November 8, 2010

संगीत ’कट्यार काळजात घुसली’

संगीत ’कट्यार काळजात घुसली’

कलेला, संगीताला कशाचं बंधन असतं? धर्म, जात, पात, लिंग यासर्वाच्या पलिकडेही उरते तीच फक्त कला- मग ती कला कोणत्याही स्वरूपात असो- चित्रकला, शिल्पकला, गायनकला, अथवा अजून कुठलीही. संगीतामध्ये अनेक घराणी होऊन गेली, अनेक मातब्बर गायक होऊन गेले ज्यांनी आपापल्या घराण्यांची वैशिष्ट्य जपली, वाढवली, आपापल्या घराण्यांची गायकी रसिकांसमोर पेश केली आणि त्यांच्या हृदयात आपल्या गायकीच्या आधारे विशेष स्थान मिळवलं. पण खरंच संगीत असं घराण्यांत वाटलं जाऊ शकतं का? एक घराणं यमन राग एका पद्धतीने गात असेल, दुसरं दुसर्‍या पद्धतीने, पण यमन रागाचे सूर, मात्रा, लय हे घराण्यांप्रमाणे बदलतात का? यमन हा यमनच असतो ना? भैरवी ही भैरवीच असते ना? ती कोणीही गावी, मनापासून गावी, रसिकांना मैफिलीची सांगता कायमची समरणात रहावी अशी गावी.. अमूक एका घराण्याचा गायक भैरवी गातो, म्हणून त्याची श्रेष्ठ आणि तमूक एका घराण्याचा गायक भैरवी गातो म्हणून ती कनिष्ठ ठरेल का? संगीत. संगीत हे पीढ्यानपीढ्या टिकून राहिलं आहे, अजरामर आहे, कारण ते कोणा एकाच्याच मालकीचं नाही, कोणाचंही दास नाही. संगीत अखंड आहे, स्वयंभू आहे, शाश्वत आहे.. भौतिक गोष्टींच्या पलिकडे जे आहे, ते संगीत सर्व भेदांपासून मुक्त आहे. पण ते जपणारी, ते गाणारी, ते जाणणारी माणसं, त्यांचं काय? ते असं मानतात का? संगीताचा मुक्तात्मा ते जपतात का?

संगीत ’कट्यार काळजात घुसली’ हे श्री. पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या लेखणीने, पंडित जितेन्द्र अभिषेकींच्या संगीताने नटलेले संगीत नाटक ह्याच प्रश्नांवर भाष्य करतं. कला मोठी की कलाकार? गायन महत्त्वाचं की घराणं? हे नाटक ज्या काळात घडतं त्या काळात संगीतातली घराणी सर्वश्रेष्ठ समजली जायची. एखाद्या घराण्याचा गायक त्याच्या गुरूंनी शिकवलेली गायकी, त्या घराण्याची परंपरा प्राणपणाने जपायचा, वाढवायचा आणि रसिकमान्यता मिळवायचा. पंडित भानुशंकरजी हे एका संस्थानातले राजगायक. त्या संस्थानाची परंपरा अशी, की दरवर्षी विजयादशमीला ज्या गायकाला पंडितजींना आव्हान द्यायचे असेल आणि त्यांना हटवून राजगायक होण्याची ज्या गायकाची मनिषा असेल, त्याने आधी आपले गाणे राजेसाहेबांसमोर गायचे, त्यानंतर पंडितजी आपली कला पेश करणार आणि मग राजेसाहेब ठरवणार, की ’राजगायक’ ह्या उपाधीस कोण लायक आहे ते. सतत दहा वर्ष पंडितजी राजगायकाचा खिताब जिंकलेले असतात आणि सतत दहा वर्ष खाँसाहेब आफताब हुसेन हे दुसर्‍या घराण्याचे गायक त्यांना टक्कर देऊ पहात असतात. खाँसाहेबांचं एकच ध्येय- पंडितजींकडून राजगायकाची पदवी हिसकावून घ्यायची.. त्यासाठी ते दहा वर्ष सतत, अविरत कष्ट घेतात, बारा बारा तास रियाझ करतात.. आणि एका वर्षी ते नवल घडतं- त्या वर्षी विजयादशमीच्या तिथीला खाँसाहेब परत एकदा आपली गायकी राजेसाहेबांसमोर पेश करतात..
साँवरियासे लडे नैन चार..
लागी कलेजवा कटार..

आता पंडितजीन्च्या गायनाकडे सगळ्यांचं लक्ष असतं.. पण! पण, पंडितजींच्या तानपुर्‍यामधून सुरावट झंकारत नाही, तर डोळ्यांमधून केवळ आसवं ओघळतात! एक ओळही न गाता ते मैफल अर्धवट सोडून अज्ञानतवासात निघून जातात.

’राजगायक’ हा बहुमान खाँसाहेबांचा होतो! राजगायकाची गादी, हुद्दा आणि तो महालही- ज्यात दहा वर्ष पंडितजींनी वास्तव्य केलं- ते सर्व त्यांचं होतं! आपल्या लवाजम्यासहित खाँसाहेब तिथे पोचतात, तर तिथे त्यांची गाठ पडते पंडितजींच्या मुलीशी- उमाशी. उमा पित्याच्या परांगदा होण्यानं आधीच दु:खी आहे, त्यात तिला रहातं घरही सोडावं लागतंय. तिच्या बरोबर आहे ती केवळ आपल्या वडिलांची एक तसबीर आणि त्यांनी शिकवलेली कला- गायन!
’घेई छंद मकरंद
प्रिय हा मिलिंद
मधुसेवनानंद
स्वच्छंद हा धुंद

मिटता कमलदल
होई बंदी हा भृंग
परी सोडी ना ध्यास
गुंजनात दंग
घेई छंद मकरंद..’
हे पद ती पित्याच्या आठवणीत गाते.. खाँसाहेबांच्या डोक्यात ह्या ओळी घर करतात.. पंडितजींच्या गायकीबद्दल त्यांच्या मनात अढी आहे.. ते भावरसपूर्ण, भक्तीरसपूर्ण, मृदू गातात असा त्यांचा आक्षेप आहे. गाणं कसं हवं? सळसळत्या नागिणीसारखं, तानांनी युक्त, आक्रमक असं त्यांचं मत. हेच पद ते संपूर्णपणे वेगळ्या चालीत, ताना घेत गातात, तेव्हा कुठे त्यांच्या मनातली बेचैनी कमी होते.. त्याच वेळी राजेसाहेबांचे दीवाणजी खाँसाहेबांच्या हवाली एक रत्नजडित कट्यार करतात. ह्या कट्यारीलाही एक परंपरा आहे.. ज्या राजगायकाकडे ती आहे, त्याने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी, अथवा योग्य अशा कारणासाठी दुसर्‍या कोणाचा जीव घेण्यासाठी ह्या कट्यारीचा वापर केला, तरी अशी केलेली एक हत्या त्या राजगायला माफ असते. आजवर पंडितजींना ती कट्यार हाताळायची वेळ कधीच आली नव्हती.. कदाचित खाँसाहेबांना..?

खाँसाहेबांचा निरोप उमा घेणार, एवढ्यात तिथे एक अपरिचित तरूण येतो.. कपडे मळलेले, केस विस्कटलेले, अनेक दिवसांचा उपाशी असा तो पांथस्थ कोण असतो? तो असतो सदाशिव, सदाशिव गुरव. पार मिरजेहून आग्र्याला पंडितजींकडे गायन शिकण्यासाठी आलेला असतो.. मिरजेला तब्बल बारा वर्षांपूर्वी पंडितजींचं वास्तव्य असताना सदाशिवाचं गाणं ऐकून पंडितजींनी त्याला आपला गंडाबंध शिष्य करण्याचं कबूल केलेलं असतं.. तेच स्वप्न उराशी बाळगून सदाशिव नेमका आज हवेलीत आलेला असतो, जेव्हा खुद्द पंडितजींचाच पत्ता कोणाला ठाऊक नाहीये! सदाशिव निराश होतो.. सर्व पाश सोडून तो केवळ संगीतसाधना करण्यासाठी इथवर आलेला असतो.. पण ज्यांच्यासाठी तो आलाय, तेच नाहीत म्हटल्यावर तो हताश होतो.. तो खाँसाहेबांना शिष्यत्व देण्यासाठी गळ घालतो.. खाँसाहेब त्याच्या गळ्याची तयारी ऐकण्यासाठी त्याला गायला सांगतात, आणि सदाशिव गातो तेच पद- ’घेई छंद मकरंद..’

खाँसाहेब अस्वस्थ होतात. ते सदाशिवाचं गाणं अर्ध्यात तोडतात. त्यांना बोलणं सुचत नाही! सदाशिवाने पंडितजींकडे बारा वर्षापूर्वी केवळ सहा महिन्याचं अध्ययन केलेलं असतं. त्या तुटपुंज्या शिदोरीवर त्याने तब्बल बारा रियाझ केलेला असतो. त्यामुळे आज त्याच्या गळ्यावर पंडितजींच्या घराण्याचं गाणं कोरलेलं खाँसाहेबांना स्पष्ट दिसतं. सदाशिवाचा गळा तयार आहे तो पंडितजींचं गाणं गायला, खाँसाहेबांचं नाही हे त्यांना उमगतं. ते सदाशिवाला शिष्य करण्यासाठी स्पष्ट नकार देतात. त्या महालात असलेला पंडितजींचा ठसा खाँसाहेबांना पूर्णपणे मिटवायचा आहे. निर्धाराने ते गातात-
’ह्या भवनातील गीत पुराणे
मवाळ हळवे सूर जाऊद्या..’

हताश सदाशिवाला उमा आपल्या धर्मशाळेतल्या खोलीत आसरा देते.. पंडितजींची जी काही शिदोरी आहे त्या बळावर सदाशिवाचा रियाझ परत सुरू होतो.. सदासिव गायनकला शिकण्यासाठी आसूसलेला आहे.. त्याचं एकच स्वप्न आहे- आपल्या गुरूकडून मनसोक्त गाणं शिकावं, दिवसरात्र फक्त गावं, गात रहावं आणि गुणीजनांनी, मान्यवरांनी भरलेल्या सभेत आपलं गाणं पेश करून त्यांच्याकडून शाबासकी मिळवावी, आशीर्वाद मिळवावा- ’जीते रहो, गाते रहो!’ त्याची राजगायक बनण्याची महत्त्वाकांक्षा नाही, की गायकीवर दौलत कमावून श्रीमंत होण्याची इच्छा नाही.. त्याला तळमळ आहे ती एकच- गुरूकडून गाणं शिकणं, बस्स! पण हे पूर्ण कसं व्हावं? पंडितजी नाहीत आणि खाँसाहेब शिकवायला तयार नाहीत! मग तो एकलव्याप्रमाणे स्वशिक्षणास प्रारंभ करतो- खाँसाहेबांच्या महालावरून त्यांच्या रियाझाच्यावेळी तो घिरट्या घालू लागतो- अशा वेळी कानावर येणारे दोनचार सूर, लकेरी, ताना, मुरक्या ह्यांवर समाधान मानून त्याच घरी येऊन घोटवू लागतो.. ह्याची कुणकुण खाँसाहेबांच्या मुलीला- झरीनाला लागते.. ती धाडस करून ह्या संगीताचा ध्यास घेतलेल्या वेड्याला भेटते, त्याचं अंत:करण जाणून घेते.. त्याची केवळ शिकण्याची इच्छा पाहून तिचं हृदय द्रवतं आणि ती त्याला परोपरीने मदत करण्याचा निश्चय करते.

इकडे खाँसाहेब राजगायक होतात खरे, पण त्यांचं मन आता त्यात रमत नाही. राजेसाहेबांनी बोलावलं की प्रसंगी रियाज सोडून तडक त्यांच्या दरबारी हजर व्हायचं, ते म्हणतील ते राग, ते म्हणतील तितका वेळ गायचा, त्यातली शुद्धता, वेळ, नियम न पाळता आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली की हवेलीवर परत यायचं! नाव काहीही घेतलं, तरी होते ते राजेसाहेबांचे नोकरच. त्यांच्या इच्छेचा सन्मान करणं त्यांचं कर्तव्यच होतं. पण हे मनातून पटत नव्हतं. त्यांचा मूळ पिंड हा गायकाचाच होता. पंडितजींना हरवायची एकच इर्ष्या होती, ती पूर्ण झाल्यानंतर उरलं होतं ते फक्त गायकीचं प्रेम. मनातला सल आता स्वस्थ बसू देत नव्हता.. एक बेचैनी, एक अस्वस्थता सतत घेरून असायची.. मन रमवण्यासाठी रियाझ चालू होताच, पण मनातून सदाशिवासारखा एकही शिष्य मिळाला नाही, ज्याने त्यांच्यानंतर त्यांचं गाणं, त्यांचं घराणं जिवंत ठेवलं असतं ही खंत होती. खरंतर सदाशिव आजही तयार होता त्यांच्याकडून विद्येचं दान घ्यायला, पण घराण्याचा अभिमान आणि पंडितजींशी असलेलं मनात घट्ट रुतून बसलेलं शत्रुत्व त्यांना तसं करण्यास परवानगी देत नव्हती..

अशातच एकदा खाँसाहेब फिरून येतात.. ती वेळ उगवतीची होती.. त्या प्रसन्न वेळी आपोआपच त्यांच्या ओठी एका खूप जुन्या गीताचे बोल येतात-
तेजोनिधी लोह गोल
भास्कर हे गगनराज
दिव्य तुझ्या तेजाने
झगमगले भुवन आज

खाँसाहेब ह्या गीताच्या आलापीत रमलेले असताना अचानक त्यांच्या कानावर एक रवाळ, तयार तान येते.. तान अगदी जवळून येत आहे.. कोणाचा आहे हा आवाज? इतका तयार गळा कोणाचा आहे? कोण बेभान होऊन गात आहे? खाँसाहेब कुतुहलाने शोध घेतात आणि पडद्यामागे स्वत:ला, जगाचे भान हरपून गात असलेला सदाशिव त्यांच्या नजरेस पडतो! संतापाने ते तोल गमावून बसतात.. ज्या मुलाला शिष्यत्व द्यायचे त्यांनी जाणीवपूर्वक नाकारले, तो असं लपून छपून विद्या शिकतो, तेही त्यांच्याकडून हे त्यांना सहन होत नाही.. ते चपळाईने ती कट्यार हाती घेतात आणि ती सदाशिवाचा जीव घेणार, इतक्यात त्यांना पंडितजी आठवतात, त्यांचा गुन्हा आठवतो.. आणि ते सदाशिवाला सोडून देतात..

दोन वर्ष उलटतात.. दोन्ही वर्ष खाँसाहेब स्वत:ची राजगायकाची पदवी राखायला यशस्वी ठरतात.. त्यांना टक्कर देईल असा कोणी गायकच पंचक्रोशीत आता नाहीये.. त्यांचं स्थान अबाधित आहे.. उद्या परत विजयादशमी आहे. खाँसाहेब आज कसून रियाझ करत आहेत.. ही बंदिश त्यांच्या घराण्याची शान आहे, त्यांच्या घराण्याची खास पेहचान आहे.. आधी कधीच पेश न केलेली ही बंदिश ते आळवून आळवून गात आहेत-
सूरत पीयाकी छिन बिसरायी
हर हरदम उनकी याद आयी..

त्या दिवशी खाँसाहेबांचा पाय थोड दुखावला आहे, म्हणून रियाझ करता करता त्यांनी महालातला हरकाम्या बद्रीप्रसादला पाय दाबून द्यायला बसवला आहे.. बंदिश आळवताना खाँसाहेब तल्लीन झाले आहेत, त्यांचे शिष्य मंत्रमुग्ध झाले आहेत.. एक अंतरा संपला आणि खाँसाहेब काय बघतात, की चक्क मुका बद्री त्यांच्याबरोबरीने गात आहे! हे काय भलतंच? बद्रीला तर बोलताही येत नाही.. तो ताना कशा घेईल? त्यांची गानसमाधी भंग पावते, ते गाणं थांबवतात. शिष्यांना समजत नाही, पण खाँसाहेबांना बरोब्बर समजतं! बद्रीच्या वेशात सदाशिव आहे- गेली दोन वर्ष बद्री म्हणून तो महालातला सेवक म्हणून खपतोय आणि खाँसाहेबांच्या गाण्याचे जे अमृतकण मिळत आहेत, ते कानात साठवत आहे. सदाशिव म्हणजे शेवटी पंडितजींच्या त्या भजनातला भृंगच! कितीहीवेळा कमलदलात बंदिवान झाला तरी त्याचा ध्यास न सोडणारा.. त्याला रंगे हाथ पकडल्यानंतरही सदाशिवाची गायन शिकण्याची आस किंचितही कमी झालेली नाही..

पण इतका दगा? खाँसाहेब आता संतापाने आंधळे होतात. आता एकतर सदाशिव तरी, नाहीतर त्यांचं गाणं तरी.. सदाशिव आपली कैफियत पुन्हापुन्हा त्यांच्यासमोर मांडतो, पुन्हापुन्हा त्यांना शिष्यत्व देण्यासाठी विनवतो, पण आता खाँसाहेब काहीच ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत.. अखेर सदाशिव मरणाला तयार होतो, पण अंतिम इच्छा म्हणून एकदा खाँसाहेबांसमोर मनमोकळेपणाने गायची परवानगी मागतो.. त्यानंतर जो फैसला होईल तो त्याला मान्य आहे.. खाँसाहेब त्याला आजमावायचे ठरवतात.. सदाशिव गायला लागतो, केवळ एकदा ऐकलेलं-
सूरत पीयाकी छिन बिसरायी
हर हरदम उनकी याद आयी..

त्याच ताना, त्याच मुरक्या, तीच फिरत- हुबेहूब खाँसाहेब! केवळ एकदा ऐकून त्याने गाण्याचे बारकावे जसे आत्मसात केले, ते पाहून खाँअसाहेन स्तिमित होतात! ते सदाशिवाच्या गाण्यात हरवून जातात.. हात सरसावून घेतलेली कट्यार हातातून कधीच गळून पडते.. पहिला अंतरा झाल्यानंतर सदाशिव थांबतो.. खाँसाहेब म्हणतात,
"बेटा, और गाओ.." पण सदाशिवाला पुढचे माहितच नाहीये.. तो परत एकदा त्यांना विनंती करतो, "खाँसाहेब, मला शिकवा, मी तुम्ही म्हणाल ते ऐकेन, करेन, पण मला गाणं शिकवा.."
खाँसाहेबांचं मात्र एकच उत्तर- "नामुमकिन!"

हार पत्करून शेवटी सदाशिव त्याच्या कल्पनेनेच पुढचा अंतरा जुळवतो आणि त्या जुळवलेल्या अंतर्‍यात तो अशी काही कलाकारी दाखवतो, की खाँसाहेब तृप्त होतात.. सार्‍या जगाचं भान विसरून, सर्व बंधनातून मुक्त होऊन सदाशिव गात आहे आणि खाँसाहेब समाधिस्थ अवस्थेत तृप्त होऊन ऐकत आहेत!

शेवटी गाणं संपतं.. खाँसाहेब सदाशिवाच्या जवळ येतात.. त्याच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवतात आणि त्याला आशीर्वाद देतात- "बेटा, जीते रहो, गाते रहो!" आणि उसन्या अवसानानं ते कट्यार उगारतात, पण त्यांची दृष्टी अंधारते, हात गळून पडतात.. सूरांच्या सच्च्या भक्तासमोर घराणेशाहीचा अभिमान माथा टेकवतो!

सदाशिवाच्या रूपाने समोर कट्टर, किंवा कदाचित तुल्यबळ प्रतिस्पर्धी समोर उभा ठाकलेला असताना आणि हातात कट्यार असतानाही अंतत: खाँसाहेब ती कट्यार चालवू शकत नाहीत! कारण, ती कट्यार सदाशिवाच्या काळजातून आरपार गेल्यानंतर जे रक्त वाहिलं असतं, ते एका सच्च्या गायकाचंच वाहिलं असतं फक्त- एका गरिबाचं, एका लाचाराचं नव्हे. उलट सगळी सुखं हात जोडून जवळ असूनही त्या क्षणी गरीब आणि लाचार ठरतात ते खाँसाहेब. वृथा अभिमान बाळगून त्यांनी केवळ सदाशिवाला अव्हेरलं नाही, तर त्यांनी संपूर्ण गायनकलेचा अपमान केला.. सदाशिवाला हाकलून दिल्यानंतर त्याचं काहीच वाईट झालं नाही.. तो गात राहिला, शिकत राहिला, गाण्यात रमत राहिला.. हार मात्र झाली ती खाँसाहेबांची, त्या घराणेशाहीची जिच्यामुळे गायनाचा वसा विसरून तिचे भक्त गायनाला वर्ज्य असलेल्या कणसूर शत्रूत्वात गुंतले!

कधी विचार केलाय, की सृष्टीच्या रचनाकाराने गाता गळा हा बरोब्बर मेन्दू आणि हृदयाच्या मधोमध का ठेवलाय? कारण संगीत हे भावना आणि हुशारी ह्यांचं अलौकिक असं मिश्रण आहे..संगीत हाच आत्मा, संगीत हेच तत्त्व! चराचरात भरून राहिलंय ते फक्त संगीत. त्याला कोणत्याही सीमा बांधून ठेवू शकत नाहीत.. घराण्याच्या, शिष्टाचाराच्या, अहंकाराच्या, प्रतिष्ठेच्या, रीतीरिवाजांच्या- कोणत्याही बंधनात हे बद्ध नाही. संगीतकला ही अशी विद्या आहे जी जितकी द्याल तितकी वाढेलच.. तिच्यात अपार समाधान, सुख आणि शांतता देण्याची शक्ती आहे.. तिच्यात घराणेशाहीच्या क्षूद्र भिंती उभारून तिची वंचना करू नका, तिच्या साधकांचा अपमान करू नका.. आनंद घ्या, आनंद द्या हा संदेश हे संगीत नाटक अत्यंत प्रभावी पद्धतीने आपल्याला देतं.. नाटकाचा शेवट म्हणजे एक शोकांतिका आहे- घराणेशाहीची शोकांतिका, जी आपल्या हृदयाला चटका लावून जाते!

10 comments:

aativas said...
This comment has been removed by the author.
aativas said...

It is an interesting story.. never read it (that is nothing to be proud of I know!). The opening and the concluding paragraphs share remarkeable thoughts! Will read the story in original now.

मनराव said...

उत्तम !!!

साधक said...

या नाटका बद्दाल खूप दिवसांपासून उत्स्तुकता मनात होती. राहुल देशपांडे खां साहेबांच्या भूमिकेत अशी जाहिरात वाचून कोण हे खान साहेब असा प्रश्न पडे.

सगळ्या प्रश्नांची उकल झाली असली तरी नाटक पहायची उत्सुकता दुणावली आहे. इतका छान उलगडा व गाण्याच स्थान लक्षात आल्यानंतर आता त्या गाण्यांमधला अर्थ समजतो आहे.

Anonymous said...

> पण खरंच संगीत असं घराण्यांत वाटलं जाऊ शकतं का? ... पण यमन रागाचे सूर, मात्रा, लय हे घराण्यांप्रमाणे बदलतात का?
>--------

एखाद्‌या भाषणात टाळ्या घ्यायला ही वाक्यें ठीक आहेत; पण अमुक घराण्याची ज़ोपासना हे क्षूद्रतेचेच लक्षण असते, असे नाही. वेगवेगळ्या कलाकारांनी आपल्या मनाच्या आणि आवाज़ाच्या धर्मानुसार संगीतातल्या वेगवेगळ्या घटकांवर भर देण्याला, आणि त्यांचे वेगवेगळ्या प्रमाणात मिश्रण करायला, कोणाचीही हरकत असू नये. लता यमन गाताना ज़े सूर लावते तेच तुम्हीही लावता. म्हणून तुमचा यमन लतासारखा उतरायचा नाही.

घराण्याचा दुरभिमान नसावा हे सत्य आहे. त्याला धरून कानेटकरांनी त्यांच्या नाटकात कथावस्तू बेतली आहे. पण घराण्यांनी क्षूद्र भिन्तीच काय त्या उभारल्या असा सरसकट निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल.

(माझ्या आठवणीनुसार सदाशिव लहानपणी 'दिन गेले भजनाविण सारे' गाणे ऐकतो, 'घेई छन्द' नाही; आणि त्याचा रियाज़ करतो. त्या दोन गाण्यांत 'दिन गेले' हे बालआवाज़ाला तुलनेने जास्त झेपण्यासारखे आहे.)

- नानिवडेकर

Anonymous said...

मी लिहिले होते :
> पण अमुक घराण्याची ज़ोपासना हे क्षूद्रतेचेच लक्षण असते, असे नाही.
>--------

'क्षुद्रतेचे' ...

- डी एन

poonam said...

आतिवास, मनराव, साधक- धन्यवाद.

नानिवडेकर- थोडा गैरसमज होतो आहे.. ही सगळी वाक्य केवळ नाटकाला उद्देशून आहेत, जनरलाईज्ड वाक्य नाहीत. आज शास्त्रीय संगीतात अनेक बदल झाले आहेत, आज एखादा साधक दोन घराण्यातल्या गुरूंकडून विद्या घेऊ शकतो. त्याने तसं केलं तर तो 'गुन्हेगार' आहे असं कोणी समजत नाही आज. घराण्यांनी भिंती उभारल्या हे असं सरसकट विधान करायचंच नाहीये.. मला जे म्हणायचं आहे ते फक्त नाटकापुरतं सिमित आहे. आणि कानेटकर नाही, पुरुषोत्तम दारव्हेकर.

जेव्हा वसंतराव हे नाटक करत, तेव्हा नाटकाचा कालावधी सहा तास होता असं मी ऐकलं आहे. मी पाहिलेलं नाटक हे नवीन संचातलं आहे, ज्यात राहुल देशपांडे खाँसाहेबांची भूमिका करतो. ह्याची लांबी व्यावसायिक कारणांसाठी चार-सव्वाचार तास आहे. ह्यात सदाशिव जेव्हा प्रथम पंडितजींकडे येतो, तेव्हा आवाजाची तयारी दाखवण्यासाठी 'घेई छंद..'च गातो. आपण म्हणता ते 'दिन गेले भजनाविण सारे' नवीन संचात तेव्हा नाही.

Naniwadekar said...

> संगीताचा मुक्तात्मा ते जपतात का?
>----

छत्रे बाई : या नाटकाबद्‌दल माझा दारव्हेकर-कानेटकर गोंधळ कायम होतो. नाटकात भरपूर प्रचारकी भाग आहे. तो टाळ्यांसाठी ठीक आहे. नाटक छान आहेच. पण 'संगीताचा मुक्तात्मा' वगैरे ऐकायला चांगल्या गोष्टी आहेत. 'कुठलीच गोष्ट पूर्णपणे मुक्त नसते' हे सुद्‌धा विरोधी पण छान वाक्य आहे, आणि ते सत्याच्या जास्त ज़वळचे वाटते. कलेच्या स्वरुपामुळे, मानवी मर्यादांपायी अनेक बंधने संगीतकलेवर पडतात. त्यामुळे अनेकदा कला उज़ळून निघते तर कधी तिच्यावर मर्यादा येतात. कलेविषयी अवास्तव बोलायचे ठरवले की तानसेन पाऊस पाडत असे, दीपक-राग गाऊन दिवे पेटवत असे वगैरे भाकडकथा तयार होतात. अब्दुल करीम, भीमसेन वगैरेंनी लयीला कमी महत्त्व दिले आणि फ़ैयाज़ खाननी सूर त्या मानानी कमी ज़ोपासून लयीच्या अंगावर भर दिला. याच्यात संगीताच्या तथाकथित मुक्तात्म्याला काय त्रास झाला? एकच कला साकारायचे दोन वेगळे मार्ग स्वीकारले गेले.

घराणी अस्तित्वात असताना जितके थोर कलाकार होते तितके आज़ त्या भिन्ती ढासळल्यावर राहिलेले नाहीत. पण याचा घराणेशाहीशी संबंध नाही; आणि शुद्‌ध स्वरुपातली घराणी राहिली नाहीत याचे मला दु:ख आहे, अशातला भाग नाही. विसाव्या शतकाच्या प्रारम्भी कलेला पोषक वातावरण होते. त्यानन्तर ५०-१०० वर्षांनी सवंगपणा बोकाळला आणि ग़ज़ला गाणारी बुज़गावणी कलाकार म्हणून मिरवू लागली.

तेव्हा 'पण खरंच संगीत असं घराण्यांत वाटलं जाऊ शकतं का?' याला उत्तर 'का नाही?' या प्रतिप्रश्नाच्या स्वरूपात आहे.

Dhananjay said...

@poonam - thanks for the article
@naniwadekar - agreed to your opinion

Dr. Gajanan Kagalkar said...

seen drama.


I have CD also. Khansaheb - chandrakant limaye

Now eager to see movie