December 19, 2019

अनुभव अनुवादाचा



Excuse me, can you pass those papers please? Thank you!
Sorry, I could not finish this before deadline.
You are so kind.

ही म्हणली तर साधी इंग्रजी वाक्य. दैनंदिन इंग्रजी बोलणा-यांच्या वापरातली. यांचा मराठी अनुवाद होईल का? निश्चित होईल. मराठीत यातल्या प्रत्येक शब्दाला समर्पक असा शब्द आहे.

माफ करा, तुम्ही मला तिथले कागद देता का? धन्यवाद!
मी हे वेळेआधी पूर्ण करू शकले नाही, दिलगीर आहे.
तुम्ही किती दयाळू आहात!

ही तीनही वाक्य शुद्ध मराठी आहेत. वरच्या इंग्रजी वाक्यांचाच अनुवाद आहे. परंतू, त्यांच्यात काहीतरी खटकतं, नाही का? इंग्रजी वाक्य सहज वाटतात, तर त्यांचीच अनुवादित मराठी वाक्य मात्र कृत्रिम वाटतात. याचं कारण म्हणजे भाषेमागचे भाव.

भाषा म्हणजे काही नुसती एकापाठोपाठ रचलेली, शुद्धलेखन आणि व्याकरणाचे नियम लावून बोललेली किंवा लिहिलेली वाक्य नाहीत. अर्थात, भाषेत त्यांचा अंतर्भाव होतोच, पण नुसते योग्य शब्द म्हणजे भाषा नाही, नाही का? भाषा म्हणजे भावना. मुळात आपल्या मनातल्या भावना दुस-यांपर्यंत पोचवण्यासाठी भाषेचा वापर सुरू झाला. त्यामुळेच जी भाषा व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे, पण जिच्यात योग्य भाव पोचत नाहीत, ती भाषा अपूर्ण वाटते, किंवा कृत्रिम. या उलट, ’भावनांओंको समझो’ असं म्हणत अनेक भाषा आणि नियम जमवून कडबोळं केलेली धेडगुजरी बोलीही आवडत नाही. ’Sunday ला breakfast ला we had पोहे आणि then झणझणीत वांग्याची भाजी and भाकरी for lunch.’ असं ऐकलं की कसंतरीच होतं. यातली लक्षवेधक गोष्ट अशी, की पोहे, झणझणीत वांग्याची भाजी आणि भाकरी यांना पर्यायी इंग्रजी शब्द नाहीत, बाकी सगळ्याला आहेत! अस्सल मराठमोळे शब्द मात्र मराठी ते मराठीच राहतात.

तर, असे ’अनुवाद’ आपण सहज जाता-येता करत राहतो. पण जेव्हा ख-याखु-या प्रकाशित पुस्तकाचा खराखुरा अनुवाद करायची वेळ येते तेव्हा ’भाषा’ या विषयावरच पहिल्यापासून गांभीर्याने विचार करावा लागतो. ’मला माझी मातृभाषा मराठी, हिंदी आणि इंग्रजी उत्तम येते’ असं आपण सहज म्हणतो. पण यातली एक तरी भाषा आपल्याला खरंच पूर्णपणे येते का? प्रत्येक भाषा म्हणजे एक अथांग सागर असतो. व्याकरण, मुळाक्षरांपासून ते लाखो-करोडो शब्द, वाकप्रचार, म्हणी, स्थानिक संदर्भ, बोलीभाषा, लहेजा या सगळ्यांचा अंतर्भाव एका भाषेत असतो. त्यापैकी कितीसे शब्द आपल्याला ज्ञात असतात, किती संदर्भ आपल्याला ठाऊक असतात? आणि, जेव्हा एका भाषेतले संदर्भ दुस-या भाषेत नेण्याची वेळ येते, तेव्हा त्या शब्दांमागच्या भावना अधिकच महत्त्वाच्या ठरतात. वर लिहिली तशी अनुवादित उदाहरणं तर आता ’गूगल’ किंवा अन्य ’ट्रान्सलेशन टूल्स’ही करतात, पण त्यांत भाव आणि संदर्भ नसतात. इंग्रजी ही भाषा ब-यापैकी मार्दव आणि अदब राखून अशी, तर आपली मराठी भाषा मोकळी-ढाकळी, रोखठोक. मराठी माणसाला चुटपुट लागत नाही असं नाही, त्याला दिलगीर वाटत नाही असंही नाही, पण तो ते शब्दांतून व्यक्त करत नाही, इतकंच. त्यामुळेच मराठी भाषेत असे शब्द येतात, तेव्हा जरा ठेचकाळालायला होत्ं. पण अनुवाद करताना या ठेचा लागल्या, तरी पुढे जावंच लागतं. मूळ लिखित शब्दाचा मान ठेवावाच लागतो. अशा वेळी दोन्ही भाषांमधली साम्यस्थळं, भाव व्यक्त करायची पद्धत, वाक्य लिहिण्याची पद्धत यांचा अभ्यास करून मग कुठे अनुवादाचा श्रीगणेशा होतो. कधी कधी दोन्ही भाषांत आश्चर्य वाटतील अशी साम्य सापडतात, कधीकधी मात्र एका भाषेतलं दुस-या भाषेत प्रभावीपणे मांडता येत नाही, म्हणजे नाही! अशा वेळी ती मर्यादा मान्य करून शक्य तितकं मूळ मजकुराशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करावा लागतो.  

आज मला हे लिहायला सोपं वाटत आहे, कारण गेली जवळपास दोन वर्ष, मी स्वत: हा अनुभव घेतला. ’बूम कंट्री?’ या ऍलन रॉजलिंग लिखित पुस्तकाचा मी केलेला मराठी अनुवाद नुकताच प्रसिद्ध झाला. या पुस्तकावर मी जवळपास दोन वर्ष काम करत होते. सुरुवातीला मूळ पुस्तक फक्त वाचलं तेव्हाच ते वाचनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं, आणि त्याचबरोबर अनुवादाच्या दृष्टीनं अतिशय गुंतागुंतीचं आहे याची जाणीव झाली. ऍलन रॉजलिंग हे मूळ ब्रिटिश आहेत. नोकरी आणि व्यवसायानिमित्त अनेक वर्ष त्यांचा भारतातल्या उधोगजगताशी संबंध येत गेला. १९९१ च्या आर्थिक उदारीकरणापासून ते सध्याच्या चक्क मोबाईलवर सुरू करता येईल अशा व्यवसायाच्या प्रारूपापर्यंत भारताच्या उद्योगजगतात जे काही क्रांतीकारी बदल घडले त्या सगळ्याचे ऍलन साक्षीदार आहेत. १९९० पूर्वी भारत सरकारची उद्यमशीलतेबद्दलची धोरणं, तेव्हाच्या सरकारी आणि खाजगी कंपन्या, भांडवलाचा पुरवठा, ग्राहकाची मानसिकता, त्यानंतर २००० साली डॉट कॉम क्रांतीनंतर भारताचा बदललेला आर्थिक चेहरामोहरा, भांडवल उभारणीचे विविध स्रोत, मोठमोठ्या कारखान्यांपासून इ-कॉमर्स उद्योगांपर्यंत व्यवसायाचं बदलतं स्वरूप, तरुण उद्योजकांची स्वप्न आणि आकांक्षा या सगळ्याचा धांडोळा ऍलन यांनी या पुस्तकात घेतला आहे. अर्थातच, विषयाचा आवाका खूप विस्तृत आहे. ऍलन यांची भाषा निवेदनात्मक, त्यात ब्रिटिश उपहासाचा सूर, कोणाचीही भीड न ठेवता केलेल्या टिप्पण्या आणि एका वाक्यात अनेक वाक्य घालण्याची त्यांची शैली वाचली. वाचक म्हणून कौतुक वाटलं, पण अनुवादक म्हणून शब्दश: घाम फुटला. इंग्रजी आणि मराठी या दोन पूर्ण विरुद्ध भाषांचा संगम करायचा होता. इंग्रजीतली लांब, पल्लेदार वाक्य छोटी, सोपी करावी लागणार होती. भाषेचा लहेजा तर सांभाळायचा होताच, पण विषय गंभीर असल्यामुळे वाचकाला सोपा करूनही सांगावा लागणार होता. हे पुस्तक म्हणजे निव्वळ भाषांतर होणार नव्हतं. हा एक कस पाहणारा भावानुवाद होता. 

संपूर्ण पुस्तकाचा पहिला आराखडा तयार झाला. संपादकांकडे तो सुपूर्त करताना काहीतरी चुकतंय हे जाणवत होतं, पण नेमकं काय हे उमजत नव्हतं. संपादक, श्री. विलास पाटील सरांना मात्र ते लगेचच समजलं. त्यांनी केलेल्या अनुभवी मार्गदर्शनानंतर मग पूर्ण अनुवादाकडे एका वेगळ्या नजरेतून पाहिलं, तेव्हा जाणवली त्यातली ’भावनाशून्यतेची पोकळी’. ही नस गवसल्यानंतर मग आपल्या हातून नक्की काय निसटलं हे समजलं. मग परत एकदा पहिल्या पानापासून सुरुवात केली! हा नंतरचा प्रवास ख-या अर्थाने मजेचा होता. परत, परत, परत, परत वाचून सुधारणा केल्या. मुद्रितशोधकांनीही बहुमोल मदत केली. अनेक चर्चा, अनेक आराखडे, अनेक बदल करत करत अखेर अनुवाद सिद्ध झाला. 

हा अनुवाद संपूर्ण निर्दोष आहे असा दावा मी करू धजणार नाही. भाषा प्रवाही असते, पुन्हा वाचताना त्यात आणखी सुधारणा सुचत जातील. मूळ लेखनाशी प्रामाणिक राहून मराठीत ते लेखन अनुवादित करताना त्यात काही त्रुटी राहिल्या आहेतच याची नम्र जाणीव आहे. पण ती जाणीवही झाली ती या अनुवादामुळेच. या अनुवादाचा अनुभव व्यक्तीश: मला समृद्ध करणारा होता, कारण त्याने मला दोन भाषांच्या ताकदीची, त्यांच्या सौंदर्यस्थळांची, त्यांच्या वेगळेपणाची आणि कमतरतांचीही जाणीव करून दिली. या अनुभवाने मला माझ्या मर्यादांची आणि थोड्याबहुत कौशल्याची ओळख करून दिली आणि या अनुभवामुळेच माझ्या हातात माझं पहिलंवहिलं अनुवादित पुस्तक आलं. आणखी काय हवं? जणू ’सोने पे सुहागा’च, नव्हे नव्हे, ’दुधात साखर’च! :-) :-)  

**** 


4 comments:

kirams said...

Great experience and achievement
एक सुंदर अनुभव आणि सुयश

kirams said...

पूनम अभिनंदन

काल निर्णय said...

नमस्कार. श्री. नरेंद्र गोळे यांच्या "अनुवाद रंजन" ह्या ब्लॉगवर त्यांनी तुमच्या ह्या लेखाची ओळख करून दिलेली वाचली. [लिंक: https://anuvad-ranjan.blogspot.com/2020/01/blog-post_10.html]

अनुवादाबद्दल इतक्या सुंदर रीतीने आणि इतक्या सहजतेने आजपर्यंत फारसे वाचनात आले नाही. अनुवाद करण्याच्या प्रक्रियेत सुरुवातीपासून शेवटापर्यंत कोणते आणि कसे अनुभव येतात आणि दोन्ही भाषांची 'समज' कशी महत्त्वाची ठरते याबद्दल आपण फार छान विवेचन केले आहे. यानिमित्ताने तुमच्या ब्लॉगबद्दलही समजले. तुमचे बाकीचेही लेख नक्की वाचेन. अनुवाद हा माझाही आवडता विषय असल्याने तुमच्या ह्या लेखाबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा देऊ इच्छितो.

poonam said...

kiram, काल निर्णयजी, मन:पूर्वक धन्यवाद! :)
’बूम कंट्री?’ वाचायची संधी मिळाली, तर जरूर वाचा, आणि शक्य झालं तर अभिप्रायही द्या.