July 1, 2020

लिरिक्सवाला गाना- पंढरी सोडून चला...

आपल्या भक्तांच्या प्रत्येक हाकेसरशी धावून जाणा-या विठ्ठलावरती अनेक अभंग, गाणी, ओव्या रचलेल्या आहेत. यातलं एक गाणं त्यातल्या एका आगळ्यावेगळ्या मागणीमुळे लक्षवेधक ठरतं. आशाबाईंच्या आवाजात हे गाणं आहे-
पंढरीनाथा, झडकरी आता,
पंढरी सोडून चला, विनविते रखुमाई विठ्ठला ’
 
ही मागणी चक्क रखुमाई करतेय. ती म्हणतेय, हे पंढरपूर, म्हणजे आपलं गाव, आपलं घर, ते सोडून जाऊया, तेही अगदी लगेचच... ’झडकरी’... किती गोड शब्द आहे! त्वरित, ताबडतोब, सत्वर पंढरपूर सोडून जायची घाई रखुमाईला का झाली असावी
 
रखुमाई नाराज आहे. पंढरपुराला विठ्ठलाने आपलं स्थान मानलं, जिथे त्याने कायमचा वास केला, जिथे त्याच्या ’कर कटेवरि घेऊनिया’ रूपाने भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. पण तिथे आता रखुमाईचं मन मात्र रमत नाहीये. ज्ञानोबा, तुकाराम, नामदेव, जनाबाई या थोर संतांमुळे आणि विठ्ठलाचा असंख्य भक्तांमुळे विठ्ठलाच्या या गावाला, या घराला घरपण आलं. इथूनच त्याने त्याच्या भक्तांचे त्रास पाहिले, ते दूर केले, त्यांना दर्शन दिले आणि त्यांचा उद्धारही केला. पण या घराला आता घरपण राहिलेलं नाही असं रखुमाई म्हणते. ती म्हणतेय की आता इथे विठ्ठलाला भेटायला भक्त येत नाहीत, आता येतात ते फक्त सौदेबाज. विठ्ठलाचे खरे भक्त त्याच्याकडे कसलीही याचना करत नाहीत का त्याच्याकडून काही अपेक्षा करत नाहीत. त्यांना फक्त त्यांच्या माऊलीचा आशीर्वाद हवा असतो. पण आता काळ बदलला. आता तसे भाबडे भक्त राहिले नाहीत. आता पंढरपुरात व्यापारी येतात. आता विठ्ठलाच्या आशीर्वादाचा मोबदला ठरवला जातो, मागितला जातो आणि दिलाही जातो. आपल्या घराचं बदललेलं हे रूप रखुमाईला सहन होत नाहीये. ’हे असं आहे का आपलं घर?’, रखुमाई विठ्ठलालाच विचारतेय. ती उद्वेगाने विचारतेय, ’यासाठी का आपण इथे राहिलो?’ 
 
ज्ञानदेवे रचिला पाया
कळस झळके वरि तुकयाचा
याच मंदिरी आलो आपण
प्रपंच करण्या भक्तजनांचा
भक्त थोर ते गेले निघुनी
गेला महिमा तव नामाचा
विक्रय चाले देवपणाचा
रहायचे मग इथे कशाला 
 
खरं तर देव आणि भक्त यांच्यामध्ये किती साधी सरळ देवाणघेवाण असते... देवही भाबडा असतो आणि भक्तही. भक्तांना त्यांच्या आराध्याशी बोलायची मनमुक्त मुभा तेवढी हवी असते. देवालाही दुसरं काय हवं असतं? श्रद्धेने आपल्या दर्शनासाठी येणा-या भक्तांचं दु:ख जाणून घ्यावं, त्यांच्या वेदनेवर हळूवार फुंकर मारावी, त्यांना आपल्या नामाचा लाभ घेऊ द्यावा, बस्स! या हृदयीचे ते हृदयी असा हा मूक संवाद व्हावा. आनंदीआनंद व्हावा.
पण! हा पणच तर अडसर ठरतो. देव कोणाचा असावा, देव कसा असावा, त्याला कोणी भेटावे, त्याला केव्हा भेटावे हे कोणीतरी भलतेच ठरवतात. देव आणि भक्त यांच्यामध्ये भिंत बांधली जाते. तो एक मूक, आत कोंडला जातो; हे अनेक मूक, हतबल होतात. देव भक्तांना दुरावतो.
धरणे धरुनी भेटीसाठी

पायरीला हरिजन मेळा
भाविक भोंदू पूजक म्हणती
केवळ अमुचा देव उरला
कलंक अपुल्या महानतेला
बघवेना हो रखुमाईला 
 
एकीकडे देवाची ही अवस्था, तर दुसरीकडे भक्तांची. मधल्यामध्ये या दोघांच्याही वतीने स्वत:च्या फायद्याचं ठरवणारे भोंदू पूजक रखुमाईला मुळीच मान्य नाहीत. रखुमाई या ’देवी’ला कायमच एक स्वतंत्र स्थान आहे, तिला तिचं मत आहे आणि ती ते वेळोवेळी नोंदवतेदेखील. वेगवेगळ्या कथांमधून, अभंगांमधून रखुमाईच्या व्यक्तिमत्वाची ओळख आपल्याला झालेली आहे. लक्ष्मीसारखी ती विष्णूची केवळ अर्धांगिनी नाही आणि पार्वतीसारखी शंकराच्या भक्तांबाबत अलिप्तही नाही. विठ्ठल जितका त्याच्या भक्तांच्या बाबतीत हळवा आहे तितकीच रखुमाईही आहे. प्रत्येक भक्ताच्या हाकेला विठोबा धावून जाताना दिसत असला, तरी भक्ताची गरज रखुमाईही ओळखून आहे. ती विठोबाला रोखत नाही, टोकत नाही, मूक पाठिंबा देते. क्वचित ती स्वत:देखील भक्तांच्या हाकेला ’ओ’ देते. हां, भक्तांच्या मागण्या अवाजवी वाढलेल्या मात्र तिला आवडत नाहीत. एका सामान्य बायकोसारखी ती देव असलेल्या तिच्या नव-यावर अधूनमधून रागावते, रुसते आणि चक्क त्याला जाबही मागते. आणि विठोबाही सामान्य नव-यासारखा अनेकदा रखुमाईकडे दुर्लक्ष करतो, पण त्यालाही तिचा रुसवा काढावा लागतो. विठोबा-रखुमाई हे एकमेकांना अतिशय पूरक असलेलं आदर्श जोडपं आहे, पण त्याच बरोबर एक स्वतंत्र स्त्री म्हणून रखुमाईचं व्यक्तिमत्त्व अतिशय रोचक आहे
 
त्यामुळेच, या गाण्यात रखुमाई आधी विनंती करते, त्या विनंतीमागचं कारण सांगते आणि अखेर विठ्ठलाला निर्वाणीचा इशाराही देते,
यायचे तर लवकर बोला
ना तर द्या हो निरोप मजला 
 
रखुमाईचं म्हणणं स्पष्ट आहे- देवाच्या नावाचा जो बाजार मांडला गेला आहे, तो पूर्ण चुकीचा आहे, अन्यायकारक आहे आणि आपल्या कर्मालाही तो साजेसा नाही. तो थांबायला हवा आणि तो थांबणार नसेल, तर आपण आपलं हे स्थानच सोडून जाऊ. आणि देवा, तुम्हाला तेही अवघड जाणार असेल, तर किमान मला तरी जाऊद्या. मी डोळ्यावर पट्टी बांधून हा अनागोंदी कारभार बघू शकत नाही
 
निवृत्तीनाथ रावजी पाटील , म्हणजेच सुप्रसिद्ध गीतकार, जनकवी पी. सावळाराम यांनी हे गीत लिहिलेलं आहे आणि आशाबाईंनी त्याला स्वरसाज चढवला आहे. पी. सावळाराम यांना रखुमाईची नस अचूक सापडली आहे असं मला वाटतं. सहसा विविध साक्षात्कारांच्या साहाय्याने केवळ विठ्ठलाची महती लिहिण्याचा मोह कोणाही गीतकाराला होईल, पण सावळारामांना भक्तीचा बाजार मांडणा-या समाजकंटकांवर ताशेरे ओढावेसे वाटले आणि त्यासाठी त्यांनी मोठ्या खुबीनं रखुमाईच्या रोखठोक स्वभावाचे गुणविशेष वापरले आहेत. गीतकार म्हणून ते किती श्रेष्ठ आहेत हे या गाण्यातून दिसून येतं
 
रखुमाई खरंच विठ्ठलाला सोडून जाऊ शकते, ती पोकळ धमक्या देत नाही. ती प्रत्यक्ष देवाचीही कानउघाडणी करू शकते. सहसा समाजमान्य झालेल्या प्रथा आणि रिवाजांविरुद्ध बोलणा-या व्यक्तीला मोठ्या प्रमाणावर रोष स्वीकारावा लागतो. रखुमाईचंही तसंच आहे. भक्तजनांचं रखुमाईपेक्षा विठ्ठलावर जास्त प्रेम आहे, कारण तो बिचारा भोळा, तर ही कडक. पण अर्धांगिनी अशीच असायला हवी, नाही का? एकनिष्ठ, तरीही निर्भीड! आदर्श स्त्री, पत्नी म्हणून अनेक देव्यांची आणि स्त्रियांची नावं घेतली जातात, त्यात प्रमुख स्थान रखुमाईचं असायला हवं. तिला भक्ताच्या दु:खाची जाणीव आहे, त्याच्यावर होणा-या अन्यायाने ती तळमळते, त्याला वाचा फोडते.. व्यक्तीपूजक, स्वार्थी समाजात सहसा आपल्यासमोर आरसा दाखवणारं कोणी भेटत नाही. चुकीला चूक म्हणणारी रखुमाई हा विठ्ठलाचा आरसा आहे. ती नसेल तर विठ्ठल अपूर्ण आहे
 
लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार असताना आपली मुळं सहज विसरली जाऊ शकतात. अशावेळी आपल्या सत्वाची नव्याने ओळख करवून देण्यासाठी आपल्यावर खरं प्रेम करणा-या माणसाची गरज असते. जे पती-पत्नी हे पारदर्शक नातं जपतात तेच ख-या अर्थाने एकमेकांचे सहचर होऊ शकतात. आज पंढरपुरात विठ्ठल आणि रखुमाईची दोन वेगवेगळी मंदिरं आहेत. लौकिकार्थाने ते वेगळे आहेत. पण तरीही विठ्ठलाला शोभा रखुमाईमुळेच आहे, हेही तितकंच खरं. ती विठ्ठलाच्या ’वामांगी’ उभी असली, तरी तिच्यामुळेच विठ्ठलाची ’दिसे दिव्य शोभा’ यात कोणाचंच दुमत नसावं

0 comments: