December 23, 2016

ते एक वर्ष- ११

दिल, दोस्ती, दुनियादारी

एकटेपण, कॉस्मोपॉलिटन वातावरण, विचित्र मालकीणबाई, जेवढ्यासतेवढं वागणा-या, तरीही अनोळखी शहरात एकमेव सहारा असलेल्या बरोबर राहणा-या मुली, आई-वडिलांपासून आणि आपल्या शहरापासून दुरावल्याची खंत या सगळ्या काळ्याकुळकुळीत वातावरणात मी निभावून नेलं ते केवळ माझ्या मित्र-मैत्रिणींच्या भरवशावर. गंमत म्हणजे यातले जवळपास सगळे मित्र नवे होते… ज्यांना मी कशी आहे, कशी वागते, कशी बोलते, माझा भूतकाळ, माझं कुटुंब याबद्दल कोणतीही माहिती नव्हती आणि त्यामुळे प्रीजुडायसेसही नव्हते. मी जशी बोलत होते, व्यक्त होत होते, प्रतिक्रिया देत होते त्यावरूनच त्यांना माझी ओळख पटत होती. ही नवी मैत्री मला कुठे सापडली? करेक्ट! ऑनलाईन फोरमवर.

आता व्हॉट्सॅपमुळे आणि सोशल नेटवर्किंगमुळे ऑनलाईन मैत्री हा काही फारसा नवलाचा विषय राहिलेला नाहीये. पण तेव्हा मात्र ते मला तरी अद्भुत आणि भारी वाटलं होतं. तो होता वायटुकेचा काळ. इन्टरनेट, वेबसाईट ब्राऊजिंग, ईमेल अकाऊंट्स हे सर्वांनाच नवं होतं. मोबाईल तर फारच कमी लोकांकडे होते. लॅंडलाईनवर कामं होत होती. (ब्लॅंक कॉल्स इतिहासजमा व्हायचे होते ;)) तेव्हा एखादा ऑनलाईन फोरम असतो, त्यावर एकाच वेळी अनेक लोक येतात, गप्पा मारतात आणि चक्क एकमेकांचे दोस्तही होतात ही संकल्पनाच बावचळवून टाकणारी होती. म्हणजे, माझ्यासाठी तरी होती.

“मायबोली”शी माझी ओळख माझ्या एका मैत्रिणीने करून दिली. ती तिथे कविता लिहायची, त्यावर लोकही कवितेतूनच उत्तर द्यायचे, चक्क कविता आणि चारोळ्यांचे सवालजबाबच घडायचे तिथे आणि तेही खेळीमेळीत! गंमतच वाटली होती मला सगळ्याची. काही दिवस मी फक्त वाचलं. मग मला नोकरी लागली. माझ्या कंपनीचा व्यवसायच संगणकाशी निगडीत होता, त्यामुळे ऑफिसात अनलिमिटेड नेट ऍक्सेस! प्रत्येक अंधा-या रात्रीनंतरच सकाळ होते, तद्वतच हा अनलिमिटेड नेट ऍक्सेस माझ्यासारख्या एकलकोंड्या आणि एकट्या पडलेल्या जीवासाठी एखाद्या लखलखीत सकाळसारखा होता. मी आता ऑनलाईन सोशल फोरमवर अधिकृतपणे प्रवेश केला.

एव्हाना, तोपर्यंत ख-या आयुष्यात असलेल्या मित्र-मैत्रिणी चांगल्याच दुरावल्या होत्या. काही मैत्रिणींची लग्न झाली होती, काहींची व्हायच्या मार्गावर होती. ज्यांची लग्न ठरत होती, त्यांचं विश्व लग्न ठरल्याठरल्या बदलूनच जात होतं. त्यांना माझ्यासाठी वेळ नव्हता, किंवा असला तरी त्यांच्या गप्पांमध्ये नवरा आणि लग्न याशिवाय दुसरा विषयच नव्हता. त्यांच्या दृष्टीनं ते काही चूक नव्हतं म्हणा. पण मला जाम बोअर व्हायचं. त्यामुळे हळूहळू  मला जवळच्या मैत्रिणीच उरल्या नाहीत. कॉलेजमध्ये जे मित्र होते ते पुढच्या पोटापाण्याच्या शिक्षणासाठी तरी किंवा नोकरीत अडकले होते.  उच्चशिक्षण घेत असताना कोणाशी घट्ट मैत्री झालीच नाही, किंवा होऊ शकली नाही, कारण स्पर्धा तीव्र! सगळं लक्ष अभ्यास करणं आणि पास होणं यावरच लक्ष केंद्रित होतं. पास झाल्याझाल्या मी आले मुंबईत. स्वत:लाच अनोळखी झाले!

अशा रीतीनं रियल लाईफमध्ये कोणीच उरलेलं नसल्यामुळे आणि सध्याच्या जगात नवीन कोणी प्रवेश घेत नसल्यामुळे मायबोलीच्या व्हर्चुअल जगात मी आनंदानं शिरले.

हे व्हर्चुअल जग होतंही अतिशय लोभसवाणं. इथे मनमोकळा संवाद होता, आपण काही लिहिलं की त्याचं कौतुक करणारे किंवा त्यावर काही ना काही पद्धतीनं रिऍक्ट होणारे लोक होते. इथे मी एकटी पडत नव्हते. मी जोक्स करत होते, लोकांनी केलेल्या जोक्सवर कोट्या करत होते, कविता वाचून काहीतरी नवीन अनुभवत होते, अंतर्मुख होत होते. कादंब-या, ललित लेख माझं विश्व विस्तारत होते. इथे मी कोणाला दिसतच नव्हते, त्यामुळे माझं रूप-रंग, करीयर, शिक्षण, महत्त्वाकांक्षा, स्वभाव यांबद्दल कोणालाही देणंघेणं नव्हतं. सगळेच जण केवळ दोन घटका सकस मजेसाठी इथे येत होते. कोणाकडूनही कसल्याच अपेक्षा नसल्यामुळे ऋणानुबंध आपोआपच तयार होत होते. एखाद दिवस मी दिसले नाही तर माझी चौकशी करणारे लोक मला इथेच भेटले, मी सल्ला मागितल्यावर मला तो विनासायास इथेच मिळाला, मी काही बोलले तर ’हिची आणि माझी मतं जुळतात’ असं बिनधास्तपणे लिहून मोकळे होणारेही मला इथेच दिसले. आणि काहीही न बोलता मी नुसती वाचत बसले, तरी जे व्हर्चुअल जग हात आखडता न घेता मला काही ना काहीतरी देतच होतं. असं आपापसात बोलणारं, जगणारं हे जग मला अतिशय आवडत होतं. मला माझे नवे मित्र सापडले, ते इथेच!      

या ऑनलाईन विश्वातले बहुतांश लोक अमेरिकेत होते. त्यातलेही ९०% लोक मूळचे पुण्याचे किंवा मुंबईचे होते. हे लोक सुट्टीला भारतात यायचे, तेव्हापासून त्यांना भेटायच्या निमित्तानं हळूहळू मायबोली गटग सुरू झाली. स्थानिक नेहेमीचे यशस्वी लोक प्लस परदेशस्थ कोणीतरी येणार आहे हे निमित्त धरून जवळपास दर वीकान्ताला भेटी व्हायला लागल्या! ऑनलाईन गप्पा, चेष्टा आता प्रत्यक्षातही व्हायला लागली. शाळा-कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींबरोबर जो कम्फर्ट सापडत होता, तो याही लोकांमध्ये मिळत होता. मी या गटग आयोजकांमध्ये कधी सामील झाले मला कळलंही नाही! मी एरवी मुंबईत असले, तरी दर शनि-रवि पुण्याला जात होतेच. त्यामुळे पुण्याच्या गटग आयोजकात मी असेच. माबोच्या कोणत्यातरी बाफ़वर कोणीतरी घोषणा करत असे, ’मी येतोय, भेटायला आवडेल’ की आमची चक्र फिरायला लागत. काय ईमेल्स करत असू आम्ही! दुसरं कोणतं साधनही नव्हतं म्हणा. चार जणांना फोन करत बसण्यापेक्षा ईमेल्स बडवणं सोपं होतं. माझ्यासारखे आणखी तीन-चार-पाच पर्मनन्ट मेम्बर्सही होते. कोणी नवं असेल तर त्यांच्याबरोबर, आणि कोणी नसेल तर आमचेआमचेच आम्ही अगदी रेग्युलरली भेटू लागलो.

या भेटण्याची इतकी सवय झाली, की आपोआपच आमचा चार-पाच जणांचा असा एक कोअर ग्रूपही तयार झाला. यात मित्र होते, तशाच मैत्रिणीही होत्या. मग पर्सनल ईमेल्स, क्वचित पर्सनल चॅट्स, फोन कॉल्स हेही सुरू झालं. ’पर्सनल’ वर लगेच डोळे टवकारू नका! :P वैयक्तिक इश्युज, गॉसिप्स, जोक्स, चांगलं काही वाचलेलं शेअर करणं असे आणि इतपतच ’पर्सनल’ प्रकार होते. किमान माझे तरी. मला तरी त्या वेळेला सर्वांचेच केवळ चांगलेच अनुभव आले.  असं करत प्रत्येकाबरोबर मैत्री एक वेगळा टप्पा गाठत होती. हे क्लिशे आहे, तरीही लिहिते, की माझ्या एरवीच्या मुंबईच्या रटाळ आयुष्यात ही मैत्री खरोखर अनमोल होती. त्यामुळे एखाद्या वीकान्ताला ’कांदेपोहे’ कार्यक्रम असला आणि त्याच वेळेला गटग असलं तर ’गटगला मी येऊ शकत नाही’ हे कळवताना मला अतिशय त्रास व्हायला लागला होता. यावरून घरीही खटके उडायला लागले होते. पण त्याकडे मी फारसं लक्ष देत नव्हते.

माझे जसे ख-या मित्र-मैत्रिणींबरोबरचे बांधलेले हात सुटले होते, तसंच कमीअधिक या माझ्या ग्रूपचंही झालेलं होतं. मागचे मित्र मागेच राहिले, कामाच्या जागी तेवढ्यास तेवढी मैत्री, त्यामुळे आम्ही व्हर्च्युअल मित्र आपसुकच एकमेकांचे घट्ट मित्र झालो. आता माबो व्यतिरिक्तही शेअरिंग आमच्यामध्ये व्हायला लागलं. नुसतं बाहेर भेटणं नाही, तर एकमेकांच्या घरीही येणंजाणं वाढलं. ’कांदेपोहे’ हा विषय कमी-अधिक सगळ्यांच्याच घरात चालू होता. मुलं थोडी निवांत होती, पण मुलींच्या घरात चालू होताच. मग त्या अनुषंगानं आपली मतं मांडण्यासाठी मला तर हक्काचे कानच मिळाले. कारण माझ्या मनातली घुसमट मी आई-वडिलांशी बोलूच शकत नव्हते. मी जेव्हा एखाद्या गटगला जायचे तेव्हा सहज, ’कसे झाले गेल्या वेळचे कांदेपोहे?’, ’नाहीच का जमलं अजून काही?’, ’जो कोण हिचा नवरा होईल त्याचं काही खरं नाही बाबा!’, ’चहा तरी करता येतो का? चाललीय लग्न करायला!’ अशी चिडवाचिडवी व्हायचीच. पण एखादवेळी अगदीच डाऊन असेन, तर ’होईल गं नीट सगळं’ असा मोजक्याच, पण आवश्यक शब्दांत धीरही मिळायचा.  बाकीचेही आपापल्या इश्युजबद्दल बोलायचे. कोणाचे आई-वडिल गावी होते, त्यांना मुलाचं ’शहरी’ होणं पसंत नव्हतं, कोणाच्या घरी पैशाचे प्रॉब्लेम्स होते, कोणाचे नातेवाईकांचे होते, कोणाचे पालक-मुलं या अपेक्षांबद्दलचे होते. जे काही होतं ते आम्ही आत्मीयतेनं आणि विश्वासानं एकमेकांशी बोलत होतो. व्यक्त होत होतो. बाकी, पोटापाण्यासाठी नोकरी आणि दंगा करायला सोशल नेटकर्किंग होतंच. पण या माझ्या ग्रूपमुळे ’आपल्या वयाच्या लोकांशी बोलायची’ जी भूक असते ती मात्र माझी अगदी तृप्त होईपर्यंत भागली. Owe it to all of them!  

मी ते दिवस मिस करते का? नाही. मिस नाही करत. कारण त्या दिवसांच्या सुरेख आठवणी माझ्या मनात अगदी ताज्या आहेत. ’जो दूर गये ही नही, उनको पास क्या बुलाना?’ :)

****

Disclaimer: Fact and fiction are intertwined together in this work.

0 comments: