छोटीशी कसरत नक्कीच निभावू शकू. आढेवेढे न घेता मदत करा, आणि हक्काने मदत घ्याही. शेवटी काय, तर ’एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’! ऑल द बेस्ट!
     
***

2 comments:

Anonymous said...

perfect!!!

poonam said...

Thank you Anonymous, I wish you would have left your name :)