May 25, 2020

वाचनवेड

मुलं आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून काही गोष्टी आपोआप आत्मसात करतात. मी माझ्या आजीकडून ’वाचन’ शिकले. माझी आजी कायम काहीतरी वाचत असायची. संपूर्ण सकाळभर वर्तमानपत्र पुरायचं. दुपारी वामकुक्षी घेण्याआधीही आधी लवंडून पुस्तक वाचन व्हायचंच. १९८० च्या दशकात आजीने ’घरपोच लायब्ररी’ लावलेली होती.  लायब्ररीवाले काका दर महिन्याला पुस्तकांच्या जड पिशव्या घेऊन घरी यायचे. महिन्याला बारा पुस्तकं! चंगळ!! आजीच्या वाचनप्रियतेमुळं मी आणि माझी भावंडंही पुस्तकातले किडे झालो होतो. त्या बारा पुस्तकांपैकी सहा आजीच्या पसंतीची आणि सहा आमची अशी वाटणी होती. काका आले की माझे आत्तेभाऊ जवळजवळ झडप घालूनच पुस्तकं ताब्यात घेत. प्रचंड खल करून पुस्तकं निवडली जात. सगळ्यात लहान असल्यामुळे माझं मत फारसं विचारात घेतलं जायचं नाही, पण त्यामुळे मी आजीने निवडलेल्या कादंब-याही वाचायचे आणि भावंडांनी घेतलेल्या रहस्यकथाही!

आजी फारशी धार्मिक नव्हती. देवळात जाणं, कीर्तन ऐकणं तिने माफक केलं. ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत, कसकसल्या पोथ्याबिथ्या वगैरेही वाचल्या, पण तिला मनापासून आवडायचं ते फिक्शनच! कथा, कादंबर्‍या सर्वात प्रिय. फार जड, फिलॉसॉफिकल पुस्तकं वाचायची नाही! बर, जे वाचलंय त्यावर हीरीरीने चर्चाही कराबिरायची नाही! सगळं फक्त स्वानंदासाठी! तिची वाचायला बसायची एक टिपिकल पोझ होती.. एक पाय लांब करायचा, कंबरेत वाकून दुसर्‍या पायावर हाताने पुस्तक तोलून रेलायचे आणि तासनतास वाचत बसायचं! पुढे, वय झालं तसं पुस्तक पेलवत नसे, तर पोझ तीच, फक्त पुस्तक हातात धरण्याऐवजी समोर उशीवर ठेवलेलं असायचं! थंडीच्या दिवसात दुपारी नऊवारी साडीचा पदर डोक्यावरून घेत, उन्हाला पाठ करून अंगणात ती वाचत बसायची. आम्हीही तिचं अनुकरण करत तिच्या शेजारी बसत असू. पण, थोड्य़ा वेळाने उन्हाने आमच्या पाठीला चटके बसायचे आणि आम्ही उठायचो, आजी मात्र निवांत बसलेली असायची! एकदा वाचायला लागलं, की आमचे आवाज, ऊन, खराब हवा वगैरे किरकोळ गोष्टी तिला त्रास देत नसत.

माझे वडिलही असेच पुस्तककिडे. त्यांची वेळ मात्र रात्रीची, आणि त्यांचं अधिककरून वाचन इंग्रजी पुस्तकांचं. त्यांच्या झोपण्याच्या जागेपाशी कायम एक टेबललॅम्प आहे. घरं बदलली, तरी रात्री वाचण्यासाठी डोक्यापाशी असलेल्या दिव्याची जागा काही बदलली नाही. त्यांचीही पुस्तक वाचायची एक आवडती ’पोझ’ होती. ते आरामखुर्चीत बसत, एका हातात पुस्तक आणि एक हात डोक्यावर! असे ते तासनतास बसलेले असत. आजही रात्री काही ना काही वाचल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही. हा त्यांचा वारसा मीही चालवते आहे. मलाही रात्री झोपण्याआधी वाचल्याशिवाय झोप येत नाही, आणि डोक्याशी टेबललॅम्पही हवाच! माझीही एक गंमतशीर पोझ होती. मी पलंगावर पोटावर झोपत असे आणि पुस्तक खाली जमिनीवर! हातात धरायची भानगडच नाही! अनेक पुस्तकांचा फडशा मी असा पाडलेला आहे. (आता मात्र पुस्तक हातात धरूनच वाचते!)
मला आजोबांनी बाराखडी शिकवल्यापासून मी झपाझप वाचायला लागले. वाचन करताना मी कधी अडखळले नाही. एकदा गाडी सुरू झाली ती झालीच. मला सगळं काही वाचायला आवडतं, अभ्यासाची पुस्तकंदेखील. त्यामुळेच ’थिअरी’ विषयांत मी अजूनही जास्त रमते. गणिताशी सख्य झालं नाही. सासूबाई आणि नवरा हेदेखील वाचनवेडे.
हा इतका ’वारसा’ असूनही माझा मुलगा मात्र अगदी अस्सल या पिढीचा आहे. त्याचं वाचनप्रेम हे फार ’सिलेक्टिव्ह’ आहे. आम्ही तर अक्षरश: ’जे दिसेल ते’ वाचणारे. मुलाच्या आवडी मात्र अगदी ठरलेल्या. सुरुवातीला आम्ही बरेच प्रयत्न केले, त्याचं वाचनप्रेम वाढावं म्हणून वेगवेगळी पुस्तकं आणली, त्याला गोष्टी सांगितल्या, पुस्तकं हाताळायला दिली… त्या त्या वेळेला त्याने रस दाखवलाही, पण तो रस टिकला नाही. त्याला आवडलेलं पुस्तक तो पाठपुरावा करून अगदी दोन दिवसांतही पूर्ण करेल. पण पुस्तक वाचण्यापेक्षा त्याच्या दृष्टीनं आणखी एखादी interesting activity असेल, तर तो ती प्राधान्याने निवडेल, पुस्तक सहज बाजूला ठेवेल. हे पचवणं आम्हाला जरा जड गेलं, पण शेवटी मान्य करण्यावाचून इलाज नाही. कदाचित असंही असेल की त्याला रस वाटेल अशी पुस्तकं त्याला आम्ही देऊ शकलो नाही. कदाचित आणखी मोठा झाल्यावर, आणखी अनुभवी झाल्यावर त्याला त्याच्या आवडीची पुस्तकं मिळतील आणि तोही वाचनवेडा होईल!! Who knows? या उलट, माझे असे काही परिचित आहेत, जे स्वत: अक्षरशत्रू आहेत, पण त्यांची मुलं मात्र प्रचंड वाचतात. मला या गोष्टीचं फार नवल, आश्चर्य आणि गंमत वाटते, थोडा हेवाही वाटतो J  
आता तर पुस्तक वाचनाचे कितीतरी पर्यायही आहेत, ऑडियो बुक्स, ई-बुक्स, किंडलसारखी केवळ वाचनासाठी तयार केलेली उपकरणं आहेत आणि आपली कागदी पुस्तकं आहेतच. कोणताही, किंवा सगळे पर्याय निवडावेत, पण माणसाने वाचत राहावं. वेळकाळ विसरून पुस्तकात रमलेली व्यक्ती किती सुंदर दिसते! पुस्तकातली गोष्ट अनुभवत ती केवढा मोठा प्रवास करते, आपल्या विवंचना विसरून एखाद्या नवीन विश्वात हरवून जाते, हसते, रडते, दु:खी होते, विचारात पडते… वाचणारी व्यक्ती पानापानाला समृद्ध होत जाते. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या वाचनवेड्यांना (आणि मलाही) भरपूर, विविध, सुंदर पुस्तकं वाचत राहायला मिळोत, ती वाचताना त्यांना शांतपणा लाभो, त्यांच्या वाचनतंद्रीत कोणताही अडथळा न येवो! कारण जे.के.रोलिंग म्हणून गेलेलीच आहे, की ‘I do believe something very magical can happen when you read a book!’  
  

0 comments: