February 19, 2019

लिरिक्सवाला गाना- का रे दुरावा...


शयनगृहात रात्रीच्या वेळी एक पत्नी तिच्या पतीचा दुरावा दूर करते आहे’- असा सीन आहे, असं कोणी सांगितलं तर आपल्या डोळ्यापुढे एका झटक्यात हव्याशा, नकोशा, ऐकलेल्या, पाहिलेल्या, अनुभवलेला अशा अनेक फॅन्टसीज येतील. मग पुढे कोणी सांगितलं की ’आता या सीनसाठी एक गाणं लिहा’ तर मात्र आपली विकेट पडेल. कल्पनेच्या भरा-या मारणारं आपलं मन एका झटक्यात जमिनीवर आदळेल कारण हा सीन योग्य शब्दात मांडायला लागते हिंमत. ती काही आपल्यात नाही, गाणं तर लांबच राहिलं! म्हणूनच आपल्याला असलं काही कोणी विचारत नाही, गदिमांना विचारतात! :) 
 
१९७० साली आलेल्या ’मुंबईचा जावई’मधही ही ’सिचुएशन’ आहे. त्यातून हे गाणं आहे पत्नीच्या ओठी! म्हणजे फारच सेन्सेशनल. बाहेर स्त्रीने उत्तान नृत्य करावीत, कॅबरे करावेत, आयटम सॉन्ग्ज करावीत, पण घरातली स्त्री ही शालीनच असायला हवी, तिने तिच्या हक्काच्या नव-याच्या नुसतं जवळ जाणंही म्हणजे अगोचरपणा. त्यातून शय्यागृहातला सीन म्हणजे तर शांतम पापमच. असो.

म्हणून अशा नाजूक सिचुएशनकरता गदिमांचीच गरज असते आणि ते लिहितात-
 
का रे दुरावा का रे अबोला
अपराध माझा असा काय झाला?

हे गाणं लिहिणं म्हणजे एका thin rope वर तोल सावरत चालण्यासारखं आहे... काय सुंदर गाणं लिहिलंय गदिमांनी! एकाचवेळी रोमॅंटिक, गोड, अंगावर शिरशिरी आणणारं, उघड उघड मागणी करणारं आणि तरीही शालीन, कणभरही तोल न ढळलेलं! या गाण्यातला एकेक शब्द नीट वाचला की गदिमा ही काय चीज आहे हे कळतं!

पती-पत्नी’ हे नातं किती गुंतागुंतीचं आणि अनेकपदरी असतं! आपल्या सवयी, आवडी, सल, दु:, स्वभाव आणि शरीर पूर्णपणे माहित असलेला आपला जोडीदार... अर्थातच हे नातं इतर कोणत्याही नात्यापेक्षा वेगळं आणि अनेक कंगोरे असलेलं असतंच, कारण या नात्याची सुरूवात च होते शारीरिक जवळीकीने. आणि मग सगळे संदर्भच बदलून जातात. नवरा-बायकोंमध्ये असलेले आलम दुनियेतले अनेक रुसवे फुगवे, भांडण तंटे, इगो आणि वाद शमतात ते त्यांच्या शयनगृहात. ती जागा असते फक्त त्यांची. त्या दोघांची. त्यात डोकावायचा हक्क कोणालाही नसतो. नुसतं एकमेकांच्या शेजारी बसून मारलेल्या गप्पा, कुशीत शिरून मन मोकळं करणं या छोट्या छोट्या गोष्टींनाही या जागेत खूप मोठं महत्त्व असतं. इथे जे डायनॅमिक असतं त्यावर आख्खे संसार तरतात. ती रुसली तर तिचा रुसवा कसा काढायचा, त्याचा इगो हर्ट झाला तर त्याचा राग कसा घालवायचा याची रहस्य त्यांच्या या स्पेसमध्ये दडलेली असतात.

तर गाणं सुरू होतं तेव्हा पती काही कारणाने रागावला आहे आणि चक्क पत्नीकडे पाठ आहे. विनवण्या करूनही तो तिच्याकडे बघतही नाहीये. मग पत्नी एक ट्रिक करते आणि त्याच्या विनवण्या करण्याऐवजी त्याच्यावरच रुसते. तिचा रुसवा घालवायला तरी तो तिच्याकडे बघेल असा तिचा कयास आहे. ती म्हणते,

नीज येत नाही मला एकटीला
कुणी ना विचारी धरी हनुवटीला
मान वळविशी तू वेगळ्या दिशेला
अपराध माझा असा काय झाला?

कृष्णधवल चित्रपटांमध्ये हीरो हिरॉइनच्या हनुवटीला धरून तिच्या चेहरा त्याच्याकडे वळवतो, ’आज कुणीतरी रुसलंय वाटतं’ म्हणतो. हे सीन आठवून आज आपण हसतो, जवळपास त्यातल्या ’चीजीनेस’ची खिल्ली उडवतो. पण हनुवटी धरून चेहरा आपल्याकडे वळवणं हे किती मोठं रोमॅंटिक gesture आहे माहितेय! चेहराच समोर आल्यावर संवाद साधण्यावाचून पर्यायच रहात नाही आणि चेहरा समोरच आल्याने इतरही अनेक पर्याय खुले होतात ;) 
 
इथे तर हीरॉइनच म्हणतेय, माझी हनुवटी धर, मला जवळ घे! रुसवा घालवायची काय मस्त ट्रिक आहे ही! आणि हा बाण अचूक बसतो. हीरो सपशेल माघार घेतो. दुस-या कडव्यात तो आणखी खुलतो. हळूहळू रुसवा तर दूर होतो, आणि मग होते ’दुरावा’ संपवण्याची वेळ. कृतीतून करायची ही गोष्ट, गदिमा किती सुंदर शब्दात गुंफतात!

रात जागवावी असे आज वाटे
तृप्त झोप यावी पहाटे पहाटे
नको चांदणे अन नको स्वप्नमाला

किती सूचक शब्द... म्हटली तर उघड मागणी, म्हटलं तर आर्जव, म्हटली तर इच्छा, जी पूर्ण करणं फक्त त्यालाच शक्य आहे. आणि तशी ती त्याने केली, तर टिपूर चांदण्याचीही गरज नाही. आह! Romantic and passionate at the same time!

आसपास पन्नास लोक असले तरी दोघांनी एकमेकांना उद्देशून बोललेले काही ’खास’ शब्द, तिने त्याच्यासाठी माळलेला गजरा, त्याने तिच्यासाठी लावलेलं अत्तर, त्याच्या नजरेत तिला पाहून उमटलेलं कौतुक, एखादा चोरटा स्पर्श, धरलेला हात... एकमेकांकरता असलेली असोशी दाखवायच्या प्रत्येक जोडप्याच्या पद्धती निराळ्या, त्यांच्यात्यांच्यापुरत्या खास सिक्रेट्स. पण सगळ्याच अतिशय मोहक. एकमेकांवरचा विश्वास बळकट करणा-या. एकमेकांना समजून घेणा-या, फुलवणा-या आणि जपणा-या. स्पर्शाच्या आधारे फुलणारं हे नातं शब्दबद्ध होऊच शकत नाही. पण ही किमया साधली आहे गदिमांनी.

हे गाणं दिसतं त्याहीपेक्षा मला ते ऐकायला जास्त आवडतं, कारण दर वेळी ऐकताना त्यातून ’पती-पत्नी’ या नात्याचा एक नवीन पैलू हाती लागतो. बाबूजींचं संगीत, आशाबाईंचा आर्जवी आवाज याबद्दल तर काय बोलावं! खटकणारी एकच गोष्ट आहे तो म्हणजे ’अपराध’ शब्द, कारण हा शब्द नकारात्मक आहे, आणि पती-पत्नीच्या नात्यात इतकं टोकाचं काही असू नये. पण निरागस बाळाला दृष्ट लागू नये म्हणून जशी तीट लावतात तसा हा शब्द तीटेसारखा आहे असं मी मानते, गदिमांना परत एकदा नमस्कार करते आणि परत एकदा हे नितांतसुंदर, कमाल रोमॅन्टिक, प्रेमळ गाणं ऐकते- ’का रे दुरावा, का रे अबोला...’

इथे पहा आणि ऐका-  https://www.youtube.com/watch?v=s7H8icde0Iw

8 comments:

raju said...

खूप छान लेख!

poonam said...

धन्यवाद राजूजी !

Slient Banker said...

Mast lekh.

poonam said...

धन्यवाद मंदारजी!

orchid said...

आवडला लेख. किती छान लिहीलयं.

poonam said...

Thanks Orchid :)

Unknown said...

अचूक शब्दांकन...गदिमांचे संयत, संयमित शब्द. कृष्ण धवल चित्रपटांच्या काळात प्रेक्षकांचं लक्ष नायक नायिकेच्या हावभाव चेहर्यावर केंद्रीत असायचं. आजच्या रंगीत चित्रपटात लक्ष नायक नायिका सोडून इतरत्र, सर्वत्र...

poonam said...

खरं आहे. धन्यवाद अनामिक :)