August 3, 2018

Kia Ora New Zealand- भाग ५


नैसर्गिक चमत्कारांचा प्रदेश- रोटोरुआ



“या नंतर कुठे जाताय?” पहियाहून निघताना आमच्या टॅक्सी ड्रायव्हरने आम्हाला विचारलं.
“रोटोरुआ.”
हे ऐकल्याबरोबर त्याने स्वत:चं नाक धरलं आणि म्हणाला, “इट स्मेल्स लाईक रॉटन एग्ज!”
रोटोरुआ हे न्यु झीलंडच्या नॉर्थ आयलंडमधलं एक महत्त्वाचं गाव. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर तयार झालेल्या जमिनीवर रोटोरुआ वसलेलं आहे. रोटोरुआची वैशिष्ट्य म्हणजे उकळणा-या मातीची डबकी, जमिनीखालून हवेत उंच उसळणारी गरम पाण्याची कारंजी आणि गरम पाण्याचे झरे. रोटोरुआ आणि त्याच्या आसपास अनेक मोठी तळी आहेत. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेल्या या तळ्यांच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात गंधक (सल्फर) आहे. गंधकामुळे या पाण्याला एक उग्र वास येतो- सडक्या अंड्यांसारखा! तळ्याभोवतीच्या आसमंतात हा वास पसरलेला असतो. त्याचा खूप त्रास होत नाही, पण त्याचं अस्तित्व सतत जाणवत राहतं.
रोटोरुआत शिरतानाच त्याचा आखीवरेखीवपणा नजरेत भरतो. ’ब्लॉक’ पद्धतीने बांधलेले रस्ते आणि चहू बाजूंनी हिरवळ, फुलं, बागा आणि अर्थातच मोठमोठी हॉटेलं! इथले जे ’स्पा’ आहेत त्यांचा लाभ घेण्याकरता इथे जगभरातल्या पर्यटकांची भरपूर गर्दी असते. या स्पांचं मुख्य आकर्षण म्हणजे शरीरावर इथल्या मातीचं लेपन आणि गरम पाण्याने स्नान. इथल्या काही ठिकाणी जमिनीचा पृष्ठभाग अतिशय नाजूक आहे. अनेक ठिकाणी जमिन खचून खड्डे तयार झाले आहेत. त्या खड्ड्यातल्या मातीत गंधक आणि पृथ्वीच्या पोटातली नैसर्गिक खनिजं मिसळून ’मड पूल्स’ निर्माण झाले आहेत. ही मातीची डबकी पृथ्वीच्या पोटातल्या उष्णतेमुळे सतत उकळत असतात. या मातीत अनेक औषधी गुण असतात असं म्हटलं जातं. या मातीचे लेप शरीराला लावले, तर सांधेदुखी, गुडघेदुखी, त्वचेचे रोग बरे होतात असं म्हणतात. त्यामुळे या स्पांमध्ये पर्यटकांचा सतत ओघ असतो. नैसर्गिक गरम पाण्यांच्या झ-यांचा वापर करून अनेक हॉटेल्समध्ये ’सॉना बाथ’ची सेवाही उपलब्ध आहे.
’तेही पुइआ’ (Te Puia) या भागात ’व्हाकारेवारेवा’ नावाच्या एका जागी ’पोहुटू’ नावाचं एक गरम पाण्याचं कारंजं आहे. हे पृथ्वीच्या पोटातून थेट ३० मीटर झेप घेतं. साधारण दर अर्ध्या तासाने हे कारंजं उडतं. त्यामुळे या परिसरात सतत वाफ येताना दिसते. इथेच माओरींनी शोध लावलेले ’कूकर’ही मुद्दाम पहायला ठेवले आहेत. उकळत्या मातीच्या खड्ड्यात सीलबंद केलेल्या भांड्यात बटाटे, मांस, भात ठेवून द्यायचे. नैसर्गिक उष्णतेमुळे हे पदार्थ आपोआप शिजतात. 

माओरी संस्कृतीत लाकडापासून विविध वस्तू कशा केल्या जात असत हे उलगडून दाखवणारी न्यु झीलंड आर्ट्स ऍन्ड क्राफ्ट इन्स्टिट्युट याच परिसरात आहे. अनेक तरुण इथे लाकूडकामाचं प्रशिक्षण घेतात आणि माओरी कलाकुसर असलेले मुखवटे, बाहुल्या, हत्यारं विकण्याचा व्यवसाय करतात.
इथे जवळच, ’ऍग्रोडोम’ इथे एक ’शीप शो’, म्हणजेच मेंढ्यांचा शो होतो. इथे मेंढ्यांची पैदास केली जाते, त्यांची लोकर काढून अनेक उपयोग केले जातात. वेगवेगळ्या जातीच्या आणि आकाराच्या मेंढ्यांना केंद्रस्थानी ठेवून हे सगळं अतिशय हसतखेळत सांगणारा शो आवडेल असा आहे. त्यानंतर अर्थातच पर्यटकांना ’गिफ्ट शॉप’मध्ये सोडलं जातं, जिथे बहुतेक लोक मनापासून खरेदी करतात हे सांगणे नलगे! याशिवाय, रेनबो स्प्रिंग्ज या नेचर पार्कमध्ये ’रेनबो ट्राऊट’ हा मासा आणि ’किवी’ पक्षी पहायला मिळतो. संध्याकाळी अनेक ठिकाणी माओरी संस्कृती दाखवणारे कार्यक्रम असतात. माओरी संस्कृतीची ओळख, त्यांची भाषा, त्यांच्या चालीरीती, नाच असं सगळं माओरी वेशभूषा केलेले तरुण सादर करतात. खास माओरी पद्धतीचं जेवणही असतं. एखादी संध्याकाळ रिकामी असेल तर या माओरी कार्यक्रमाला जरूर उपस्थित रहावं.   
वायटामो ग्लोवर्म केव्ह्ज
ऑकलंड-रोटोरुआ या वाटेवर रोटोरुआच्या अलीकडे या ग्लोवर्मच्या गुहा आहेत. ग्लोवर्म, अर्थात अंधारात ’ग्लो’ म्हणजेच चमकणारा एखाद्या डासाच्या आकाराचा किडा फक्त न्यु झीलंडमध्ये सापडतो. वायटामो केव्ह्ज या चुनखडीच्या गुहा आहेत. कित्येक लाख वर्षांपूर्वी, न्यु झीलंडचा भूभाग समुद्रातच बुडालेला होता तेव्हापासून त्या तयार होत होत्या. गोंडवन शिफ्टमुळे जेव्हा न्यु झीलंड पृथ्वीच्या पृष्ठभागावर आला, तेव्हा या गुहांमध्ये समुद्राचं पाणी शिरून अनेक चिरा, फटी तयार झाल्या. पाण्यामुळे चुनखडीचे वेगवेगळ्या आकाराचे थर तयार झाले आणि जन्माला आली काही सुंदर शिल्प (stalactites and stalagmites). वायटामो केव्ह्जमधली शिल्पदेखील अप्रतिम आहेत. आमच्या वाटाड्याने सांगितलं, की एक सेंटीमीटर चुनखडीचा थर तयार व्हायला काही लाख वर्ष लागतात. इथे जमिनीच्या पोटात असे कित्येक थर तयार झाले होते, त्यांच्या नैसर्गिक रचना पाहताना डोळ्यांचं पारणं फिटलं. ते डोळ्यात साठवत असतानाच आमच्या वाटाड्याने आम्हाला एका खोल गुहेत नेलं. चर्चेसमध्ये असते, तशी उतरत्या झुंबरांसारखी रचना या जागी झाली आहे, म्हणून या गुहेचं नाव आहे ’कथीड्रल’. आमच्या वाटाड्याने इथे थांबून एकेका शिल्पाचं वैशिष्ट्य, त्याचा कोन, त्याचा आकार समजावून सांगितला. माना वर करकरून आम्हीही ते सौंदर्य डोळ्यात साठवलं. इथे एक गंमतीशीर प्रथा आहे. प्रत्येक गट इथे एकेक गाणं म्हणतो. गुहेला खोली असल्यामुळे इथे आवाज छान घुमतो. शिवाय, चर्चेसमध्ये ’कॅरोल्स’ गायची पद्धतही आहेच. आमच्या आधीचा सगळा गट कोरियन होता, त्यांनी तिथे कोरियन राष्ट्रगीत गायलं. आमच्या गटात अनेक देशांतले लोक होते, त्यामुळे सगळ्यांना येईल असं कोणतं गाणं गायचं हे आठवत असताना कोणीतरी म्हणालं, ’’हॅपी बर्थडे’ सॉन्ग म्हणूया’. आमचा वाटाड्याही खिलाडूपणाने म्हणाला,’चालेल, आज माझाच वाढदिवस आहे असं समजूया’. मग आम्हीही त्याचं नाव घालून, मोठ्या आवाजात ’हॅपी बर्थडे’ सॉन्ग गायलं आणि टाळ्याही वाजवल्या. खूपच मजेशीर अनुभव होता तो.
यानंतर वाटाड्याने आम्हाला ते ’ग्लोवर्म्स’ जवळून दाखवले. दमट, अंधा-या जागी या किड्यांची पैदास होते. वायटोमो केव्ह्ज हे या ग्लोवर्म्सकरता अगदी आदर्श स्थान. हे किडे एखाद्या दिव्यासारखा स्थिर प्रकाश देतात. गुहेतले इतर किडे याच प्रकाशाकडे आकर्षित होतात. ग्लोवर्म्सना या दिव्याखाली वडाच्या पारंब्यांसारख्या tentacles असतात ज्या अंधारात दिसत नाहीत. किडे जेव्हा ग्लोवर्मकडे झेपावतात, तेव्हा ते या पारंब्यांमध्ये अडकतात आणि ग्लोवर्म्सचं भक्ष्य होतात. वायटामो केव्ह्जमधले ग्लोवर्म्स बघण्याकरता होडीने जावं लागतं. (ग्लोवर्म्सच्या अंगावर प्रकाश पडला, तर ते बुजतात आणि विझतात. परत प्रकाशमान व्हायला बराच वेळ जातो. त्या दरम्यान अन्न न मिळाल्यामुळे त्यांचा अंतही होऊ शकतो. त्यामुळे ग्लोवर्म्स बघताना फोटो काढायला मनाई आहे.)
होडी जिथे होती, तिथे अगदी अंधुक प्रकाश होता. वाटाड्याने आधीच सूचना दिल्याप्रमाणे सर्वांचे मोबाईल आणि कॅमेरे बंद होते, एकमेकांशीही कोणी बोलत नव्हतं. नि:शब्दपणे एकेक करून आम्ही होडीत बसलो. दोराच्या सहाय्याने वाटाड्याने होडी पुढे न्यायला सुरूवात केली. आता नजरेसमोर मिट्ट काळोख होता. डोळ्यात बोट घातलं तरी समजणार नाही इतका काळोख. शेजारी, मागे सगळीकडे माणसं होती, पण पाण्याच्या ’चुबुक चुबुक’ आवाजाखेरीज एकही आवाज नव्हता. संपूर्ण शांतता आणि काळाभोर अंधार यांची शहरी माणसाला आता सवय कुठे आहे? एक क्षण मुळापासून भीती वाटली... आणि पुढच्याच क्षणी डोळ्यासमोर चमकले ते अद्भुत ग्लोवर्म्स… एक नाही, दहा नाही, तर शेकडो, हजारो… आता चहूबाजूला, जिथे पाहू तिथे एक सुंदर प्रकाशाचा ठिपका होता. काही ठिपके अगदी गच्च, एकाशेजारी एक होते, काही एकएकटे होते, काही जवळ होते, काही लांब होते, पण जिथवर नजर जाईल तिथे मनाला आश्वस्त करणारे ते निसर्गाचे दिवे उजळलेले होते. होडी हळूहळू पुढे जात होती, आणि प्रत्येक वळणावर सुंदर प्रकाशाचे ठिपके आमचं स्वागत करत होते. एखाद्या परीकथेत वर्णन केलेलं असतं, तसाच होता तो प्रवास. अविश्वसनीय, अकल्पित, स्वप्नवत, शब्दांच्या पलीकडला.         
होडीतला प्रवास संपला, आम्ही परत उजेडात आलो. हळूहळू उतरलो, बाहेर आलो, पुढच्या प्रवासाला लागलो. बराच वेळ कोणीच कोणाशी काहीही बोललं नाही. ’किती वेगळा अनुभव होता हा’ हेही नाही. काही क्षण फक्त अनुभवण्याचे असतात. त्यांचं वर्णन करायला जावं, तर असं लक्षात येतं की इथे शब्दांची सद्दी संपली आहे. ग्लोवर्म्स पाहून थेट हृदयातच लक्ष लक्ष दिवे उजळले होते. त्या नंतर बोलण्यासारखं उरलंच काय होतं? 
क्रमश: 

(मेनका प्रकाशनच्या ’मेनका’ या मासिकाच्या जून २०१८ च्या अंकात हा भाग प्रकाशित झालेला आहे)
 


0 comments: