September 23, 2019

आदूचा वाढदिवस


“आदू, या महिन्यात तुझा वाढदिवस आहे. काय हवंय आमच्याकडून?”

आदूचा चेहरा खुलला. या वर्षी बाबांना नवा गेम मागावा की नवी बॅट हे अजून ठरलेलं नव्हतं. पार्टीला केक, भेळ आणि वडापाव करायला आईला सांगायचं हे फिक्स होतं. कोणाकोणाला बोलवायचं हेही ठरलेलंच होतं.

“एक आयडिया आहे. या वेळी तुझा वाढदिवस जरा वेगळ्या पद्धतीने करूया का? तुझे सगळे मित्रमैत्रीणी मिळून फलटणला जाऊया का?”

आदूचा चेहरा प्रश्नार्थक झाला.

“विसरलास वाटतं! अरे तुमच्या सायकली ज्या शाळेला भेट दिल्या, तिथे जाऊन तुझा बर्थडे सेलिब्रेट करूया असं आम्ही म्हणतोय. तुझे सोसायटीतले मित्र-मैत्रीणी, त्यांचे आई-बाबा असे सगळे जाऊ, तिथे थोडा वेळ त्या मुलांबरोबर घालवू. दुस-या दिवशी रविवार आहे, तेव्हा तुझी दरवर्षीची करतो तशी पार्टी करूच. पण हे काहीतरी वेगळं जरा. कसा वाटतोय प्लॅन?”

’बाबांनी हे काय नवीन काढलंय?’, आदूच्या मनात आलं.

गेल्या वर्षीच्या दिवाळीत आदूच्या सोसायटीतल्या सामंतकाकांनी पुढाकार घेऊन २०-२५ मुलांच्या न वापरल्या जाणा-या, पण चांगल्या सायकली फलटणमधल्या एका शाळेतल्या विद्यार्थ्यांना भेट दिल्या होत्या. आदूचीही सायकल त्यात होती. ती सायकल एका मुलीला मिळाली होती. तिने नंतर आदूला ’थॅंक यु’ म्हणणारं पत्रही लिहिलं होतं. तेव्हा आदूला ते सगळं जाम एक्सायटिंग वाटलं होतं, पण त्या गोष्टीला आता सात-आठ महिने झाले होते. त्याच शाळेत जायचं परत? तेही वाढदिवसाला? कशाला? काय करायचं तिथे जाऊन? आदूला बाबांची ही कल्पना अगदी बोअरिंग वाटली, पण दुस-या दिवशी त्याच्या मनासारखी पार्टी घरी होणार होती. त्यामुळे, उत्तर म्हणून त्यानं खांदे उडवले.

***

यानंतर काही दिवस एकदम नेहेमीसारखे गेले. वाढदिवसाला आणखी पंधरा दिवस होते.  शाळा नुकतीच सुरू होत होती. आदू आता सातवीत गेला होता. नवीन अभ्यास सुरू होत होता. अधूनमधून घरात आई-बाबांची गडबड चालू होती. कोण कोण येणार, कसं जायचं, काय काय न्यायचं, कोणी काय आणायचं वगैरे प्लॅनिंग चालू होतं. आणि मग एका शनिवारी तो आईबरोबर बाजारात गेला. सोहम आणि त्याची आईही बरोबर होते.

“आदू, रिटर्न गिफ्ट काय घ्यायचं आहे?”

“पेन्सिल पाऊचेस” आदूचं उत्तर तयारच होतं. कारच्या आकाराचे मस्त पाऊच मिळाले. ते बघत असतानाच आदूच्या कानावर आईचे शब्द पडले.

“एक पेन्सिल, एक खोडरबर असं देऊया, का दोन-दोन पेन्सिली देऊया?” आई सोहमच्या आईला विचारत होती.

“पेन्सिली नकोत आई…” त्याने मध्येच सांगितलं.

“तुझ्यासाठी नाही रे, आपण फलटणला जाणारोत ना, तिथल्या मुलांसाठी काय घेऊया?”

आदूचा चेहरा एकदम ब्लॅन्क झाला. अरे बापरे. त्या मुलांसाठीही काहीतरी घ्यायचं आहे?

इतक्यात सोहमनं विचारलं, “काकू, पेन्सिल-रबर-शार्पनर’ असा सेट देऊया का?”

दोन्ही आयांना ही कल्पना एकदम पसंत पडली. त्या दुकानदाराशी बोलायला लागल्या. आदूच्या चेह-यावर आश्चर्यच आश्चर्य पसरलं. सोहमलाही माहित आहे? मग मला का कोणी सांगितलं नाही काही? परत येताना त्याने आईला शेवटी विचारलंच.

“असं काही नाही, आज आणलं की तुला बरोबर. आदू, तुला खूप आवडली नाहीये ही कल्पना हे आम्हाला माहित आहे. पण अरे, एक वेगळा अनुभव मिळेल तुला. इकडे आपल्याला सगळंच सहजपणे मिळतं, पण गावाकडची मुलं कोणकोणत्या परिस्थितीतून शाळेत येतात, शिकण्यासाठी त्यांना काय काय करावं लागतं इतकं तरी समजेल तुम्हा मुलांना. आणि आपण तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी जातोय, तर थोडा खाऊ, एखादं गिफ्ट त्यांना देऊया असं वाटलं, सगळ्यांनाच ही आयडिया आवडली. सोसायटीतले सगळेच जण सहभागी होत आहेत.”

“अच्छा. मग खाऊ काय देणार आहात?”

“अजून काही ठरलं नाहीये. काय देऊया? चॉलकेट्स? चिक्की?”

“आई, वाटी केक देऊया ना. चॉकलेट्स वितळतात आणि काहीतरीच होतात. वाटी केक न्यायला आणि द्यायला पण इझी होतील.”

“मस्त आयडिया आदू. वाटी केक फिक्स करूया मग.”

आईने लगेच होकार दिल्यामुळे आदूला बरं वाटलं.

***

बघता बघता निघायचा दिवस आला. शुक्रवारी रात्री आदूला झोपच नाही आली. संध्याकाळपासून आईची लगबग चालू होती, बाबांचे सारखे फोन चालू होते, लोक येत होते. आजीच्या शब्दांत ’गिल्ला’ चालू होता नुसता. शनिवारी सकाळी सहाला निघायचं होतं. पहाटे पाचला जाग येईल का, या भीतीमुळे आदूला कितीतरी वेळ झोपच लागली नाही. सकाळी आईने हाक मारली, तेव्हा त्याची झोप अजिबात पूर्ण झाली नव्हती.

आवरून सगळे खाली आले. बस आलेली होती आणि सामंतकाका ड्रायव्हरशी गप्पा मारत होते. आदूला बघताच त्यांनी ’आला बर्थडे बॉय’ अशी आरोळीच ठोकली. सामंतकाकांचं ऐकून सगळेच जण त्याच्याकडे धावत आले, शुभेच्छांचा पाऊस पडला नुसता. आदूला एकदम लाजल्यासारखं झालं.

’गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात बस निघाली. आदूला मस्त वाटत होतं. सोहमशी गप्पा मारता मारता त्याला झोप कधी लागली हे कळलंच नाही.    

***

ब्रेक लावत बस थांबली, तशी आदूला जाग आली. समोरच एक मोठी कमान होती, त्यावर लिहिलं होतं ’कै. रखमाबाई पाटील प्रशाला, फलटण’. मोठं ग्राऊंड पाहून आदू आणि कंपनी एकदम खूश झाली. त्यांच्या शाळेचं ग्राउंड अगदी छोटं होतं आणि मधल्या सुट्टीत तिथे इतकी गर्दी व्हायची, की काहीही नीट खेळता यायचं नाही. हे ग्राउंड कसं मस्त मोठं होतं. पण त्यात फार कमी मुलं खेळत होती. मध्ये एक एकमजली बिल्डिंग होती. सगळे उतरून आत जायला लागले, तसा मुलांचा आवाज ऐकायला यायला लागला.
दारातच एक सर उभे होते. त्यांनी सगळ्यांचं हसून स्वागत केलं.

“या या. वाटेत काही त्रास नाही ना झाला? आपण सरळ हॉलमध्येच जाऊ. तुम्ही अगदी वेळेवर पोचलात. शाळा सुटायची वेळ झालीच आहे.” त्यांच्याबरोबर खूप सामान होतं. आदूनेही एक पिशवी उचलली. सगळीकडे कुतुहलाने बघत ते एका मोठ्या रिकाम्या खोलीत आले. तिथे आणखी दोन-तीन शिक्षक थांबलेले होते. यांना पाहून तेही लगबगीनं पुढे आले, त्यांच्या हातातलं सामान त्यांनी कोप-यात ठेवलं. मोठ्या लोकांना चहा दिला आणि छोट्यांना बिस्किटं.

“आमची शाळा तशी छोटी आहे. अनुदानित आहे. गावातली आणि आसपासच्या वस्त्यांवरची मुलं येतात. पण हा दुष्काळी भाग. यंदा तर जून महिना सुरू होऊन तीन आठवडे झाले, तरी अजून एकही पाऊस नाही झाला. अशी परिस्थितीत विद्यार्थीसंख्येवर परिणाम होतो. मोठ्या मुली तर येतच नाहीत. लांब कुठेतरी जाऊन त्यांना पाणी आणावं लागतं. मग शाळेत येण्याचा त्यांचा उत्साह कमी होतो. पाऊस चांगला झाला, तर एक-दोन महिन्यांनी यायला लागतील परत. मुलांना शिकायचं आहे, पण कधीकधी त्यांचाही नाईलाज होतो, काय करणार? पण सामंतसाहेब, तो सायकलींचा उपक्रम छान झाला हां गेल्या वर्षी. लांबून येणा-या विद्यार्थ्यांना आम्ही चिठ्ठ्या टाकून सायकली दिल्या. एकदम खूश झाली.”

इतक्यात जोरात घंटा झाली. दोन शिक्षिकांबरोबर वेगवेगळ्या वयाची मुलं ओळीनं हॉलमध्ये आली आणि खाली बसली. मुलं गोंधळ करत होती, शिक्षिका रागावत होत्या. आदूला एकदम मजा वाटली. आपणही शाळेत असंच करतो, फक्त टीचर इंग्लिशमध्ये ओरडतात, हाच काय तो फरक.

ते सगळे कोप-यात उभे होते. सगळ्या काकू पिशव्यांतून सामान काढत होत्या. काका मंडळी गप्पा मारत होती आणि बच्चेकंपनी नुसतीच सगळीकडे बघत बसली होती. ते मगाचचे सर उठून माईकवरून भाषण द्यायला लागले. समोरचे विद्यार्थी एकदम गप्प झाले. आदूचं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. पॅन्टच्या खिशात त्याला एक अगदी छोटा कॅलिडोस्कोप सापडला होता.तो त्याने कधी डोळ्याला लावला आणि कधी तो फिरवत बसला, हे त्याला कळलंही नाही. अचानक त्याला आईची हाक ऐकायला आली.

“आदू, आता आधी सगळ्यांना केक वाटायचे आहेत तुम्ही मुलांनी. सगळ्यांना नीट द्या हं. प्रत्येकाला केक मिळतोय ना याकडे लक्ष दे, काय?” आदूला एकदम जबाबदार मोठा मुलगा असल्यासारखं वाटलं.
आईने सगळ्या साताठ मुलांच्या हातात एकेक पाकीट दिलं. ते एकेका ओळीत फिरून केक वाटायला लागले. केक दिला की तो मुलगा किंवा मुलगी हसत होती. एक अगदी छोटा मुलगा होता, त्याचा चेहरा एकदम रडका झाला होता. आदूने त्याला दोन केक दिले, तर तो एकदम हसायला लागला.

मग पेन्सिल सेट्सचंही वाटप सगळ्या मुलांनी केलं. यावेळी आणखी जास्त हसरे चेहरे त्यांना दिसले. आणि मग सगळा कार्यक्रम संपल्यासारखाच झाला. आई, आदू आणि सोहम कोप-यात उभे राहून आवराआवरी करत असताना अचानक एक मुलगी त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. पण ती काहीच बोलेना. आईनं तिला विचारलं, 

“काय गं?”

“काकू, मी भाविका साळवी. आदूदादाची सायकल मला मिळालेली, त्यावेळी मला त्याचा फोटोही मिळालेला. मी फोटोवरून त्याला ओळखलं.”

आदूला एकदम लाजल्यासारखं झालं. सायकल मिळाल्यावर भाविकाने त्याला पत्र लिहिलं होतं. आणि आता ती धीटपणे बोलायलाही आली होती. त्याला मात्र काय बोलावं, काही सुचत नव्हतं.

आईच बोलली. “अगं, हो ओळखलं ना तुला, किती सुंदर पत्र लिहिलं होतंस तू. आणि तुझा भाऊ कुठे आहे? त्याचंही नाव आदूच ना?”

“तो नाही आला आज. पण काकू, आदूदादाच्या सायकलचा…”

“अगं ती तुझीच सायकल आहे. दादाने तुला दिली म्हणजे तुझीच झाली, हो की नाही?”

यावर ती हसली.

“काकू, या उन्हाळ्यात गावातली विहीर आटल्यावर आईला खूप लांबून पाणी आणावं लागायचं. पण या वेळी ना, सायकल असल्यामुळे आम्हीही आईला मदत केली. मी एक हंडा भरून सायकलवर ठेवायचे. आदू सायकलचं हॅन्डल धरायचा. असं आम्ही रोज दोनतीनदा करायचो. टॅंकर आला की मी सायकलनी पटकन पुढे जाऊन नंबर लावायचे. आमचं पाहून आणखी काही मुलांनीही असं केलं. मी हे गुरुजींना सांगितलं. गुरुजी म्हणाले, ज्याने सायकल दिली त्याला सांग. म्हणून सांगायला आले.” तिने एका दमात सांगून टाकलं.

आदू आणि सोहम एकदम इम्प्रेस झाले. “म्हणजे तू आदूला डबलसीट घ्यायचीस, तसं तुम्ही पाण्यालाच डबलसीट घेतलं”, सोहम म्हणाला.

आईलाही तिचं फार कौतुक वाटलं. “शाब्बास. आईला किती मदत झाली गं तुझी. एकदम शहाणी मुलगी आहेस तू. तुला यासाठी मुद्दाम एक वेगळं बक्षिस द्यायला हवं.”

आदूला काय वाटलं माहित नाही, त्याने चटकन खिशातला कॅलिडोस्कोप तिच्यासमोर धरला. तो तिनं आनंदानं घेतला. लगेच डोळ्याला लावून पाहिलाही आणि हसली.  

इतक्यात सरांनी सगळ्यांना एकत्र उभं केलं. सगळ्यांनी मिळून राष्ट्रगीत म्हणलं. आदूच्या शाळेतही ते रोज राष्ट्रगीत म्हणत असत. पण आज ते या मुलांबरोबर गाताना त्याला वेगळंच काहीतरी वाटत होतं.

*** 

रात्री घरी पोचल्यावर आई-बाबा आजीला सगळं सांगत असताना तो बाबांना म्हणाला,

“बाबा, हा माझा बेस्ट बर्थडे होता. आणि मला काही गिफ्ट नको. आणि आई, आपण उद्या पार्टी नाही केली, तरी चालेल.”

आई-बाबा-आजी सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. आजीनं त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली, “राहुल, आपला आदू ख-या अर्थाने मोठा झाला रे आज!”

***
समाप्त.

(ही कथा ’पासवर्ड’च्या ऑगस्ट २०१९ च्या अंकात सर्वप्रथम प्रकाशित झालेली आहे.)

0 comments: