खूप दिवसांनंतर मोहिनीने आज ’फेसबुक’वर लॉगिन केले. ती काही रोज फेसबुकावर जाऊ शकत नव्हती. एक तर बँकेत अजिबात वेळ मिळत असे आणि अनेक वेबसाईट्स चालतही नसत. आठवण झाली, की घरून आठ-दहा दिवसांनी ते तिथे एक बरा विरंगुळा म्हणून जात होती. आज तसेच लॉगिन करतेय, तोवर वरच्या कोपर्यात पंधरा नवीन संदेश आलेले दिसले. एकदम पंधरा?! तिला जरा नवल वाटलं. तिने उत्सुकतेने ते पहायला सुरूवात केली आणि तिचा भ्रमनिरास झाला! सर्वच्या सर्व संदेश तिच्या शाळेच्या ग्रूपमधले होते! चिडचिड करतच तिने त्यावर एक नजर टाकायला सुरूवात केली.
मोहिनीला दहावी होऊन वीस वर्ष होत आली होती. ’वीस वर्ष पूर्ण’ ह्या निमित्ताने तिच्याच वर्गातल्या एका मुलाने त्यांच्या शाळेचा एक ग्रूप तयार केला होता. त्यात शाळेतली, तिच्या वर्गातली आणि बाकी तुकड्यांमधलीही अनेक मुलं-मुली होती. वीस वर्ष पूर्ण झाली, म्हणून एक स्नेहभेटीचा कार्यक्रम ठरवत होते, त्याच्याबद्दलच्या चर्चांनी एका बाजूला जोर धरला होता. इतके दिवस नुसतीच चर्चा होत होती, पण आता तारीख ठरली होती, आणि त्या अनुषंगाने चर्चा चालू होत्या. दुसर्या बाजुने कोणी जुने शालेय गॅदरिंगमधले फोटो टाकत होते, कोणी आठवणी लिहीत होते, कोणी ठावठिकाणा नसलेल्या मुलामुलींबद्दल विचारपूस करत होते.. सगळीकडची नावं परिचित होती, काही मुलांना ती आजच थेट वीस वर्षांनी बघत होती. नव्वद टक्के लोक परदेशात होते.. त्यांनी त्यांच्या बायको/नवरा आणि मुलांबरोबरचे फोटो टाकले होते, त्यांच्या प्रोफाईलवरून ते मोठ्या कंपन्यांमध्ये कामाला होते असं दिसतंच होतं. मोहिनीला एकाच वेळी हे ओळखीचे चेहरे दिसले म्हणून छानही वाटत होतं आणि एकेकाचे मुक्कामाचे देश, परिवाराचे फोटो, आयुष्यात स्थिर झाल्यानंतर चेहर्यावरही स्थिरावलेले सुख हे पाहून रागरागही होत होता. आता अचानक काय सगळ्यांना इतका पुळका आला आहे शाळेचा आणि एकमेकांचा, तिला समजेना! ती फाडकन फेसबुकमधून बाहेर पडली.
---
लंचटाईममध्ये मोहिनीचा मोबाईल खणखणला. अपूर्वाचा होता. अपूर्वा तिची शाळेतली एकमेव मैत्रिण म्हणावी अशी. त्यांचा आता तसा खूप काही संपर्क नव्हता, अधूनमधून फोन व्हायचे, इतकंच! अपूर्वाही तिच्या संसारात रमली होती, संगणकक्षेत्रात नोकरी करत होती. मोहिनीच्या अपेक्षेनुसार तिने शाळेच्या संमेलनाबद्दलच बोलायला फोन केला होता.
"अगं वाचत आहेस ना संमेलनाचे मेसेजेस? तुझा एकही मेसेज नाही तिथे.. अगं मी आयोजकांच्या कमिटीत आहे आता, अजून एक व्याप मागे लावून घेतला मागे!" उत्साहाने फसफसत अपूर्वाने टेप सुरूच केली.
इकडे मोहिनीच्या कपाळावर आठ्या पडल्या. काय ते सारखं शाळा एके शाळा? झालं ते जुनं आता. कशासाठी त्या स्मृती परत आठवायच्या? काय साध्य होणार आहे त्याने? तिकडे अपूर्वाने परत एकदा ’तू का नाही येत तिथे?’ विचारलं.
"मला बोअर होतं गं, काय तेच ते?"
"ए! तेच ते कुठंय? पहिल्यांदा भेटणार आहोत आपण चक्क वीस वर्षांनंतर! तुला काहीच एक्साईटमेन्ट नाहीये? कमालच आहे बाई!"
"काय करायचं भेटून? तू कशी? मी कशी? घरी कोण असतं? नोकरी कुठे? मिस्टर काय करतात? मिसेस कुठे असतात? मुलं किती? ह्याच प्रश्नांचा सामना करायचा ना? नव्या उत्साहानं ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायची शक्ती नाही आता माझ्यात! आणि तेही शाळेतल्या मुलामुलींना? नको मला आग्रह करूस प्लीज!" इतकं बोलून जवळजवळ रडकुंडीला आलेल्या मोहिनीने फोन बंदच केला.
इकडे अपूर्वा गंभीर झाली. ही बाजू तिच्या लक्षातच आली नव्हती. नकळत तिने मोहिनीला दुखावले होते. तिला आठवलं, शाळेत अगदी खालच्या इयत्तेपासून मोहिनी खूप हुशार मुलगी होती. कायम पहिल्या तीनातच असायची. दिसायला साधारण असली, तरी चटपटीत होती, अक्षर सुरेख होतं, हसतमुख असायची, सर्व शिक्षकांची लाडकी होती. दहावीला तर ती बोर्डात येणार अशी सर्वांची खात्री होती, पण हुकला नंबर. तरी एकोणनव्वद टक्के मिळवून शाळेत पहिली आली होती. अकरावीला सायन्सला नामांकित महाविद्यालयामध्ये मोठ्या दिमाखात तिने प्रवेश घेतला होता. तेव्हाच ती आणि मोहिनी एका ग्रूपमध्ये आल्या होत्या. मित्रमैत्रिणी, महाविद्यालयाचे सुरूवातीचे गुलाबी दिवस, क्लास, प्रॅक्टिकल्स ह्यामध्ये अकरावीचं वर्ष कसं सरलं समजलंही नाही. तेव्हाच ग्रूपमधल्या विक्रांतशी मोहिनीचं सूत जमलं. तो काही त्यांच्या शाळेतला नव्हता, असाच नवीन ओळखीचा होता. तो आला आणि सगळंच चुकत गेलं. मोहिनी त्याच्याबरोबर बहकतच गेली. शिक्षणावरचा तिचा फोकसच ढळल्यासारखा झाला. ग्रूपमधून फुटून सतत ते दोघंच एकत्र रहायला लागले. काय भुरळ त्याने घातली तिला काय माहित! पण सतत आपल्या बुद्धीमत्तेमुळे चमकत असलेल्या मोहिनीला ’अभ्यास’ हा शब्दच वर्ज्य असल्यासारखा झाला. क्लासला दांड्या, वर्गात न बसणे सर्रास चालू झाले. विक्रांतचा हेतू नक्की काय होत हे कळलं नाही, पण बारावीला मोहिनीला चक्क ग्रूपला सदुसष्ट टक्के मिळाले फक्त आणि विक्रांतला ब्याण्णव! वर्तुळातल्या एकूणएक माणसाला धक्का बसला होता तेव्हा. ह्यानंतर अर्थातच मोहिनी आणि विक्रांतच्या वाटा वेगळ्या झाल्या. तो ठरल्याप्रमाणे अभियांत्रिकीला गेला. मोहिनीचे बाबा तिच्यावर प्रचंड चिडले होते. त्यांनी तिची रि-इव्हॅल्युएशनची विनंती साफ धुडकावली. त्यांनी स्वत:ची बदलीच स्वीकारली आणि बीडसारख्या तुलनेने मागास शहरात ते सगळेच स्थलांतरित झाले. तिला विज्ञान शाखाही सोडावी लागली आणि तिने वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला. ह्यानंतर मात्र संपर्क कमी झाला, संपलाच जवळजवळ.
तीन साडेतीन वर्षांपूर्वी मोहिनी परत पुण्यात आली होती. तेव्हा तिने बरीच खटपट करून अपूर्वाच्या आईकडून तिचा नंबर मिळवला होता आणि चक्क आपणहोऊन फोन करून भेटायची इच्छा व्यक्त केली होती. अपूर्वा फार उत्सुकतेने भेटायला गेली होती. मोहिनीला बघून तिला फारच आश्चर्य वाटलं होतं. चेहर्यावरचं तेज लोपलेलं, काहीशी फिकुटलेली, अशक्त अशी दिसत होती. अपूर्वाला तिला पाहून खूपच वाईट वाटलं होतं. नंतर बोलण्यातून मोहिनीचा अजूनच दु:खद इतिहास समजला. तिचं लग्न होऊन नंतर घटस्फोटही झाला होता. सासरकडच्या लोकांनी मानसिक छळ केला होता भयंकर. सहा महिन्याचं लग्न आणि तीन वर्षाची कायद्याची लढाई! बीडला तिने साधं एम. कॉम केलं होतं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेचच लग्न केल्यामुळे नोकरीही नव्हती. घटस्फोटानंतर बरेच प्रयत्न केल्यानंतर कोणाच्यातरी ओळखीने एका को-ऑपरेटिव्ह बँकेत मिळाली नोकरी, आणि तिथून आता पुण्यात एका प्रायव्हेट बँकेत मिळाली होती, म्हणून ती एकटीच पुण्याला निघून आली होती; आई-वडील बीडलाच स्थायिक झाले होते. नियती म्हणायचं की योग की अजून काही! एका हुशार, सिन्सियर मुलीची इतकी वाताहात पाहून अपूर्वाला मनापासून वाईट वाटलं होतं. मोहिनीच्या फिकुटलेपणाचं रहस्य आता समजलं. तिच्यात तो स्पार्कच उरला नव्हता काही. नशीबापुढे हतबल झाली होती बिचारी. जमेल तसा तिच्याशी संपर्क ठेवून तिला जी मदत करता येईल ती करायची ह्याची खूणगाठ तिने मनाशी बांधली होती.
शाळेच्या संमेलनाच्या निमित्ताने मोहिनीला जुन्या मित्रमैत्रिणींच्या ग्रूपमध्ये ओढून, तिचं थोडं तरी socialisation करायचं असं मात्र तिने ठरवून टाकलं. तशा ओळखीच्या, तरी आता अनोळखी मुलामुलींमध्ये राहून मोहिनी जरा हसा-बोलायला लागेल अशी तिची आशा होती.
--
स्नेहभेटीला दीड एक महिना राहिला आणि आयोजकांच्या हालचालींना वेग आला. अपूर्वा, सचिन, कैवल्य, अमोघ आणि पल्लवी असे पाच जण प्रमुख होते. त्यानिमित्ताने ते आधी शाळेत जाऊन आले. शाळेचं रूप खूपच बदललं होतं. आपल्यावेळची लहान शाळा आता खरंच एक मोठी नावाजलेली शैक्षणिक संस्था झाली आहे, हे पदोपदी दिसत होतं. वाढीव इमारती, बांधकामाचा सुधारलेला दर्जा, अद्ययावत उपकरणं त्याची साक्षच देत होते. त्यांना अचानकच काही जुने शिक्षक-शिक्षिका भेटल्या.. उभयक्षात निर्मळ आनंद पसरला. संमेलनाची कल्पना सर्वांनीच उचलून धरली. शाळेच्या नवीन इमारतीचा हॉल संमेलनासाठी वापरण्याची परवानगी विद्यमान मुख्याध्यापकांनी दिली. इथे फ़ेसबूकवर सतत अपडेट्स चालू होतेच. दिडशे मुलांपैकी साधारण नव्वद येतील असा अंदाज होता. वर्गणीचं आवाहन करण्यात आलं. वर्गणीचा द्यायला कोणाचीच ना दिसली नाही. सगळ्यांकडे नेट बँकिंगची सोय होती. पटापट पैसे जमायला लागले. पण अजून हात हवे होते मदतीला. आधी मेळावा, प्रत्येकाने आपापली नवी ओळख सांगणे, जुन्या शिक्षकांना बोलावून त्यांचा आदरसत्कार, आपल्यातल्याच काही मुला-मुलींचे विविध गुणदर्शन आणि मग जेवण असा भरगच्च कार्यक्रम होता. अपूर्वासह सगळेच भारले गेले होते. कोणी कल्पनाही केली नव्हती की शाळेतली ती गबाळी ध्यानं आज विविध शहरा-देशात राहतायेत, स्व-कर्तृत्वाने पुढे जात आहेत आणि कितीही नाही म्हणलं तरी आपल्या शाळेचं नावही झळकवत आहेत! फेसबूकवर रोजचे अपडेट्स येत होते. जे लोक लांब होते, ते मनानं तिथेच असायचे. शाळेत असताना क्वचितच एकमेकांशी बोलणारे आता खुशाल थट्टामस्करी करत होते एकमेकांसोबत. चहूबाजूंनी सूचना येत होत्या. एक ’टीम-स्पिरिट’चं वातावरण सगळ्यांमध्ये संचारलं होतं.
ह्या सगळ्यात अपूर्वाला मोहिनीची अनुपस्थिती चांगलीच खटकत होती. तिला एकटीलाच नाही, तर सर्वांनाच खटकत होती. मोहिनी त्यांच्या बॅचची स्टार विद्यार्थिनी होती. मेळाव्याच्या निमित्ताने नव्या-जुन्या चेहर्यांची उजळणी झाली, त्यात प्रामुख्याने मोहिनी आता कुठे असते, काय करते ह्याबद्दल अनेकांनी उत्सुकता दाखवली होती. अपूर्वाने मोघम ’माझा आहे तिच्याशी संपर्क आणि ती अधूनमधून हा ग्रूप बघत आहे’ असं लिहीलं होतं. तिला तिच्या कोशामधून बाहेर यायची आणि तिच्या आयुष्यात जे काही झालं आहे ते एकदा पूर्णपणे स्वीकारून पुढे जायची गरज आहे असं अपूर्वाला मनापासून वाटत होतं. ती काही मानसोपचार तज्ञ नव्हती. तरीही ज्या शाळेत ती चमकली, तिथेच मोहिनीने येऊन ताठ मानेने स्वत:च वास्तव स्वीकारणं आवश्यक आहे असं तिला प्रकर्षाने वाटत होतं. त्या दृष्टीने एक संधी अचानकच चालून आली. तिने लगेचच मोहिनीला फोन लावला.
"कशी आहेस?"
"मी ठीक आहे गं, तू सांग.."
"अगं माझं एक काम होतं तुझ्याकडे. शाळेत असताना तुझी चित्रकला काय सुरेख होती! अजूनही आहेस का टचमध्ये?"
इकडे मोहिनी निराशेनं हसली.
"चित्रकला? छे गं, रंग कधीच उडाले नाही का माझे?"
"असं का बोलतेस गं नेहेमी? झालं गेलं गंगेला मिळालं.. मुद्दा काय, की तुझ्या बोटात कला आहे. सराव नसेल. पण आहे, हो की नाही?"
"हं. त्याचं काय?"
"हां, तर मला छोटीशी ग्रिटिंग कार्ड्ज करून देशील का? ती एकदम छोटी असतात बघ, अगदी दोन इंचांची, तशी?"
"बघावं लागेल. दोनच इंचांची? काय लिहायचं आणि त्यावर?"
"फार काही नाही गं, साध्या शुभेच्छा, बेस्ट विशेस असं.."
"हां, आलं लक्षात. बहुतेक जमेल. मी मध्ये अगं कॅलिग्रफ़ी शिकले होते, असंच बघून. त्याने लिहिलं तर चालेल का?"
"हो तर! अगदी चालेल. हे मला आवडलं बघ. खरी कलाकार आहेस तू. लगेच तुला कायकाय सुचायला लागतं त्यात!" अपूर्वाला आपला सहज टाकलेला खडा वाया गेला नाही ह्याची खात्री पटली.
"कधी हवी आहेत? आणि किती हवी आहेत? कार्ड्ज म्हणतेयस मगाचपासून. दोन-चार हवी आहेत का?"
"शंभर!"
"शंभर???" मोहिनी ओरडलीच पलिकडून.
"आपल्या मेळाव्यासाठी गं" अपूर्वा हसून म्हणाली.
"ई! मी नाही करणार मग! मला नाही करायची. मला जमणारच नाहीएत शंभर शुभेच्छपत्र करायला. तुला काय मी इतकी रिकामी वाटले की काय?" मोहिनीने झटकून टाकलं. पण ऐकेल ती अपूर्वा कसली. तिनेही आपलं घोडं दामटलं..
"बर राहूदे. नाहीतरी छोटी ग्रिटिंग कार्ड्ज करायची म्हणजे खूपच खटपट आहे. तुला सर्टिफिकेट्सची कल्पना कशी वाटते? ती आपण छापून घेऊ शकू, आणि मग फक्त नाव तू लिहीशील कॅलिग्राफी वापरून? हे सोपं आहे, एक नाव लिहायचंय फक्त. करशील तू, हो ना?"
"अगं नाही! उगाच काय? मी का करू? तू प्रिन्ट घे करून.."
"ए! प्रिन्ट कुठे आणि लिहीलेलं कुठे? लिहील्यामुळे पर्सनल टच येतो. का झटकत आहेस तू? फेसबूक ग्रूप बघत आहेस ना? लोकांचा उत्साह ओसंडून वाहतोय. लोकांना काय करू आणि काय नको होतंय आणि तू अशी अलिप्त रहूच कशी शकतेस? ते काही नाही, हे काम तूच करायचं आहेस. प्रिन्टरकडून दोनचार सॅम्प्ल्स येतील ती तुला पाठवेन. त्यावर तुझी आर्टिस्टिक नजर फिरव आणि फायनल निर्णय तूच घे ओके? चला हे ठरलं तर मग. मी ग्रूपमध्ये हा अपडेट देऊन टाकते."
"अगं! तू मला गृहितच धरते आहेस? मी साफ नकार दिला तर?" मोहिनी चांगलीच नाराज झाली.
"मोहिनी, मला माहित आहे, तू टाळत आहेस तू. पण माझं कळकळीचं सांगणं आहे तुला. तू जितकी एकटी राहशील तितकीच एकटी पडशील. लोकांमध्ये ये, मिसळ, विनोद कर. हे तर आपले शाळासोबती. चांगली तेरा वर्ष आपण एकत्र काढली आहेत. त्यांच्यापासून दूर पळू नकोस. आणि हे बघ, तू तुझं वैयक्तिक आयुष्य त्यांच्यापासून लांब ठेवूच शकतेस ना. कोण तपासणी करायला येणार आहे? पण ये ह्या ग्रूपमध्ये. शाळेचं रुण चुकवल्याचं समाधान मिळतं एकाप्रकारे. असं झटकून टाकण्यापेक्षा माझ्या बोलण्यावर विचार करशील का? हं? मी वाट पाहीन तुझ्या फोनची.." काहीसं भावूक होतंच अपूर्वाने फोन ठेवला.
*******
हा शाळेचा हॉल ह्या मुलांना नवाच होता. नवीन इमारत बांधली दहा वर्षांपूर्वी तेव्हा बांधला होता. अपूर्वा आणि टीमला आयत्यावेळी बरेच स्वयंसेवक मिळाले होते, त्यामुळे हॉल सुरेख सजवला गेला होता. खुर्च्या मांडल्या होत्या. संयोजक टीमची गडबड चालू होती. मोहिनीही लवकरच पोचली. पण शांतपणे एका कोपर्यात उभं राहून बघत होती. एकेक मुलं येत होती. एकेकाला ओळखायला मजा येत होती. मुलग्यांचे तर चांगले बाप्ये झाले होते. मुली काही जाडम्मा झाल्या होत्या, काही होत्या तशाच होत्या, पण चेहरे बदलले होते, काहींमध्ये अजिबात बदल झाला नव्हता. नवीन चेहरा दिसताक्षणी चेहरे उजळून निघत होते, जवळ जाऊन हस्तांदोलनं, मिठ्या होत होत्या, विचारपूस केली जात होती, फेसबूकवरचा रेफरन्स घेऊन माहितीची देवघेव चालू होती. हे सगळं लांबूनच पहायलादेखील खूप मजा येत होती मोहिनीला. इतक्यात अपूर्वा तिला शोधत आली.
"मोहिनी, जरा चल. दिक्षित सर आणि उपाध्याय मॅडम येत आहेत. त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांना बूके दे.."
मोहिनीची जराशी चलबिचल झाली. ’चल गं’ असं नजरेनेच दटावत आणि तिच्या हातात दोन पुष्पगुच्छ कोंबत अपूर्वा तिला ओढत घेऊन गेली. दिक्षित सरांना लांबूनच पाहूनही मोहिनीचे पायच लटपटायला लागले. एकेकाळी आपण त्यांच्या किती लाडक्या होतो हे आठवून भरून आलं. सर किती थकलेले दिसत होते. हळूहळू चालत होते. केस बरेचसे गेले होते, जे होते ते पूर्ण पांढरे.. चष्मा मात्र तोच आणि पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट हा वेषही तोच. उपाध्याय मॅडमचंही वय दिसत होतं. दोघे कधीच निवृत्त झाले होते, पण उत्साहाने केवळ ह्यांच्या संमेलनासाठी म्हणून येत होते. पटकन मोहिनीने स्वत:ला सावरलं. त्या दोघांच्या स्वागतासाठी कमिटीतले इतर सदस्यही सरसावले पुढे. तिने त्यांच्यामधूनच वाट काढून हिंमत करत दोघांच्याही हातात पुष्पगुच्छ ठेवले.
"स्वागत सर, या मॅडम" अनेक आवाज उठले. दोघांच्याही चेहरे हसरे झाले. किंचित माना वर करून त्यांनी त्यांच्या जुन्या विद्यार्थ्यांना ओळखायचा प्रयत्न केला, पण पटकन कोणीच आठवेना. इतक्यात मोहिनीने दोघांनाही वाकून नमस्कार केला.
सरांनी पटकन तिला वर उठवलं.
"तुम्ही मोठे झालात आता. आता आपण बरोबरीचे झालो. हो की नाही? वाकून नमस्कार नका करू. कोण बरं तू?" ते मोहिनीचा चेहरा निरखत म्हणाले.
मोहिनीला गलबलून आलं एकदम.
"सर, मी मोहिनी, मोहिनी फडके. दहावी अ."
"अरे वा! मोहिनी फडके. ओळखलं तर! आमची स्टार विद्यार्थिनी. सर हिला विज्ञान आणि गणित दोन्हीत पैकीच्या पैकी गुण होते दहावीला. आठवलं ना?" उपाध्याय मॅडमनाही खूप आनंद झाला.
"हो हो, आलं माझ्याही लक्षात. मोहिनी, काय म्हणतेस? कशी आहेस? नंतर बोलूया आपण नक्की." सरांना खूप काही बोलायचे होते, पण आजूबाजूची गर्दी वाढत होती. मोहिनीचं पाहून अनेक जण त्यांच्या पाया पडायला सरसावले. कमिटीतले लोक त्यांना आत हॉलमध्ये घेऊन गेले. मोहिनी होती तिथेच थिजून थांबली. डोळे कधी भरून आले, तिचं तिलाही समजलं नाही.
आतला हॉल चांगलाच गच्च भरला होता. शिक्षक आल्यामुळे चांगलीच लगबग चालू होती. शेवटी सगळे स्थानापन्न झाले. सुबोध कर्णिकने संचालनाची सूत्र हाती घेतली. मोहिनीला गंमत वाटली. ह्या सुबोधला घडाघडा चार वाक्य बोललेली ऐकल्याचंही तिला आठवत नव्हतं, आणि तो चक्क संपूर्ण कार्यक्रम पुढे नेणार होता! किती बदल होतो माणसात! एका क्षणात तिच्यावर परत एकदा स्वत:च्याच कमनशिबाचं सावट पडलं आणि ती उदास झाली.
तिकडे कार्यक्रम सुरू झाला. त्या दिवसांची आठवण म्हणून सुरूवातीला सगळे उभे राहिले आणि त्यांनी ’एकसाथ’ शाळेची प्रार्थना म्हणली. वीस वर्षांनी कोणाला प्रार्थना पाठ असणार? म्हणून प्रार्थना लिहीलेले कागद आधी सर्वांना वाटण्यात आले. प्रार्थना झाल्यानंतर शाळेच्या प्रथेप्रमाणे सर्वांनी राष्ट्रगीतही गायलं. आजचे आवाज एकदम जोशपूर्ण आणि आत्मविश्वास असलेले होते. राष्ट्रगीत झाल्यावर सर्व स्थानापन्न झाले. मोहिनी चौथ्या ओळीत सर्वात कोपर्यात बसली होती. तिच्या शेजारी तिच्या एकेकाळच्या वर्गमैत्रिणी होत्या. पण संकोचाने ती आत्तापर्यंत कोणाशीच बोलली नव्हती. सर्व मुलं-मुली आपसात मोकळेपणाने बोलत होती. मोहिनीच एकटी काय ती बुजल्यासारखी होती. तिकडे सुबोधचे खुमासदार संचालन सुरू होते. त्याने दिक्षित सरांना चार शब्द बोलायची विनंती केली.. दिक्षित सर खरं म्हणजे त्यांचे वर्गशिक्षक. शाळेत असताना कोणाची टाप नव्हती त्यांच्याशी काहीही अवांतर बोलायची. पण काळाबरोबर सर्वच बदलत जातं. सर उभे राहिले तशी त्यांची वृद्ध कुडी अधिकच ठळक झाल्यासारखी दिसली लांबून.
"कशी सुरूवात करू समजत नाही. ’माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो’ असं म्हणावं तर तुम्ही आता इतके मोठे झाला आहात! आणि ’उपस्थित सभ्य स्त्री-पुरुषांनो’ म्हणावे, तर तुम्ही इतके लहान वाटता! तर ते असो. आज कित्येक वर्षांनी एकदम इतक्या विद्यार्थ्यांना एकसलग पाहतो आहे. तशी आता दृष्टी अधूच झाली आहे. पण मनाच्या आतल्या डोळ्याला तुम्ही सगळे लख्ख दिसता. ते दिवस स्पष्ट आठवतात. मी तुमच्याशी ज्या सक्तीने वागायचो तेही आठवतेच. तुमच्यातल्याच एका-दोघांना मी पट्टीने मारले होते ना? माझ्यावर राग नाही ठेवलात ना रे? तीच वेळ असते सावरायची, नाहीतर गाडी रुळावरून घसरायला वेळ लागत नाही! अर्थात ही आमची जुनीपुराणी विचारसरणी झाली!" सर मिस्किलपणे म्हणाले आणि सगळ्यांमध्ये माफक हशा पसरला. सर नुसतेच सक्त नव्हते, तर अतिशय रागीटही होते. एखादी चूक, बेशिस्त झाली, की संपलेच. नुसताच तो दिवस नाही, तर नंतरचे कित्येक दिवस त्या चुकीचा पाढा सर्वांसमोर वागला जायचा. "निवृत्त झाल्यानंतर तुरळक विद्यार्थी भेटतात, नमस्कार करतात, तेवढंच बरं वाटतं. आज तुम्ही यशाच्या अनेक शिड्या चढून अनेक शिखरं पादाक्रांत केली असतील. अनेक मोठ्या लोकांमध्ये तुमची गणना होत असेल. त्या निमित्ताने तुम्ही तुमच्या शाळेला आणि तुमच्या शिक्षकांना आठवत असाल- ही शिदोरीच आम्हा शिक्षकांना कायम पुरते, शिकवत रहाण्याचं बळ पुरवते. आज तुमच्याच निमित्ताने ह्या आपल्या संस्थेमध्येही मी सुमारे चार वर्षांनी आलो असेन. फार समाधान वाटलं, की तुम्ही तुमच्या शिक्षकांना, शाळेला विसरला नाहीत. असेच यशस्वी व्हा, मोठे व्हा." आपलं छोटंसं, तरी परिणामकारक भाषण संपवून सर बसले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. खाली बसलेल्यांपैकी श्रीधर उत्स्फूर्तपणे उठला आणि स्टेजवर जाऊन सरांच्या पाया पडला. "सर, मला मारलं होतंत" इतकंच हसत हसत म्हणाला.
"अरे बापरे! राग नाही ना रे बाबा माझ्याबद्दल? काय करतोस आता?"
"सर, मीही प्रोफेसरच आहे, गावातल्या कॉलेकमध्ये! गणित शिकवतो शास्त्र शाखेला.."
"उत्तम! पण, त्या मुलांना मारत नाहीस ना रे?"
सरांनी असं विचारताच एकच हशा पसरला. श्रीकरने नुसतीच जीभ चावत जोरात मान हलवली.. वातावरण कमालीचे उत्साही झाले.
ह्यानंतर एकेकाने स्टेजवर जाऊन आपल्याबद्दल सांगायचे होते. वीस वर्षापूर्वी शाळा सोडली, त्यानंतर काय केलं पुढे- शिक्षण, व्यवसाय, काही विशेष उल्लेखनीय कर्तृत्व, कुटुंब वगैरे. शाळेत ’रोल नंबर’ असायचे. त्याप्रमाणेच सगळ्यांचा पुकारा होणार होता. परत मोहिनी नर्व्हस झाली. काय सांगणार जाऊन? ना शिक्षण. ना कुटुंब. ना कोणतंही यश. उगाच आलो आपण इथे असं परत एकदा वाटलं तिला. हळूच सटकून निघावं असंही वाटलं, पण पाय बळ गमावून बसले होते. ’किती दिवस आणि कोणाकोणापासून पळणार अजून?’ ह्या हताश करणार्या प्रश्नानेही परत फणा काढला. ’आज आपलं जे काही झालेलं आहे, त्याला काही प्रमाणात आपण आणि काही प्रमाणात आपलं नशीब हे कारणीभूत आहे. हे स्वत:ला ठामपणे समजावून स्वीकारायला हवं होतंच कधी ना कधीतरी. मग आजच का नाही? ह्याच सवंगड्यांसमोर- ज्यांच्याबरोबर आयुष्यातले सोनेरी दिवस जगले होते?’ मनाचा निर्धार हळूहळू होत गेला.
तिचं नाव रोलकॉलमध्ये बरंच खाली होतं. तिच्या आधीच्या ज्या मुली होत्या, त्या सगळ्यांचंच उत्तम चालू होतं. नुसतंच घर-संसार नाही, तर करियर्सही. एकेकाळी अतिशय लाजाळू, खालच्या नंबरात असलेल्या मुली पुढे केवढ्यातरी चमकत होत्या. पण आता हे मोहिनीला सललं नाही, उलट कौतुक वाटायला लागलं एकेकीचं. नकळत तीही इतरांबरोबर टाळ्या वाजवू लागली, तिचा चेहराही हसू लागला. तिचं नाव पुकारलं गेलं. मोठा श्वास घेऊन ती स्टेजकडे जायला लागली. हृदयातली धडधड कमालीची वाढली. पायही लटपटू लागले. आपल्याच्याने हे निभावणार नाही असं वाटायला लागलं. अपूर्वा स्टेजच्या अगदी खाली उभी होती. तिने हळूच मोहिनीचा खांदा दाबला आणि हसली. बुडत्याला काडीचा आधार..
"नमस्कार. मी मोहिनी फडके. रोल नंबर अठरा. मी बारावीपर्यंत इथेच होते. त्या नंतर बीडला डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. माझं लग्नही झालं होतं. But things did not work out. मी आता परत ह्या शहरात आले आहे. आणि एका बँकेत नोकरी करते." इतकंच बोलून ती स्टेजवरून उतरलीसुद्धा.
सभागृहात एक सेकंद पसरलेली सुन्न शांतता तिला चांगलीच जाणवली, सामुहिकरीत्या चुकलेला काळजाचा एक ठोकाही तिला ऐकू आला. तिच्या हृदयात अजूनही प्रचंड धडधडत होतं. पण एक सुटकेची जाणीवही होती. पुढच्या अर्ध्या मिनिटात तिच्या मागची शुभांगी पुरोहित स्टेजवर गेली होती, त्यामुळे आपोआप लोकांचं तिच्यावरचं लक्ष सरकलं आणि तिने सुटकेचा नि:श्वास टाकला. खूप वेळ ताणून ठेवलेलं रबर सुटल्यावर जसं आकारहीन दिसतं, तशी गलितगात्र होऊन ती खुर्चीत पसरली. हळूच तिने आजूबाजूला नजर फिरवली. तिला वाटलं होतं कोणीच तिच्याकडे रोखून बघत नव्हतं, की कोणाच्या नजरेत तिच्याबद्दल घृणा अथवा कीव नव्हती. इतक्यात तिची नजर स्टेजवर गेली. दिक्षित सरांची नजर मात्र तिच्यावर खिळलेली होती. तिने कशीतरी त्यांची नजर चुकवली.
प्रत्यक्ष शाळेत येऊन आपण मधली वीस वर्ष पुसू शकू अशी कल्पनाही तिने कधी केली नव्हती. शाळा आठवली की आपली यशोगाथा सांगणारी प्रगतीपुस्तकं आणि त्यानंतर सतत उतरता आलेख हेच मनात येई. कोणताही सारासार विचार ती त्या नंतर करूच शकत नसे. कॉलेजच्या दिवसात सर्वचजण थोडेफार त्या दिवसांच्या आहारी जातात. पण आपल्यासारखे वाहवत किती जण गेले असतील? बाबांचं आणि तिचं त्यानंतर नातं तुटलं ते तुटलंच. घटस्फोट तर शेवटचा घाव होता. गेल्या वीस वर्षातले कित्येक तास तिने केवळ रडण्यात घालवले असतील! आज शाळेतला हरेक विद्यार्थी रुढार्थाने सफल होता. अपयशी होती ती ती एकटीच. इतक्यात स्टेजवरून प्रशांत वालावलचे नाव पुकारले गेले आणि अचानक एका कोपर्यातून हशा उसळला. तिने उत्सुकतेने पाहिले. हसतहसत तो स्टेजवर चढत होता. खूपच वेगळा दिसत होता, अर्थातच. तिला तो शाळेत असतानाचाही अंधुकसाच आठवत होता. तिच्या आठवणीप्रमाने खालच्या नंबरात असायचा तो. आता मात्र चांगला स्मार्ट दिसत होता.
"सर, मॅडम नमस्कार. मी प्रशांत वालावल. दहावी क, रोल नंबर सत्तेचाळीस. लास्ट नंबर." असं म्हणून तो हसला. त्याच्या चेहर्यावर एक खट्याळपणा होता. परत एकदा त्या कोपर्यामधून शिट्ट्या वगैरे वाजल्या. सगळेच उत्सुकतेने बघायला लागले.
"सर, तुमच्या आशीर्वादामुळे दहावी तर एका फटक्यात पास झालो. आपल्या शिव, विवेकबरोबर अकरावीला कॉमर्सला प्रवेशही घेतला. खूप टीपी केला. वर्गात तर कधी बसलोच नाही. बारावीला फेल झालो सर. चक्क फेल. तेव्हा घरी वडिलांनी जो मार दिलेला तो अजूनही आठवतो सर. हे शिव वगैरे मस्त पास झाले. आणि मी त्यांच्या नादाला लागून मागे राहिलो! वडीलांकडून जबर मार खाल्ला तेव्हा कुठे मग अक्कल आली. एकूण आपली कपॅसिटी लक्षात आली होती तोवर सर. त्यामुळे त्यानंतर शिक्षणाला रामराम ठोकला आणि चक्क आईला मदत करायला लागलो. आता कोणालाही प्रश्न पडेल, की आईला मदत कशात? तर माझी आई घरी चिवडा आणि वड्या करायची आणि मिठाईवाल्या दुकानांना सप्लाय करायची! मी मदत म्हणून सुरू केलं, पण ते काम मला भयंकर आवडायला लागलं सर. व्होलसेल मार्केटमधून पोह्याच्या, दाण्याच्या गोण्या, तेलाचे डबे मी अगदी न कंटाळता आणायचो. बस. आईकडून सगळं टेक्निक शिकून घेतलं आणि काही वर्षांनी आपला कारखाना सुरू केला सर. खूप पदार्थ वाढवले. पाच वर्षापूर्वी केटरिंगची लाईन सुरू केली. तुमच्या आशीर्वादामुळे आता एकदम मस्त चालू आहे सर. पण ते दिवस आठवले तरी... घरातूनच तर मला किती सुनावलं जाई, मित्रमंडळी हेटाई करत, बायकांची कामं करतो म्हणून, पॉश कपडे घालून कधी मैत्रिणींबरोबर कुठे फिरलो नाही. तेव्हा वाईट वाटायचं, पण तेवढ्यापुरतंच. मला माझी लाईन सापडली ह्याचाच आनंद जास्त असायचा. आज मी अभिमानाने सांगू शकतो, की माझा केटरिंगचा बिझिनेस आहे, आणि सर, आजचं आपल्या संमेलनाचं जेवण आपल्याच केटरिंगचं आहे.."
ह्यावर टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. खूप चिअरिंगही मिळालं प्रशांतला. तोही हसत सगळ्यांमध्ये सामील होत होता.. "फक्त एकच सल आहे सर. मी फक्त बारावी पास आहे सर. आपल्या शाळेचं रेप्युटेशन खूप चांगलं आहे, आपला 100% रिझल्ट लागला होता दहावीला.. माझ्याच बॅचचे हे सगळे खूप शिकले, मोठे झाले. पण ह्या शाळेमधून बाहेर पडल्यावरही मी शाळेचं नाव खूप काही मोठं नाही करू शकलो सर.." जराशा खट्टू स्वरात तो म्हणाला, आणि सगळ्यांनाच एक चुटपुट लागली. दिक्षित सर तत्परतेने उठले. चालत माईकपर्यंत आले..
"प्रशांत, अरे का असं वाटून घेतोस बाळ? उलट बघ, आज तुझ्या कृपेने आमच्या तोंडात सुखाने अनायसे घास पडणार आहे.. काय? शाळेला, शिक्षकांना आपले सर्वच विद्यार्थी प्रिय असतात. आयुष्यात जो कोणी घडतो तो त्याच्या कष्ट आणि भागध्येयानुसार. आम्ही फक्त माध्यमं आहोत रे. तू जिद्दीनं उभा राहिलास, कोणतंही काम कमीपणाचं मानलं नाहीस हे तू विनयाने बोलला नाहीस, तरी दिसतंच आहे. त्याशिवाय एवढं यश मिळणारच नाही.. आम्हाला तुझा अभिमान वाटतो! आणि अरे, एवढाच सल असेल, तर अजूनही शिकू शकतोस. कित्येक कोर्सेस आहेत. पण खरं सांगू का, जगातल्या उत्तमोत्तम विद्यापीठांमध्ये जे शिकवलं जात नाही, ते तू कधीच आत्मसात केलेलं आहेस. अरे हे हाय-फाय एमबीए कोर्सेस म्हणजे काय आहेत? हेच आहे सगळं, जे तू सध्या करत आहेस! अनुभव हाच गुरू! तेव्हा चिअर अप! तुझ्या हातचे चमचमीत पदार्थ खाण्यासाठी आम्ही अगदी उत्सुक आहोत.. काय रे मुलांनो?"
सरांनी सभागृहालाच प्रश्न विचारल्यानंतर ’होऽऽऽऽऽ’ असा एकच चित्कार निघाला.
प्रशांतच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने सरांना पटकन नमस्कार केला.
--
मोहिनी सगळं ऐकत होती, पहात होती, साठवत होती. माणसाच्या आयुष्यात साक्षात्काराचे क्षण कोणत्या वेळी, कोणाच्या मुखातून येतील हे सांगता येत नाही. प्रशांतचं अनुभवकथन तिला थक्क करून गेलं. जेव्हा आपल्या वयाची मुलं कॉलेजात हसतखेळत शिकत आहेत, प्रगती करत आहेत, त्याच वयात ’स्वयंपाकघरात’ राबणं हे त्याच्यासाठी किती मानहानीकारक झालं असेल ह्याची तिला कल्पना येऊ शकत होती. पुण्यासारख्या शहरातून बाबांनी समूळ उपटून तडक बीडसारख्या जिल्ह्याच्या गावी तिला आणून ठेवलं नुसतंच. ती तिथे रुजलीच नाही कधी. कारण ’हे आपल्या बाबतीत होऊच कसं शकतं?’ ह्या प्रश्नाच्या भोवर्यातूनच तिची कधी सुटका झाली नाही. निस्तेज, वाढ खुरटलेल्या रोपट्याप्रमाणे ती नुसतीच जगली, कोणतीही चमक न दाखवता. चांगला जोडीदार मिळेल, नंतरचं आयुष्य तरी समरसून जगू ही इच्छाही फोलच ठरली. आजही ते दिवस आठवायलादेखील नको वाटायचं. पण ह्यात तिने सतत केवळ नशीबाला दोष दिला. ’का नाही आपण स्वत:हून काही हातपाय हलवले, काही जिद्द दाखवली? पुढे शिकलो का नाही? सासरकडच्या विचित्र वागणूकीची लग्नाआधीच चाहूल लागली असूनही, का बोहल्यावर चढलो? का नाही धैर्य दाखवलं लग्न मोडण्याचं? जेव्हा आयुष्यच पणाला लागलं, तेव्हा कुठे घटस्फोटाचा निर्णय घेतला, पण नुसताच छळ होत राहिला असता, तर करत बसलो असतो का सहन? नियती, नशीब ह्यांच्यावर सगळं ढकलत राहिलो. कदाचित तेव्हा काही जिद्द दाखवली असती, तर नशीबानेही साथ दिली असती का? प्रशांतला दिली तशी? तो नाही कुढत बसला. जिद्दीने आज स्वत:चा उद्योग उभा केला आहे.. त्याचं व्यक्तीमत्त्व आत्मविश्वासाने भरलेलं आहे. किती confident वाटतो तो. उलट आपण. स्पार्क असूनही त्याचा काही वापर केला नाही, कारण इच्छाशक्तीतच मूळ कमी पडलो’. खुर्चीत बसल्याबसल्या मोहिनीने आज प्रथमच स्वत:लाच प्रश्न विचारले; आयुष्याचा ताळेबंद मांडला. तो मांडायला आत्तापर्यंत वेळ झाला नव्हता असं नव्हे, तर त्याला सामोरं जायची आजवर हिंमत झाली नव्हती. आता त्या ताळेबंदातली तूट स्वच्छपणे समोर दिसली आणि ती भरून काढण्यासाठी केवळ आपण स्वत:च हातपाय हलवले पाहिजेत हेही लख्ख्पणे दिसलं..
अल्पोपहारापर्यंत मोहिनी बरीच सावरली. अपूर्वाच्या मागे जाऊन उभी राहिली ती. माफक गप्पा मारायला लागली. चेहराही जरासा हसरा झाला. बळ एकवटून ती दिक्षित सरांपाशी गेली. त्यांचंही तिच्याकडे लक्ष गेलं..
"अरे! पाध्ये! मगाशी तुझ्याशी बोलायचंच राहून गेलं. कशी आहेस तू? ओळख करून देताना काय म्हणलीस ते?" सरांच्या बोलण्यातून तिला काळजी जाणवली.
"हो सर. मी घटस्फोटित आहे!" हे वाक्य तिने उच्चारलं आणि ती स्वत:शीच दचकली. आज प्रथमच कोणा दुसर्यासमोर तिच्या आयुष्यातलं हे एक सत्य, ती कोणताही आडपडदा न ठेवता सांगू शकली होती. आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा तिने उल्लेख केला होता, तो शरमेने, मनाविरुद्ध! आपल्यातलाच हा बदल जाणवून तिला आधी आश्चर्य वाटलं आणि मग ती जराशी सुखावली. "बराच छळ सहन केला, मग एका मर्यादेनंतर ते सहन करणं शक्य नाही असं लक्षात आलं आणि त्यातून बाहेर पडले."
"धैर्याची आहेस! तुझ्यासारख्या गुणी मुलीच्या वाट्याला हे का यावं?"
यावर ती जराशी हसली.
"हाच विचार करत खूप वर्ष वाया घालवली आहेत मी सर. आणि शेवटी हातावर हात ठेवून बसले होते नुसतीच. पण आजचा दिवस खर्या अर्थाने माझ्यासाठी turning point ठरणार आहे. जिथून मी सोनेरी स्वप्नांच्या आशेने बाहेर पडले होते, कोमेजून तिथेच परत आलेय. पण मला परत बळ मिळालंय सर. तुम्ही, अपूर्वा, हे सर्व म्हणजे सर्व मित्रमंडळ.. सगळेच. मला जाणवलंय मी काय मिस केलंय ते. खूप उशीरही झाला आहे, सावरायला. पण कदाचित ह्यापुढची वर्ष मी काही धडपड तरी करेन.. मगाशी तुम्ही प्रशांतला सांगितलंत ना सर.. शिकण्याची वेळ कधीही उलटून जात नाही.. त्या दिशेने प्रयत्न करणार आहे आता.."
"अगदी अवश्य! आणि ह्या सगळ्यांची मदत घे, अगदी नि:संकोच! तुझ्यात एक स्पार्क आहे मोहिनी, तो असा विझू देऊ नकोस! तुला अजूनही खूप काही मिळवायचं आहे, आणि तू ते मिळवशीलही! मोठी हो! यश मिळव.. आणि हो, पुढल्या वर्षी परत स्नेहसंमेलन होईल तेव्हा प्रमुख संयोजक म्हणून तू दिसशील अशी आशा आहे मला, काय?"
एवढं ऐकल्यावर मात्र मोहिनीने बांध घातलेलं पाणी डोळ्यातून वाहू लागलं. सरांचे आशीर्वाद घ्यायला ती चटकन वाकली आणि हळूच तिने डोळे पुसले. शाळेत तिची नुसतीच वर्गमित्रांबरोबर नाही, शिक्षकांबरोबरही नाही, तर स्वत:शीही पुनर्भेट झाली होती.
-समाप्त.
13 comments:
कथा आवडली! मोहिनीचं दु:ख स्पर्शून गेलं.
कथा आवडली पण असं वाटलं की कथा मोहिनीची आहे तरी तिच्यापेक्षा इतर व्यक्ती जास्त प्रभावीपणे वाचकापर्यंत पोचतायत. मोहिनीच्या आयुष्यातील काही प्रसंग आले असते तर अजून रंगत आली असती.
मागास बीड आणि साधं एम कॉम हे दोन्ही शब्दप्रयोग अतिशय खटकले. पुढचं वाचलं नाही.
धन्यवाद निरंजन, मोहना, धनंजय!
मोहना, हो मान्य आहे :)
धनंजय- १) मोठ्या शहराच्या तुलनेत मागास बीड
२) तिच्या हुशारीच्या मानाने साधं एमकॉम
.. असं आहे ते.
पूनम, कथा आवडली. तुमचा पत्राबद्दलचा लेख जास्त आवडला होता.
तुमचे आवडते कथाकार कोण, हे जाणून घेण्यास आवडेल. कृपया, कळवावे.
mast ekdam mast katha.....
mastach.. :)
धन्यवाद केदार, श्रद्धा, अवनी :)
केदार, बरेच आवडते लेखक आहेत.. त्यांची शैली, मांडणी, आशय ह्यासाठी आवडलेले आणि आवडणारे..
Nice.... :)
फार सुंदर कथा आहे.
शेवट चे धक्का तंत्र मस्तच होते.
masta ahe hi katha ekdam.. vachli navhati adhi.. MB var nahi taklis ka ?
Hi, khupch chaan lihites tu....tuzya katha vachtana kathetlya patrashi agdi ekrup vhayla hote... Manini
Post a Comment