July 2, 2018

Kia Ora New Zealand- भाग ४



प्रवासातलं खाणं: काय, कुठे, कसं?

कोणत्याही प्रवासाला निघताना प्रत्येक प्रवाशाला दोन प्रमुख चिंता असतात- पहिली म्हणजे, ठरवल्याप्रमाणे स्थलदर्शन होईल ना? आणि दुसरी म्हणजे- तिथे खायची-प्यायची आबाळ तर होणार नाही ना? आपण स्वतंत्रपणे, आपले आपणच प्रवासाला जाणार असू, तेही परदेश प्रवासाला, तर प्रवास संपूर्ण पार पाडेपर्यंत ह्या दोन्हींची टांगती तलवार सतत आपल्या डोक्यावर असते- जास्त करून खाण्याची. प्रवास म्हणजे चैन; प्लॅन करून, विचार करून करण्याची गोष्ट. मग त्यात खाण्या-पिण्याची नीट सोय व्हायलाच हवी, नाही का? भारतात आपण कुठेही गेलो, तरी दोन वेळेला व्यवस्थित काही ना काहीतरी खायला मिळेलच याची खातरी आपल्याला असते, कारण आपला देश आपल्या ओळखीचा असतो. परदेशात सगळंच नवीन. त्यामुळे अनिश्चितता असते. पण नमनाला घडाभर तेल ओतून झाल्यानंतर आता सांगते, की न्यु झीलंडमध्ये फिरताना खाण्या-पिण्याची चिंता बाळगायचं मुळीच कारण नाही!
’सकाळची न्याहारी राजासारखी, दुपारचं जेवण सामान्य माणसासारखं आणि रात्रीचं जेवण भिका-यासारखं करावं’ असा एक सुविचार आपण अनेकदा ऐकलेला असतो. एरवी आपल्याला हा सुविचार पाळायला जमला नाही, तरी प्रवासामध्ये मात्र हा सुविचार आम्ही १००% राबवतोच. आम्ही आमच्या एजंटला सांगून मुद्दाम अशी हॉटेलं निवडली, जिथे ब्रेकफास्टची सोय आहे. न्यु झीलंड हा प्रवासी-स्नेही देश असल्यामुळे बहुतांश वेळा सर्व चांगल्या प्रवासी हॉटेलांमध्ये ब्रेकफास्टची सोय होतीच. हॉटेलच्या भाड्यात ब्रेकफास्टचे पैसे घेतलेलेच होते. हे अत्यंत सोयीचं असतं आणि श्रेयस्करही. भाड्यात नाश्त्याचे पैसे इन्क्ल्युड केलेले नाहीत, पण ब्रेकफास्टची सोय आहे- अशी हॉटेलंही चालतात. महत्त्वाचं काय, की नाश्त्याची सोय हवी! राजासारखी न्याहारी करण्याचे फायदे असे, की सकाळी सकाळी रेस्तरां शोधत फिरावं लागत नाही; सहसा ब्रेकफास्ट कॉंटिनेंटल असल्यामुळे फळं, दूध, ज्युसपासून अनेक पदार्थांची व्हरायटी आपल्याला भरपेट खायला मिळते आणि त्या नंतर स्थलदर्शनाच्या तीन-चार तासात पोटाची चिंता रहात नाही. दोन-तीन वेळा आम्ही भल्या सकाळी ७ वाजता वगैरे बाहेर पडणार होतो. इतक्या सकाळी नाश्ता करण्याइतकी भूक तर नसते. अशा वेळी आम्ही आदल्या रात्री ’पॅक्ड ब्रेकफास्ट’ची सोय होईल का असं विचारलं होतं. ही फार मस्त सोय होती. एक सॅन्डविच (व्हेज अथवा नॉन-व्हेज), एक फळ, एक योगर्ट, एखादा ज्युस, एखादं बेगल अशी भरगच्च पिशवी हसतमुखाने सकाळी सकाळी आमच्या हातात पडली. मग आमच्या सोयीने, आमच्या वेळेनुसार आम्ही वाटेत नाश्ता केला. एकदा एका हॉटेलच्या ब्रेकफास्ट स्प्रेडमध्ये चक्क ’पोहे’ होते. आधी विश्वासच बसला नाही- हे नक्की पोहेच आहेत? आम्ही एकमेकांकडे साशंक नजरेने पाहत असताना, ’हो, ते आपले बटाटे पोहेच आहेत’ असं मराठीतून सांगायला एक छानसा विशीतला, चक्क डोंबिवलीकर मुलगाच हजर झाला! तो तिथे हॉटेल मॅनेजमेन्ट शिकत होता. सध्या त्याची ’किचन’मध्ये काम करायची पाळी होती. पोह्यांचं रहस्य असं होतं, की त्या दिवशी पहाटे चाळीस मुंबईकरांचा चमू तिथून नाश्ता करून गेला होता. खास त्यांच्याकरता केलेले ते पोहे होते! त्यावर आमचंही नाव होतं तर! ’दाने दाने पे लिखा है खानेवाले का नाम’ असं म्हणत ब्रेड रोल बाजूला ठेवून आम्ही आनंदाने दाणे घातलेल्या पोह्यांवर ताव मारला हे सांगणे न लगे!
न्यु झीलंडमधलं स्थलदर्शन आम्ही बसने केलं. त्या त्या शहर किंवा गावाच्या सिटी सेंटरहून जवळपासची पर्यटनस्थळं दाखवायला एक दिवसीय सहलींच्या बसेस निघतात. साधारणपणे सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान या बसेस निघतात. दुपारी १२ च्या सुमारास ’लंच स्टॉप’ असतो. हा लंच स्टॉप कधी एखाद्या कॅफेतच असतो, जिथे अनेक पदार्थांची व्हरायटी आपल्याला मिळते; कधी गावातल्या एखाद्या चौकात सोडतात आणि जेवायला वेळ देतात. न्यु झीलंड ही युरोपियन कॉलनी असल्यामुळे या चौकात ’मॅक्डोनाल्ड्स’, ’पिझा हट’, ’सबवे’ यासारखी ओळखीची अनेक क्षुधाशांतीगृह असतात. काही स्थानिक रेस्तरां आणि कॅफेजही असतात. बर्गर, पिझा, सॅन्डविच, ’क्विश’ हा तिखट केकसारखा प्रकार असे इथे खायला मिळतात. आवर्जून नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे यापैकी प्रत्येक रेस्तरांमध्ये किमान एक तरी शुद्ध शाकाहारी पदार्थ असतो. त्यामुळे शाकाहारी लोकांची मुळीच गैरसोय होत नाही. चिकन आणि रेड मीटच्या पदार्थांची तर रेलचेल असते. डेझर्टकरता अनेक चवींचे भलेमोठे मफिन्स आपली वाटच पहात असतात. त्यामुळे जेवणाचा शेवट गोड होतो. तिथेच व्यवस्थित बसून जेवता येतील अशी रेस्तरांही असतात. एशियन कुझिन, इंग्लिश पद्धतीचं जेवण देणारी आणि भारतीय रेस्तरांही ठिकठिकाणी दिसतात. भारतीय म्हणजे, पंजाबी हॉटेलं! पण जीरा राईस, दाल फ्राय, पनीर माखनी हवी असेल, तर तो पर्याय अगदी सहज उपलब्ध आहे.
आम्ही जिथे जिथे राहिलो, तिथे नाश्त्याची सोय होती. आम्ही कॉंटिनेंटल न्याहारी करून निघायचो, दुपारी वर लिहिलं तसं क्विच लंच आम्ही करायचो. रात्री मुक्कामाला परत आपल्या हॉटेलात आलं, की देखील अनेक पर्याय उपलब्ध होते. अनेक हॉटेल्सच्या खोल्यांमध्ये मायक्रोवेव्हची सोय होती, अनेकदा चक्क गॅस टॉपचीही सोय होती. मी भारतातूनच मॅगी, सूप्स, रेडी टु इट उपमा, खिचडी अशी काही पाकिटं नेली होती. (विमानतळावर प्रवेश करताना ही रीतसर डिक्लेअरही केली होती.) कधी आम्ही रात्री अशा पद्धतीचं जेवलो. कधी भारतीय रेस्तरांमध्ये गेलो. आमच्या सगळ्याच हॉटेल्सच्या जवळ किमान एक तरी सुपरमार्केट होतं. कधी आम्ही तिथून कच्चा माल आणून हॉटेलच्या खोलीत वन-डिश-मील्स रांधून खाल्ले. इथे एक पर्सनल टिप देते- हॉटेलमध्ये स्वयंपाक करायचा प्लॅन असेल, तर इथूनच थोडं मीठ आठवणीने न्या. मी ते न्यायला विसरले, त्यामुळे मला एकदम ४०० ग्रॅम मिठाचा डबा विकत घ्यावा लागला! तिथे मारवाडी नसल्यामुळे, ’दे की एक डॉलरचं मीठ’ असं मला सांगता आलं नाही आणि उगाचच मिठाचं वजन बाळगावं लागलं. न्यु झीलंडमध्ये प्रदूषणविरहित हवा असल्यामुळे दिवसभर फिरलं, तरी दमायला होत नाही. शिवाय त्या लोकांचा दिवस लवकर सुरू होऊन लवकर संपतो. दिवसभराच्या सहली संध्याकाळी सहाला संपतातही. त्यामुळे हॉटेलच्या जवळपास हिंडायला, चक्कर मारायला, स्वयंपाक करायला भरपूर वेळ मिळतो. रोज तेच तेच जेवण्यापेक्षा ही रोजची व्हरायटी पोटालाही मानवते.
खायची कोणतीही आबाळ होत नसली, तरी ’प्यायची’ मात्र होते! म्हणजे- चहा-कॉफीची! इथे चहा म्हणजे टंपरभर गर्रम पाण्यात एक टी बॅग आणि त्यात चक्क फ्रीजमधलं गारढोण दूध घालतात! साखर वरून! चहाला काही ’चहापण’च नसतं! कॉफी अशीच, शिवाय प्रचंड कडू. यावर उपाय म्हणजे दूधविरहित- अर्थात ब्लॅक टी पीणे. तो जरा तरी सुसह्य असतो. पण पाणी-दूध-चहापत्ती-साखर याचा जो ’अमृततुल्य’ उकाळा असतो तो कुठेही मिळत नाही, अगदी भारतीय रेस्तरांमध्येही! त्याची थोडीफार भरपाई करतं हॉट चॉकलेट! हे मात्र गरमागरम असतं आणि गोडही. तिथल्या गार हवेत प्यायला ते छानही वाटतं.
न्यु झीलंड अनेक प्रकारच्या माशांकरता नावाजलेलं आहे. स्क्विड, ट्राऊट, माशांची अंडी या आणि अशा अनेक प्रकारांवर लोक ताव मारतात. ’फिश ऍन्ड चिप्स’ हा इथला लाडका पदार्थ. पण आम्हाला काही तो फारसा आवडला नाही. मला वाटतं त्याची चव डेव्हलप व्हायला हवी. इथले दुधाचे पदार्थही सरस असतात. समस्त न्यु झीलंडकर ज्याचं सतत कौतुक करत असतात ते ’होकीपोकी आईसक्रीम’ आणि इतर कोणतंही आईसक्रीम कितीही थंडी असली तरी खावंच. तसंच, सर्व प्रकारची चॉलकेट्सही अगदी मुद्दाम खावीत अशी असतात.
रोज उठून ’काय खाऊ?’, ’कुठे खाऊ?’, ’केव्हा खाऊ?’, ’कुठे खाऊ?’ या प्रश्नांना तोंड द्यायला आपल्याला मुळीच आवडत नाही. आपली सगळी धडपड दोन वेळेला पुरेसं, सकस अन्न खायला मिळावं यासाठीच तर चाललेली असते, नाही का? त्यामुळे प्रवासात तरी हा प्रश्न नको अशी आपली इच्छा असते. न्यु झीलंडमध्ये फिरताना हा पोटाचा प्रश्न एकदाही छळत नाही. भरल्या पोटाने आणि त्यामुळेच भरल्या मनाने आपण न्यु झीलंडचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो.
क्रमश:

(हा लेख ’मेनका’च्या मे, २०१८ अंकात प्रकाशित झालेला आहे)

4 comments:

Mayuresh said...

Chan lihilays Poonam khas Poonam stylemdadhye. Mazyahi Travel wishlistmadhye Newzelandchi safar ahech. Lets see to yog kadhi julun yetoy.. :)

poonam said...

Lavkarat lavakar to yog juLun yewo. Tevha kahi madat lagli tar nakki vichara, amhi anandane karu :)

मिलिंद कोलटकर said...

मजा येतेय! आपण केलेल्या स्वयंपाकाचे फोटू टाकले असतेत तर अजून मजा आली असती! पोहे आणि अमृततुल्य! व्वा!! बाहेर आपण सगळ्यात जास्त यालाच मिस्स करतो. :-) कुठे सा०खि० नाही मिळाली? :]

poonam said...

Milind ji, saa khi shodhali nahi mhanun nahi milali :)