April 25, 2019

आदूची सायकल


दू, काल सामंतकाकांनी कार्यक्रमात सांगितलेलं ऐकलंस ना? लोकांच्या वापरात नसलेल्या पण चांगल्या सायकली त्यांना हव्या आहेत. खेडेगावातल्या मुलांना त्या सायकली ते देणार आहेत… ऐकलंस ना?”
आदू मेकॅनोशी खेळत असल्यामुळे आईच्या बोलण्याकडे त्याचं पूर्ण लक्ष नव्हतं, त्याने आपलं ’हं’ म्हणून टाकलं.
“तुझी सायकल देऊया त्यांना?”
हा प्रश्न ऐकल्याबरोब्बर अद्वयनं कान टवकारले.
“माझी सायकल? कोणती? नवी?”
“नवी नाही रे, ती निळी सायकल, टेरेसमध्ये बेडशीटखाली झाकून ठेवली आहे ती…”
निळी सायकल, आदूची पहिली सायकल. मस्त चमकदार निळा रंग होता तिचा, सलग सीट होती, ट्रिंग ट्रिंग बेल होती, डावीकडे मस्त आरसाही होता आणि दोन्ही बाजूला छोटी चाकंही होती आधाराला. आदूला सायकल चालवायला यायला लागल्यानंतर ती चाकं काढून टाकली होती. ती काढलेली चाकंही होती एका पिशवीत गुंडाळून ठेवलेली. आदू पाच वर्षांचा झाल्यावर ही सायकल घेतली होती. खूप चालवली होती त्यानं. घरातही चालवायचा आणि बिल्डिंगच्या खालीही. मग काही वर्षांनी त्याची उंची वाढली, ही सायकल चालवताना गुडघे सायकलच्या हॅन्डलला आपटायला लागले. मग त्याला ती सायकल अचानक नकोशीच झाली. पण तिचं करायचं तरी काय? शेवटी आईनी ती टेरेसमधल्या एका कोप-यात बेडशीटखाली झाकून ठेवली होती. आणि या वर्षी तर वाढदिवसाला बाबांनी त्याला अठरा गिअरची मस्त भारीतली सायकल घेतली होती. त्याला अजून ती खूप नीट चालवता येत नव्हती, पण ती चालवताना, गिअर बदलताना, चढावर चढताना मजा यायची. ती जुनी निळी सायकल तो विसरलाच होता, आत्ता आईने सांगितल्यावर एकदम आठवलं.
मेकॅनो तसाच सोडून आदू टेरेसवर गेला, धूळ भरलेलं बेडशीट त्याने बाजूला काढून ठेवलं. सायकलीवरही धूळ बसली होती. त्याच बेडशीटने त्याने ती थोडी पुसली, तर तिचा निळा रंग एकदम चमकला. आदूला अचानक काहीतरी आठवलं, त्याने चटकन हॅन्डलखालचं मडगार्डही पुसलं आणि तिथे चिकटवलेला बाल हनुमानचा स्टिकर त्याच्याकडे पाहून हसला. आदूलाही हसायला आलं. बाल हनुमानचा सिनेमा त्याला फार आवडायचा. त्याच्याकडे सीडीच होती त्याची, अनेकदा टीव्हीवर बघायचा तो सिनेमा तो. त्याच्यासारखी एक गदाही आजीने त्याला आणली होती. सीडीत हनुमानचे स्टिकर होते, तेही त्याने वहीत, कपाटावर वगैरे लावले होते आणि सर्वात मोठा स्टिकर लावला होत्या त्याच्या सायकलवर. जसं काही सायकल जोरात चालवताना आदूही बाल हनुमानच व्हायचा. तो स्टिकर जसाच्या तसा होता. जरासा जुना झाला होता, पण फाटला वगैरे नव्हता. आदूने सायकलची नीट पहाणी केली. सगळं छान होतं, काहीच तुटलं वगैरे नव्हतं.
“आई, पण टायरमध्ये हवा नाहीये अजिबात. फ्लॅट झाली आहेत.”
“अरे हो, ती चालवली कुठे आहे गेले काही महिने? सामंतकाका चार दिवस आधी सांगणार आहेत. त्यांनी सांगितलं की भरू आपण हवा, पाहिजे तर नवीन ट्युबही घालून देऊ.”
“आई, पण कधी द्यायची आहे सायकल? आणि कोणाला द्यायची आहे? एकटाच कोणीतरी मुलगा चालवेल, का खूप मुलं चालवतील माझी सायकल? ज्याला सायकल येते त्यालाच देणार आहेत, का सायकल न   येणा-या मुलाला देणार आहेत? न येणा-या मुलाला देणार असतील तर आई आपण ती व्हील्सपण लावून देऊया का?” आता आदू एकदम अधीर झाला. त्याला प्रश्नांवर प्रश्न पडायला लागले.
“अरे, आत्तापर्यंत तर ती सायकल तू विसरलाही होतास, आणि आता ती द्यायची म्हटल्यावर एवढे प्रश्न? हे बघ आदू, या अशा कामांना खूप वेळ लागतो. काल फक्त घोषणा केली आहे. आता ज्या-ज्या लोकांना अशा सायकली द्यायच्या आहेत त्यांची नावं गोळा होतील, मग एखाद्या सामाजिक संस्थेला कॉन्टॅक्ट करतील, मग ते लोक एखादं गाव किंवा शाळा सुचवतील, मग सायकली गोळा होतील आणि मग त्या गरजू मुलांपर्यंत पोचतील. त्यामुळे तुझी सायकल नक्की कोणाला मिळेल जाईल याबद्दल काहीही सांगता यायचं नाही.”
“अगं, हे किती बोअर आहे! याला खूप दिवस लागतील.”
“हो ना.”
“आणि पुरेशा सायकलीच मिळाल्या नाहीत, चांगली संस्थाच सापडली नाही, गावातल्या मुलांना सायकली नकोच आहेत अशा कोणत्याही कारणामुळे हा सगळा उपक्रमच बारगळूसुद्धा शकतो. तेव्हा तू उगाच आईपाशी भुणभुणही करू नकोस.” त्यांचं बोलणं ऐकत असलेल्या शेजारी बसलेल्या आदूच्या आजीने आपले अनुभवाचे बोल सांगितले.
“मग तू आत्तापासून मला विचारलंस तरी कशाला?”
“अरे, विचारून ठेवलं. तुझ्या कितीतरी मित्रांच्या सायकली अशाच पडून आहेत. आपण सगळ्यांनी मिळून एकदम पंचवीस-तीस सायकली एखाद्या गावात दिल्या, तर तिथल्या मुलांना त्याचा उपयोग होईल. ती मुलं लांबलांबून येतात चालत शाळेत. अशा एखाद्या मुलाकडे आपली सायकल गेलेली तुलाही आवडेल ना?”
आईने विषय संपवला, पण आदूच्या डोक्यातून काही ती सायकल जाईना.
रोज दुपारी शाळेतून घरी आला, की आदू आधी टेरेसवर जायला लागला. ते बेडशीट उचलून त्याखाली सायकल आहे की नाही हे बघितल्याशिवाय त्याला चैन पडायचं नाही. ती तिथेच जागेवर असली तर त्याला हायसं वाटायचं, पण लगेचच ती कोणालातरी मिळाली तर बरं असंही वाटायचं. ’कोण बरं चालवेल आपली सायकल?’ याची त्याला भयंकर उत्सुकता वाटत होती. कसा असेल तो मुलगा? तो सायकल कुठे कुठे चालवेल, नीट चालवेल ना, कसं असेल त्याचं गाव, खड्डे असतील का, पंक्चर झाली तर दुरुस्त होईल ना… अनेक प्रश्न त्याला पडत होते. पण सायकली वाटपाचा मुहूर्त काही लागत नव्हता. सामंतकाका, आई, आजी कोणालाच ’सायकल कधी द्यायची?’ हा प्रश्न पडत नव्हता. जसं काही, त्याबद्दल एकदा बोलून सगळी मोठी माणसं त्याबद्दल विसरलीच होती.
मग हळूहळू आदूची उत्सुकताही कमी झाली. शाळेचा अभ्यास होता, परिक्षा होती, प्रोजेक्ट्स होती. सहामाही परिक्षा जवळ आली होती. आदू अभ्यासात बुडून गेला. आता शाळेतून आल्यावर तो फक्त लांबूनच ते झाकलेलं बेडशीट बघायचा. दिवस भराभर पळत होते.
परिक्षा झाली, दिवाळीची सुट्टी लागली, सुट्टीचा दंगा, खेळ सुरू झाला. दिवाळी झाल्यानंतर आदू, आई आणि बाबा आठ दिवस ट्रिपला गेले. परत आल्यावर आदूचं सहज लक्ष टेरेसकडे गेलं, तर सायकल तिथे नव्हती! कठड्यावर नुसतं बेडशीट घडी करून ठेवलं होतं. आदूला धक्काच बसला.
“आजी, अगं निळी सायकल कुठंय?
“हां ते सांगायचं राहिलंच, सामंत परवा घेऊन गेले ती.”
“अगं, पण त्यात हवा नव्हती! आणि ती काढलेली चाकं…”
“हो हो, ती चाकंही घेऊन गेलेत ते. सगळ्या सायकली नीट करून मगच देणार आहेत. आणि त्यांनी तुझा एक फोटोही नेलाय आणि तुझी माहितीही लिहून घेतली.”
“का?”
“मी नाही बाबा विचारलं. ब-याच सायकली गोळा झाल्या आहेत म्हणाले. एक संस्थाही शोधली आहे चांगली. पंधरा-एक दिवसात सायकली रवाना होतील म्हणे.”
“शी बाबा! नेमके मी नसतानाच आले काका.”
“असूदे ना आदू. तू असतास, तर काय करणार होतास तू?”
“माझी सायकल कोणाला देणार हे विचारायचं होतं.”
“अरे तुझं परत तेच! तुला सांगितलं ना, अशा कामात बरेच लोक गुंतलेले असतात. आपलं काम होतं, सायकल द्यायचं, त्या गोळा करायचं हे सामंतकाकांचं काम होतं. यापेक्षा जास्त कोणालाच माहित नसतं. ती कोणाकडे गेली हे महत्त्वाचं नाहीये आदू, तू वापरत नसलेल्या सायकलीचा कोणालातरी उपयोग होणार आहे हे जास्त महत्त्वाचं आहे.” बाबांचा मुद्दा आदूला पटला.
’माझी निळी सायकल फार भारी आहे. ज्याला ती मिळेल त्याला ती नक्की आवडेल’ अशी स्वत:ची समजूत घालून त्याने मान डोलावली. 
थोड्या दिवसांनी आदू त्या जुन्या सायकलीबद्दल पूर्णपणे विसरला.
***
एक दिवस आदू शाळेतून घरी आला तर आईने त्याच्या हातात एक पत्र ठेवलं. आदू एकदम हरखून गेला. त्याच्या नावे आलेलं हे पहिलं पत्र होतं! आईने ते फोडलेलं नव्हतं. त्याने ते हातात घेऊन नीट निरखून पाहिलं. त्याच्यासारखंच अक्षर होतं. त्याचं नाव, पत्ता नीट लिहिलेला होता. खाली पाठवणा-याचं नाव आणि पत्ता होता. तिथे लिहिलं होतं- भाविका सुरेश साळवी. कै. रखमाबाई पाटील प्रशाला, फलटण.
“आई, मला एका मुलीनी पत्र लिहिलंय!” आदूला खूपच मजा वाटली. “कोण आहे ही? आपली नातेवाईक आहे का?”
आई हसत होती. तिने त्याला विचारलं, “पत्र फोडून पाहूया का?”
आदूने मान डोलावली. आईने काळजीपूर्वक पत्र फोडलं आणि आदूकडे दिलं.

॥श्री॥
०३.१२.२०१८
प्रिय अद्वय राहुल कुलकर्णी,
माझं नाव आहे भाविका सुरेश साळवी. मी कै. रखमाबाई पाटील प्रशाला, फलटण इथे पाचवी इयत्तेत शिकते. मी फलटण जवळच्या वांदरे बुद्रुक इथे राहते. माझ्या लहान भावाचं नाव आदीनाथ आहे. तो पहिलीत आहे. माझं घर शाळेपासून लांब आहे. ज्योती सेवा केंद्र यांच्याकडून आमच्या शाळेत काही विद्यार्थ्यांना सायकली भेट मिळाल्या. मलाही सायकल मिळाली. ती तुझी आहे असं मला आमच्या गुरुजींनी सांगितलं. आता मी आणि आदीनाथ सायकलने शाळेत येतो. मला तुझी सायकल खूप आवडली. हनुमानही खूप आवडला. आदीनाथ सायकलवर माझ्यापुढे बसतो, सायकलची घंटा वाजवतो आणि हसतो. त्याने सायकलला नाव ठेवलं आहे- आदूची सायकल. तुझे खूप खूप आभार. आमच्या शाळेला भेट दे.
मोठ्यांना नमस्कार.       
आपली नम्र,
भाविका सुरेश साळवी”

पत्र वाचता वाचताच आदूचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. अखेर, त्याची सायकल कोणाकडे गेली होती हे त्याला कळलं होतं. त्याला उगाचच वाटत होतं, की त्याची सायकल एका मुलाकडेच जाईल. त्याची सायकल तर चक्क एका मुलीला मिळाली होती! न पाहिलेल्या भाविकाचा आणि तिच्या छोट्या भावाचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला. त्याच्या निळ्या सायकलवर ते दोघं बसले होते आणि त्याच्याकडे पाहून हात हलवत होते. आणि सर्वात भारी मजा म्हणजे ती अजूनही ’आदूचीच सायकल’ होती!

समाप्त.

(ही मी लिहिलेली पहिली ’मुलांकरता’ असलेली कथा. ही कथा ’पासवर्ड जाने-मार्च २०१९’ या विशेषांकात या आधी प्रकाशित झालेली आहे.)

5 comments:

raju said...

खूप छान!

Mohana Prabhudesai Joglekar said...

छान जमली आहे.

poonam said...

धन्यवाद राजूजी, मोहनाताई :)

Unknown said...

उद्बोधक कथा आहे .सायकल उपक्रम वाखाणनीय .👍

poonam said...

धन्यवाद! :)