November 1, 2018

Kia Ora New Zealand- भाग ८


सावरणारं क्राइस्टचर्च


ट्रान्स अल्पाइन ट्रेनने आम्ही क्राइस्टचर्चला आलो आणि आमचं स्वागत करायला एक हसतमुख, पन्नाशीची, केस करडे झालेली, हातात आणि गळ्यात असंख्य अंगठ्या आणि चेन घातलेली एक चटपटीत महिला आली. ती आमची टॅक्सी ड्रायव्हर होती, वेन्डी. अतिशय हसतमुख, बोलायला गोड, वागायला तत्पर. तिची टॅक्सीही एकदम नव्या मॉडेल आणि मेकची होती, एकदम आरामदायी. क्राइस्टचर्चबद्दल आम्हाला दोनच गोष्टी माहित होत्या- एक म्हणजे इथे क्रिकेटचं स्टेडियम आहे आणि दुसरं म्हणजे २०११ साली इथे एक भीषण भूकंप झाला होता.  रेल्वे स्टेशन ते आमचं हॉटेल हा रस्ता बराच लांबचा होता. तेवढ्या वेळात वेन्डीने आमच्या क्राइस्टचर्चबद्दलच्या ज्ञानात बरीच भर घातली. वरवर पाहता बाहेर एक नेहेमीसारखं गजबजलेलं, पण सुंदर शहर दिसत होतं. शहराच्या मध्यातच अनेक ठिकाणी मोठ्या, विस्तीर्ण बागा होत्या, त्यात सुंदर मोठमोठी झाडं होती. युरोपियन शैलीनुसार शहर आखीव-रेखीव- ब्लॉक पद्धतीचं होतं. पण दुस-या दिवशी सकाळी आम्ही शहराच्या स्थलदर्शनाला निघालो आणि एकदम वेगळ्याच जगात पोचलो.
न्यु झीलंडच्या साऊथ आयलंडवरचं क्राइस्टचर्च हेही एक बंदर शहर. ऑकलंड, वेलिंग्टननंतर सर्वात मोठं आणि लोकप्रिय शहर. हा सगळा भूभाग भूकंपप्रवण आहे. सप्टेंबर २०१० मध्येच इथे ७.१ रिश्टर स्केलचा प्रचंड मोठा भूकंप झाला होता, पण त्याचा मध्य समुद्रात दूरवर असल्यामुळे, क्राइस्टचर्चला धक्के बसले, तरी फारशी हानी झाली नाही. मात्र त्या भूकंपानंतर सतत लहान-मोठे भूकंप इथे होतच होते. २२ फेब्रुवारी, २०११ ला मात्र एक ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप समुद्रात अगदी जवळच झाला, उभी-आडवी अशी जबरदस्त भूगर्भीय हालचाल झाली आणि क्राइस्टचर्च शब्दश: हादरलं. लिटन्स या सेन्ट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट (सीबीडी), म्हणजेच सर्वाधिक ऑफिसेस जिथे आहेत त्या भागात, ऐन दुपारच्या जेवणाच्या वेळी हा भूकंप झाला. या परिसरात दाटीवाटीने अनेक उंच इमारती आहेत त्या भयंकर भूकंपामुळे पडल्या. सी-टीव्ही या एकाच इमारतीतले ११५ जण या भूकंपात दगावले. अनेक इमारतींना तडे गेले, काहींचा पाया खचला, काही एका बाजूला कलल्या. क्राइस्टचर्च कथिड्रल या ऐतिहासिक चर्चचीही पडझड झाली. केवळ १० सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. एकूण मृतांची संख्या होती १८५.  

अर्थातच, ताबडतोब मदतकार्य सुरू झालं आणि ते नंतरचे अनेक महिने सुरूच राहिलं. इमारतींची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्यामुळे सिमेंटचे ते ढिगारे उपसण्यात सर्वाधिक वेळ गेला. त्यानंतर जागा मोकळी करणं, लोकांना नुकसानभरपाई देणं, नवीन इमारती बांधणं ही कामं सुरू झाली. याच भागात अनेक आलीशान हॉटेल्सही आहेत, त्यांनीही आपल्या इमारतींची पुनर्बांधणी सुरू केली. यानंतर न्यु झीलंडच्या प्रशासनाने नवीन बांधकामं कोणत्या पद्धतीने केली जावीत, काय खबरदारी घेतली जावी याकरता काही कायदे केले. यापुढे भूकंप झालाच तर कमीतकमी हानी व्हावी असा या कायद्यांचा उद्देश आहे.
आम्ही २०१७ मध्ये, म्हणजेच ही भीषण घटना घडल्यानंतर सुमारे साडेसात वर्षांनी तिथे गेलो होतो; आजही लिटन्स या भागात त्या भूकंपाच्या खुणा दिसतात. मध्येच रिकामी, चारही बाजूंनी सुरक्षित केलेली मोकळी जमिन दिसते, काही पडझड झालेल्या भिंती दिसतात, काही जागी टेकू लावलेले दिसतात, तर काही ठिकाणी नवं, कोरंकरकरीत बांधकामही दिसतं. इथे एका रग्बी स्टेडियमची तर फारच वाईट अवस्था झालेली आहे, तिथे मातीचे ढिगारे तसेच पडून आहेत. स्टेडियमच्या बांधणीपेक्षा निवासी आणि कार्यालयीन बांधकामांना अधिक महत्त्व असल्याने ते तसंच बंद करून ठेवलं आहे. पुनर्बांधणी करण्याकरता प्रचंड पैसे आणि मोठ्या प्रमाणावर मजूरांची गरज आहे. पैसे उभे केले जाऊ शकतात, पण इथे मजूरांचा प्रचंड प्रमाणात तुटवडा आहे. बाहेरून मजूर आणावे, तर काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना काहीच रोजगार नाही, इथे जागेचाही प्रश्न तीव्र, त्यामुळे तो मार्ग अवलंबता येत नाही आणि स्थानिक मजूर कमी आहेत. त्यामुळे काही बांधकामं वेगाने पूर्ण झाली आहेत, तर काही अजूनही चालूच आहेत. पण एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट दिसली, त्यातून या लोकांचं स्पिरिटही दिसलं. ज्या भिंती अजूनही उघड्याबोडक्या आहेत, त्यावर चक्क ग्राफिटी काढली आहे, काही नुसत्याच रंगीबेरंगी रंगवल्या आहेत. उंच इमारतींनी वेढलेल्या भागात मध्येच एखादी सुंदर भिंत दिसते. त्यावरची ग्राफिटीही आशादायक, स्फूर्तीदायक आहे. ’कितीही पडझड झाली तरी आमची मनं खंबीर आहेत’ याचंच द्योतक म्हणजे ही ग्राफिटी आहे असं मला वाटलं. वेन्डी, आम्हाला स्थलदर्शन करवणारा आमचा बस ड्रायव्हर हे या घटनेबद्दल भरभरून बोलले, पण त्यांच्याकडून निराश सूर ऐकायला आला नाही. बोलण्याच्या ओघात त्या वाईट घटनेचा उल्लेख करून ते शहरातली बाकीची वेधक स्थानं उत्साहाने दाखवत होते.
आणि अर्थातच, क्राइस्टचर्च सुंदरच आहे. इथेही इंग्रजांनी आपले पाय रोवले, मूळ ऑक्स्फोर्डमध्ये असलेल्या चर्चवरून या शहराला नाव दिलं. शहराच्या मधोमध भव्य असं कथिड्रलही त्यांनी बांधलं. 

या कथिड्रलपासूनच शहरात अनेक रस्ते फुटतात, चौक पद्धतीने शहर बांधलं आहे. बंदर असल्यामुळे समुद्रमार्गे व्यापार होतो. डायमंड बे हे इथलं एक प्रसिद्ध बंदर. ऍव्हॉन नदी शहराच्या मधोमध वाहते. तिच्यावर अनेक पूल आणि बागा बांधल्या आहेत. हेगली पार्क नावाची एक प्रचंड मोठी बाग शहरात मधोमधच आहे. ही बाग कायम एक बाग म्हणूनच राहील आणि इथे कधीही इमारती अथवा तत्सम बांधकामं केली जाणार नाहीत असं इथल्या शासनाने १८५५ मध्येच वचन दिलेलं आहे. बागेच्या एका बाजूने ऍव्हॉन नदी वाहते, एका बाजूला प्रसिद्ध बोटॅनिकल गार्डन्स आणि ऐतिहासिक कॅन्टरबरी म्युझियम आहेत. १८८७ साली बांधलेल्या या संग्रहालयाला भूकंपामुळे फारशी हानी झाली नाही. हा सगळा परिसर अतिशय रम्य आहे. एक संपूर्ण दिवस इथे निसर्गाच्या सान्निध्यात अगदी आनंदाने व्यतीत होऊ शकतो.



न्यु झीलंडहून अंटार्क्टिक खंडावर अनेक मोहिमा निघतात. अंटार्क्टिक खंडावर कसं राहतात, तिथले थंड बोचरे वारे कसे असतात, तिथलं हवामान कसं असतं याचा अनुभव घ्यायचा असेल, तर इथल्या ’अंटार्क्टिक सेंटर’ला भेट द्यायलाच हवी. इथे अंटार्क्टिकावर होणा-या बर्फवृष्टीचा, तिथल्या प्रचंड बोच-या  वा-याचा अनुभव आपण एका विशिष्ट खोलीत घेऊ शकतो. अंटार्क्टिकावर हस्की नावाची एक विशिष्ट कुत्र्यांची जातच तग धरू शकते. अशा एका ख-या हस्कीचीही भेट इथे होते. इथे आजवर आखलेल्या मोहिमांचा इतिहास जाणून घेता येतो. अंटार्क्टिका म्हणजे नक्की काय आहे यावर एक फिल्मही दाखवतात, खास ४डी पद्धतीची ही फिल्म आहे, त्यामुळे मध्येच अंगावर बर्फ पडतो, तर कधी अंगावर गारेगार पाण्याचे शिंतोडेही उडतात. इथे आपण चक्क पेंग्विनही बघू शकतो. अंटार्क्टिकवर जसं वातावरण आहे तसंच खास इथे जोपासलेलं आहे, त्यामुळे पेंग्विनांनाही आपल्या नैसर्गिक वातावरणाच आहोत असा भास होतो. आणखीही वेगवेगळे शोज आहेत, माहितीपट आहेत, लघुपट आहेत… एकूणात, अंटार्क्टिकाची पुरेपूर झलक या सेंटरमध्ये दिसते.
क्राइस्टचर्च हे आमच्या ट्रिपचं शेवटचं गाव होतं. संपूर्ण ट्रिप आनंदात, कोणताही मोठा मिसहॅप न होता,  ब-यापैकी ठरवली तशीच पार पडली म्हणून सेलिब्रेट करण्याकरता त्या रात्री आम्ही भारतीय रेस्तरांमध्ये जेवलो. तिथे भारतीयांपेक्षा गो-या लोकांची गर्दी जास्त होती हे पाहून भारी वाटलं. तंदूरचे, तडक्याचे, ग्रेव्हीचे मस्त ’देशातले’ वास येत होते, जेवणही छान होतं. 
कितीही हिंडलो, जगाच्या पाठीवर कुठेही गेलो, तरी काही दिवसांनी आपल्या घराची आठवण यायला लागते. स्वच्छता, सौंदर्य, टापटीप, शिस्त यांची कितीही तुलना केली, तरी शेवटी ’गड्या आपुला गाव बरा’ हेच काय ते खरं. तरीही न्यु झीलंडने मनातला एक कोपरा कायमचा व्यापला आहे याचीही कबूली द्यावीच लागेल. अमाप निसर्गसौंदर्य आणि असीम शांतता या हळूहळू लोप पावत चाललेल्या गोष्टी आहेत. नेमक्या याच या देशात आम्हाला सापडल्या म्हणून आम्ही या देशाच्या प्रेमात पडलो आहोत बहुतेक.
कोणतीही ट्रिप म्हटली की काही गंमतीशीर, लक्षवेधक गोष्टी घडतातच. आमच्या ट्रिपच्या काही हटके अनुभवांबद्दल लिहिणार आहे पुढच्या, म्हणजेच या मालिकेच्या शेवटच्या लेखात.
क्रमश:    

(मेनका प्रकाशनाच्या सप्टेंबर, २०१८ च्या ’मेनका’ मासिकात हा लेख पूर्वप्रकाशित झालेला आहे.)  

0 comments: