January 2, 2017

ते एक वर्ष- १२अ

मुंबई(ने) मेरी जान (ले ली)

मी ते नेलपॉलिशवालं स्थळ पाहिलं. त्या दिवशी राग, नैराश्य, वैताग, त्रास अशा सर्व नकारात्मक भावनाच सोबत होत्या. घरी पोचल्या पोचल्याच मी कधी नव्हे ते वडिलांना उलट बोलले.

“ही असली स्थळं मी पाहणार नाही. कसा होता तो मुलगा?”

“अगं पण तिथे पोचेपर्यंत मला तरी माहित होता का तो कसा आहे ते?”

“वैतागले आहे मी या सगळ्या प्रकाराला.”

“बरोबर आहे तुझं. पण करायचं काय तेही सांग.”

“ते मला माहित नाही. मी आता पुण्याला येणारच नाहीये. किमान १५ दिवस तरी. म्हणजे ही कटकटच नको. मी एकटीनेच राहते. मला नाही पहायची स्थळंबिळं.”

“हा असला वेडेपणा चालणार नाही. पहायची नाहीत स्थळं म्हणजे? लग्न करायचंय ना?”

“घाई काय आहे हो? इतकं काय आहे तुमचं लग्नलग्नलग्नलग्न? इतकी घाई असेल तर कळवा याच मुलाला होकार. करते याच्याशी लग्न!”

“मूर्खासारखं बोलू नकोस. पसंत नसलेल्या मुलाशी कसं लग्न लावून देईन तुझं? पण पसंत पडेपर्यंत स्थळं बघावी लागतीलच हेही लक्षात ठेव. १५ दिवस यायचं नसेल तर नको येऊस. त्यानंतर मात्र परत सुरू करावंच लागेल.”

परिस्थितीपुढे आम्ही सगळेच हतबल झालो होतो. तरुण मुलीचं लग्न वेळेत करून द्यावं असं माझ्या आई-बाबांना वाटत होतं त्यात काय चुकीचं होतं? पण व्यवस्थित स्थळं येत नव्हती आणि तो सगळा प्रकारच असह्य होत होता ज्यामुळे मी फ्रस्टेट होत होते यात माझं तरी काय चुकत होतं?

शेवटी आई-आजी मध्ये पडल्या. दुपार झालेलीच होती. आम्ही जेवलो आणि जरा उन्हं कलल्यावर मी निघालेच; आता १५ दिवस यायचंच नाही असं ठरवूनच. त्यातून काय सिद्ध होणार होतं कोण जाणे. रागात घेतलेल्या निर्णयाला कधीच लॉजिक नसतं. तसाच तोही होता.

परत येताना ट्रेनमध्ये संपूर्ण वेळ मनात नुसता कल्लोळ चालू होता. उलटसुलट विचार येतजात होते. शेवटी दादरला उतरताना एक निर्णयापर्यंत आले- या पुढे ज्या स्थळाकडून होकार येईल, त्याच्याशी आपण लग्न करायचं. तशी सगळी स्थळं अनुरूपच होती. त्यामुळे क्लिकबिकच्या मागे लागायचं नाही. जे काही असेल त्याच्याशी घेऊ जुळवून. या चक्रातून आता सर्वांचीच सुटका करायची.

निर्णय घेतला खरा, पण मन स्वस्थ नव्हतं. दुस-या दिवशी ऑफिसमध्येही नरमच मूड होता. त्यात माझा कंपू नालायकपणा करत होता! आदल्या दिवशी मी जेव्हा स्थळ बघायला गेले होते तेव्हा ते सगळे खडकवासल्याला गेले होते. तिथे मस्त फोटोही काढले होते. आणि तत्परता अशी की फोटो डेव्हलप करून, ते स्कॅन करून ग्रूप ईमेलवरही टाकले होते! भयानक चिडचिड झाली माझी ते फोटो पाहून! मग बालिशपणे मीही ’जा जा, माझ्याशिवायच जा सगळीकडे. मी येणारच नाहीये आता पुण्याला’ अशी ईमेल केली. मग टपाटप आल्या सर्वांच्या ईमेली:

-गटवला वाटतं कोणीतरी मुंबईवाला. मग कशाला येतेय आता पुण्याला? आम्हीच येतो मुंबईला.

-सुटलो बुवा. ए चला रे, आता बिनधास्त पानशेतला जाऊ येत्या शनिवारी.    

-अगं असं काय? पुण्याला येणार नाहीस म्हणजे? काय झालं?

-अरे!! एक गटग ठरत होतं. आता तू नाहीस तर तुझा आवाजही नाही. लोक पोचणार कसे गटगपर्यंत?

-पुण्यावर रागावून कसं चालेल? शेवटी सगळी आपली माणसं पुण्यातच आहेत ना?

चौकश्या, टोमणे, हलकटपणा असं सगळं ’युक्त’ असलेल्या त्या ईमेलींमुळे अखेर माझा मूड परत ताळ्यावर आला.
आठवड्याचे बाकीवे दिवस नेहेमीसारखेच गेले. आणि उजाडला शनिवार. आज काही मला पहाटे चारला उठायचं नव्हतं. मस्स्स्त ताणून द्यायची आहे या विचारानेच आदल्या दिवशी रात्री झोपले होते. आणि साखरझोपेत असतानाच पाय जोरात हलतोय असं लक्षात आलं. पाठोपाठ जोशीआजींचा आवाज, ’जायचं नाही का तुला? ५.१५ वाजले!’ आईशप्पथ!!  यांना सांगायलाच विसरले! एरवी दर शनिवारी मी पाचला घर सोडत असे तेव्हा या डाराडूर झोपलेल्या असत. आज बरी यांना जाग आली ती! मी खडबडून उठले आणि जोरात सांगितलं, “नाही जाणारे मी आज”. “नाही का? बर बर. मला वाटलं विसरलीस की काय उठायला. म्हणलं उशीर नको, म्हणून उठवलं. मला काय…” याच्या पुढेही त्या आणखी काहीबाही बोलायला लागल्या. त्यांची ट्रेन एकदा सुरू झाली की… आजींना ऐकायला येत नसे. त्यामुळे त्या सहसा जोरातच बोलत. त्यातून पहाटेचं बोलणं! खूपच मोठ्यानं बोलत होत्या त्या. माझ्या रूमीजही बिचा-या जाग्या झाल्या. आणि परत झोपल्या. मला मात्र झोप येईना! मी नुसतीच पडून राहिले. आत्ता किती वाजले? आत्ता मी कुठे पोचले असते? आज आई काय करेल जेवायला? आज माझा ग्रूप काय करेल? मला कोणी मिस करेल का? वगैरे अत्यंत निरुपयोगी विचार करत कूस पालटत राहिले. शेवटी सातला उठलेच. पण उठून करायलाही काही नव्हतं. माझ्या रूमीज डाराडूर पडलेल्या होत्या. त्यांच्याकडे बघत नुसतीच बसले होते, तेव्हा “त्या काही नवाशिवाय उठायच्या नाहीत” अशी माहिती आजींनी तत्परतेने पुरवली. एकंदर उठल्याउठल्याच फार बोअर झालं मला. पण इलाज नव्हता. 

पण नंतरचे दिवस बरे गेले. या मुली उठल्यावर आम्ही सावकाश एल्कोमध्ये एक चक्कर मारली. जेवून टळटळीत दुपारी परत आलो आणि भरपूर झोपलो. संध्याकाळी लिंकिंग रोडला गेलो, टीपी केला, थोडी खरेदी केली.

रविवारीही आजींनी झोपून दिलं नाही. परत पहाटे पाचलाच त्यांनी भाजणी भाजायला घेतली!! कसकसले वास आणि कढईत उलथनं फिरवल्याच्या आवाजाने मी आपली परत जागी! हा काय मंत्रचळेपणा होता त्यांचा!! रूमी नंतर म्हणाली, “त्या तशाच आहेत. एरवी सोमवार ते शुक्रवार आम्ही दिवसभर घरात नसताना त्या काहीही काम करत नाहीत, शनि-रवि मात्र त्यांना पहाटेपासूनच काम असतं खूप. भाजण्या करणं, लाडू भाजणं, डबे-पातेली खाली काढणं, ते पाडणं, ते आपटणं हे अगदी नॉर्मल उद्योग असतात. एकदा तर भर सकाळी ६ ला त्यांनी भजीही तळली होती!” खूप प्रकारचे खमंग, चटकदार खायचे पदार्थ करायचे आणि ते आम्हा मुलींना द्यायचे नाहीत हे त्यांचं ठरलेलं होतं. पण मुद्दाम चिडवल्यासारखं आम्ही असतानाच त्या ते का करत होत्या आणि त्यातून त्यांना कोणता विकृत आनंद मिळत होता, कोण जाणे. बाकी काही असो, लग्न झाल्यावर किमान या असल्या भयंकर बाईपासून सुटका होईल असाही एक विचार माझ्या मनात येऊन गेला. 

त्या दिवशी दिवसभर आळशीपणा करून संध्याकाळी आम्ही गिरगाव चौपाटीला गेलो. जाम गर्दी होती आणि समुद्रही ठीकठाकच होता. पण ’मुंबईत समुद्रावर गेले’ हा एक टिकमार्क लागला. तसा तो वीकेन्ड खरं सांगायचं तर बोअरच गेला. त्याच्या पुढच्या वीकेन्डला मुंबईत करायचं तरी काय हा यक्ष प्रश्न माझ्यापुढे रविवारी रात्री झोपतानाच पडला होता.

आणि सोमवारी त्याची ईमेल आली.

क्रमश:
****

Disclaimer: Fact and fiction are intertwined together in this work.

1 comments:

Unknown said...

छान. मजा आली. पटापट लिहा. ओघ ओसरत चाललाय हळूहळू. बाकी एक गोष्ट नक्की की आम्हा मुलांचं जरा बरं असतं तुमच्या पेक्षा... ;)