October 3, 2018

Kia Ora New Zealand - भाग ७

फ्रान्झ जोसेफ ग्लेशिअर आणि ट्रान्स-ऍटलांटिक ट्रेन


फ्रान्झ जोसेफ, फॉक्स ग्लेशिअर आणि आणखी एक ग्लेशिअर मिळून न्यु झीलंडच्या साऊथ आयलंडचा ’ग्लेशिअर रीजन’, अर्थात हिमनदीचा प्रदेश तयार होतो. जुलिअस व्होन हान्स नावाचा एक जर्मन भूगर्भशास्त्रज्ञ होता. १८५८ ते १८६८ या काळात न्यु झीलंडमध्ये तो भरपूर फिरला, अनेक भौगोलिक क्षेत्रांचा त्याने अभ्यास केला. त्यानेच या हिमनदीचा शोध लावला आणि त्याला ऑस्ट्रियाचा सम्राट फ्रान्झ जोसेफ याचं नाव दिलं.
या हिमनदीला अर्थातच एक माओरी नाव आहे आणि त्याच्याशी निगडित अशी एक गोड, रोमॅंटिक माओरी कथादेखील आहे: हिने हुकातेरे नावाची एक स्थानिक मुलगी होती, तिला डोंगरांवर चढाई करायचा नाद होता. एकदा तिचा प्रियकर वावे यालाही आग्रह करून ती चढाईला घेऊन गेली. नेमक्या त्याच दिवशी डोंगरावर मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झालं, वावे त्यात वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झाला. हिनेच्या दु:खाला पारावार राहिला नाही, ती खूप खूप रडली, तिचे अश्रू गोठले आणि ही हिमनदी तयार झाली.
फ्रान्झ जोसेफ जरी हिमनदी असली, तरी त्याची उंची अगदी कमी आहे, समुद्रसपाटीपासून केवळ ३०० मीटर्स. तरीही इथे बर्फवृष्टी होते. त्यामुळे पर्यटकांना कमी उंचीवरही बर्फाचा आनंद घेता येतो. फ्रान्झ जोसेफच्या पायथ्याशी त्याच नावाचं एक टुमदार गाव आहे, तिथे रहायची उत्तम सोय होते. तिथूनच ग्लेशिअरवर जाण्याकरताचे अनेक पर्यायही निवडता येतात. पायथ्यापासून माथ्यापर्यंत चढत जाता येतं, पण त्याकरता ट्रेकिंगची सवय हवी आणि बर्फात चालायचीही. वरून बर्फाच्या नदीचा थर असलेल्या खोल गुहा पहायलाही जाता येतं. पण या गुहांची दारं बर्फवृष्टीमुळे कधीकधी बंद होतात, कधी या गुहांमध्येच बर्फ साचतो… यामुळे इथे फिरण्याकरता बरोबर मार्गदर्शकाची आवश्यकता असतेच. अनेक ठिकाणी ’धोका’च्या पाट्याही आहेत. त्या दिसल्यावर अतिधाडस न दाखवणं हेच श्रेयस्कर!
गावातून थेट हिमनदीच्या मुखापाशी जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे हेलिकॉप्टरची सफर. बहुतांश पर्यटक हाच पर्याय निवडतात. आम्हीही हाच निवडला होता. क्वीन्सटाऊनहून आम्ही बसने फ्रान्झ जोसेफला आलो, पण आम्ही पोचेपर्यंत दुपारचे साडेतीन वाजले. शेवटचं हेलिकॉप्टर संध्याकाळी ५ ला उडतं. आम्ही धावतपळत, अंगावर कपड्यांचे थर चढवून टूर ऑपरेटरच्या ऑफिसमध्ये पोचलो, तर समजलं की शिखरावर बर्फवृष्टी होत आहे, त्यामुळे हेलिकॉप्टरने वर जाता येणार नाही! क्वीन्सटाऊनला पावसामुळे स्काय डायव्हिंग होऊ शकलं नव्हतं, इथे आता बर्फामुळे बेत फिस्कटला! आनंदावर विरजण पडत चाललं होतं. भयंकर निराश झालो. हात चोळत बाहेर पडणार, इतक्यात तिथल्या माणसाने सांगितलं, ’उद्या सकाळी ७ ला आलात, तर कदाचित शिखरावर जाता येईल’. आम्ही अर्थातच होकार दिला.
दुस-या दिवशी पहाटे उठून पाहिलं, तर हवा स्वच्छ होती. जीव ’गारेगार’ झाला. परत एकदा त्या ऑफिसला गेलो. दिवसाची पहिलीच हेलिकॉप्टर सफर आमच्या नावे त्याने लिहिली. सोपस्कार पूर्ण करून हेलिकॉप्टरमध्ये चढलो. हा पहिलाच अनुभव. छोटंसं सहा आसनी हेलिकॉप्टर होतं. आम्हाला घेऊन भर्रकन त्याने आकाशात झेप घेतली. लगेचच हिमनदीचा खडकाळ रस्ता दिसला. पाचच मिनिटात मुखापाशी पोचलो. 

सर्वत्र पांढराशुभ्र घट्ट बर्फ पडला होता. खाली पाहिलं तर नदीचा खडकांनी भरलेला चिंचोळा मार्ग दिसत होता. मान वर करून पाहिलं की डोंगराचं हिमाच्छादित टोक दिसत होतं आणि त्याच्याहीवर होता निळ्याशार आकाशाचा तुकडा. संपूर्ण परिसरात फक्त आम्हीच होतो आणि आमच्याबरोबर होती नीरव शांतता. कालची सगळी निराशा कधीच पळून गेली. शिखराची उंची कमी असल्यामुळे श्वास घ्यायला त्रासही होत नव्हता. आम्ही चाललो की आमच्या पायाचे ठसे उमटत होते, जणू काही तिथे पाय उमटवणारे आम्ही पहिलेच होतो! मजा वाटत होती. थोड्या वेळाने चालकाने खूण केली. परत हेलिकॉप्टरमध्ये बसलो आणि पटकन खालीही आलो.      
काल संध्याकाळची सफर आज केल्यामुळे सकाळी धावपळ झालीच. सामान उचलून आम्ही लगेचच बसमध्ये चढलो, बसप्रवास करून ग्रेमाऊथ या गावी ट्रान्स-अल्पाइन ट्रेन पकडून क्राइस्टचर्च गाठायचं होतं. ग्रेमाऊथच्या आधी होकिटिका हे गाव लागतं, तिथे बस काही वेळ थांबली. होकिटिका इथे एकेकाळी सोन्याच्या खाणी होत्या. इथलं मेंढ्याच्या लोकरीचं विणकामही नावाजलं जातं.  इथे ग्रीनस्टोन नावाचा एक नावाप्रमाणेच हिरव्या रंगाचा दगड आढळतो. ग्रीनस्टोन जडवलेले दागिने बरेच प्रसिद्ध आहेत, त्यामुळे या गावी आवर्जून एक थांबा घेतला जातोच.   
ग्रेमाऊथला एक टुमदार रेल्वे स्टेशन आहे. हे गाव न्यु झीलंडच्या साऊथ आयलंडच्या पश्चिम बाजूला आहे. इथे जी ट्रान्स-अल्पाइन ट्रेन येते ती आपल्याला घेऊन जाते क्राइस्टचर्चला, म्हणजेच साऊथ आयलंडच्या पूर्वेला. हा पूर्व-पश्चिम रस्ता अनेक डोंगर रांगांमधून जातो, अनेक बोगदे, नद्या, द-या, नैसर्गिक आश्चर्य बघत बघत हा सुखद रेल्वेचा प्रवास होतो, म्हणूनच ही ट्रेन जर्नी अगदी आवर्जून करावीच अशी आहे.  


१८७० पासून न्यु झीलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर रेल्वे वाहतूकीकरता रूळ बांधायला सुरूवात झाली. पश्चिम आणि पूर्व बाजूंची त्या-त्या दिशेची ठिकाणं रेल्वेनं हळूहळू जोडली गेली. पण पूर्व-पश्चिम बाजू जोडणं अवघड होतं. पश्चिमेकडून पूर्वेला निघालं की जो सर्वात सोयिस्कर रस्ता होता त्याच्या वाटेतच वैमाकारिरी नदी आणि तिची प्रचंड मोठी गॉर्ज (दरी) सुरू होत होती. इथल्या डोंगरांमधून बोगदे खोदण्याचं काम अतिशय अवघड होतं. शब्दश: डोंगर फोडून, अनेक धोके पत्करून, घोडे आणि मजूर लावून काम पूर्ण करावं लागलं. या जागा अशा आहेत, की तिथे यंत्र नेताच येत नव्हती, त्यामुळे बहुतांश काम मजूरांनी हातांनी केलेलं आहे. अभियांत्रिकी विद्येची कमाल म्हणून आजही या बोगद्यांकडे पाहिलं जातं. एके ठिकाणी नदीवरच अत्यंत अवघड असा ७५ मीटर व्हियाडक्ट बांधला गेला. या मार्गावरचा सर्वात मोठा बोगदा म्हणजे ’ओटिरा टनेल’. हा बोगदा साडेआठ किलोमीटर लांबीचा आहे. तो पश्चिमेकडे ’आर्थर्स पास’ला जोडला गेला आणि अखेर १९२३ मध्ये पूर्व-पश्चिम रेल्वे मार्ग खुला झाला.   
सध्या ही रेल्वे ’द ग्रेट जर्नीज ऑफ न्यु झीलंड’ या कंपनीतर्फे चालवली जाते. न्यु झीलंडमधली ही अतिशय लोकप्रिय रेल्वे आहे. या रेल्वेच्या सर्व डब्यांना मोठमोठ्या काचेच्या खिडक्या आहेत. पाच तासांच्या या प्रवासात नदीची आणि डोंगरांची अप्रतिम दृश्य दिसतात. कधी आपण अगदी जमिनीलगत एखाद्या तळ्याशेजारून किंवा शेतांच्या जवळून जातो, तर कधी एखादा अवघड डोंगर बोगद्यातून सर करतो. मग डोंगरावरून दिसते अद्भुत निळ्या रंगाची नदी, तिची सुरेख वळणं आणि डोंगरांचे विविध आकार… अनिमिष डोळ्यांनी हरेक नजारा फक्त डोळ्यात साठवावा.
रेल्वेची रचना साधारण आपल्या ’चेअर-कार’सारखी आहे. प्रत्येक प्रवाशाला हेडफोन दिलेला असतो आणि बाहेर एखादं महत्त्वाचं ठिकाण आलं, की त्याबद्दलची माहिती त्याच क्षणी हेडफोनमधून कानावर पडते. काही ठिकाणी फलक लावलेले आहेत, काही ठिकाणी त्या काळचे कृष्णधवल फोटो आहेत… ते नीट पाहता यावेत, म्हणून अशा काही जागी रेल्वेचा वेगही जरासा मंद होतो. रेल्वेमध्ये खानपानाची सोय आहे, एक डबा नुसताच खुर्च्यां-काचांविना रिकामा आहे, त्यात उभं राहून बाहेरचे फोटो काढा, व्हिडिओ कैद करा किंवा नुसतेच उभे रहा. इतक्या कष्टांनी बांधलेल्या या रेल्वेमार्गाचा प्रवाशांनी पुरेपूर आनंद घ्यावा याकरता हरप्रकारच्या सुविधा प्रवाशांकरता केलेल्या आहेत.
रेल्वेत आमच्या शेजारीच एक कुटुंब बसलं होतं, गाडी सुरू झाल्याबरोबर त्यांनी पत्ते काढून खेळायला सुरूवात केली. भरपूर गोरे ज्येष्ठ नागरिक होते जे चिकार फोटो काढत होते, खात होते आणि आणि गप्पाही मारत होते. ’फॅमिली’वालेही होते. सर्व जण बोलत होते, बाहेरची दृश्य एकमेकांना दाखवत होते, मुलं इकडून-तिकडे पळत होती… आपण ’डेक्कन क्वी”मध्येच बसलो आहोत की काय इतकं आपल्यासारखं वाटत होतं सगळं. बाहेरची सुंदर दृश्य आणि रेल्वेतलं उत्साही वातावरण अनुभवतच आम्ही क्राइस्टचर्चला उतरलो.
आजचा दिवस विलक्षण होता. दिवसाची सुरूवात झाली होती एका हिमनदीच्या टोकावर उभं राहून, आणि संध्याकाळ होते, तोवर एक देश पश्चिम-पूर्व असा आम्ही ओलांडला होता. आता आम्ही पोचलो होतो आमच्या ट्रिपच्या शेवटच्या टप्प्यावर- क्राइस्टचर्चला.      

क्रमश:
(हा लेख मेनका, ऑगस्ट, २०१८ च्या अंकात प्रकाशित झालेला आहे.)

0 comments: