“सब हो गया ना ठीकठाक? अब कोई प्रॉब्लेम
नही आयेगा ना?” अभिजीतने प्लम्बरला विचारलं.
“हा हा, अब ठीक हो गया. लीकेज अंदरतक
गया था ना, वो निकाला है. आज मत युज करो बेसिन. कलसे सब ठीक हो जाएगा. कोई प्रॉब्लेम
हुआ तो मेसेज भेजना व्हॉट्सॅपपे. आजी के पास है मेरा नंबर.”
“हा ठीक है.”
त्याचे पैसे देऊन अभिने त्याला रवाना
केले.
“बरं केलंय ना रे काम? किती काम निघालं
बघ. तरी मी म्हणत होते, की नुसता नळ तर गळतोय, तरी इतकी ओल कशी?” आईने अभिला विचारलं.
“हो. काढलंय त्याने लीकेज. पाहिलंय मी.
पण आई हा कोण नवीनच प्लम्बर? चौधरीला का नाही बोलावलंस?”
“काही सांगू नकोस त्या चौधरीचं. फोन करून
कंटाळले मी. नुसतं ’आज येतो, उद्या येतो’ करतो तो. येत नाही काही नाही. कामं फार झाली
आहेत त्याला. मग हा शोधला काल शेवटी. अरे, ते इमर्जन्सी सेवांचं अॅप डाऊनलोड केलंय
ना मी. त्यावर याचा नंबर होता. मग याला व्हॉट्सॅप केला, मग त्याचं उत्तर आलं, आणि आज
काम झालं सुद्धा बघ!”
“वा आई! एकदम टेक-सॅव्ही झाली आहेस तू.
पण अॅपवर विश्वासू लोक आहेत ना? कधीकधी कोणीही घरात शिरू शकतं. म्हणून आज मी मुद्दाम
आलो पहायला.”
“त्या निमित्ताने का होईना, आलास बाबा.
पण हे बघ, आपल्या वाट्याला काय प्रकारची माणसं येतील हे काही सांगता येत नाही. कुठेतरी
विश्वास टाकावाच लागतो! अरे, त्या अॅपवर इलेक्ट्रिशियन, रंगारी असे पण लोक आहेत. या
मोबाईलमुळे आणि त्यावरच्या अॅप्समुळे किती सोय झाली आहे बघ!”
अभिने मोठी जांभई दिली आणि आळस दिला.
“पण फार वेळ गेला पण या सगळ्यात. जाम
भूक लागलीये. आता घरी जाऊन जेवायला फार उशीर होईल. आज इकडेच जेवतो. काय केलंय्स जेवायला?”
आई एकदम चपापली. “अरे घरी केलं असेल ना
मानसीने…”
“असेल की. पण मला आता कंटाळा आलाय. कसली
भाजी आहे? पोळ्या नसतील, त्या आणतो मी खालून.”
“अरे सकाळपासून त्या प्लम्बरच्याच मागे
होते. काहीच केलं नाहीये. पण ते एक अॅप केलंय मी डाऊनलोड. चांगलं घरगुती जेवण घरपोच
देतात, त्यावरून मागवू का? अरे नाहीतर खालचा शेट्टी पण देतो इडली-डोसा घरी दहा मिनिटात.
थांब त्यालाच फोन लावते. चालेल ना?”
अभि आईकडे बघतच राहिला.
“आई, घरात कांदे-बटाटे तरी असतील ना?
दहा मिनिटांत रस्सा होईल. मी करू का?” तो बाह्या सरसावून उठलाच.
“का रे?” आई हसून म्हणाली, “तुम्ही तर
येता-जाता बाहेरचं खाता. आईने मात्र घरीच करायचं, असं का?”
“तसं अजिबात नाही आई. पण… बरं असुदे.
तू मागव शेट्टीकडून तुला पाहिजे ते. पण आज मला तुझं स्वयंपाकघर चेक करायचंय.”
“वा रे वा. मॅनेजर साहेब आज आईचं चेकिंग
करणार तर.”
“आई! असं काय तिरकं बोलतेय्स? पण ठीक
आहे. तसं समज. आई, मी तुझ्याकडे खायला मागतोय, आणि तू मला विकतचं काहीतरी खायला देतीयेस
हेच मला पटत नाहीये. ओके, तुझ्याकडे पोळी-भाजी तयार नसेल, पण तू ती पटकन करायची तयारीही
दाखवत नाहीयेस, हेही काहीतरी खूपच वेगळं आहे. बर, बाकी काही नाही, तर थालिपीठाची भाजणी,
धिरड्याचं पीठ हे तरी असतंच तुझ्याकडे. पण सगळं सोडून तू डायरेक्ट फूड अॅपच काढलंस.
म्हणजे तू टेक-सॅव्ही असलीस, तरी मुलाला भूक लागलेली असताना तू काही अशी वागणार नाहीस. काहीतरी
पाणी मुरतंय. This is not you आई.”
अभिचं बोलणं ऐकून आईचा चेहरा उतरला.
“भाजणी, आंबोळ्यांचं पीठ… काहीच करत नाही
रे आताशा घरी. भाजीही कधीतरीच करते. नेमकं आज घरात काहीच नाही.”
“अगं, मग तू जेवतेस तरी काय रोज?”
“असंच, वरण-भात, कधी खिचडी, कधी रव्याची-नाचणीची
खीर… भाजी-पोळीही करते रे, नाही असं नाही… पण रोज करतेच असं नाही.” ही कबूली देत असतानाही
आईचा चेहरा कसनुसा झाला.
“का? अशी का आबाळ करतेय्स स्वत:ची?”
“आबाळ असं नाही, पण कंटाळाच येतो एकटीसाठी काही करायचा.”
“आई, मानसी तुला डबा देते म्हणाली, तर
तू नको म्हणालीस. स्वयंपाकाला बाई लाव, तर एकटीसाठी काय करायची बाई, म्हणून तीही लावली
नाहीस. आणि स्वत:ही काही करत नाहीयेस! मला काही समजेनासंच झालंय… आई, मी आणि दादाने
घरचं, सकस अन्न खावं अशा सवयी लहान असताना तू मुद्दाम आम्हाला लावल्यास. आम्ही कुठेही गेलो तरी आमची आबाळ होऊ नये म्हणून
भाज्या, कोशिंबीरी करायला तू आम्हाला आग्रहानी शिकवलंस. मला तर घरात तू केलेले लाडू
नाहीत, चिवडा नाही असा दिवसच आठवत नाही. आणि आज हे असं? जिने सतत आम्हाला, आमच्या मित्रांना,
नातेवाईकांना स्वत:च्या हातचं जेवायला घातलं,
ती आई आज स्वत:च जेवत नाही? तिच्या घरातले डबे हे आज रिकामे? हे भयंकर आहे आई. काय
कारण आहे याचं?”
“काही कारण नाही रे. आसक्तीच संपलीये
सगळ्याची. करून करून वीट आला स्वयंपाकाचा. एकेकाळी दिवसचे दिवस स्वयंपाकघराबाहेर पडत
नव्हते. आता नकोच वाटतं. आणि हौसेने करायचं
तरी कोणासाठी? तुम्ही मुलं, सुना, नातवंडं सतत बिझी. आपलं रोजचं बोलणं फोनवर. दादाचा
फोन सकाळी, तुझा संध्याकाळी. आज किती दिवसांनी इतका शांतपणे माझ्याकडे आलास सांग बरं.
सणासुदीला मीच येते तुमच्याकडे. तेव्हा करते काहीबाही. पण रोज एकटीसाठी रांधायला, तेही इतकंइतकंसं… नकोच
वाटतं. तुमच्या भाषेत सांगायचं, तर माझी ही ’कंटाळ्याची फेज’ आलेली आहे. आईने काय सतत
करतच राहायला हवं का?” आईने एकदाचं बोलून टाकलं.
“आई, तेच म्हणतोय मी. तुला मुद्दा कळत
नाहीये. तूच रोज स्वयंपाक केलाच पाहिजेस, तू आयतं काही खाल्लं नाही पाहिजेस असं कोणीच
म्हणत नाहीये. तू उलट इतकी टेक-सॅव्ही आहेस, स्वतंत्र आहेस, स्वतंत्र राहतेस, स्वत:च्या
विश्वात रमलेली आहेस, नवीन गोष्टी चटकन शिकतेस, याचा प्रचंड अभिमान वाटतो आम्हाला सगळ्यांनाच.
पण हे तुझं वागणं तुझ्याच आत्तापर्यंतच्या वागण्याशी विसंगत आहे. तुला नाही का असं
वाटत? आई, भाज्या, सॅलड्ज, डाळी, फळं का खायची असतात हे काय मी सांगायचं का तुला आता?
आणि तुझ्या त्या व्हॉट्सॅपवरच्या मैत्रिणी नाही का सल्ले देत तुला? त्या कधी अचानक
घरी आल्या तर काय देतेस त्यांना?”
“त्या कशाला घरी येतायेत? तोही विरंगुळा
तेवढ्यापुरताच. त्यांना काही सांगायला जात नाही मी बरंका. आजकाल त्याही भेटी बाहेरच
हॉटेलात होतात. घरात भेटायचं असेल तर आधी व्हॉट्सॅपवरच ठरतं. मग तेवढ्यापुरतं मागवते
सामान किराणामालाच्या एका अॅपवरूनच.” आईला
हे बोलता बोलताच हसू आलं. अभिही हसला.
“आई, प्लीज असं वागू नकोस. नीट खा-पी.
आयुष्यभर तुला साग्रसंगीत खाताना, खायला घालताना पाहिलंय गं. हे तुझं ओकंबोकं स्वयंपाकघर
बघताना कसं वाटतं हे मी नीट शब्दात सांगू शकत नाही तुला…”
“नको बोलूस काही. मला कळत नाही असं वाटतं
का रे तुला? पण आता या वयात ’तू चुकतेस’ असं
सांगणारं कोणी राहिलं नाही. कशाचीच उमेद वाटत नाही. कोणासाठी करायचं असा प्रश्न सतत
पडतो. स्वत:साठी काही केलंच नाही ना आजवर. पण आज तू हक्काने बोललास. खरंच बरं वाटलं.
बर आता एक काम कर. शेट्टीचं पार्सल येईल. तोवर खाली जा आणि केळी घेऊन ये. बाकी काही
नाही, तर गोड म्हणून शिकरण तरी करते. लहान असताना, तेवढी असली तरी तुझा चेहरा खुलायचा.”
आई प्रेमाने अभिकडे बघत म्हणाली.
“आणतो. पण आई एक प्रॉमिस कर. तू रोज सकाळ-संध्याकाळ
व्यवस्थित जेवशील. पाहिजे तर मी भाजी आणून देत जाईन तुला दर रविवारी.”
“नको रे. तू कशाला आणतोस? भाजीसाठीही
एक अॅप आहे ना माझ्याकडे. ताजी भाजी मिळते त्यावर. जेवेन मी आता नीट. पाहिजे तर तुला
फोटोही पाठवेन रोज…”
“व्हॉट्सॅपवर!” दोघेही एकदमच हसत हसत
म्हणाले!
*****
2 comments:
Kharach .. haa prasang halli khup commonly pahayla / anubhawayla milat asel ...ektepan..tyatun (hasat) marg kadhnari tech-savy aai, mula la aai chi asleli kaalji , ekmekan baddal cha toch odhaa, te chch sentiments...tari hi aajchya jagatla practical pana ... Mastach ...ek sadha sa ..kuthlya hi gharat ...konabarobarahi or rather saglyan barobar ghadnara ( ghadnara mhannya itka motha hi naahi ) pan tari hi ...goad prasang .
Khup sunder lihila aahe 😊
Thanks so much! साधाच प्रसंग आहे, कोणत्याही घरात होऊ शकेल असा. फक्त त्याला जरा सकारात्मक पद्धतीने मांडायचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला तो आवडला, हे वाचून छान वाटलं! :) मन:पूर्वक आभार!
Post a Comment