कांदेपोहे
वेणूला
मी कांदेपोह्यांबद्दल सांगितलं होतं ते काही खोटं नव्हतं. एव्हाना मी नोकरीत सेटल झाले
होते, कमावती होते. आई-वडिलांनी मला विचारलं की आता स्थळं बघायची का, का कोणी शोधला
आहेस? कोणी शोधलेला नव्हता, आणि लग्न करायचं होतं (म्हणण्यापेक्षा, लग्न न करायचं काही
कारण नव्हतं) म्हणून त्यांना होकार दिला. तेही दोन-चार वधू-वर सूचक केंद्रांमध्ये ताबडतोब
नाव नोंदवून आले. त्यानंतर मग जे काही सुरू झालं त्यासाठी मात्र मी मानसिकरित्या मुळीच
तयार नव्हते. पार्ल्यातलं एकटेपण त्यापेक्षा निश्चितच सुसह्य होतं. असो.
कागदोपत्री
माझं स्थळ उत्तम असल्याने आणि मला ’अनुरूप’ अशी अनेक स्थळं सुचवली गेली असल्याने ’बघायचे’
कार्यक्रम धडाधड ठरायला लागले. दर शनिवारी मी घरी आले, की त्या दिवशी संध्याकाळी आणि
रविवारी सकाळी असे किमान दोन कार्यक्रम तरी होतच. बहुतांश वेळेला आम्हीच मुलाच्या घरी
जायचो. क्वचित काही कार्यक्रम माझ्या घरीही झाले. शिक्षण संपल्यावर मी पुण्यात नोकरी
शोधायला सुरूवात केली होती. पण शेवटच्या इन्टरव्ह्यूपर्यंत जाऊन माशी शिंकत होती, त्याचप्रमाणे
कागदावर उत्तम वाटलेल्या स्थळाला प्रत्यक्ष भेटल्यावर काहीच होत नव्हतं. ’क्लिक होणं’
या फ्रेजशी मी नंतर परिचित झाले, पण तेव्हा खरंच कुठेही घंटा किणकिणत नव्हत्या, की
व्हायोलिनचे आवाज ऐकायला येत नव्हते. तसं पाहिलं तर जात, वय, उंची, वर्ण, पगार, घरची
स्थिती सगळं काही मॅच होत होतंच. सो टेक्निकली काही प्रॉब्लेम नव्हता. पण समोरासमोर
बसलो, जुजबी प्रश्नोत्तरं झाली की ’आता काय?’ असं व्हायचं. ’तुम्हाला दोघांनाच काही
बोलायचंय का?’ असा उदार प्रश्नही विचारला जाई आणि अशा अनेकांशी मी बोललेही. तिथेही
तेच व्हायचं.
माझ्या
काहीच स्पेसिफिक अपेक्षा नव्हत्या किंवा अटीही नव्हत्या. तेवढी अक्कलच कुठे होती? मला
काय हवं आहे यापेक्षा काय नको आहे हे पक्कं होतं, बाकी कोणत्याची ऍडजस्टमेन्टची तयारी
होती. एकत्र कुटुंबात रहायची तयारी होती. खूप जास्त ऍम्बिशियस प्लॅन्स नव्हते. टिपिकल
सदाशिव पेठी असल्यामुळे ’साधी राहणी, उच्च विचारसरणी’ यावर भर होता. परदेशात मात्र
मला जायचं नव्हतं. तेव्हा अनेक मुली २१ दिवसात लग्न करून अमेरिकेत जात होत्या. पण मला
अमेरिकेत जायचंच नव्हतं. याचं कारण म्हणजे इकडे मी जे शिक्षण घेतलं होतं ते अमेरिकेत
ठार निरुपयोगी! म्हणजे एक तर तिकडे जाऊन परत शिका नाहीतर घरात बसा. मला दोन्ही पर्याय
मान्य नव्हते. (आता वाटतं, की तिकडे जाऊन शिकले असते किंवा बसले असते घरी तर काय बिघडलं
असतं? इथे राहून त्या शिक्षणाचा उपयोग करून, नोकरी करून काय दिवे लावले? शिक्षणाचा
असा कोणता लय भारी उपयोग केला? पण ही सगळी पश्चातबुद्धी!)
मुद्दा
असा, की ’दोघेच’ जेव्हा बोलत असू तेव्हा माझ्यापाशी काही मुद्देच नसायचे डिस्कस करायला!
पण किमान समोरच्या माणसाशी गप्पा माराव्यात असं तरी वाटलं पाहिजे ना? तेच नेमकं होत
नव्हतं. मुलांमध्ये काही खोट होती का? नाही. काही प्रॉब्लेम होता का? नाही. विचित्र
होती का? नाही. मग काय नव्हतं? क्लिक होत नव्हतं. बस हेच उत्तर.
मुलगा
पाहून आलो की वडिल विचारायचे, आवडला का? मी म्हणायचे नाही. ते विचारायचे काय नाही आवडलं?
मी सांगायचे, सांगता येत नाही नीट. आणि ते गप्प बसायचे. स्थळ पाहून आल्यानंतर त्यांच्याकडून
काही फोनच आला नाही, तर मला हायसंच वाटायचं, पण त्यांच्याकडून ’पुढे जाऊया का?’ असा
प्रश्न आला आणि मला नकार द्यायचा असेल तर मात्र माझे जाम हाल व्हायचे. होकार नाहीये
हे पक्कं असायचं, पण त्यांना न दुखावता आणि मुख्य म्हणजे वडिलांचा अपेक्षाभंग न करता
कसं सांगायचं हे मला काही केल्या कळायचं नाही. खूप अपराधीपणाने मी त्यांना ’नाही आवडला’
असं सांगायचे, मग ते पुढे कळवायचे.
कांदेपोह्यांच्या
कार्यक्रमादरम्यान मुलं, मुली आणि त्यांचे आई-वडिल हे सगळेच एका विचित्र फेजमधून जात
असतात. सगळेच तणावाखाली असतात. लग्नाच्या गाठी स्वर्गामधल्या असल्या तरी पृथ्वीतलावर
त्या शोधणं कर्मकठिण. दर वेळी स्थळ बघायचा कार्यक्रम असला की ’हेच असेल का ते?’ या
प्रश्नावर सर्वांचंच ध्रुवीकरण- यात मुलगेही आले आणि मुलीही. मुलांनाही धडधड, एक्साईटमेन्ट,
नकाराचे अपे़आभंग असणारच की. मुली एकट्याच सफर होतात असं नाही. पण मुलींना मान खाली
घालायची वेळ जास्त येते त्यामुळे ते मुलींसाठी जास्त क्लेशकारक असतं असं मला वाटतं.
माझ्या बाबतीत सांगायचं, तर एक तर साधारण रूप आणि अगदीच किरकोळ शरीरयष्टी यामुळे ’दिसण्याच्या’
बळावर स्थळ मी पटकावूच शकणार नव्हते. बुद्धिमत्ता आणि कुटुंब यांच्या बळावरच जो कोणी
मिळाला असता तो. त्यामुळे त्याचीच वाट बघणं चालू होतं. पण पूर्ण आठवडा एका वेगळ्याच
मन:स्थितीत घालवल्यानंतर सुट्टीचा दिवसही फलश्रुती न होणा-या बघण्याच्या कार्यक्रमात
घालवायचा जाम त्रास व्हायला लागला होता आणि टेन्शनही येत होतं. या दरम्यानचे हे काही
किस्से.
पहिला
किस्सा, मी मुलाला दिलेल्या नकाराचा- नेहेमीप्रमाणे त्यांची फॅमिली बॅकग्राउंड उत्तम
होती. मुलगाही व्यवस्थित होता. आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. त्याची आजी, आई-बाबा
आणि तो असे होते. बोलण्यातून दोन्ही बाजूंनी ओळखी निघाल्या आणि वातावरण अगदी अनौपचारिक
झालं. माझे आई-वडिल दोघेही खुश होते. पण मुलगा ज्या पद्धतीने वावरत होता, बोलत होता
ते मला काही कारणास्तव आवडतंच नव्हतं. ते सगळे लोक खूपच चांगले होते, प्रेमाने बोलत
होते…’हे आपलं सासर’ असं मी इमॅजिन करू शकत होते, पण ’हा आपला नवरा’ असं काही केल्या
मनातून ऍक्स्पेटच करता येत नव्हतं. खूपदा मी मनातून स्वत:ला पुश केलं, की काय हरकत
आहे? पण मनातून नकारच येत गेला. माझे आई-वडिल आणि आजीही खूपच निराश झाले माझा नकार
आल्यावर. सुदैवानेच त्यांनी प्रेशराईज केलं नाही.
दुसरा
मुलगा होता ठाण्याचा. मस्त होता. उंच, हॅन्डसम आणि ऍम्बिशियसही. ठाण्यात राहून फोर्टला
जायचा. मला एकदम पसंत होता. पण त्याच्यापुढे मी एकदमच सामान्य होते. त्याने नकार दिला, तो मला अपेक्षित होता तसा… पण
तरी मनातून एक धुगधुगी वाटत होती... या नकारानंतर मी खरंच खट्टू झाले होते.
असो.
त्यानंतरचा
किस्सा म्हणजे खरंच क्लेशकारक आहे. अशी स्थिती कोणाच मुलीवर न येवो. सिरियसली. या मुलाची
परिस्थिती सेम माझ्यासारखी होती. आई-वडिल पुण्यात, तो नोकरीनिमित्त मुंबईत, दर वीकेन्डला
पुण्यात यायचा. इथे प्राथमिक बघाबघी झाल्यावर ’तुम्हाला दोघांनाच काही बोलायचं आहे
का?’ या प्रश्नावर तो म्हणाला, बाहेर गेलो तर चालेल का? तोवर ’दोघांचं बोलणं’ म्हणजे
घरातल्याच दुस-या खोलीत किंवा बाल्कनीत असे. त्याचा डॅशिंग प्रश्न मला आवडला. वडिलांनी
परवानगी दिली आणि आम्ही त्याच्या कारमधून निरुद्देश फिरायला बाहेर पडलो. त्याकाळी मुलाकडे
स्वत:ची कार असणं हीही एक रेअर गोष्ट होती :) भरपूर गप्पा मारल्या- मुख्यत्वे मुंबईच्या. तासाभराने परत सोडलं त्याने मला. जाताना म्हणाला,
की पुढच्या शनिवारीही भेटूया का? त्याच्या कारमध्ये एक पुस्तक होतं. त्याने मला ते
वाचायला दिलं… म्हणाला शनिवारी बोलू यावर. मला हे सगळं जरा वेगळं आणि चांगलं वाटत होतं…
आजवरपेक्षा वेगळं. वडिलांना मी सगळं सांगितलं. ते म्हणाले ठीके. भेटा पुढच्या शनिवारीही.
पुढच्या शनिवारी तो दुपारी चारलाच आला. आठवड्यात मी पुस्तकाचा फडशा पाडला होता. मस्त
होतं पुस्तक. मी आजवर वाचलं होतं त्यापेक्षा वेगळं पण अद्भुत. याची टेस्ट अशी असेल
तर फारच छान! मनाने ऑलरेडी एक चेकबॉक्स टिक केला होता. वडिलांनी साडेसातला घरी या अशी
तंबी दिली. आम्ही परत लॉन्ग ड्राईव्हला गेलो. घरचे लोक, त्यांचे स्वभाव, करियर, मुंबई
वि पुणे अशा कित्येक विषयांवर गप्पा मारत होतो. एक ईझ वाटत होती. मी पहिल्यांदाच एका
अनोळखी मुलाशी इतकं बोलत होते. मनात कुठेतरी आशा पल्लवित व्हायला लागल्या होत्या. आम्ही
मग हॉटेलमध्ये गेलो. त्याने मला विचारून वगैरे ऑर्डर दिली. माझ्याकडचे एकेक चेकबॉक्सेस
हळूहळू टिक व्हायला लागले होते. अखेरीस आपला शोध संपतो आहे असं वाटत होतं. तोही निवांत
गप्पा मारत होता, जोक्स मारत होता… त्याच्याकडूनही काही प्रॉब्लेम असेल असं वाटत नव्हतं.
आम्ही
खाऊन निघालो आणि मला घरी सोडताना तो म्हणाला, माझी बहिण आणि मी खूप क्लोज आहोत. (तिचं
लग्न झालेलं होतं आणि ती अमेरिकेत होती.) तिला तुझा फोटो पहायचा आहे (मोबाईल्स, स्काईपपूर्वीचा
हा जमाना आहे), तर मला तुझा एक छान फोटो देशील का प्लीज? (माझे लग्नाळू फोटो काढलेले
नव्हते. पत्रिका-माहिती पडताळून धडक चहा-पोहे मोहिमाच चालू होत्या.) इथे मला
instinctively काहीतरी खटकलं होतं. पण वरवर मला काही जाणवलं नाही. मी जोरात ’त्यात
काय, देते की’ टाईप्स होकार दिला आणि त्याला माझा एक त्यातल्यात्यात बरा असा फोटो दिला.
त्याने पोलाईटली माझ्या आई-वडिलांचा निरोप घेतला आणि गेला. इकडे मी ऑलमोस्ट हवेत होते.
काय-काय बोलणं झालं मी त्यांना सांगून टाकलं आणि ’माझी या मुलाशी लग्न करायला हरकत
नाहीये’ असं थेट स्टेटमेन्ट पहिल्यांदाच केलं. आई-वडिल अर्थातच आनंदले. वडिल म्हणाले,
उद्या बोलतो त्यांच्याशी.
मी
रात्रभर हवेत होते. लग्नाळू मुलींच्या मानसिकता मोठी विचित्र असते. मी लग्नाळू तर होतेच,
पण socially awkward ही होते आणि inferiority complex ने ग्रस्त होते. त्यामुळे ’आपण
कोणाला आवडू?’ हीच शंका कायम मनात. लग्नाची खटपट सुरू केल्यापासून अनेक निराशाजनक अनुभव
आलेले असल्यामुळे ’आपलं लग्न होणार आहे की नाही?’ या प्रश्नाची पायरी मी चढायला लागले
होते. जी मुलं मला आवडत होती, त्यांच्याकडून नकार, जिथून होकार, ती मला आवडत नाहीत
अशा विचित्र साखळीत अडकले होते. त्यामुळे एखादा मुलगा आपल्याला आवडला आहे आणि त्यालाही
आपण आवडत आहोत आणि इतकंच नाही, तर कदाचित आता आपलं त्याच्याशी लग्नच होईल- ही भावना
अत्यंत सुखावणारी होती. मन परतपरत त्या दोन शनिवारी एकत्र घालवलेल्या चार तासांतलं
प्रत्येक मिनिट जगत होतं. स्वप्न तर रंगायला लागलीच होती. कुठेतरी एक भावनिक गुंतवणूकही
झाली होती. त्या रात्री मी जवळपास तरंगतच झोपले.
दुस-या
दिवशी वडिलांनी त्यांच्याकडे फोन केला. नक्की काय बोलणं झालं माहित नाही, पण वडिल आम्हाला
म्हणाले, की ते एक-दोन दिवसात कळवतील. त्यांचं मुलीशी बोलणं व्हायचंय अजून. इथे मला
परत काहीतरी खटकलं. मुलगी तर लग्न करून गेली. तिचं काय आहे इतकं? आई-वडिल-मुलगा यांना
मी पसंत असेन तर मुलीच्या पसंतीचं काय इतकं? मी वरवर काही बोलले नाही. आई-आजी-वडिल
काहीतरी तर्क मांडत होते, पण मी नीटसं ऐकलं नाही. परत मुंबईला जायची व्यवधानंही होतीच.
पण तो आठवडा मात्र वाईट गेला. मन सतत त्याच-त्या आठवणी जगत होतं, पण स्वप्न बघायची
की नाही याचं उत्तर मिळत नव्हतं. मध्यंतरीच्या फोनवर वडिलही काही बोलले नाहीत. पुढच्या
शनिवारी घरी गेले. वडिलांनी मला समोर बसवलं, आणि म्हणाले, त्यांचा ’योग नाही’ असा निरोप
आला आहे. एकाच वेळी दोन मुली त्यांनी पसंत केल्या होत्या आणि ज्या मुलीवर त्यांची अमेरिकेतली
मुलगी शिक्का मारेल, तिलाच फायनल पसंती मिळणार होती. दोन्ही मुली चांगल्याच होत्या,
त्यांना कोणतीही चालणार होती. पण तिने दुस-या मुलीला पसंत केलं होतं. आमचा योग नव्हता.
फोटोही साभार परत आला होता. एक बारिकसं ’सॉरी’ही आलं होतं.
एका
वेळी दोन मुली? कोणतीही चालणार होती?? मुलाचंही हेच मत होतं? इतकं उघडउघड शुद्ध व्यवहाराच्या
पातळीवर चालू होतं म्हणजे हे? म्हणजे हा माझ्याबरोबर संध्याकाळी फिरत होता तेव्हा तो
सकाळी वेगळ्याच एका मुलीबरोबर असंच फिरून आला होता? जे माझ्याशी बोलला तेच तिच्याशीही
बोलला होता? तेच जोक्स केले होते? त्याच हॉटेलात नेलं होतं? मला जाणवलेली ती आमची जुळलेली
वेव्हलेंथ खोटी होती? मी त्याच्यात गुंतत होते आणि तो सर्व वेळ मला केवळ साईझ-अप करत
होता? सकाळच्या मुलीशी कम्पेअर करत होता? मनात नोट्स काढत होता?- या प्रश्नाला मुलगी
क्र. १ ने असं उत्तर दिलं आणि मुलगी क्र. २ ने असं. १ समोर टिक, २ समोर फुली! १ समोर
टोटल इतक्या टिक्स, इतक्या फुल्या. २ समोर इतक्या टिक्स, इतक्या फुल्या. एकूणात १ पसंत,
२ ला नकार कळवणे. हे असं चालू होतं सर्व वेळ?????
मला
इतकी शिसारी आली! किती भाबडेपणा तो आपला… लग्नसंस्थेवर विश्वास ठेवून आपण आपलं मनच
कोणासमोर तरी उघडं करतो आणि त्याच्यालेखी तो सगळाच केवळ एक हिशेब असतो? इतकं भावनाशून्य?
I was seriously heartbroken. खूप खूप त्रास झाला मला त्या सगळ्याचाच. माझ्या आई-वडिलांनाही
हे फार जिव्हारी लागलं. तो वीकेन्ड भयाण शांततेत
गेला.
पण
नेमेचि येतो पावसाळा… नुसार पुढच्या रविवारीही एक स्थळ बघायला जायचंच होतं. माझी मुळीच
इच्छा नव्हती. हे नुकतंच झालेलं प्रकरण खूपच दुखत होतं. कोणावर भरवसा ठेवायचा, कोणाशी
काय बोलायचं नक्की आणि त्यातून निष्पन्न तरी काय होणार? मनात निराशाजनक विचार येत होते.
त्यात त्यांच्याकडे जायचं होतं सकाळी आणि त्याच सकाळी मित्र-मैत्रिणींबरोबर नेमका सिंहगडाचा
बेत ठरला होता. शनिवारी मी घरी कधी नव्हे ते खूप कटकट केली, खूप ओरडाआरडा केला. पण
वडिल ठाम होते. झालंगेलं विसरून लग्न ठरत नाही तोवर प्रयत्न करावेच लागतात असं त्यांनी
मला सांगितलं. आईने, आजीनेही समजावलं. ते सगळेच त्या वेळी मला इतके बिचारे वाटले की
एका पॉइंटनंतर मी कधी ’ठीक आहे’ म्हणाले मलाच कळलं नाही.
आणि
मग माझ्याच वयाचे सगळे स्वच्छंदी, आनंदी मित्र-मैत्रिणी जेव्हा खडकवासला, सिंहगड अशी
मौजमजा करत होते, त्याच वेळेला मी अत्यंत निरिच्छेने एक मुलगा पहायला गेले. ते रहात
होते तो भाग नवीन डेव्हलप होत होता. घर पटकन सापडलं नाही. काहीच्या काही डायरेक्शन्स
सांगितल्या होत्या. माझ्या वैतागाने परत डोकं
वर काढलं. कसेबसे विचारत विचारत पोचलो एकदाचे. घर अगदी नवीन होतं, नुकतेच शिफ्ट झाले
होते ते लोक. दार मुलाच्या आईने उघडलं. त्याचा धाकटा भाऊ पुढच्याच खोलीत पेपर वाचत
बसला होता. आम्ही बसेपर्यंत मुलगा बाहेर आला. नमस्कार वगैरे झाले. नवीन लोकॅलिटी, नवीन
लोक, शेजारी वगैरे बोलणं चालू असताना मुलाची आई म्हणाली, अरे तिला घर दाखव. मी एव्हाना
टोटली निर्विकार मनोभूमिकेत होते. व्हायोलिन, घंटा वगैरे आपल्या बाबतीत काहीही वाजणं
शक्य नाही हे मनाने स्वाकारलं होतं. लग्न करताना तडजोडच करावी लागणार आहे हे मी जणू
मान्यच केलं होतं. फक्त आधी कोण हरतं?- मी का वडिल याची वाट होती. को-या मनाने मी निघाले
त्याच्यामागे घर बघायला. पॅसेजमध्ये एक दार होतं आणि दारावर चक्क उर्मिला मातोंडकरचा
’रंगीला’मधलं ’ते’ उन्मत्त पोस्टर होतं! ते बघताच मला ’चर्र’ झालं. दार बंद होतं, ते
उघडण्यासाठी तो एक क्षणभर थांबला. माझी नजर सहज त्याच्या पायांकडे गेली. त्याच्या दोन्ही
पायांच्या अंगठ्यांना चक्क लाल नेलपॉलिश लावलेलं होतं!!! I couldn’t believe my
eyes! लग्नाळू वयाचा अक्कल असलेला मुलगा होता
ना हा? आवडतात नट्या, पण आता झालास ना मोठा? आणि कसलं पोस्टर लावतोस तू स्वत:च्या खोलीबाहेर?
बर याच्या लहान भावाने लावलं असेल असं एक घटका मान्य केलं, तरी हा भाऊ ही अंदाजे माझ्याच
वयाचा होता. म्हणजेच ते तसलं पोस्टर ’बाय चॉईस’ लावलेलं होतं. नेलपॉलिश तर आठ-दहा वर्षाची
मुलंही लावून घ्यायला लाजतात आणि याच्या पायाला लालेलाललाललाल नेलपॉलिश?? ही कसली आवड?
काय प्रकार आहे हा? कदाचित त्या सगळ्यालाच एखादं लॉजिकल उत्तर असेलही, पण त्या क्षणी मात्र मी संपूर्ण हुकले. डोक्यात घण पडायला लागले. काय होतं हे? ही वेळ आली होती माझ्यावर?
खरंच इतकी वाईट, इतकी गयीगुजरी होते मी? लग्न म्हणजे तडजोड आलीच हे मान्य होतं, पण
अशी, इतक्या लेव्हलची करावी लागणार होती मला? एक डिसेन्ट मुलगाही मला मिळू नये? स्वत:बद्दल
कमालीची शरम वाटायला लागली. ते शिक्षण, तो ईगो, ते स्वत:च्या पायावर उभं असणं सगळं
केराच्या टोपलीत गेलं. लग्न या प्रकाराचाच तिटकारा येऊ लागला.
हे
मी पाहिलेलं शेवटचं स्थळ!
****
Disclaimer:
Fact and fiction are intertwined together in this work.
2 comments:
या ’भयानक’ प्रकारात घेतलेले सारे अनुभव आठवले.
पूनम
तुझे मुंबईतल्या नोकरीचे अनुभव खूपच छान लिहीले आहेस. मीही ९३-९४ मधे सीप्झ मधेच नोकरीला होते. थोड्याफार फरकाने अशाच अनुभवातून गेले आहे. मी जुहू ला रहायचे, होस्टेल मधे. रोज बस ने अंधेरी वेस्ट, तिथून भलामोठा पादचारी पूल पार करुन चालत चालत कंपनी च्या बस स्टॉप पर्यंत अंधेरी इस्टला. सगळे गुजराथी लोक. कुणाशी ओळख नाही. चोरुन, संकोचाने डबा खाणं, रात्री न आवडणारं होस्टेल चं जेवण, चमक धमक असणार्या होस्टेल च्या मुली, रोज ऑफिस मधून आल्यावर कपडे धुणं, भूक लागली तरी नो ब्रेकफास्ट! चीझ सॅंडविच तर मी तेव्हा पहिल्यांदा खाल्लं!
आई वडिल दूर विदर्भात. आणि त्यांनी टाकलेला पूर्ण विश्वास. कधीतरी येणारे फोन. तळहाता एव्हढे फुलके, मोकळा भात, बेचव भाज्या! एकदा मी बोरीवलीच्या दूरच्या एका काकूकडे गेले होते. त्यांनी पोळी भाजी चा डबा दिला येतांना..ती पडवळाची भाजी अमृतासमान लागली होती तेव्हा!
Post a Comment