January 5, 2017

ते एक वर्ष १२ब- अंतिम


हसले मनी चांदणे

तो म्हणजे माझ्या कंपूपैकीच एक मित्र. तो पुढच्या वीकेन्डला मावशीकडे येणार होता मुंबईला. शनिवारी काहीतरी काम होतं आणि रविवार मोकळा होता. तर ’तू नाहीतरी पुण्याला येणार नाहीयेस, आणि मी मुंबईला येतोच आहे तर दाखव मला थोडी मुंबई’ अशी त्याच्याच शब्दात ऑर्डर होती. मला बरंच वाटलं. एक तर मी पुणे-सिक व्हायला लागले होते ऑलरेडी. मूर्ख हटवादीपणा मोडून त्या वीकेन्डला पुण्याला जावं का असा विचार मनात येतच होता. पण ती आपली हार होईल असं एक मन म्हणत होतं. यानंतर जिथून होकार येईल तिथे लग्न करायचं आहे असं ठरलेलं असल्यामुळे होता होई तो हे एकटेपण अनुभवावं असंही दुसरं मन म्हणत होतं. पण मुंबईत करायचं काय या प्रश्नाचं उत्तर त्याच्या ईमेलमुळे मिळालं. मला पुणं नाही, तर किमान पुण्याचं कोणीतरी तरी भेटणार होतं. मित्रच खरंतर. त्यामुळे माझ्यात एकदम पहिल्यासारखा उत्साह संचारला. कुठे कुठे जाता येईल? आपण न चुकता आणि आपलं फारसं हसं न करता त्याला काय काय दाखवू शकू? जेवायचं काय करायचं?  दिवसभर भेटायचं का फक्त संध्याकाळपुरतं? कुठे भेटायचं? प्रश्नांवर प्रश्न! मी मायबोलीवर अंदाज घेतला, मैत्रिणी, रूमीज आणि ऑफिसमध्ये रेवा, सुनिथाचं डोकं खाल्लं आणि शेवटी चर्चगेटपर्यंत जाऊन साऊथ बॉम्बे परिसरात भागात चक्कर मारायची असं ठरवलं. एक तर तिथे जायला डायरेक्ट ट्रेन होती. रविवारमुळे गर्दी कमी आणि साऊथ बॉम्बे म्हणजे कशी पॉश एरिआ. ठरलं. ’पहिल्यांदा कुठे भेटायचं?’ यावर मात्र बराच खल झाला. त्याचं म्हणणं होतं की मी थेट आजींकडेच येतो. म्हणजे चुकामुक व्हायचा काही प्रश्नच नाही. पण जोशीआजींच्या दारात माझा एक मित्र येऊन उभा म्हणजे भयंकर रोमांचक प्रसंग झाला असता. चाळभर चघळायला खाद्य काही मला पुरवायचं नव्हतं. त्याला कशाच्या बळावर काय माहित, पण कॉन्फिडन्स होता की तो मावशीच्या माहीमच्या घरापासून पार्ल्यात नक्की पोचू शकेल. त्यामुळे मग पार्ला स्टेशनवरच भेटायचं असं ठरलं. वेळ सकाळी अकरा.

ही भेट आणि ही सर्व ठरवाठरवी ग्रूप ईमेलवर चालू होती!! म्हणजे येणार होता फक्त तो एकटाच पण सगळे मिळून बडबडबडबड करत होते, सूचना देत होते, टीपी करत होते, खेचत होते… आठवडाभर कल्ला चालू होता नुसता. मला पुण्याचा विरह झाला म्हणून माझ्यासाठी हिन्दुस्थानचे केक आणि चितळ्यांची बाकरवडीपण येणार होती. आय सिम्प्ली लव्ह्ड देम ऑल! आठवड्याचे दिवस रूटीनमध्ये आणि या एक्साईटमेन्टमध्ये सहज गेले.

शुक्रवारीच मी आजींना सांगून झोपले होते, मला उठवू नका. या वेळी सूज्ञपणे कानात बोळेही घालून झोपले, आणि जाग आली तरी जाम उठायचं नाही पहाटे असं ठरवूनच झोपले. त्यामुळे खाडकन एकदम सकाळी साडेसातलाच जाग आली! माझं रेकॉर्डब्रेक झोपणं हे. रूमीज झोपलेल्याच होत्या. खूप लोक सहज नऊसाडेनऊपर्यंत झोपू शकतात. मला कधीच जमलं नाही ते. पण सलग झोप झाल्यामुळे फ्रेश वाटत होतं. त्या दिवशी आमचा काही खास प्लॅन नव्हता. सकाळ तर टंगळमंगळ, आळशीपणा, कपडे धुणे यात गेली. संध्याकाळी पार्ल्यातच चक्कर मारली. पार्लेश्वराचं देऊळ मला फार आवडायचं. तिथे एरवीही मी ऑफिसमधून आल्यावर संध्याकाळच्या आरतीला अधूनमधून जात असे. त्या दिवशी ’देवा कंटाळा आला सगळ्याचा. काहीतरी मार्ग दाखव बाबा’ अशी प्रार्थना केलेली आजही आठवते आहे.

रविवार उजाडला. मला उगाच्च खूप एक्साईटमेन्ट वाटत होती. ऍडव्हेन्चरस वाटत होतं. खास आपल्याला भेटायला आपला मित्र येणार, इथूनतिथून नाही, तर आपल्या पुण्याहून येणार, त्याला आपण आपल्या जबाबदारीवर मुंबईसारख्या अवाढव्य जागी फिरवणार, खूप गप्पा मारणार, जेवायची ट्रीट देणार, परत ट्रेनमध्ये बसवून देणार… एकदम खूप मोठे टास्क्स समोर असल्यासारखे होते. मला लवकरच जाग आली. आज कधी नव्हं ते आजीही झोपलेल्या होत्या. हवा मस्त होती (मुंबई मस्त! ). खूप वेळ मी एकटीच गॅलरीत उभी होते. कुठूनतरी रेडिओचा आवाज येत होता. आमच्या चाळीच्या आवारात दोन मोठे गुलमोहर होते, त्यावर पक्ष्यांची हालचाल होती आणि वातावरण अगदी शांत होतं. ’आजचा दिवस छान जाणार आहे’  अशी खूण का कोण जाणे पटली.

रविवारी रिक्षाचा भोंगा वाजवत चाळीत इडलीवाला येत असे. त्याच्याकडून इडली घ्यायची असं आमचं आदल्या दिवशीच ठरलं होतं. तो बरोब्बर साडेआठला आला. मी चटकन इडली घेतली (- आमच्यापुरतीच), खाल्ली, आंघोळ केली आणि साडेनऊपर्यंत तयारही झाले! वेगळा ड्रेस वगैरेचा काही प्रकारच नव्हता. पंजाबी ड्रेसच होते माझ्याकडे, तेही एकसारखेच. सगळ्या जीन्स पुण्यालाच होत्या. त्या लोळत पडलेल्या असेपर्यंत मी तयारही झाले हे पाहून इतके दिवस कोऑपरेट करणा-या रूमीज अचानकच चिडवायला लागल्या- काय आज अगदी झटपट आवरलंस ते, ड्रेसही फार घालत नाहीस हा, आजच्यासाठी ठेवला होता वाटतं, नीट जाशील ना, परत येशील ना, का तिथूनच पुण्याला जाणारेस वगैरे. मला ते सगळंच काहीच्या काही वाटत होतं.  ते इग्नोअर करत साडेदहापर्यंत वेळ काढला आणि ’ऑल द बेस्ट’च्या हाका-या ऐकत शेवटी बाहेर पडलेच.     

कितीही टंगळमंगळ करत चालायचं म्हटलं, तरी तेराच मिनिटात मी स्टेशनला पोचले. जिना चढत असताना परत प्रश्नांचा फेर सुरू झाला. तो येईल ना? वेळेवर येईल ना? त्याला सापडेल ना? कितीची लोकल घेतली असेल? स्टेशनवर पहिली ’पार्ला’ पाटी येईल तिथे उभं रहायचं असं ठरलंय, डावीकडून पहिली का उजवीकडून पहिली?- मीच गोंधळायला लागले. किती वाजेपर्यत आपण वाट बघायची? हा सगळा माझ्या कंपूनं केलेला एक हलकट प्लॅन तर नसेल ना? तो येणारच नसेल, सगळे मिळून माझा पोपट करत असतील का? माझी प्रश्नसाखळी सुरू झाली की संपतच नाही. तसंच तेव्हाही झालं. मी विचार करत करतच जिना चढले आणि उतरले आणि मनाला आणि पायांना खाडकन ब्रेक लावायला लागला! समोरच तो उभा!

एक क्षण ’आईशप्पत, ’आला पण?’ झालं! तो खरंच आलेला होता. हा माझा बकरा करायचा कोणताही प्लॅन नव्हता. उलट त्यालाही माझ्यासारखेच प्रश्न पडले होते म्हणून तोही घरातून लवकरच निघालेला होता. आम्ही अगदी सेम पेजवरच होतो. मला एकदम हायसं वाटलं. त्याच क्षणी लावलेले ब्रेक सोडले गेले आणि माझी टकळी सुरू झाली! उत्साहात मी त्याला माझा प्लॅन सांगितला, तसं तो म्हणाला,

“चर्चगेट? मला खरंतर तू राहतेस ते पार्लाच पहायचं होतं!”

पार्ल्यात काय आहे डोंबल? असं न म्हणता, मी म्हणाले, “ते पाहशील नंतर. आपण चर्चगेटलाच जाऊ. तिथून साऊथ बॉम्बेला जाऊ. तो मस्त भाग आहे मुंबईचा. पाहण्यासारखा. हे आपल्या पुण्यासारखंच आहे, पार्लं.”    

त्याने वाद न घालता मान्यच केलं एकदम. आज गर्दी खूपच कमी होती ट्रेन्सनाही. आम्हाला आरामात चढायला मिळालं. मी जनरलमधूनच प्रवास केला. न जाणो, तो हरवला कुठे तर? एका अनइव्हेन्टफुल प्रवासानंतर आम्ही चर्चगेटला उतरलो. उतरलो आणि माझा आत्मविश्वास जरासा डळमळीत व्हायला लागला. तशी मी पाहण्यासारखी बरीच ठिकाणं शोधून ठेवली होती. पण अचानक माझ्या लक्षात आलं, की ती बघण्यात त्याला शून्य इन्टरेस्ट असू शकेल! माझी ठिकाणं म्हणजे आरबीआय बिल्डिंग, स्टॉक एक्सचेंज आणि एशिऍटिक सोसायटी. अगदीच काही नाही, तर जहांगीर आर्ट गॅलरी! मला या यादीची उजळणी करतानाही ’पॅं’ वाटू लागलं. इथे काय जायचं? काय विचार करून मी ही ठिकाणं निवडली होती काय माहित! मला अगदीच कानकोंड्यासारखं झालं. चर्चगेटला येऊन तर पोचलो! चांगलं म्हणत होता तो की पार्ल्यातच फिरू. पण मला कोण शायनिंग मारायची हौस! आता? आज तर हॉटेलं पण बंद असतात इथली असं मला सांगितलं होतं. आयुष्यात झाला नाही इतका पोपट होणार आहे याची खात्रीच मला पटली. इतक्यात बुडत्याला काडीचा आधार मिळाला. हा! इथून वानखेडे स्टेडियमला जाता येईल. आणि ओव्हलही. हुश्श! क्रिकेटचं वेड प्रत्येक मुलाला असतंच. याच्याशी तसं क्रिकेटबद्दल कधी स्पेसिफिक बोलणं झालेलं नव्हतं, पण क्रिकेट ही सेफ बेट होती. शिवाय ते सचिनचं होम ग्राऊन्ड. सचिन तर प्रत्येकालाच आवडतो. मी त्याला वानखेडेचं दर्शन करवलं तर तो आयुष्यभर माझा ऋणी की कायसा झाला असताच! मला एकदम तरतरीत वाटलं.  डळमळीत झालेला आत्मविश्वास परत आला.

“ए तुला वानखेडे बघायला आवडेल ना? इकडून जाता येईल आपल्याला.”

“वानखेडे?” (बोंबला! नेमकं क्रिकेट आवडत नाही का काय याला?)

“हो. वानखेडे स्टेडियम. सचिनचं होम ग्राऊन्ड. बघायचं?”

“त्यात काय बघायचंय?” (असा का आहे हा? मी परत डळमळीत व्हायला लागले.)

“मला वाटलं तुला आवडेल.” माझी सपशेल माघार. केलेले प्लॅन्स धडाधड कोसळतच होते. मला सरेन्डर करण्याशिवाय पर्यायच नव्हता.

“तसं आवडेलच. पण मॅच असेल तर. रिकामं ग्राऊन्ड काय पहायचंय? आणि मला नाही वाटत असं कोणालाही केव्हाही आत सोडत असतील ते पहायला. पास वगैरे लागत असेल. किंवा कोणाचीतरी ओळख.” हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. आता मी हरलेच.

“मग? मी इथे आले होते तेव्हा फोर्ट भागात फिरले होते, तेव्हा मला फार भारी वाटलं होतं. सर्वात पॉवरफुल लोक जिथे बसतात, जिथून इकॉनॉमीची सूत्र हलतात ती ऑफिसेस आहेत तिथे. पण तुला ते पाहण्यात काय इन्टरेस्ट असणार?” माझा आवाज हळूहळू कमी कमी होत, शून्य डेसिबल्सलाच पोचला.

“बरोबर आहे तुझं. मग आता काय प्लॅन आहे?”

माझा चेहरा पडला. मी गप्प बसले. मग अखेर माझ्यावर दया येऊन तो म्हणाला, “ठीके, नो प्रॉब्लेम. चल, इथून बाहेर तरी पडू. करू काहीतरी. भटकू कुठेतरी.”

आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो. कोणता रस्ता घेतला हे मला आठवतही नाहीये. कारण माझ्या प्लॅननुसार आम्हाला थेट टॅक्सीत बसून ऐटीत ऑर्डर द्यायची होती फक्त. सध्या तरी आम्ही चालतच होतो. आणि चालताचालता बोलत होतो. मुंबईत रुळलीस का, आवडायला लागलं का इथलं आयुष्य, पुण्याला का नाही आलीस, माबोवर कोण कोण काय काय बोलत होतं, तो कोणाकोणाला भेटला आहे इत्यादी वळणं घेत संभाषण चालू होतं. आणि चालताचालता अचानक आम्ही एक वळण घेतलं. तो रस्ता अगदी सरळसोट जात होता आणि समोर… समोर पोकळीच होती एक फक्त. ते बघताच माझ्या अंगावर एकदम शहारा आला. समुद्र. समुद्र होता तिथे. आम्ही दोघेही गप्प झालो आणि चालत राहिलो. ती पोकळी जणू आम्हाला बोलावून घेत होती. तिथे पोचलो आणि समुद्राचं अप्रतिम दर्शन झालं. डाव्या हाताला मंत्रालयाची प्रचंड मोठी इमारत होती, टी जंक्शनचा मोठाच्या मोठा आलीशान रस्ता होता, रस्त्याकडेला फुटपाथ होता, कठडे होते, चौपाटीवरचे ते सिनेमात बघितलेले सुप्रसिद्ध गोल लांबट दगड होते आणि भर दुपारच्या उन्हात चमचम करणारा विशाल समुद्र होता. It was breathtaking!

ठरवल्यासारखे आम्ही समुद्राकडे तोंड करून त्या कट्ट्यावर बसलो. नि:शब्द. बराच वेळ. मग अचानक मला तोंड फुटलं.

“काय सुंदर दिसतोय न?”

“ह्म्म. मस्तच!”

यानंतर परत आमचं बंद पडलेलं संभाषण सुरू झालं. बोलता बोलता तो म्हणाला,

“मी काल मावशीकडे आलो होतो, ते एक मुलगी बघायला.”

हे कानावर पडताक्षणीच माझ्या पोटात एक खोल खड्डा पडला. सावरून मी म्हणाले, “तू मुली बघतोयेस? आधी बोलला नाहीस.”

“मुली बघत असं नाहीये. पण मी परत युएसला प्रोजेक्टवर जाईन बहुतेक. दोनतीन वर्ष तरी. आई-बाबांचं असं म्हणणं आहे, की तोवर एखादी मुलगी पसंत पडली तर साखरपुडा करूनच जा. ही मुलगी मावशीच्या नात्यातली आहे. तुझ्यासारखं नाव नोंदवलं नाहीये अजून. तशी घाई नाहीये, पण विषय निघाला तेव्हा मावशी म्हणाली, की ही बघ आधी.”

“कशी आहे मग?”

“चांगली आहे की.”

का कोण जाणे, पण मला हे संभाषणच नकोसं होत होतं.

“मग कधी साखरपुडा?”

“साखरपुडा? मॅड आहेस का? तिच्याशी लग्न करायचं असतं तर आज तुझ्याबरोबर इथे आलो असतो का?”

अं? हो की. पण… म्हणजे…???

त्याने मान तिरकी केली आणि माझ्याकडे बघत म्हणाला, “घरात माझ्या लग्नाची बोलणी सुरू होऊन आठ-दहाच दिवस झालेत. हा विषय निघाला तेव्हा मी फारसा क्लियर नव्हतो, पण तू मागचा वीकेन्ड आली नाहीस, त्या नंतर मी सिरियसली विचार करायला लागलो. काल ती मुलगी पाहिली आणि मग ठरवलंच, की आता सोक्षमोक्ष लावायलाच हवा. तुला भेटलो नाही, तर मी तुला मिस करतो असं माझ्या लक्षात आलं. एक मैत्रिण म्हणून मला तू आवडतेस. तुझी चिडचिड, तुझा मोकळेपणा, तुझं हसणं, वैतागणं, इथे आवडत नसूनही एकटीनंच खंबीरपणे राहणं...सगळंच. आणि मला हे सगळंच कायम बघायला आवडेल. मला असं वाटतंय की मी तुझ्या प्रेमात पडलोय. तर तूही माझा विचार करशील का? एक मित्र म्हणून आणि एक लाईफ पार्टनर म्हणूनही?”

त्याचा एकेक शब्द ऐकताना माझ्या हृदयातली धडधड वाढत होती. अशी धडधड मी या आधी कधीच अनुभवली नव्हती. दिल की घंटी अशीच असते का? हा माझ्यावर प्रेम करायला लागला होता, कारण त्याला मी जशी होते तशी आवडलेली होते. हा मला आहे तशीच रहा असं सांगत होता. मी मित्र म्हणून अनेकदा याच्यासमोर रडले होते, ओरडाआरडा केला होता, तावातावानं वाद घालते होते आणि अगदी मनापासून हसलेही होते. आणि तेच बघून तो मला लग्नासाठी मागणी घालत होता! त्याच्या स्वरातला सच्चेपणाच त्याच्या मनाची ग्वाही देत होता आणि माझं हृदय त्याला आपसूकच साद देत होतं. एका क्षणी ही धडधड इतकी वाढली की माझा श्वासच थांबला आणि दुस-याच क्षणी मला रडायला यायला लागलं. अगदी हुंदके देऊन. आम्ही बसलो होतो ते वातावरण, त्याने दिलेली प्रेमाची कबूली, मला झालेलं ’क्लिक’ आणि फायनली एक रीलिफ, की आता भेदलं आपण ते नकोसं चक्र- तेही नाईलाजानं नाही, तर मनासारखं माणूस भेटल्यामुळं- या सर्वांचा तो एकत्रित ईफेक्ट असावा.

पण तो गडबडला ना! “अगं! काय झालं तुला? प्लीज, रडू नकोस. तू विचार कर, ओके. काही घाई नाहीये मला उत्तराची…” त्याची ती धांदल पाहून रडतारडताच मला हसायलाही आलं.

“अगं काय तू? ठीक आहेस ना?”

मी मान डोलावली.

“मॅडच आहेस. बर, हे घे.” असं म्हणत त्याने त्याच्या सॅकमधून ती प्रॉमिस केलेली बाकरवडी आणि कपकेक काढले. आणि एक डेअर मिल्कही काढलं. जे खास माझ्यासाठी ’प्रपोजल गिफ्ट’ होतं. उन्हामुळे त्याचा बट्ट्याबोळ झाला होता. पण ते पाहूनही मला हसायलाच आलं. मला खूप खूप हसायलाच येत होतं. कसाबसा गंभीर चेहरा करून मी म्हणाले,

“मला हे खरंच अपेक्षित नव्हतं. मला हे सगळं पचवायलाच वेळ लागेल, मला दोन दिवस देशील विचार करायला प्लीज?”

“हो अगदी. चार दिवस घे. तुला जेजे वाटत असेल ते विचार, बोल. नो प्रॉब्लेम.”

मी खरंतर उगाच आखडूपणा केला होता. माझं ’हो’ म्हणायचं असं ठरलंच होतं. पण सदाशिवपेठीपणा कुठेतरी दाखवायलाच हवा ना!

अशा रीतीनं अगदी अनपेक्षितपणे माझ्या अत्यंत आवडत्या समुद्राच्या साक्षीनं, भर दुपारी बारा वाजता मला ’जगात देव आहे’ याची खूण पटली.

नंतरचा प्रवास मग अगदी सोपाच होता. टेकडी चढून आल्यावर सपाटीवर चालल्यासारखा. अशा रीतीनं मुंबईत जाऊन, अनेक वाईट आणि थोडे बरे अनुभव गाठीशी बांधून, थोडंसं शहाणपण अंगी बाणवून पुण्यातली मुलगी परत पुण्याला आली आणि नंतर आनंदानं पुण्यातच राहिली. त्याचं मात्र पार्लं बघायचं राहिलंच!

समाप्त!
****
Disclaimer: Fact and fiction are intertwined together in this work.

6 comments:

आंबट-गोड said...

पूनम.... :-) अगदी बहारदार लिखाण. मनोवेधक आणि प्रांजळ. आणि हे १२ अ , ब काय?
इतक्या सरळपणे हा एव्हढा मोठा गुंता सुटेल असे तुलाही वाटले नव्हते ना? तुझ्या त्या वेळेत विचारलेल्या मित्रालाही याचे श्रेय आणि शुभेच्छा..कारण अशी अनेकदा ट्रेन सुटलेली अन संधि हुकलेली माणसे पाहिली आहेत!
थोडं अधिक लिहीलं असतंस तर...? पुढे काय झाले? (चिं वि जोशींच्या एका कथेचा शेवटच याने होतो.."पुढे काय झाले?" आईने उत्सुकतेने विचारले!) :-)


poonam said...

धन्यवाद आंबट-गोड! :) तुम्ही या आधीही कॉमेन्ट दिली होतीत, तेव्हा उत्तर द्यायचं राहून गेलं होतं. हो अनेकदा ट्रेन सुटलेली माणसं पाहिलेली आहेत... माझं सुदैवच की माझ्याबाबतीत असं काही झालं नाही!
पुढे काय झालं? :) :) सगळंच लिहून टाकू नये. काहीतरी वाचकांच्या कल्पनाशक्तीसाठीही ठेवावं, नाही का? ;)

आंबट-गोड said...

ओके :-)
मग आम्ही कल्पना शक्तीला वाव देतो.
दरम्यान तू नवीन कथासूत्र घे गुंफायला....

Sarang said...

जून ८ ते जानेवारी ५... ६ महिने चिकाटीने तुझा ब्लॉग दर १-२ आठवड्याला चेक करत होतो. कमेंट शेवटच्या भागापर्यंत राखून ठेवली होती. कथा सुफळ संपुर्ण! तुझं लिखाण नेहमीप्रमाणे सुटसुटीत आणि अप्रतिम!

poonam said...

Thanks a lot Sarang! :)

rahul hodage said...

Mindblowing. जगलो शेवटचा हा पार्ट वाचता वाचता. Every Love story is special. शेवटचा पार्ट म्हणजे गरम भाकरी वर लोण्याचा गोळा दिल्या सारखा वाटलं. जबरदस्त! बीच वरचा सिन मूवी सारखा समोर पाहता आला असता तर मजा आली असती.
Feeling Nostalgic😢