अजयकडे जाऊन आल्यापासून निनाद अस्वस्थ आहे हे निधीच्या लक्षात आलं होतं.
अजय निनादचा शाळेतला जवळचा मित्र होता. पलीकडच्याच गल्लीत राहायचा, एकमेकांच्या
घरी नेहेमी येणं-जाणं असायचं, साहजिकच त्याचे आई-वडील निनादच्या चांगल्याच
परिचयाचे होते. पुढे शिक्षण, नोकरी यामुळे दोघांचे रस्ते वेगळे झाले. आता ते फक्त शाळेतल्या
मित्रांच्या एका व्हॉट्सॅप ग्रुपच्या माध्यमातून संपर्कात होते.
निनादला हे असे ग्रुप्स खरंतर अजिबात आवडायचे नाहीत. लोक नुसते मेसेजेस
फॉरवर्ड करत राहतात, एकमेकांशी आपुलकीचं बोलणं होत नाही ही त्याची नेहेमीची तक्रार
होती. तरी, जुन्या जिव्हाळ्याखातर निनाद ग्रुपवर होता. ग्रुपवर हास्यविनोद
चालायचे, बातम्यांची देवाणघेवाण चालायची. व्हर्चुअल जमान्यातली सो-कॉल्ड मैत्री
कायम होती. त्याच ग्रुपवर सकाळी अजयचे वडील गेल्याची बातमी कोणीतरी पोस्ट केली
होती. या अवघड वेळेला अजयला आपण मदत करायला हवी, अनेक परवानग्या लागतात, मदतीला
कोणीतरी लागतं याची जाण ठेवून निनाद तडक अजयकडे गेला होता. आणि मग जवळपास दुपार
कलेपर्यंत त्याची काहीच खबर नव्हती, निधीला काळजी वाटायला लागलेली असतानाच निनाद घरी
आला.
"झालं सगळं व्यवस्थित. काका आजारी होते, हॉस्पिटलमध्येच होते, त्यामुळे
पुढच्या फॉर्मॅलिटीज सुरळीत पार पडल्या. त्याचे नातेवाईक, मित्रही होते मदतीला.
अजयही ठीक आहे”, इतका ’रिपोर्ट’ देऊन निनाद खोलीत आंघोळीला गेला. पण तेव्हापासून
तो अस्वस्थच होता. जेवलाही नाही, फक्त चहा पीऊन खोलीत जाऊन बसला.
**
संध्याकाळी अंधार पडला. निधी खोलीत डोकावली, तर कानाला हेडफोन्स लावून, डोळे
बंद करून निनाद काहीतरी ऐकत बसला होता. एरवी निधीने त्याला डिस्टर्ब केलं नसतं, पण
त्याच्या डोळ्यातून पाणी वहात होतं. तिला गलबलून आलं.
“अरे… निनाद…”
निनादची तंद्री भंग पावली. दचकून त्याने डोळे उघडले.
“अरे, रडतोयेस? काय झालं?”
निनादने डोळे पुसले, पण तो तसाच सुन्न बसून राहिला.
“काही सांगतोस का?”
“आयुष्य कधीकधी इतके धक्के देते ना साला! अंदाजच येत नाही काही. मी आणि अजय
जिगरी दोस्त होतो, शाळेत आणि नंतर कॉलेजमध्येही. काय काय गप्पा मारल्यात आम्ही,
सिनेमे पाहिलेत, करियरबद्दल बोलायचो, मुलींबद्दलही. मग आणखी मोठं झाल्यावर कुठेतरी
आपण स्वत:लाच भारी समजायला लागतो आणि मित्राचे दोष दिसायला लागतात. तो बालीश वाटायला
लागतो, त्याचं वागणं पटत नाही, भांडणं होतात, वाद होतात, हळूहळू त्याचा हात सहज
सुटतो. पण तरी दोस्ती असतेच. म्हणजे, असं मला वाटत होतं… त्याच दोस्तीखातर तडक
गेलो आज. कसलाही विचार केला नाही. सगळे सोपस्कार पार पाडेपर्यंत आम्ही एकत्र होतो,
त्याच्या खांद्याला खांदा लावून उभा होतो, त्याच्याबरोबर रडलोहीए. पण निधी… शेवटी
निघालो तेव्हा त्याला कडकडून मिठीच नाही मारावीशी वाटली मला. आणि त्यालाही नाही
वाटली!!! हे इतकं अस्वस्थ करणारं आहे, माहितेय? आमची मैत्री कधी फॉर्मल झाली होती,
कळलंच नाही. आणि कळलं ते अशा वेळेला… जेव्हा मिठी हीच आमची गरज होती… पण नेमके
त्याच वेळेला दोघेही दोन काठांवर असल्यासारखे एकमेकांकडे बघत राहिलो फक्त. आतून
काही हललंच नाही यार! त्याचे बाबा गेले, त्यापेक्षा या दु:खाने मी जास्त हादरलो
आहे. इतका कोरडेपणा आला आणि समजलंही नाही? पाण्याने भरलेला रांजण असतो ना… त्याला
असलेल्या एकदम लहानशा छिद्रातून हळूहळू सगळं पाणी निघून जावं, तशी आमची मैत्री already
drain झाली होती. फक्त जाणवायला वेळ लागला. छ्या! हे फार चुकीचं आहे सगळं! हे असं
कोणाकोणाबरोबर झालं आहे माझं? मोठ्या होण्याच्या, मॅच्युअर होण्याच्या नादात मला
कोणी मित्रच राहिला नाहीये का काय?” निनाद डोकं गच्च धरून बसला.
निधीच्या डोळ्यासमोरून तिच्या व्हॉट्सॅप ग्रुपमधल्या अनेक मैत्रिणींची नावं
सरसर सरकून गेली. निनादच्या शेजारी बसून तिने त्याला हलकेच मिठीत घेतलं.
***
2 comments:
सुंदर
धन्यवाद अपी! :)
Post a Comment