February 5, 2019

लागू मॅडम

आपला मेंदू म्हणजे एक भलंमोठं unpredictable मजेशीर कपाट आहे. एका साध्या trigger मुळे त्यातल्या कोणत्याही कप्प्यातून काय काय बाहेर पडतं! परवा शाळेतल्या लागू मॅडम भेटल्या आणि अगदी हाच अनुभव घेतला. 

लागू मॅडम खरंतर आम्हाला मराठी शिकवायच्या… मी सहावीत असताना! म्हणजे किती वर्षांपूर्वी कोण जाणे! माझं मराठी शाळेतल्या इतर मुलांपेक्षा चांगलं होतं, त्यामुळे माझे निबंध अनेकदा वर्गात त्या वाचून दाखवायच्या. त्या ’आर्ट आणि क्राफ्ट’ही शिकवायच्या. पण त्याहीपेक्षा, शाळेच्या मुलींच्या दृष्टीने त्यांची ओळख म्हणजे त्या दर वर्षी गॅदरिंगमध्ये मुलींचे नाच बसवायच्या. डान्स नाही, नाचच! त्यामुळे दर वर्षी लागू मॅडमच्या नाचात आपली वर्णी लागावी याकरता मुली जीव टाकायच्या. मीही त्यात होतेच.

मॅडमही ग्रेट होत्या, अतिशय उत्साही. शिकवतानाही त्या एकदम कूलली मजा मजा घेत आणि मजा करत शिकवायच्या. गॅदरिंग म्हणजे तर धमाल करायचं लायसन्सच! दर वर्षी लागू मॅडम खास गॅदरिंगकरता म्हणून स्वत: नवं गाणं लिहायच्या, त्याला चालही लावायच्या आणि शाळेतलीच मुलंच ते गाणं गात असत… असा तो, सबकुछ लागू मॅडम असलेला तो नाच व्हायचा, तेही लाईव्ह गाण्यावर! आम्ही बहुतेक कधी सिनेगीतांवर नाच केलाच नसावा.

मी बहुतेक सातवीत असताना, इंद्रधनुष्याच्या सात रंगांवर गाणं होतं. खूप मुलींना चान्स मिळाला होता. त्यांना मस्त मस्त इंद्रधनुष्यी रंगाचे मुद्दाम शिवलेले फ्रॉकही घालायला मिळणार होते. पण मैत्रिणीने शिफारस करूनही आणि अनेकदा ट्रायल नाच करूनही मॅडमना मी नाचाकरता पसंत पडले नव्हते. पण लागू मॅडमच्या ग्रुपमध्ये तर आपण असायलाच हवं- मग मी त्या नाचाच्या गाण्यात शिरकाव करून घेतला होता. नाच ना सही, गाना ही सही, इतकं वेड होतं ते.

एका वर्षी आमच्याही शाळेने पोलीस ग्राउन्डवर भरणा-या एका कार्यक्रमात नाचाची एन्ट्री द्यायची ठरवली. बसवणार अर्थातच लागू मॅडम. यावेळी नाच ग्राउन्डवर होता, त्यामुळे मुलींची संख्या जास्त होती, मलाही चान्स मिळाला. पण प्रॅक्टिसकरता रोज शाळेत ११ वाजता यायला लागेल अशी अट होती. मी लांब रहायचे. शाळेत स्कूलबसने जायचे. प्रॅक्टिसकरता लवकर जाणार कसं? आभु गेले नाही, तर नाचातून आऊट! ते तर होऊच नाही शकत! मग त्यावरही एक मस्त तोडगा निघाला. मी रोज सकाळी लवकर लागू मॅडमच्या घरी चालत जायचे. त्यावेळी त्या चक्क बजाज स्कूटर चालवत. मग मला डबल सीट घेऊन आम्ही शाळेत जायचो. कोणाचीही कोणत्याही टीचरशी त्याकाळी इतकी सलगी नसे. आणि इथे तर प्रत्यक्ष टीचरबरोबरच शाळेत जात होते मी! मला फार भारी वाटायचं…  आणि आम्ही पोचलो, की तिथे ऑलरेडी आलेल्या मुली जोरात ओरडायच्या, हात हलवायच्या… ते सगळं लागू मॅडमकरता असायचं, पण मला वाटायचं, माझ्यासाठीच!

माझ्या सगळ्या मैत्रिणी छान नाचायच्या, दिसायच्याही सुंदर. मी दोन्ही डिपार्टमेन्ट्समध्ये लंगडी. पण तरी एकीच्या नादाने दुसरी… असं करत माझाही नंबर नाचात लागायचा. गॅदरिंग म्हणजे त्यावेळी आम्हा मुलींसाठी नटण्याची पर्वणीच! आईच्या सगळ्या साड्या उचकून त्यातली एकही न आवडण्याचे, मैत्रिणीच्या आईची साडी नेसायचे ते दिवस! गॅदरिंगच्या दिवशी जोरदार फाउंडेशन, ’लाली’ आणि लिपस्टिक लावायची संधी मलाही मिळायची. त्या दिवसात दिसण्याबाबत प्रचंड कॉम्प्लेक्स असणा-या मलाही वाटायचं, की मीही सुंदर दिसते, सुंदर नाचते. हा कॉन्फिडन्स मिळाला लागू मॅडमच्या नाचातून!
 
आता कितीतरी वर्ष सरली. मध्यंतरी ’गॅदरिंग’ हा शब्द उच्चारला की ’मुलाचं’ गॅदरिंग हेच डोक्यात होतं. माझ्या स्वत:च्या गॅदरिंगबाबत पार विसरायलाच झालं होतं. हे सगळं आठवलं कारण अवचितपणे परवा लागू मॅडम भेटल्या आणि मेंदूतला तो जादुई कप्पा अचानक उघडला. मी त्यांना न ओळखण्याचा प्रश्नच नव्हता, पण त्यांनाही माझा चेहरा ओळखीचा वाटला. त्या मला जशा आठवतात तशाच आहेत, अगदी त्यांची हेअरस्टाइलही. या इतक्या मोठ्या काळादरम्यान मी एका अल्लड मुलीची एक प्रौढ बाई झाले, पण वयाचा मागमूसही त्यांच्या चेह-यावर दिसला नाही. त्या आजही तितक्याच उत्साही, हस-या आणि हव्याहव्याशा आहेत. माझ्यासारख्या अनेकींच्या आयुष्यात त्यांनी नकळतपणे जो आत्मविश्वास पेरला त्याचंच हे फळ असावं! प्रत्यक्ष फार काही न शिकवता आपल्या कृतीतून बरंच काही शिकवणारे असे शिक्षक आपल्याला लाभले होते, आपण किती भाग्यवान होतो याचा प्रत्यय आज खूप खूप वर्ष सरल्यानंतर आला!

0 comments: