बे ऑफ आयलंड्ज
न्यु झीलंडचे ढोबळमानाने
दोन भाग होतात- नॉर्थ आयलंड आणि साऊथ आयलंड. या नॉर्थ आयलंडचं सर्वात उत्तरेचं टोक म्हणजे बे ऑफ आयलंड्ज. ’पहिया’
हे इथलं मोठं गाव. पहियापासून जवळ एक ऐतिहासिक महत्त्वाचं ठिकाण आहे- ’वैतांगी ट्रीटी
ग्राउन्ड्ज’. या ठिकाणी मूलनिवासी माओरी आणि इंग्रज यांच्यामध्ये तह झाला होता. या
तहाचीही एक कथाच आहे. न्यु झीलंडच्या भूमीवर चौदाव्या शतकापासून माओरी नावाचे मूलनिवासी
इथल्या छोट्या छोट्या बेटांवर टोळ्या करून रहात होते. त्यांच्यात सतत टोळीयुद्धही सुरू
असत. हे माओरी ’कनू’, म्हणजे लाकडी होड्या करण्यात निष्णात होते आणि शिकारीतही. पण,
त्या व्यतिरिक्त समाज म्हणून ते अप्रगत होते.
सतराव्या शतकापासून
ऑस्ट्रेलियाहून समुद्रात मुशाफिरी करताना डच, फ्रेंच आणि इंग्रज यांना न्यु झीलंडची
भूमी सापडली आणि तिचा मोह पडला. इथली समृद्ध आणि कोणाचीच सत्ता नसलेली भूमी सर्वांनाच
हवीहवीशी वाटायला लागली. इंग्रजांना राणीच्या नावाने वसाहती कशा निर्माण करायच्या आणि
मूलवासियांकडून भूमी कशी गिळंकृत करायची याचा सर्वाधिक अनुभव होता. त्यांनी एका बाजूने
माओरींना फ्रेंचांविरुद्ध युद्ध जिंकून दिली, तर दुस-या बाजूने त्यांच्या मिशन-यांनी
शांततेसाठी स्वत:ची गरज पटवून दिली. अखेरीस १८४० मध्ये इंग्रजांनी माओरींबरोबर एक तह
केला. या तहावर जिथे सह्या केल्या ती जागा म्हणजे वैतांगी ट्रीटी ग्राउंड्ज. या तहांतर्गत
इंग्रजांना माओरींची जमिन आपल्या नावे करण्याची, त्यावर वसाहती निर्माण करायची परवानगी
दिली गेली होती. या तहाची कलमं आणि त्याचे परिणाम माओरींना समजायला जरा वेळ लागला.
आपली जमिन बळकावली जाते आहे हे जेव्हा माओरींच्या लक्षात आले, तेव्हा इंग्रजांबद्दल
त्यांचा भ्रमनिरास झाला आणि परत एकदा लढाया सुरू झाल्या. इंग्रजांनी आपल्या अनुभवाच्या
बळावर, कधी रक्त सांडून, तर कधी पैसे देऊन या लढाया थोपवल्या. अखेरीस हळूहळू, न्यु
झीलंड ही इंग्रजांची वसाहत झाली.
एका माओरी गाईडने
तो परिसर हिंडता हिंडता हा इतिहास आम्हाला सांगितला. हा परिसर अतिशय सुंदर आहे. समोरच
निळाशार समुद्र, मोकळ्या मैदानावरची अल्हाददायक हवा, फर्न आणि इतर झाडांची हिरवाई-
इंग्रजांना या जागेचा मोह का पडला असेल याचं प्रत्यक्ष उत्तरच मिळत होतं! आज न्यु झीलंडमध्ये युरोपियन/ ब्रिटिश वंशाची लोकसंख्या
सर्वाधिक आहे, त्यानंतर नंबर लागतो तो माओरींचा. सर्व माओरी आधुनिक आहेत, न्यु झीलंडच्या
मुख्य प्रवाहात मिसळले आहेत. इंग्रजांमुळे न्यु झीलंडची प्रगती झाली यात वादच नाही.
पण आपल्या पूर्वजांच्या अज्ञानाचा कसा गैरफायदा घेतला गेला हे सांगताना त्या गाईडच्या
मनाला यातना होत असतील का, असा प्रश्न मला उगाचच पडला.
होल इन द रॉक
अठराव्या शतकात कॅप्टन
रॉस हा एक साहसी इंग्रज न्यु झीलंडच्या आसपास बोटीने भरपूर फिरला. अनेक छोट्या बेटांचा
त्याने शोध लावला. त्याच्या सन्मानार्थ, इथल्या एका बेटाचं नावच ’रॉस आयलंड’ आहे. पहियाहून या रॉस आयलंडला बोटीने जाता येतं. त्याच
बोटीने समुद्रात पुढे गेल्यावर ’होल इन द रॉक’ नावाचा एक जबरदस्त नैसर्गिक चमत्कार
दिसतो.
समुद्रात उभे असलेले
छोटे डोंगर आणि खडक अनेक शतकं समुद्री वा-यांना तोंड देत असतात. लाटा आणि वारा यांमुळे
या डोंगरांची झीज होते आणि ते समुद्रात कोसळतात. वा-यामुळे असंच एक भलंमोठं ’भोक’ या
समुद्रातल्या एका डोंगराला नैसर्गिकपणे पडलेलं आहे. त्याला ’भोक’ असं म्हणत असले, तरी
ते तब्बल ६० फूटांचं आहे! इथे बोटीनं जाणं हा फारच मस्त अनुभव होता. त्या वेळी भन्नाट
गार वारं सुटलं होतं. ’होल’ लांबूनही दिसत होतं, पण वा-यामुळे डेकवर बसणंच काय, उभं
राहणंही मुश्किल होतं. आमच्या बोटीच्या चालक बाईने वाटेत जाताना आम्हाला खूप डॉल्फिन्सही
दाखवले. आपापली नाकं वर काढून, इकडून तिकडे सुळ्ळकन जाऊन, माफक उड्या मारून आम्हाला
अनेक डॉल्फिन्सनी सुखद दर्शन दिलं. आणि मग ख-या अर्थाने दिसलं ते ’होल इन द रॉक’.
खूपच
जवळ होतो आम्ही त्याच्या. निसर्गाचा चमत्कार पाहताना क्षणभर आम्ही स्तब्ध झालो. हे
’होल’ ब-यापैकी मोठं असल्यामुळे बोट त्याच्यातून आरपार जाऊ शकते. ’होल’मधून जात असताना
तुमच्या डोक्यावर जर वरच्या खडकातून पाणी पडलं तर तुम्ही खरे भाग्यवान असंही समजलं
जातं. पण आम्ही तिथे पोचलो, तेव्हा नेमकी भरती होती. त्यामुळे चालक बाईने कोणताही धोका
न पत्करता होलमधून बोट न नेण्याचा निर्णय घेतला. आम्हाला आमचं भाग्य आजमावता आलं नाही.
अर्थात, न्यु झीलंडसारख्या सुंदर देशात फिरत होतो, म्हणजे आम्ही भाग्यवान होतोच. तरी
आपल्या भाग्याचा खुंटा सतत हलवून खातरी करायची स्वाभाविक इच्छा आपल्याला असतेच ना!
पण ते काही होऊ शकलं नाही. अखेरीस, हळहळतच, आम्ही मागे फिरलो.
केप रिंगा (Cape Reinga)
केप रिंगा हे न्यु
झीलंडचं उत्तरेचं टोक. आपल्याला नद्यांचे संगम परिचित आहेत, पण केप रिंगा या टोकापाशी
दोन समुद्रांचा ’संगम’ होतो. डावीकडे ऑस्ट्रेलिया आणि न्यु झीलंडच्या मध्ये असलेला
तास्मान समुद्र आणि उजवीकडे प्रशांत महासागर. अत्यंत निसर्गरम्य जागा आहे ही. इथे एका
बाजूला समुद्रावरून वेगाने वाहणा-या वा-यामुळे किना-यावरची रेती उडून महाकाय वाळूच्या
टेकड्या तयार झाल्या आहेत. या वाळूच्या टेकड्या इतक्या मोठ्या आहेत, की त्यावर ’सॅन्ड
बोर्डिंग’ म्हणजेच वाळूवरून सरकत खाली येण्याचा खेळ खेळता येतो! या टेकड्या एका बाजूला,
दुस-या बाजूला निमुळता होत होत समुद्रातच विरघळून जाणारा डोंगर आणि समोरच्या बाजूला
निळ्या रंगाच्या अनेक छटांचे फेसाळते दोन समुद्र दिसतात. ही जागा आणखीनच रोमॅंटिक वाटते
ती इथे उभ्या असलेल्या दीपस्तंभामुळे. केप रिंगा हे अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहे. इथून
मालवाहतूक करणा-या जहाजांची सतत ये-जा सुरू असते. त्यांच्यासाठी पथदर्शी म्हणून हा
दीपस्तंभ १९४१ पासून उभारलेला आहे. सौर उर्जेवर चालणारा हा दीपस्तंभ रात्री दर १२ सेकंदांनी
प्रकाशाचा झोत समुद्रात सोडतो.
आम्ही ज्या दिवशी
इथे भेट दिली त्या दिवशी हवा काहीशी ढगाळ होती. पावसाची अगदी बारीक भुरभुरही अधूनमधून
होत होती. डावीकडे आक्रमक आणि उसळणारा तास्मान समुद्र, उजवीकडे त्याला आपल्यात सामावून
घेणारा धीरगंभीर प्रशांत महासागर आणि मधोमध उठून दिसणारा दीपस्तंभ यांचं मनाला शांतवत
नेणारं दृश्य दिसत होतं. या मंत्रमुग्ध करणा-या वातावरणात भर घातली एका माओरी श्रद्धेने.
समुद्रात झेपावणा-या
डोंगरावर पायथ्याजवळ एकच एक झाड उभं आहे. त्याचं नाव आहे- ’द एन्शन्ट सर्व्हायव्हर’.
इथे समुद्री वारं सतत वहात असतं. इथे सुपीक माती नाही, आहे ती फक्त रेती. झाडं रुजण्याकरता
आणि उगवण्याकरता कोणतीही अनुकूल परिस्थिती नसतानाही हे एकच झाड मात्र चक्क एका खडकावर
तग धरून आहे. म्हणूनच माओरींकरता हे झाड अतिशय महत्त्वाचं आहे. माओरींचा असा समज आहे,
की मृत्यूनंतर माओरींचा आत्मा या ठिकाणी येतो. इथे, या एकुलता एक झाडाची मुळं धरून
तो आत्मा समुद्रात प्रवेश करतो आणि समुद्र मार्गाने प्रवास करत त्याच्या मूळ ठिकाणी
बाहेर पडतो. त्यानंतरच तो आत्मा त्याच्या पुढच्या प्रवासाला जातो. प्रत्येक आत्म्याचा
प्रवास निर्विघ्न व्हावा म्हणून माओरींकरवी इथे अनेकदा मोठ्या प्रमाणात मोक्ष विधीही
होतात. गंमत बघा… आपली अशी समजूत आहे की समुद्राखाली ’पाताळ’ आहे; स्वर्ग जर ’वर’ असेल,
तर नरक ’खाली’ आहे. थोडक्यात सांगायचं, तर सगळ्या पुण्यवान, शुद्ध गोष्टी ’वर’, तर
पापी लोकांचं स्थान ’खाली’. पण आपल्याला नकोशा असणा-या याच पाताळाद्वारे माओरींना मात्र
मोक्ष मिळतो! प्रत्येक धर्मात, पंथात अनेकदा अशा आपल्या धारणांपेक्षा अगदी विरुद्ध
समजूती असतात! पण त्या समजून घेताना मात्र मजा वाटते, नाही का?
बे ऑफ आयलंड्जच्या
या छोट्या सहलीत आम्ही थोडा इतिहास जाणून घेतला, निसर्गाच्या सौंदर्यावर लुब्ध झालो
आणि आम्हाला माओरींच्या आयुष्यात डोकावण्याची संधीही मिळाली. कोणत्याही घाई आणि गजबजाटाविना
गेलेले हे दोन दिवस अपार समाधान देणारे होते. आता वेध लागले होते आणखी एका नैसर्गिक
चमत्काराच्या प्रदेशाचे- रोटोरुआचे.
क्रमश:
0 comments:
Post a Comment