काही स्पेशल लोकांच्या पत्रिकेत जन्मत:च अनेक ’स्पेशल ग्रहयोग’ असतात. म्हणजे साधेसुधे रवी-बुध-गुरू-शुक्र-शनि ह्यांच्या युती, प्रतीयुती वगैरे नव्हेत. ते तर काय सर्वांच्याच पत्रिकेत असतात. पण ’स्पेशल ग्रहयोग’ म्हणजे ’कोणत्याही-रांगेत-शेवटचा-नंबर-असणे’ योग; ’घाई-असताना-घराचीकिंवागाडीचीकिल्ली-नसापडणे योग’, ’मुसळधारपाऊस पडत असताना-घरी छत्री विसरणे-योग’, ’कशातही-निवड-होत-असताना-आपण-शेवटचा प्रेफ़रन्स असणे’ योग वगैरे वगैरे. आपण तिकिटाच्या रांगेत उभे असताना आपला नंबर येताच लंच टाईम होणे योग, झालंच तर, कधी नव्हे ते कोणी मोहक व्यक्ती आपल्याकडे बघून स्मित देत असताना नेमका आपला चेहरा आणि पेहराव नीचांकी बावळट असणे योग हेही आहेतच. असो. तर ह्या असे योग काहीच ’स्पेशली सिलेक्टेड लोकांच्या’ नशीबात असतात बरंका. त्यासाठी गेल्या जन्मी काही अत्यंत नीच पापं केलेली असणार बहुधा ह्या लोकांनी!
खरंतर, ’ते लोक’ असं म्हणून मी अलिप्तपणे नुसती स्टेटमेन्ट करून बसू शकत नाही, कारण असा एक अत्यंत हटके, दुर्मिळ, एकमेवाद्वितीय योग खुद्द माझ्या वाट्याला ग्रहगोलांच्या माध्यमातून आलेला आहे. तो म्हणजे ’कोसळती धारा’ योग!
ऐकलं होतं ह्या योगाबद्दल कधी? नाही ना? मग! तेच तर म्हणते मी. माझ्या पत्रिकेत नक्की कोणा ग्रह-गोल-योग-युत्या आणि गेल्या जन्मीची पापं-पुण्य-पुढच्या जन्मात कॅरी ओव्हर झाली आहेत कोणास ठाऊक की मी ह्या ’कोसळती धारा’ची ब्रॅन्ड अॅम्बॅसॅडॉर (हायला! केवढे अर्धचंद्र!) झाले आहे हे तो ब्रह्मदेवच जाणे! उपभोक्ती मात्र मी आहे हे नक्की.
तर काय असतो हा ’कोसळती धारा’ योग? हा योग ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत असतो, ती व्यक्ती जिथे जाईल तिथे पाऊस पडतो का? छे छे! तसं नाही. तसं असतं तर आत्तापर्यंत दुष्काळग्रस्त गावांसाठी मला कधीच किडनॅप नसतं का केलं गेलं? शिवाय तसं असतं तर त्याला एक ’परमेश्वरी वरदहस्ताचा’ अॅंगल मिळाला असता. इथे मी चक्क वैतागलेली आहे. कारण ह्या योगामुळे मी ज्या ज्या घरात रहायला जाते, त्या त्या घरात गळायला लागतं! खोटं वाटतंय? खरंच विश्वास ठेवा. आईशप्पथ असंच होत आलंय माझ्याबाबतीत! एकाही शब्दाची अतिशयोक्ती नाही. विस्ताराने, अगदी पहिल्यापासून सांगतेच आता.
मी अगदी लहान असताना आम्ही वाड्यात रहात होतो. बाकी वाडा तसा भक्कम होता. पण नेमकं आम्ही रहात होतो ते घर गळकं होतं! काय म्हणावे ह्याला? माझी आई बिचारी दरवर्षी जमेल ते उपाय करायची. पण ढिम्म उपयोग झाला. त्याकाळी पाऊस नियमित आणि भरपूर पडत असे. परिणामी त्या घरात दर वर्षी गळायचं. छतावर पाणी गळल्यामुळे मस्त डिझाईन्स झाली होती (-आम्ही आहे त्यात सुख शोधणारे!) अशी अनेक अनेक वर्ष त्या गळक्या घरात काढल्यानंतर त्या वेळेच्या पद्धतीनुसार तो वाडा पाडायचे ठरले. इथे आम्ही आनंदात की किमान आता तरी नवीन घट्ट न गळणारं घर मिळेल! मधल्या काळात दोन वर्ष पर्यायी जागेत रहात होतो. तो एक जुना भक्कम बंगला होता. आम्ही पहिल्या मजल्यावर रहात होतो, त्याच्यावर गच्ची! गेलो त्याच वर्षी एका खोलीत गळायला लागलं! बंगला गळण्याइतका जुना त्याच वर्षी झाला त्याला कोण काय करणार, नाही का?!
यथावकाश, नवी इमारत उभी राहिली. आमचं घर सुरेख दिसत होतं. आमच्या घरावर अजून एक फ्लॅट होता. त्यामुळे त्या घरात तरी नक्की गळणार नव्हतं. तो आमचा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटला! आमच्या घराच्या एका खोलीच्या वर वरच्या फ्लॅटचं टेरेस होतं. तिथे त्यांनी सुर्रेख बाग फुलवली होती. फुलवेनात का! पण त्यासाठी त्यांनी त्या घरात येणार्या पाईपलाईनला बरंच फिरवलं होतं, त्यांच्या घराच्या जमिनीतून, जी कर्मधर्मसंयोगानं आमच्या घराच्या छताच्या लगेचच वर होती! हे असं तिरकं काम केलं की ते कधीच सफाईदार होत नाही. त्यामुळे त्या पाईपलाईनला क्रॅक गेला. ती गळू लागली. कुठे? करेक्ट! आमच्या घरात! मी आणि आईने अक्षरश: डोक्याला हात लावला होता ते पाहून!
पुढे माझं लग्न ठरलं. त्या निमित्ताने सासरघरी डागडुजी, थोडे नवीन बांधकाम असे केले गेले, लग्नाआधी. लग्न होऊन मी त्या घरी आले, आणि त्यानंतरच्या पावसाळ्यात नवीन बांधकाम केलं होतं, तिथे सुरूवात! बाकी जुनं बांधकाम खणखणीत. नवीन बांधलेलं ओलं! जवळजवळ हाच सीन आम्ही नवीन घर तिथे रिपिट. त्या घराच्या छतामधून तर मी एकदा दोन बादल्या पाणी काढलंय- कोरं बांधकाम केलेलं हां! त्या घरात रहायला गेलो तेव्हापासूनच तिथे गळती समस्या आहे. काय करणार! मी आले ना त्या घरात रहायला. त्याला गळणं क्रमप्राप्त आहे! मग ते कोरं करकरीत का असेना!
तरी मध्यंतरी बर्याच ठिकाणची गळती काढली. मग आला दोनहजारबाराचा पावसाळा. पुण्यात पाऊसच पडला नाही. घरात एकदाच दोन तास पाणी येऊ लागले. आता पाणीच नाही म्हणून तरी गळती थांबेल की नाही! छे! नाव नको. पाण्याच्या नियोजनासाठी सोसायटीमध्ये नवीन पाईपलाईन घातली गेली. ती आमच्या घरातून जिथून जात होती, तिथे लीकेज! ते अर्थातच तातडीने दुरुस्त केलं, तर आता एक नळ गळतोय. त्याच्या डोक्यावर एक थापटी मारली की बंद होतो बिचारा. टेक्निकली गळका आहे, पण अॅक्च्युअली गळत नाहीये. मी विचार करतेय की तो दुरुस्त करूच नये. बाळाला तीट लावतात, तसं एखादं गळकं काहीतरी घरात असलं तर माझं बाकी घर तरी सुरक्षित राहील!
मध्यंतरी, कोणाला हा माझा ’कोसळती धारा’ योग निष्प्रभ करण्याच्या युक्ती ठाऊक असतील तर कृपया तातडीने वेळ न दवडता लगेच संपर्क करा अशी माझी कळकळीची विनंती. शनी-मंगळ वगैरे डेन्जर युतींचीही शांत होऊ शकते, तर माझ्या ह्या समस्येचं काहीतरी निराकरण असेलच ना? चहा तर मी रोजच गाळते, आसवंही गाळते अधूनमधून. त्यात काही प्रॉब्लेम नाही. पाण्याची गळती मात्र नको रे बाबा!
7 comments:
तुम्ही यावेळी निराळेच लेखन केलेत. कथाबाह्य. (टीव्हीवरच्या पुरस्कारांमध्ये एक 'सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम पारितोषिक' असे असते.)शुभेच्छा आहेतच.
धन्यवाद केदार :)
’हलकंफ़ुलकं लेखन’ ह्या उजवीकडे दिसत असलेल्या टॅबखाली ह्यासारखे ’कथाबाह्य’ लेख लिहीले आहेत मी बरेच :)
पूनम,
तुमच्या कोसळती धारा साऱखा माझ्या नशिबात हिंडतो वारा हा योग आहे. घरात किंवा ऑफिसमध्ये कितीही पेपरवेट ठेवा, जड वस्तू ठेवा..माझ्या गरजेची कागदपत्रे टेबलवरून खाली पडणारच. स्वतःची खात्री असतेच की, मी सगळे व्यवस्थित ठेवलेले आहे. कुठे गेलं आणि पाच मिनिटांनी येऊन बघितले तर हा सगळा पसारा...भोवतालच्या व्यक्तींचे त्यावेळचे डोळे खास प्रतिक्रिया देण्यातच गुंतलेले असतात.ः))
नेहमीइतकी मजा नाही आली वाचताना :-(
केदार>> :D It happens! :)
aativas- sorry :-( I hope next time's shall be better.
Mast.... ek navin yog kalala.... aata upay sangu shakat nai pan jo durmil yog aalay jamun aayushyat to enjoy karanyasati khup Shubhechha.... :)
हाहा ... हा योग कुणाच्या वाट्याला येऊ नये पण लिखाण आवडलंच. बाय द वे, आमच्या पत्रिकेत छपरातून गळणारं पाणी आणि नळाला मात्र पाणी नाही असाही योग होता काही वर्षं ;)
-अगो
Post a Comment