December 4, 2018

Kia Ora New Zealand- भाग ९

समारोप

 
एक दिवसाची साधी सहल असो किंवा पंधरा-वीस दिवसांची मोठ्ठी ट्रिप… प्रत्येक प्रवास हा काही ना काही कारणाने संस्मरणीय होतोच. देवदयेने, आमच्या न्यू झीलंड ट्रिपमध्ये फार काही गोंधळ, घोटाळे किंवा तोंडचं पाणी पळवणा-या काही घटना घडल्या नाहीत, पण तरीही काही युनिक गोष्टी झाल्याच.

सिडनीची पनवती
आम्ही क्वान्टास या ऑस्ट्रेलियन विमान कंपनीचे तिकिट काढले होते. त्यामुळे, न्यूझीलंडला जाताना आणि तिथून येताना दोन्ही वेळा सिडनीत विमानाचे थांबे होते. आमचा मुंबई ते ऑकलंडचा एकूण विमानप्रवास अठ्ठावीस तासांचा होता. त्यातले पहिले पंचवीस तास एकदम व्यवस्थित पार पडले. आता सिडनी ते ऑकलंड असा शेवटचा तीन तासाचा टप्पाच उरला होता. आम्ही अतिशय एक्सायटेड होतो. हा शेवटचा विमानप्रवासही अगदी वेळेवर सुरू झाला. तीन तासापैकी एक तास झाला, राहिले दोनच. आणि माशी शिंकली! विमान चक्क वाटेत मागे फिरलं! विमानाची वातानुकूलन यंत्रणा नीट काम करत नव्हती, म्हणून वैमानिकाने विमान परत सिडनीत न्यायचं असं ठरवलं. बर, पण याची काही घोषणाही नीट केली नाही. फक्त ’विमानात काहीतरी समस्या आहे, म्हणून आपण मागे फिरतोय’ इतकंच सांगितलं. त्याहून आश्चर्य म्हणजे विमानातल्या एकाही गो-याने ’का?’ असं विचारलं नाही! मग आम्हीच शेवटी न राहवून कारण विचारलं, तेव्हा आम्हाला वरचं उत्तर मिळालं. विमानप्रवास सुरू झाल्यानंतर एखाद्या प्रवाशाची मेडिकल इमर्जन्सी आली किंवा विमानात अतिरेकी शिरले वगैरे म्हणून विमान परत वळवलं, हे ऐकलं होतं. पण विमानाची तपासणी न करता आधी ते हवेत नेलं आणि मग चूक लक्षात आल्यानंतर ते परत नेलं हे क्वान्टासच्याही इतिहासात पहिल्यांदाच घडलं असेल, आणि आमचं नशीब असं की नेमके आम्हीच या इतिहासाचे साक्षीदार! मग विमान परत वळवल्यानंतर त्याची तपासणी, दुरुस्ती, आम्हा प्रवाशांना उतरवणं, परत चढवणं या सगळ्यालाच इतका उशीर होत गेला, की दोनच तासांनी आम्ही ऑलकंडला पोचणार होतो त्या ऐवजी तब्बल नऊ तासांनी पोचलो! दुस-या दिवसाचं संपूर्ण नियोजन कोलमडलं. इतका लांबचा प्रवास केल्यानंतर थोडी विश्रांती घेऊ अशी आमची योजना होती, ती फिस्कटली, सुदैवाने कोणतेही प्लॅन्स रहित करावे लागले नाहीत.     
परतीच्या प्रवासात याच एअरपोर्टवर आणखी कहर झाला! सिडनी एअरपोर्टवर चक्क वीज पुरवठा खंडित झाला! बॅकपही चालेना. त्या विमानतळावर त्या आधी किमान तीस वर्ष असं अघटित घडलं नव्हतं. पण आम्ही क्राइस्टचर्चहून सिडनीला पोचलो आणि तेही घडलं! परिणामत: भयंकर गोंधळ झाला, अनागोंदी माजली, संपूर्ण विमानतळावरचं पाणी गेलं, टॉयलेट्स बंद… प्रवाशांची जाम पंचाईत! आणि त्यानंतर विमानउड्डाणांची वेळापत्रकं पूर्णपणे कोलमडली! कोणत्या टर्मिनलवरून कोणतं विमान कधी सुटेल याचं उत्तर कोणापाशीच नव्हतं. आमचं सिडनी-सिंगापूर विमान डीले झालं. इतकं, की आमचा पुढचा सिंगापूर-मुंबई प्रवासच धोक्यात आला! पण कसंबसं ते संकट टळलं.
दोन्ही वेळेला सिडनीतच विचित्र प्रसंग उद्भवले! हा कसला योगायोग म्हणायचा?

पचास साल के जवान?
न्यू झीलंडमध्ये आम्ही सार्वजनिक बसेसमधून बहुतांश प्रवास केला. क्वचित टॅक्सीनेही. सर्वात लक्षणीय गोष्ट अशी, की या चालकांचं सरासरी वय किमान पन्नास होतं! काही तर साठ-पासष्टीचेही होते. त्यातही निम्म्या स्त्रिया होत्या. ड्रायव्हर म्हणून आपल्या सवा-यांचं सामान उचलणं हे त्यांचं काम होतं, त्यांचीही त्याला कधी ’ना’ नव्हती, पण तरीही ज्येष्ठ नागरिकांकडून सामानाची चढ-उतार करवून घ्यायचा आम्हालाच संकोच वाटायचा. शक्य तेव्हा आम्हीच सामान ठेवलं-उतरवलं. सगळे चालक गप्पिष्ट मात्र होते. प्रवास चालू असताना आजूबाजूची माहिती सांगणं, पर्यटकांना आवश्यक सूचना देणं हेही त्यांचं कामच होतं, पण हे कामही ते आनंदानं करत होते. क्वचित विनोद करत होते, आम्ही आणखी प्रश्न विचारले त्यांचीही त्यांनी छान उत्तरं दिली. सगळे ’फिट’ दिसत होते, पण या वयात ’ड्रायव्हर’सारखं दमणूक करणारं काम त्यांना का करावं लागत असेल हा प्रश्न पडला. न्यू झीलंड हा देश तसा राहणीमानाच्या मानानं महाग आहे. सरकारी नोक-या, पेन्शन याबाबतीत त्यांची काय धोरणं आहेत याची कल्पना नाही, पण निवृत्तीनंतर एक चांगलं आयुष्य जगायचं असेल तर खूप वर्ष काम करणं या देशात आवश्यक असावं की काय असं वाटलं.
तुझं-माझं जमेना…
भौगोलिकदृष्ट्या पाहिलं, तर दक्षिण गोलार्धच्या तळाशी असलेला न्यू झीलंड हा अगदीच चिमुकला देश आहे. शेजारचाच ऑस्ट्रेलिया मात्र सर्वार्थाने बलाढ्य. न्यू झीलंड अनेक बाबतीत या शेजा-यावर अवलंबून आहे. त्यामुळे की काय, पण ऑस्ट्रेलियाबद्दल मनातून असहायता, काहीसा राग, थोडीशी असूयाही आहे. (अर्थात, भारत-पाकिस्तानसारखे संबंध ताणलेले नाहीयेत.) रग्बी, क्रिकेट या खेळांमध्ये ही असूया अगदी ठळक दिसून येते. पण बाकी वेळेला बिचारे न्यू झीलॅंडर्स तोंड दाबून ऑस्ट्रेलियाला ’सहन’ करत असतात. ’तुझं-माझं जमेना अन तुझ्यावाचून करमेना’ अशी गत. मग कधीकधी विनोदांमधून, कधी टोमण्यांमधून तर कधी सरळसरळ तोंडावरच ऑस्ट्रेलियावर निशाणा साधला जातो. उदाहरणच द्यायचं झालं, तर किवी हा इथला स्थानिक पक्षी. आता याची संख्या इतकी रोडावली आहे की तो नामशेष होईल अशी भीती आहे. तसं होऊ नये म्हणून प्रशासन अथक प्रयत्नही करत आहे. किवींची संख्या कमी होण्याची अनेक कारणं आहेत, आणि त्यातलंच एक कारण आहे ’पॉसम’ हा प्राणी. मूळ ऑस्ट्रेलियातून इथे आलेल्या पॉसमचं आवडतं भक्ष्य म्हणजे किवी! शिवाय उभ्या झाडांची, पिकांची प्रचंड नासधूस करायचीही ’आवड’ आहे पॉसमला. पर्यटनस्थळांवर हिंडताना किवींबद्दल बोलताना सगळे गाईड आणि चालक हमखास या पॉसमला आणि त्यायोगे ऑस्ट्रेलियलाही दोन शब्द सुनावतातच! आपल्यासारख्या पर्यटकांचं मात्र या ’लव्ह-हेट रिलेशनशिप’मुळे मस्त मनोरंजन होतं.          
रांगेचा फायदा… 
रांगेचा फायदा सर्वांना असतो हे निर्विवादच, आपल्याकडे मात्र अशिक्षितांपासून उच्चभ्रूंपर्यंत सर्वांन घोळकेच करायची सवय असल्यामुळे तिथल्या रांगांचं भयंकर कौतुक वाटलं. रांगांची सवय असल्यामुळे गजबजलेल्या पर्यटनस्थळांपासून ते बसमध्ये चढण्यापर्यंत, बेकरीमध्ये खाद्यपदार्थ घेण्यापासून वॉशरूमपर्यंत सगळ्यांचीच सोय होत होती. लोक आपसुक रांगेतच उभे रहात होते, त्यामुळे गोंधळ होत नव्हता. (आपल्याकडे का नाही असं होत?) एका प्रसंगी मात्र माझ्या हातून अनवधानाने या रांगेच्या नियमांची चूक झाली. स्काय टॉवरला जाण्याच्या रांगेत उभे असताना काही कारणाने नवरा आणि मुलगा पुढे गेले, मध्ये एक कुटुंब आणि मग मी असे उभे राहिलो. आमच्याकडे ’फॅमिली पास’ होता. त्यामुळे मी कोणताही विचार न करता त्या कुटुंबाला ओलांडून पुढे गेले. त्या कुटुंबातल्या बाईला ही बेशिस्त मुळीच आवडली नाही आणि तिने ती बोलूनही दाखवली. नव-याला चटकन तिच्या नापसंतीचं कारण समजलं आणि त्याने तिला ’आम्ही एकत्र आहोत’ असं सांगितलं, त्यावर तिने किंचितशी मान हलवली. पण चूक माझीच होती. नियमानुसार मी तिची परवानगी घेऊन ’एक्स्क्युज मी’ म्हणून मगच पुढे जायला हवं होतं. भारतीय पद्धतीनुसार मी सरळ घुसले ते चूकच होतं. औपचारिकता ही आपल्या स्वभावातच नाही, परदेशात मात्र सतत नियम, सॉरी, थॅन्क्यु, इत्यादींचं भान ठेवावं लागतं.
युरोपियन प्रभाव असल्यामुळे एरवी लोक एकमेकांच्यात नाक खुपसत नाहीत, पण पर्यटकस्नेही देश असल्यामुळे, आपल्याला कोणतीही मदत हवी असेल, प्रश्न असतील तर अतिशय सौजन्याने उत्तरं दिली जातात. त्यांचे हसरे चेहरे पाहूनच धीर येतो. आम्ही फक्त तेरा दिवस त्या देशात होतो, त्यामुळे खोलवर जाणून घ्यायला फार वाव नव्हता, पण जे अनुभव आले, ते चांगले होते. पर्यटकाला आणखी काय हवं, नाही का? 
हाएरे रा
’किया ओरा’ असं म्हणत न्यू झीलंडने आमचं स्वागत केलं आणि तेरा दिवसांनंतर त्या देशाला ’हाएरे रा’ म्हणजेच ’गुडबाय’ म्हणत आम्ही परत आलो. ऑक्टोबर, २०१७ मध्ये आम्ही हा अविस्मरणीय प्रवास केला,   ख-या अर्थाने पर्यटनाचा आनंद अनुभवला. त्या सुंदर स्मृतींना मी ऑक्टोबर, २०१८ पर्यंत, म्हणजे पुढचं एक वर्ष या लेखमालिकेच्या माध्यमातून उजाळा देऊ शकले. या आनंददायी नॉस्टॅलजियाची संधी दिल्याबद्दल ’मेनका प्रकाशन’च्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार. ही मालिका ’मेनका’त प्रकाशित झाल्यामुळे हजारो वाचकांपर्यंत न्यू झीलंडचं सौंदर्य पोचलं. काही वाचकांनी माझ्याशी संपर्क साधला, न्यू झीलंडबद्दल आणखी जाणून घेतलं, तिथे जाण्याकरता ट्रिपही प्लॅन केली. फार सुंदर अनुभव होते हे. ’आनंद वाटल्याने द्विगुणित होतो’ याचा प्रत्यय मला या निमित्ताने आला.
मी हे लेख माझ्या ब्लॉगवरही पोस्ट केल्यामुळे आणखी दूरपर्यंत ते पोचले. परदेशातल्या काही लोकांच्या पर्यटनस्थळाच्या यादीत न्यू झीलंडचे नावही त्या निमित्ताने समाविष्ट झालं याचाही आनंद आहे.
ही लेखमालिका इथे संपत असली, तरी ब्लॉगवर नवीन काहीतरी लिहित राहीनच.
सध्या, हाएरे रा! अच्छा!
समाप्त. 

0 comments: