October 8, 2012

सावर


’साडेसहा झाले तरी आर्यन अजून आला नव्हता.. हे आता नेहेमीचंच व्हायला लागलं होतं. आठवड्यात एखादा दिवस तरी तो उशीराच यायचा. विचारलं तर उडवून लावायचा. मला आत्ता बाहेर पडायलाच हवं होतं आणि ह्याच्या यायची अनिश्चिती! काय करावं? जाऊदे. जातेच मी. म्हणजे तरी कळेल कोणी घरी असण्याची किंमत!’ माझ्या मनाची नेहेमीप्रमाणे उलघाल व्हायला लागली. इतक्यात दारावरची घंटा खणाणली. अपेक्षेप्रमाणे आर्यनच होता.
"उशीर झाला रे.." मी न राहवून बोललेच.
"काही नाही गं, असंच गप्पा मारत होतो मित्राबरोबर खाली." तो अगदीच शांत होता.
"अरे मग वर यायचं. इथे मारा गप्पा. मी कधीतरी तुला अडवलंय का? वेळेवर येत जा पण. हे बघ, मी आता निघतच होते नीरजचं कायकाय सामान आणायला. शिवाय भाजीही आणायची आहे.. मी कुलूप लावून गेले असते तर काय केलं असतंस?"
"काय आणायचंय? मी आणतो.. शाळेतलं प्रोजेक्ट का?" त्याने पटकन विषयाला बगल दिली.
"हो ना रे. दरवेळेचं एकेक नवीन. आणशील का खरंच? ही घे यादी. नाहीतर, आपण बरोबरच जाऊ की.."
"नको, बरोबर कशाला?" तो एकदम लाजल्यासारखा झाला. नकळत मी हसले.
"बर, तू असं कर, नीरज खाली खेळतोय, त्यालाच घेऊन जा. त्याच्या मनासारखं नसलं तर गोंधळ नको परत. पुढच्या ’श्री’कडे जा. तिथे जरा बर्‍याच गोष्टी पाहता येतात. मीही भाजी घेऊन येते अर्ध्या तासात."

चालता चालता मी विचार करायला लागले. आर्यनवर असं चिडणं, रागावणं हे बरोबर नाही. त्यालाही आवडत नसेल. तो काय आपल्याला बांधील नाही. पण हे नेमकं त्याच्यावर रागावताना लक्षात यायचं नाही! त्या वेळेला तोंडातून शब्द निघून जायचेच.

आर्यन खरंतर आमच्या इमारतीत आमच्या वर तीन मजले राहणार्‍या महेश-स्मिता उपाध्येंचा मुलगा. स्मिताशी माझा चांगला परिचय होता. आमच्यासारखे, तेही घरात तिघंच होते. पण दोघेही सॉफ़्टवेअर कंपन्यांमध्ये मोठ्या हुद्द्यावर कामाला होते. आमच्याकडेही संजीव सॉफ़्टवेअरमध्येच होते, पण मी एका प्रायव्हेट कंपनीत होते. नुकताच स्मिताला एक महत्त्वाचं प्रोजेक्ट मिळालं होतं आणि त्यामुळे तिला त्यामुळे घरी यायला रोज उशीर व्हायला लागला होता. रात्रीचे साडेसात-आठ तरी व्हायचे. महेशही त्याच दरम्यान यायचा. आणि आर्यन तर यायचा शाळेतून पावणेसहाला. मीही ऑफिसातून सहाच्या दरम्यान नीरजला पाळणाघरातून घेऊन यायचे. दोन-चार दिवस आर्यन मला दिसला बिल्डिंगच्या खालीच एकटाच कट्ट्यावर बसलेला.. म्हणून चौकशी केली तर हे सगळं कळलं! त्याचा चेहरा इतका कंटाळलेला होता हे सगळं सांगताना की बास. त्याची शाळा बरीच मोठं नाव असलेली होती. शाळेतच अभ्यास, खाणं वगैरे करून घ्यायचे. शाळेत दप्तर न्यायचं नाही, घरचा अभ्यास नाही, शाळेतच खेळ-बिळ व्हायचे. मुलांना घरी जाऊन करण्यासारखं काही उरायचंच नाही! त्यातून घराची किल्ली मुलाकडे द्यायची नाही असं त्याच्या आई-बाबांचं मत होतं, कारण ते नसताना त्यांना ते सुरक्षित वाटत नव्हतं! परिणामी आर्यन रोज संध्याकाळी पेन्शनरांसारखं तास-दीड-दोन तास खाली कट्ट्यावर नुसता बसून रहायचा, नाहीतर आसपास चक्कर मारायचा आई-बाबांची वाट बघत. कोणी मित्र भेटले तर ठीक, नाहीतर एकटाच.

न राहवूनच मी रात्री संजीवशी ह्याबद्दल बोलले.
"मी तशीही रोज त्याच वेळेला घरी येते.. तर आपण आर्यनला आपल्याकडे यायला सांगूया का? किमान घरात तरी बसेल तो."
"कशाला तू उगाच एकेक गळ्यात घेते आहेस शुभदा? तो त्यांचा प्रश्न आहे ना! चांगला मोठा आहे आर्यन. त्याच्याकडे घराची किल्ली देणं हा सर्वात सोपा उपाय आहे, पण त्याला ते तयार नाहीत. त्याला घरातच घेणं म्हणजे.. तूही उगाच अडकून पडशील कुठे जायचं असलं तर.. आणि आवडेल का स्मिताला? तिला उगाचच एक स्वत:बद्दल नको इतका ताठा आहे.."

संजीव काही फारसा अनुकूल दिसले नाहीत, पण तरी त्यांच्या प्रत्येक शंकेला माझ्याकडे त्या दिवशी उत्तर होतं. कोण दुसर्‍याला विचारेल की माझा मुलगा तुझ्याकडे बसला तर चालेल का दोन तास? अशावेळी आपणहोऊन मदत करावी असं प्रकर्षाने वाटलं मला!

दुसर्‍या दिवशी सकाळीच स्मिताला फोन करून मी तिला आर्यनला आमच्याकडे पाठवायला सांगितलं. तीही आधी ’नाही’च म्हणाली. महेशने त्याच्या ऑफिसमध्ये काहीतरी तडजोड करून आठवड्याचा एक दिवस घरूनच काम करायची परवानगी घेतली होती म्हणे. हे ऐकल्यावर तर माझं काम अजूनच सोपं झालं, कारण आता तर प्रश्न चारच संध्याकाळच्या दोन तासांपुरता होता. बरीच बडबड करून, माझी बाजू पटवून शेवटी स्मिताचाही होकार मी मिळवलाच. दुसर्‍या दिवसापासून आर्यन आमच्याकडे येईल असं शेवटी तिला मी मान्य करायला लावलं.

दुसर्‍या दिवशी आर्यन आला. पण अर्थातच जरा बुजला होता. काही खाणार नाही, टीव्ही नको वगैरे नकारघंटा वाजवून झाल्या. मग मीही त्याच्या जास्त मागे लागले नाही. नीरजही आसपास बडबड करत होताच. त्याचं आणि आर्यनचं एकदम जमून गेलं. नीरजला ’दादा’ खूप आवडत असत. त्या दिवशी त्याने आर्यनला त्याचे सर्व खेळ वगैरे दाखवले. आर्यननेही काही युक्त्या सांगितल्या, त्याच्याबरोबर कार्टूनही पाहिलं आणि त्याच्या नादाने खाल्लंही. खूपच समाधान वाटलं मला. आमचं रूटीन बघताबघता सेट झालं. सोमवारी महेश घरी असे. त्यामुळे मंगळवार ते शुक्रवार आर्यन माझ्याबरोबरच घरी येत असे. हळूहळू त्याचा संकोच कमी व्हायला लागला. हळूहळू तो शाळेतलं घडलेलं एकेक सांगायला लागला. मलाही त्याचं ऐकायला बरं वाटायचं, माझ्या अनेक प्रश्नांना तो शांतपणे उत्तर द्यायचा. नीरजचा तर बेस्ट फ्रेन्डच झाला. नीरज खाली खेळायला गेला की तो काहीतरी वाचत बसे, नाहीतर माझी किरकोळ कामंही करी. त्याला आमच्या पीसीही वापरायला मी परवानगी दिली गेम्स वगैरे खेळायला. मला परत भाजी वगैरे किरकोळ कामांसाठी बाहेर जायचं असेल, तर तो तेवढा वेळ एकटा घरात बसे. मी आल्यावर दार उघडे, भाजी वगैरे सॉर्ट करायला मदत करे. संजीव कधी लवकर येत, कधी उशीरा. त्यांच्याही गप्पा व्हायला लागल्या. आर्यन स्मिता-महेशबद्दल तो बोलण्याच्या नादात काही ना काही सांगत असे, पण त्यांच्याबद्दल चुकूनही तक्रार केली नाही त्याने कधी. तसा तो कमीच बोलायचा. त्यातून माझं आणि नीरजचं इतकं कायकाय चालू असायचं की त्याच्या शांतपणाचं मला कौतुकच वाटत असे. त्याच्यात मी मोठा झालेला नीरज बघत होते.

आमचं गूळपीठ जमल्यावर संजीवने मध्येच एकदा सुचवून पाहिलं होतं, की मी उपाध्येंकडून त्यांच्या घराची किल्ली तरी मागून घ्यावी अडीअडचणीसाठी म्हणून. पण मला आर्यन इथे माझ्या घरीच बरा वाटत होता. आणि त्या दोघांनी कधीच आपणहोऊन पुढाकार घेतला नाही किल्ली ठेवण्याबद्दल. मलाही मागून घेणं प्रशस्त वाटलं नाही. कधी महेश, कधी स्मिता येत आर्यनला घ्यायला. आले की दोन मिनिटं गप्पा व्हायच्याच. पण तितपतच. सुरूवातीला त्यांनी अनेकदा धन्यवाद दिले, माझी अडचण होत असेल तर तसंही बिनदिक्कतपणे सांगायला सांगितलं. पण नंतर त्यापुढे कधी गप्पा गेल्या नाहीत. खरं नातं हे माझ्याबाजूने आर्यनसाठी होतं. बाकी सगळेच, अगदी आर्यनही त्याकडे एक तडजोड म्हणूनच पहात असावेत. पण रोज आर्यन येतो आहे ना- हे पाहून मीही त्याबद्दल फारसा विचार केला नाही.

एक दिवस आर्यनने त्याचा नवीन मोबाईल फोन दाखवला मला. मला चांगलंच आश्चर्य वाटलं! नववीतल्या मुलाला कशाला मोबाईल? तर म्हणे आजकाल सगळ्यांकडेच असतो. आणि स्मिताचाच आग्रह होता. ते दोघंही असे प्रचंड बिझी. त्यामुळे मोबाईल असला की सतत संपर्कात राहता येतं म्हणे.
"काकू, अगं एकदम साधा हॅन्डसेट आहे बघ. ह्यात फक्त फोन करता येतात आणि एसएमएस. बाकी काही नाहीये त्यात. हां, रेडियो वगैरे पण आहे. आणि बाबांचं लक्षं असतं बिलावर. आमच्या शाळेत सगळ्यांकडे आहेत. काहींचे तर हॅन्डसेटही एकदम भारी आहेत. शाळेत क्लासमध्ये परवानगी नाही, पण ब्रेकमध्ये बघतो आम्ही. गेम्स, मूव्हीज, स्पोर्ट्स सगळं बघतात मुलं. आई मला तसा काही घेणार नाही.."

".. आणि त्याची गरजही नाहीये रे. शाळेत तर असतोस दिवसभर. नंतर इथे. फोन तरी कधी करतात आई-बाबा तुला?"

"करतात असंच मधून, नाहीतर एसएमएस टाकतात एखादा.."

माझ्या मनात उगाचच शंका आली. त्या दोघांचा माझ्यावर विश्वास नव्हता का? म्हणून त्यांनी घेऊन दिला असेल का मोबाईल आर्यनला? त्यांना मनातून हे आवडलंच नव्हतं की काय? आर्यनलाही इथे बांधून घातल्यासारखं होत असेल का? नाना शंकांनी माझा ताबा घेतला. मला आत्तापर्यंत असंच वाटत होतं की खाली दोन तास बेवारशासारखं बसण्यापेक्षा आर्यनला माझ्याकडेच सुरक्षित वाटत असणार. त्यालाही ते नकोसं होत असेल अशी शंकाही मला आली नाही कधी. आता मात्र मी ते जरा तपासून पहायचं ठरवलं. पण त्याच आठवड्यात नीरजची परिक्षा होती आणि त्या दरम्यान आर्यनने त्याचा इतका मस्त अभ्यास घेतला की मी नि:शंक झाले.

आर्यनशी नीरजशी बोलायची एक खास पद्धत होती. नीरज जितका जोरात बोलायचा तितकाच आर्यन हळू बोलायचा- त्याला एखादी सिक्रेट समजावून सांगायच्या आविर्भावात. सहाजिकच नीरजला खूप आकर्षण वाटायचं तो काय सांगतोय ह्याबद्दल आणि तो त्याचं सगळं ऐकायचा. त्या दोघांना एकमेकांशी बोलताना, खेळताना पाहिलं की एक समाधान वाटायचं मला. भाऊच होते जणू एकमेकांचे! नीरज एरवी इतका वांड, पण आर्यनदादासमोर सपशेल शरणागती पत्करायचा. आर्यन माझ्याकडे खुश आहे, त्याच्या घरी असतो त्याहीपेक्षा असं माझं मत होत चाललं होतं.

आणि आता आर्यनचं असं मधूनच उशीर करणं सुरू झालं होतं! मनातून मला अजिबात आवडलं नव्हतं ते. खाली त्याच्या वयाची काही मुलं असायची, त्यांच्याशी गप्पा मारत बसायचा उगाच. कसली मुलं ती! उगाचच श्रीमंती उतू चाललेली! एकाचंही लक्षण मला धड दिसत नव्हतं. आणि खाली उभे राहून मवाल्यांसारखे गप्पाच तर मारत बसायचे. ते काय आर्यनला इतके आवडत होते कोण जाणे! पण आर्यनचा तरी काय दोष म्हणा. रोजच हाक मारत असतील त्याला, एखादा दिवस तरी जायला लागणारच त्यांच्यात. मीच माझी समजूत घातली. पण त्यांच्यात जास्त मिसळायचं नाही अशी ताकीदही त्याला द्यायला हवी हेही मी स्वत:ला बजावलं! इतक्यात भाजीवाल्याची आरोळी ऐकू आली आणि मी परत भानावर आले.

काही दिवसांनी आर्यन शाळेतून घरी आला तेव्हा त्याचा चेहरा एकदम मलूल दिसला. मी एकदम घाबरलेच!
"चेहरा असा का दिसतोय आर्यन तुझा? बरं वाटत नाहीये का तुला?"
"हो. जरा डोकं दुखतंय.."
मी त्याच्या कपाळावर हात ठेवला. तापलं होतं.
"अरे! तुला ताप आहे. चल आत, आधी आडवा हो. थांब मी थर्मामीटर आणते. आणि हे बघ वैद्य डॉक्टर येतात सात वाजता. मी येईन तुझ्याबरोबर. आपण औषध घेऊन येऊ. तुझे आई-बाबा यायच्या आत एक औषधाचा डोस जाईल तुझ्या पोटात. आणि हो, उद्या शाळेत जाऊ नकोस. थांब, मी गार पाण्याची पट्टी ठेवते." मला तर काळजीने काय करू आणि काय नको असं झालं.
"डॉक्टर नको काकू. क्रोसिन दे फक्त."
"छे! क्रोसिनने काय होतंय? तात्पुरता उतरेल फक्त. जाऊ ना आपण डॉक्टरकडे. घाबरू नकोस. मी आहे ना.."
"आईनेच सांगितलंय क्रोसिनचं"
मी थोबाडीत मारल्यासारखी भानावर आले. आर्यन स्मिताशी बोललाही ह्याबद्दल? कधी? मला तर विचारल्याशिवाय सांगितलं नाही त्याने! मी एकदम खट्टू झाले.

त्याला क्रोसिन दिली मी. पण मला चैन पडत नव्हतं. त्याचं काही न ऐकता मी त्याच्या कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. नीरजची कितीतरी दुखणी काढत नव्हते का मी? आर्यनही तसाच होता माझ्यासाठी. महेश येऊन त्याला घेऊन गेला. तोही ’डॉक्टर नको’ म्हणाला. आर्यनला असाच बारिक ताप यायचा म्हणे अधूनमधून. त्यांच्या सवयीचं होतं ते. उद्या शाळेतही जाईल म्हणाला महेश. मला काही ते पटलं नाही! रात्री मी परत संजीवपाशी विषय काढलाच.
"असा कसा जाईल हो उद्या शाळेत? नीरजला तर मी दोन दिवस पाठवत नाही ताप आला की.."
"अगं नीरज लहान आहे अजून. तोही मोठा झाला की राहणार नाही घरी.."
"ते बघू पुढचं पुढे. मला तरी वाटतंय की त्यांना घरी थांबणं शक्य नाही, म्हणून ते आर्यनला जबरदस्तीच पाठवतात की काय शाळेत!"
"काहीही काय बोलतेस? कोणते आई-वडील असं करतील? ते काही निष्ठुर नाहीत. घरी यायला फक्त जरा त्यांना उशीर होतोय, इतकंच!" संजीवना माझं बोलणं काही आवडलं नाही. पण मलाही नाही पटलं त्यांचं. मी माझंच पालूपद चालू ठेवलं.
"त्यांना जमत नसेल तर मी घेऊ का सुट्टी? नीरज आजारी पडला की घेते की.."
"शुभदा, नीरज आपला मुलगा आहे. त्याच्यासाठी तू सुट्टी घेशीलच. आर्यनसाठी नाही. तू काय बोलत्येस तुला कळतंय का तरी?" संजीवचा आवाज एकदम चढला. "आर्यनला त्याचे आई-वडिल आहेत आणि ते त्याच्याकडे त्यांच्या पद्धतीने बघत आहेत. तो इथे फक्त दोन तास आणि तेही काही दिवसच येणार आहे हे विसरू नकोस. तू नको इतकी गुंतत आहेस ह्या सगळ्यात. तुझं हे असंच चालू राहिलं तर मी बंद करेन त्याचं येणं, कळलं? आणि त्याचं कोणालाही काहीही वाटणार नाही हेही लक्षात घे!"
संजीवने चांगलेच खडसावले मला आणि मी तात्पुरती भानावर आले. असं का होत होतं? आर्यनचा विषय येताच मी इतकी भावूक का होत होते? मला वेळीच सावरायला हवं होतं.

इतकं ठरवलं तरीही, आर्यन मित्रांशी जास्त वेळ बोलण्यात रमला की मला राग येत होताच. नीरजच्या शाळेतल्या गॅदरिंगला आर्यनला मी घेऊन गेले तेव्हा एक वेगळाच अभिमान मला वाटला होता. घरात आवर्जून नीरजच्याबरोबरीने मी आर्यनच्याही आवडीचा खाऊ करत होते. त्याला हवं असो वा नसो, पण आग्रहाने खायलाही घालत होते. आर्यनच्या शाळेत असलेल्या गॅदरिंगला त्याने मला नेलं नाही, पण त्याच्या आई-बाबांना नेलं हे मला अतिशय खुपलं. सोमवारी महेश घरी असतानादेखील मी आर्यनला आमच्याकडेच यायचा आग्रह करत होते. कधी तो यायचा, कधी नाही. मला तर तो आमच्या घरीच रहायला आला असता तरी चाललं असतं, इतकी मी त्याच्यात गुंतले होते. कधीकधी मला नीरजची कटकट व्हायची. पण आर्यनची कधीच नाही झाली. हे सगळं संजीवना पसंत नव्हतंच, नीरजचं हे समजण्याचं वय नव्हतंच आणि आर्यनला चालतंच आहे असं मी गृहित धरलं होतं. स्मिता-महेशचा तर मी विचारही करत नव्हते. ते दोन तास आर्यन फक्त माझ्या ताब्यात होता. आणि मी काहीच चुकीचं करत नव्हतेच मुळी! ह्या सगळ्यात तीन महिने कधीच निघून गेले होते. स्मिताचं प्रोजेक्ट काही संपलं नव्हतं. तिची ऑफिसची नेहेमीची वेळच आता रात्री आठपर्यंत झाली. सगळं कसं माझ्या मनासारखं होत होतं! आता तर माझ्या बोलण्यातूनही मी आर्यनच्या मनात तो कसा इथेच मजेत असतो, स्मितापेक्षा मी आई म्हणून निश्चितच कशी चांगली आहे, मी करियरपेक्षा घराला कसं महत्त्व देते असं माझ्याच नकळत भरवू लागले होते. आर्यन माझी गरज बनली होती. तो बस्स इथे मला हवा होता. ते दोन तास. रोज. माझ्या घरी. का? कशासाठी? नीरज असूनही हा हट्ट का?- ह्या प्रश्नांची उकल मला नकोच होती.

त्या दिवशी असाच आर्यन परत उशीरा आला. नेहेमीच्या वेळेपेक्षा मी दहा मिनिटं कशीबशी थांबले. त्याचं माझ्यापाठोपाठ वर यायचं लक्षण दिसेना म्हटल्यावर मग मीच खाली गेले. आर्यन तिथेच होता एक-दोन मुलांबरोबर बोलत होता. माझा ताबाच सुटला. इथे मी ह्याची वाट बघत बसलेय आणि हा खुशाल गप्पा मारत बसलाय! मी रागाने जोरात हाक मारली त्याला. माझा आवाज ऐकून सगळेच माझ्याकडे बघायला लागले. पण मी फिकीर केली नाही.
"आर्यन, ताबडतोब वर ये!" असं जोरात ओरडून मी वर निघूनच आले. वर आले तरी रागाने मला काही सुचत नव्हतं. असा कसा हा इथे माझ्याबरोबर थांबण्याऐवजी खाली गप्पा मारू शकतो? इथे मी त्याची वाट पहात असते आणि ह्याला काही आहे का त्याचं? आज मुद्दाम वाकडी वाट करून हसनकडून त्याच्या आवडीचे सॅन्डविच घेऊन आले. परत वर उशीर होऊ नये म्हणून दहा मिनिटं लवकर निघाले. पण आहे का ह्याला काही त्याचं? मित्र महत्त्वाचे! इतक्यात बेल वाजलीच. त्याला दार उघडताना परत माझा राग उफाळून वर आला.
"आर्यन शेवटचं सांगते हां. शाळेतून आलास की तडक वर यायचं. अजिबात कोणाबरोबर काही गप्पा वगैरे मारायच्या नाहीत."
"पण का?"
आज पहिल्यांदाच आर्यनने मला प्रतिप्रश्न केला होता. मी चपापले. जरा वरमून म्हणाले,
"मी इथे काळजी करत असते अरे"
"मी खालीच तर असतो. कुठेही जात नाही."
"ती मुलं नाही आवडत मला. मोठ्या घरची लाडावलेली आहेत नुसती. सगळा वेळ खाली गप्पा मारत बसलेले असतात." मी माझी नापसंती व्यक्त केली.
"त्यातला एक तर आईच्या मैत्रिणीचा मुलगा आहे, आणि दुसरा माझ्या शाळेत आहे काकू. तू टेन्शन नको घेऊस."
आईच्या ओळखीचा! हं! स्मिताचा विषयच मला नको होता. तिच्याबद्दल बोलायला लागले असते तर ताबाच गेला असता माझा. खुशाल मुलाला एकटं सोडणारी बाई ती. माहित्ये किती लक्ष होतं तिचं मुलाकडे. एक मोबाईल घेऊन दिला आणि दिवसातून दोन फोन केले की संपलं कर्तव्य. मी धडपडून लक्ष ठेवून असते म्हणून दिसतोय मुलगा धड दृष्टीला. पण एकदा तरी आभार मानलेत का? कोरडं बोलणं जेवढ्यास तेवढं. आली की कधी एकदा जाते असं होतं तिला. आणि ही देतेय दाखले मुलांचे! धन्य! जाऊदे मला काय!
"बर. हातपाय धुऊन घे. तुझ्यासाठी सॅन्डविच आणलेत बघ हसनचे." मी तो विषयच बंद केला.
तो काही बोललाच नाही यावर. नुसतेच ओठ मुडपले.
"काय रे? नकोत का? तुला आवडतात म्हणून मुद्दाम आणले मी."
"ते दुकान हायजेनिक नाहीये काकू. मी आईबरोबर गेलो होतो एकदा तेव्हा तिथे खूपच घाण होती."
"ठीक आहे. मग काय. आई म्हणाली म्हणजे नाहीच खाल्ले पाहिजेत तू, नाही का? काकूने धडपड करून आणलेत म्हणून काय झालं? नाही का? जाऊदेत वाया! देते टाकून". मला अचानक रडूच यायला लागलं.
माझे बदलते मूड पाहून आर्यन बिचकला.
"नाही, खातो ना. टेस्ट मस्त असते त्यांची."
त्याने दोन सॅन्डविच खाल्ल्यावरच मला शांत वाटलं.

दुसर्‍या दिवशी सकाळीच मला स्मिताचा फोन आला.
"शुभदा, आज नाही हं येणार आर्यन तुझ्याकडे.."
"का?" क्षणार्धात माझ्या तोंडातून प्रतिप्रश्न निघूनही गेला होता. तिचा मुलगा होता. त्यांची मर्जी होती. मला कारणं सांगायला ते कुठे बांधील होते? ’तुला काय करायचंय?’ असंही विचारायचा हक्क होता तिला.
पण असं काही झालं नाही.
"महेश त्याला घेऊन बाहेर जाणार आहे कुठेतरी. तू वाट बघतेस असं आर्यनने सांगितलं, म्हणून लक्षात ठेवून आधी फोन केला तुला. म्हणलं राहून जायला नको. चुकून राहिलं तर? बाकी कशी आहेस?"
तिने विषयच संपवला.
काहीबाही बोलून मीही फोन ठेवला. बाकी काही मला ऐकायलाच आलं नाही. फक्त, आज आर्यन येणार नाही इतकंच लक्षात राहिलं. मला आत्तापासूनच माझ्या मनाला समजावायला लागणार होतं की संध्याकाळी आर्यन दिसणार नाहीये, येणार नाहीये. तो त्याच्या बाबांबरोबर बाहेर जाणार आहे. असं सतत मनाला बजावलं नाही, तर हळूच संध्याकाळी आधी कंटाळा, मग नैराश्य आणि मग राग येई. तो मग नीरजवर आणि संजीववरही निघे. हे काहीतरी चुकतंय हे मला कळत होतं, पण ते थांबवायची शक्ती आणि धैर्य माझ्यात येत नव्हतं.

त्या संध्याकाळी मुद्दाम घरी थांबलेच नाही. नीरजबरोबर मीही खाली गेले. बिल्डिंगमधल्या काही बायका असत रोज. एरवी मला त्यांच्यात जायला वेळही होत नसे आणि आवडतही नव्हतं. पण घरात एकटीने थांबण्यापेक्षा हे नक्कीच बरं होतं. आज असं खाली थांबल्यावर मला नीरज स्पष्ट दिसत होता. त्यालाही मी दिसत होते. इतर आयांसारखी आज आपलीही आई इथे आहे हे पाहून त्याला खूप आनंद होत होता. काय काय येऊन बोलत होता मध्येच, सांगत होता.. खुश होता एकदम. त्याला बघून मलाही खूप मोकळं वाटलं खूप दिवसांनंतर. बघता बघता साडेसात वाजले. ती निराश करणारी वाईट वेळ टळली होती. मी घरी आले.

दुसर्‍या दिवशी मात्र मी माझ्याही नकळत आर्यनची वाट पाहू लागले. आज तर काही शुभदाचा फोन आला नव्हता, त्यामुळे आर्यन आज नक्कीच येणार होता. ऑफिसमधून निघतानिघताच मी अस्वस्थ होऊ लागले. आज येईल ना आर्यन नक्की? नाही आला तर? किंवा उशीरा आला तर? तर नक्कीच त्याच्यावर रागवायचं नाही. त्याचं वयच आहे मित्रांमध्ये रमायचं. त्याच्या मनासारखं होऊ द्यायचं. त्याला रागावत राहिले आणि तो यायचाच बंद झाला तर? छे छे! त्याच्याशी समजूतीने वागायचं. मी मनात ठरवूनच टाकलं.

नीरजला घेऊन आले आणि आर्यन मला खालीच थांबलेला दिसला. माझा जीव एकदम भांड्यात पडला. गाडी लावून मी येईपर्यंत तो आमच्यासाठी थांबला होता, आम्ही बरोबरच घरी आलो. मी त्याचा चेहरा बघून अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. थोडा अवघडलेला वाटत होता का? मला उगाच खजील झाल्यासारखं वाटायला लागलं.

आम्ही आत येऊन फ्रेश होईपर्यंत आर्यन बाहेरच सोफ्यावर चुळबुळत बसला होता. मी बाहेर आल्याबरोब्बर तो उठला आणि म्हणाला,
"काकू, मी आजपासून बास्केटबॉलला जाणार आहे तीन दिवस त्या स्टार अ‍ॅकॅडमीत. आई-बाबांनी मला घराची किल्लीही दिली आहे आता, म्हणजे मला घरी जाऊन चेन्ज करता येईल आणि सायकल घेऊन जाता येईल. मी निघतो आता, क्लासची वेळ झाली. मी आता उद्यापासून नाही येणार. मला इतके दिवस तू येऊ दिलंस, थँक्स काकू."
आणि तो गेलाही.
मला आकलन व्हायलाच काही वेळ लागला. म्हणजे? हे असं अचानक क्लासबिस? घराची किल्लीही? माझ्याकडून सुटकाच करून घेतली की काय ह्याने? असं कसं होऊ शकतं? मी काय त्याला जखडून ठेवलं होतं का? माझा तोल हळूहळू जाऊ लागला. पण आत्ता ह्या क्षणी करण्यासारखं काहीच नव्हतं. आर्यन गेलेला होता, नीरजही खेळायला गेला होता, संजीव-स्मिता-महेश सगळेच ऑफिसात होते. रिकाम्या डोक्याची होते ती मीच. काय करावं मला काही सुचेना. माझ्याकडे स्मिताचा मोबाईल नंबर होता. तिला जाब विचारण्यासाठी मी तो लावला. असं कसं ती आर्यनला माझ्यापासून तोडत होती? हक्कच काय होता तिला?
"बोल शुभदा.."
"आर्यन येऊन गेला आत्ता.. तू कसला क्लास लावलास त्याला? का लावलास आणि? मला काही सांगितलं नाहीत तुम्ही! आणि हा येऊन सांगून गेलाच अचानक! हा काय प्रकार आहे?"
"प्रकारबिकार काय? तो नाहीतरी तुमच्याकडे एकांडाच बसून होता. त्यापेक्षा त्याचा वेळही जाईल, काहीतरी शिकेलही आणि त्याच्या वयाच्या मुलांबरोबर राहील. तुलाही अडकल्यासारखं व्हायला नको.."
"अगं पण मी एकदातरी तक्रार केली का, की मी अडकून पडले आहे म्हणून? मी नाही गं अडकलेली. आर्यन किती शहाणा मुलगा आहे. मला त्याचा अजिबातच त्रास नव्हता काही.."
"मग तर उलट चांगलंच होतं की. हे बघ शुभदा, खरं सांगायचं तर तो घरात बसून कंटाळला होता. तीन महिन्याचीच गोष्ट होती तोवर आम्ही धकवून नेलं. पण आता माझी वेळच बदलली आहे. हे रूटीनच झालंय. मग आर्यनला काय कायमच तुझ्याकडे ठेऊ का? बर ती संध्याकाळची वेळ. नुसतं घरात बसून करायचं तरी काय? टीव्ही बघायचा नाहीतर कॉम्प्यूटरवर टाईमपास करायचा. एकदा त्याची भूल पडली की मुलांना दुसरं काही नको वाटायला लागतं. म्हणूनच आम्ही त्याला घराची किल्लीही देत नव्हतो. त्यापेक्षा खेळ बरा नाही का? तूच सांग.. बर, पुढच्या वर्षीपासून त्याचे दहावीचे क्लासेस सुरू होतील. मग तो बिझी होईलच. मुलांना सतत गुंतवलेलं बरं असतं बघ. तू आमची गरज ओळखलीस आणि आपणहोऊन मदत केलीस.. खरंच कोण करतं असं? पण आम्ही त्याचा गैरफायदा घेणं बरोबर नाही ना?"

आमचा फोन कधी संपला, मला कळलंही नाही. गोड बोलून स्मिताने नेहेमीप्रमाणे आपलं म्हणणं मला पटवलंच होतं. पण तिचे ’तो घरात बसून कंटाळला होता’ हेच शब्द माझ्या मनात रुंजी घालायला लागले. असा कसा कंटाळत होता? मला रागच आला आर्यनचा. मी आवर्जून त्याच्यासाठी वेळ काढत होते. मुद्दाम त्याच्यासाठी काहीबाही खायला करत होते. नीरजचा अभ्यास त्याच्याकडेच सोपवला होता म्हणजे त्याला काहीतरी व्यवधान राहील. लायब्ररीमधून त्याला आवडतील अशी ऐतिहासिक पुस्तकं, व्यक्तीचित्रणं आणत होते म्हणजे त्याचा वेळ जाईल. तरी कंटाळा कसा काय येत होता? असा येऊच कसा शकतो कंटाळा? मी दोनदा काय रागावले त्या फालतू मुलांवरून तर त्याने लगेच सुटकाच करून घेतली माझ्यापासून? मी इतकी नकोशी झाले त्याला? आता खरंच आर्यन येणार नाही कधीच? मी रडवेली झाले. एकदम असहाय, बिचारं वाटायला लागलं.

इतक्यात संजीव माझ्यासमोर येऊन उभेच राहिले. मी क्षणभर दचकलेच. घरात अंधार तसाच होता, सात वाजले होते. मला भानच नव्हतं. ते अचानक समोर आलेले पाहून माझा बांधच फुटला. मी वेड्यासारखी अचानक हमसून हमसून रडायलाच लागले. संजीवनाही समजले नाही.
"अहो.. आर्यन येणार नाही आजपासून.. आत्ताच सांगून गेला. मी स्मितालाही विचारलं. कसला तरी क्लास लावलाय त्याने.."
"मग? त्यात रडण्यासारखे काय आहे?" संजीव पुरते गोंधळले होते.
मला ह्या प्रश्नाचे धड उत्तर देता येईना. कोणालाच त्याचं महत्त्व कळत नव्हतं. सगळ्यांनाच एक बेडी कमी झाल्यासारखं वाटत होतं. कोणाला समजावायची इच्छा होत नव्हती मला. आर्यन माझ्यासाठी काय होता हे फक्त मला माहित होतं.
"अहो, तुम्ही त्यांना समजवा. तुम्ही आर्यनशीही बोला, त्याला म्हणावं काकू तुला त्रास नाही देणार.. पण तू ये.."
"हा काय वेडेपणा आहे शुभदा? त्रास कसला? तू काय त्रास दिलास त्याला?"
"बघा ना. पोटच्या मुलापेक्षाही जास्त त्याची काळजी घेतली, त्याला जीव लावला, माया केली.. पण तरी पळालाच तो. इथे रहायला तयार नाही. कंटाळा येतो म्हणे. म्हणजे कसकसले मित्र भेटणार, मुलगा वाया जाईल बघा.. आणि नीरजही एकटा पडेल. इतकं चांगलं जमत होतं दोघांचं, सख्खे भाऊच जणू एकमेकांचे.." मी बोलून गेले.
"काय बोलत्येस तू? आं? इकडे बघ माझ्याकडे?" त्यांच्या आवाजाला एक धार आली.
"हे भाऊ वगैरे काय आहे? तुझ्या डोक्यात चाललंय तरी काय शुभदा? हे बघ मी तुला आधीही स्पष्टपणे समजावलं होतं. तो आर्यन आहे. स्मिता-महेशचा मुलगा. त्याला त्याचं वेगळं स्वत:च कुटुंब आहे. तू काय समजायला लागलीस अनवधनाने? हे बघ, माझ्याकडे बघ." संजीवने हाताने माझा चेहरा वर केला. माझ्या डोळ्यात बघत ते जरा जोरातच म्हणाले, "शुभदा, आर्यन आपला कैवल्य नाही. कैवल्य गेला कधीच. कधीच परत न येण्यासाठी. आता आपला आहे फक्त नीरज. आपला मुलगा. एकुलता एक. कैवल्यची जागा कोणीच घेऊ शकणार नाही. नीरजही नाही. हा परका आर्यन तर मुळीच नाही. भानावर ये. समजतंय ना तुला?"

चांगलंच समजत होतं मला सगळंच पहिल्यापासून. पण मेंदूने मुद्दाम पांघरून घेतलेला पडदा भेदून हे शब्द आता आरपार घुसले थेट. मिटल्या डोळ्यापुढे कैवल्य, आर्यन, नीरज यांचे चेहरे तरळत होते... मी उभी कोसळले. बेशुद्धीच्या सीमेवर असताना जाणीव होत होती ती फक्त संजीवने मला सावरून धरल्याची.

--समाप्त.

(माहेर, मार्च २०१२ मध्ये पूर्वप्रकाशित)
15 comments:

मोहना said...

गोष्ट चांगली आहे. आवडली. ती आर्यनमध्ये किती गुंतली आहे ते दाखवताना विचारांची पुनरुक्ती झाली आहे ती टाळली असती तर कथा अजून रंगतदार झाली असती असंव वाटलं.

इंद्रधनू said...

मन जिथे गुंतत जाईल तिथे काहीच इलाज नसतो नाही?
खूप सुंदर गुंफलेली कथा.....

Yogini said...

mastach

poonam said...

धन्यवाद मोहना, इन्द्रधनू, योगिनी :)

केदार said...

पूनम, ही कथा आवडली.
घटना भरपूर नसताना कथा वाचनीय करणे हे कथाकारापुढचे नेहमीच आव्हान राहिलेले आहे. कमी किंवा जवळजवळ एक किंवा दोनच घडामोडी असताना कस लागतो आणि नकळत भावनांचे अधिकाधिक वर्णन केले जाते. या पार्श्वभूमीवर मोहना यांच्याशी मी सहमत आहे.
विरामचिन्हांकडे दिलेले लक्ष हे तुमच्या कथांबाबत जाणवते. कथा वाचनीय बनविण्यात त्यांचाही हात असतो.
शुभदा ही मध्यमवयीन व्यक्तिरेखा उठावदार झालेली आहे. संजीवची अखेरची दखल पारंपरिकरीत्या चांगली. मध्यांतरापर्यंत शेवटाचा अंदाज येतो.
आधुनिक कथाकारांपैकी सानिया यांच्या कथा तुम्ही वाचलेल्या आहेत का? नसतील तर अवश्य वाचा. शुभेच्छा.

Gouri said...

छान आहे कथा!

aambat-god said...

खूप सुरेख कथा. मनाचा ठाव घेणारी. तरीच म्हटलं...ही इतकी का गुंतत जातीय आर्यन मध्ये...
अतिशय सुंदर कलाटणी. मस्त.

poonam said...

धन्यवाद केदार, गौरी, आंबट-गोड :)

हो केदार, सानिया माझ्या आवडत्या लेखिका आहेत.

Dr. Sayali Kulkarni said...

Chan ahe, avadali!!

Pallavi Sawant said...

katha aawadali!

हेरंब said...

अतिशय सुंदर. शुभदाची घालमेल अतिशय छान व्यक्त झालीये ! आवडली..

poonam said...

धन्यवाद सायली, पल्लवी, हेरंब :)

Anagha said...

ek veglich gosht. khuup aavadli :)

Anagha said...

छान आहे कथा पूनम :)

swati said...

कथा आणि टविस्ट आवडला!