टिंग टॉंगS, टिंग टॉंगSS, टिंग टॉंगSSS
बेल वाजली आणि वाजतच राहिली. आदूची आजी
दार उघडायला जाईपर्यंत बेलचा ठणठणाट चालू होता. ’आले रे बाबा, आले. कोण आहे? काय झालंय
इतकं?’ असं म्हणत आजीनं दार उघडलं, तर दारात आदू! दार उघडताक्षणी तो झंझावातासारखा
आत आला, दाणदाण पावलं टाकत टेरेसवर गेला, तिथे त्याने बॅट फेकली आणि तसाच थेट आत खोलीत
गेला.
’अरे आदू, काय झालं? इतक्या लवकर कसा
काय आलास? तुला बरं नाहीये का?’ हे आजीचे सगळे प्रश्न तिच्या मनातच राहिले! आदूला काय
झालं होतं, कोण जाणे. आजी त्याच्या मागोमाग खोलीपाशी गेली. आदू पलंगावर गाल फुगवून
बसला होता. ’हां, म्हणजे तब्येत ठीक आहे’, आजी स्वत:शीच पुटपुटली आणि बाहेर जाऊन स्वस्थ
बसली. आदूचं परत एकदा बिनसलं होतं बहुतेक. गेल्या काही दिवसांत हे वारंवार होत होतं.
आदूला खेळायला अतिशय आवडायचं. संध्याकाळ
झाली, की कधी एकदा खाली जातो, असं व्हायचं त्याला. त्यांची सोसायटीही बरीच मोठी असल्यामुळे
खेळायला भरपूर मुलं होती. हळूहळू दहा-बारा मुला-मुलींचा छान ग्रुप झाला होता. न चुकता
सगळे जण संध्याकाळी पाचच्या सुमारास खाली जमत आणि चांगले दीड-दोन तास खेळत. एकदा खाली
खेळायला गेला, की आदू हाक मारल्याशिवाय कधी वरच यायचा नाही. मग त्याला आईने घड्याळ
दिलं होतं. घड्याळ्यात साडेसात वाजले की आपापलं वर यायचं असा नवीन नियम केला होता,
आदू तो पाळतही होता. पण गेल्या आठवड्यात दोन-तीन वेळा, आणि आजही आदू सातच्या आतच घरी
आला होता आणि जेव्हा जेव्हा तो असा घरी आला होता, तेव्हा तेव्हा त्याचा मूड गेलेला
होता.
थोड्या वेळानं आदूची ऑफिसमधून आई घरी
आली. आजीनं हे सगळं तिला सांगितलं. इतके दिवस त्यांनी आदूला याबद्दल विचारलं नव्हतं,
पण आज या विषयाचा सोक्षमोक्ष लावायचाच असं त्यांनी ठरवलं. सगळे जेवायला एकत्र बसत, तेव्हाच हा विषय काढायचा, असं ठरलं.
पण ती वेळच आली नाही, कारण जेवायला बसल्याबरोब्बर
आदूने विचारलं,
“आई, मला बास्केटबॉलच्या क्लासला जायचं
आहे. घालशील? उद्यापासूनच?”
“अरे, उद्यापासूनच? चौकशी तरी…”
“मला माहितीये सगळं. अनिशदादा जातो. क्लबचे
सर खूप छान आहेत. छान कोचिंग घेतात. संध्याकाळी सहा ते सात रोज. सोमवार ते शुक्रवार.
आणि तिथेच क्रिकेटचंही कोचिंग असतं शनिवार आणि रविवारी. मला तिथेही जायचं आहे. मी आपापला
जाईन सायकलवर. जवळ आहे. मी नीट चालवेन सायकल. प्रॉमिस.”
आदूने कोणाला काही बोलायची संधीच दिली
नाही. आई, बाबा, आजी अवाक होऊन बघत राहिले त्याच्याकडे.
“अरे, मग तुला इथे खेळायलाच मिळणार नाही.”
आजीने त्या विषयावर बोलायचा प्रयत्न केला. पण आदूने तिच्याकडे दुर्लक्ष केलं.
“बाबा, जाऊदे ना मला प्लीज. माझा खेळ
सुधारेल. मला बास्केटबॉल चांगला खेळता येतो. माहितेय तुला. आणि क्लबकडून खूप मॅचेसही
खेळतात.”
“अरे, पण इतके दिवस तर काही म्हणला नाहीस.
आणि आता असं अचानक… उद्यापासूनच?”
“म्हणजे तुम्ही नाही लावणार का क्लास?”
आदू एकदम चिडलाच. “मग मला एक मोबाईल तरी घ्या. म्हणजे मीही सगळ्यांसारखा मोबाईलवरच
गेम्स खेळत बसेन!”
अच्छा! म्हणजे हे कारण होतं तर!
“हो का रे? सगळ्यांकडे मोबाईल फोन आहेत?
इतक्या लहान मुलांकडे?” आजीने त्याला चुचकारलं.
“मग काय! आधी फक्त मोठ्या दादा-ताईंकडे
असायचा मोबाईल. आता सुट्टीत ध्रुवला दिला, तन्मयला दिला आणि मागच्या आठवड्यात राहीचा
बर्थडे होता, तर तिलाही तिच्या आई-बाबांनी मोबाईल घेऊन दिला आहे. सगळे जण आता एकत्र
आले, की मोबाईलवरच गेम्स खेळत बसतात, किंवा काहीतरी ऍप्स डाऊनलोड करून त्यात फोटो,
गाणी वगैरे बघत बसतात. आधीसारखं खेळायला कोणीच येत नाही. ज्यांच्याकडे मोबाईल नाहीये,
तेही शेजारी बसून तेच बघत असतात. सोहमलाही इन्टरेस्ट नसतो खेळण्यात. म्हणे, आपण दोघांनीच
काय खेळायचं? माझ्याबरोबर ग्रुपमधलं कोणीच खेळत नाही. इशान, श्रद्धाची ट्युशन असते,
त्यामुळे तेही येत नाहीत. आमचा ग्रुपच नाही राहिलाय. मग मी काय आता वेड्यासारखा लहान
मुलांबरोबर खेळू का रोज?” बोलता बोलता आदूला रागाने रडायला यायला लागलं.
आई, बाबा, आजी सगळ्यांनाच वाईट वाटलं.
लहान मुलांमध्ये मोबाईलवेड वाढत होतं, हे त्यांना माहित होतंच, पण त्याचं प्रमाण इतकं
वाढलं आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. मुलांचे आई-वडिलही त्यांना चांगले, महाग फोन
घेऊन देत होते, त्यामुळे मुलांना त्याचं आकर्षण वाटलं, तर त्यात नवल नव्हतं. पण त्यांच्या
सोसायटीत खेळण्याकरता भरपूर जागा होती आणि खेळायला मुलंही होती. तरी मुलं मोबाईल-वेडी
झाली होती!
त्यातल्यात्यात एकच समाधान, की आदूला
अजूनही मैदानीच खेळ खेळायचे होते. मोबाईलसाठी त्याने हट्ट धरला नव्हता. त्यामुळे त्याला
बास्केटबॉलचा क्लास लावायचा, तेही उद्यापासूनच, असं ठरलं.
***
आदूचा क्लास सुरू झाला. क्लब नावाजलेला
होता, बास्केटबॉल शिकवणारे सर राष्ट्रीय खेळाडू होते. येणारी मुलं खूप छान खेळायची,
आदूलाही मनापासून इच्छा होती शिकायची. मुख्य म्हणजे रोज संध्याकाळची त्याची किरकिर
बंद झाली. शनिवार-रविवारचं क्रिकेट तर दोन तास असायचं. आदूचा दिवस आता एकदम भरगच्च
झाला. सकाळी शाळा, दुपारी थोडा अभ्यास, संध्याकाळी खेळ, रात्री परत थोडा अभ्यास, टीव्ही
आणि झोप! खाली खेळायला जाणं बंदच झालं त्याचं.
एक दिवस संध्याकाळी आदूची आई सोसायटीत
फिरत असताना सोहम तिच्यापाशी आला.
“काकू, आदू आता कधीच नाही येणार खेळायला?”
आईनं सहज मागे बघितलं, आदूच्या मित्र-मैत्रिणींचा
घोळका दोन बाकड्यांवर, माना मोबाईल्समध्ये खुपसून बसला होता.
“अरे, त्याने क्लास लावला ना. सोहम, तुझ्याकडे
आहे का रे मोबाईल?”
“नाही. आई घेऊन देत नाही.”
“तुम्ही खेळत का नाही रे?”
“शाळेत खेळतो की. काकू मी जाऊ?”
सोहम पळूनच गेला एकदम.
***
दुस-या दिवशी बरोब्बर पावणेसहाला, आदू
क्लासला जायच्या गडबडीत असताना सोहम दारात हजर झाला.
“चाललास क्लासला?”
“हो”
“मी पण येऊ?” सोहमनं अचानकच विचारलं.
“जॉइन करणारेस का?”
“नाही, नुसतंच बघायला.”
“असं अलाऊड नसतं. क्लास लाव की.”
“आईला विचारतो.” सोहम परत पळून गेला.
***
काही दिवस असेच गेले, आदूचं रूटीन व्यवस्थित
चालू होतं. त्या दिवशी आदू क्लासहून खुशीतच घरी आला. आल्या आल्या त्याने आईला सांगितलं,
“आई, आजपासून सोहमही बास्केटबॉलला यायला
लागला.”
“अरे वा! ते कसं काय?”
“तो म्हणाला की त्याला खाली खूप बोअर
होतं, कंटाळा येतो. कोणीच नीट खेळत नाही. काहीतरी पंधरा-वीस मिनिट खेळतात, त्यातही
सगळा वेळ काय खेळायचं हे ठरवण्यातच जातो. मग त्यानेही त्याच्या आई-बाबांना विचारून
माझा क्लास लावला.”
“वा! मजाच आहे तुझी आता.”
“आदू, अरे, आजच मला राहीची आजी भेटली
होती. त्या सांगत होत्या, की राहीला चष्मा लागला! त्यावरून तिचे आई-बाबा तिला खूप रागावले.
त्याचं म्हणणं आहे, की, मोबाईलच्या अती वापरामुळेच लागला तिला चष्मा! आता तिचे आई-बाबा
तिला दिवसातून अर्धाच तास मोबाईल देणार आहेत म्हणे.”
“आजी, अगं ती मोबाईलवर सारखी गाणी आणि
क्राफ्टचे व्हिडिओज बघायची. सोहमने सांगितलेली आणखी एक मज्जा सांगू का? तन्मय सतत मोबाईलवर
असतो, म्हणून त्याच्या बाबांनी त्याचा स्मार्टफोनच काढून घेतला, आणि आता साधा फोन दिलाय
त्याला. आता गेम्स नाही, काही नाही. बरं झालं, चांगली जिरली!”
“आदू, असं बोलू नये!”
“आई, अगं त्याच्याचमुळे आमचा ग्रुप फुटला.
मोबाईल आणायची सुरुवात सगळ्यात आधी त्यानेच केली. मग त्याचं बघून बाकी सगळे आणायला
लागले. सोहमला माझ्याबरोबर खेळायला यायचं असायचं, पण तन्मयच त्याला त्याचा मोबाईल द्यायचा
खेळायला आणि थांबवून ठेवायचा.”
“चला, कसा का होईना, तुम्हा मुलांकडून
मोबाईलचा वापर कमी होतोय ना, ते एक बरंय,” बाबा म्हणाला.
“आई, मला तुला आणि बाबाला आणखी एक विचारायचं
होतं.”
“विचार ना…”
“आई, आपण माझा शनिवार-रविवारचा क्रिकेटचा
क्लास बंद करायचा का?”
“का रे?”
“तिकडे कोचिंगला गर्दी खूप असते. कधीकधी
तर बॅटिंग, बोलिंग काहीच करायला मिळत नाही. नुसतीच फिल्डिंग करायला लागते सारखी. आणि
जी मुलं टीममध्ये सिलेक्ट झाली आहेत, त्यांच्याकडेच सर सगळं लक्ष देतात. आणि मग आम्ही
नवीन, लिंबू-टिंबू लोक त्यांना प्रॅक्टिस देत बसतो. माझं क्रिकेट काय इतकं चांगलं नाहीये,
बास्केटबॉलइतकं…मग खूप बोअर होतं.”
“हे बोअर एक सारखं होत असतं रे तुम्हाला…
तूच म्हणालास म्हणून तो क्लास लावला ना तुला…”, बाबा म्हणाला.
“हो… पण आता तो म्हणतोय तर ऐक त्याचं.
तो शनिवार-रविवारचा क्लास नकोच,” आजीने अचानक आदूच्या बाजूने बॅटिंग करायला सुरुवात
केली. “आधीच बिचारा आठवडाभर सकाळपासून रात्रीपर्यंत बाहेर असतो. त्यात सुट्टीच्या दिवशीही
त्याचा क्लास. मग कुठे बाहेर जायचं, तर त्याला एकट्याला मागे ठेवून जा, नाहीतर क्लास
बुडवा. हेच झालं की मागच्या महिन्यात… दोन वेळा क्लास बुडला त्याचा. आणि तो रोज जातोच
आहे ना बास्केटबॉलला, त्याला नको म्हणत नाहीये ना? मग आता क्रिकेट नको म्हणतोय, तर
बघा बाबांनो. उगाच क्लाससाठी क्लास नको.”
“अरे, पण मग आदू, मग शनिवार-रविवार काय करणार तू?
तेव्हा कोणी खेळायलाच नसतं म्हणून परत चिडचिड करशील”. आईचा मुद्दाही बरोबर होता.
“आई, सोहमचं आणि माझं सगळं ठरलंय. त्याने
प्रॉमिस केलंय की कोणीही नसलं, तरी तो माझ्याशी नक्की खेळणार आहे. तन्मयही येईल. इशानलाही
रविवारी ट्युशनला सुट्टी असते, त्यामुळे तोही येणार आहे. आणि दोन-तीन जण खेळायला लागले
ना, की आपोआप बाकीचेही येतात. आम्ही बास्केटबॉल खेळू शकतो, किंवा क्रिकेट, किंवा साधं
कॅच-कॅचसुद्धा. आणि कधीतरी सायकलही चालवू शकतो. मी सोसायटीत खेळणं मिस करतो खूप. मी
इथेच खेळतो ना प्लीज.”
“अरे पण कोणीतरी मोबाईल घेऊन येणारच.”
“मग तोही खेळू थोडा वेळ,” आदू हसत हसत
म्हणाला.
“आं? काय रे? पार्टी चेंज? मोबाईल आवडत
नव्हता ना तुला?”
“सारखा सारखा मोबाईल नाही आवडत. कधीतरी
चांगला असतो. त्यावर कितीतरी गोष्टी दिसतात, मॅचेसचा स्कोअर कळतो, गणित-सायंसचे व्हिडिओज
पण मस्त असतात. पण थोडाच वेळ. मग बोअर होतं. आम्ही मित्र एकत्र खेळतो तेव्हा कधीच कंटाळा
येत नाही, हे आता सगळ्यांना पटलंय. त्यामुळे आता आमचा पहिल्यासारखा ग्रुप होईल. आणि
कोणीच नाही आलं खेळायला, तरी आई, मी एकटा-एकटा बास्केटबॉलची प्रॅक्टिस करेन. कधीच कटकट
नाही करणार.”
“बघ हं, अधूनमधून आमच्याबरोबर बाहेर यायला
लागेल, तेव्हा पण नाही ना कटकट करणार?”
“नाही!”
“आणि मोबाईलसाठी हट्ट नाही ना करणार?”
“आत्ता नकोच आहे मला मोबाईल. पण मोठा
झाल्यावर घेऊन द्याल ना?”
“अरे लबाडा! हे आहे होय तुझ्या मनात?
बघू तेव्हाचं तेव्हा.”
“पण बाबा, सांग ना. क्रिकेट बंद करून इकडेच खेळू
का?”
“खेळ रे बाबा, खेळ. भरपूर खेळा, भरपूर
दंगामस्ती करा, हेच तर वय आहे तुमचं खेळायचं.”
अखेर सगळं काही आदूच्या मनासारखं झालं.
मित्रांचं मोबाईल-वेड कमी झालं, आणि सोसायटीतले मित्रही परत मिळाले.
“येSSSSS” अशी आनंदाने आरोळी ठोकत आदू
घरभर नाचत सुटला.
***
युनिक फीचर्सच्या ’पासवर्ड’च्या २०१९ च्या दिवाळी अंकात ही कथा प्रकाशित झालेली आहे.
0 comments:
Post a Comment