October 25, 2010

आधी बीज एकले..

"काय झालं असंल रं?" गाडीत बसल्यापासून हरबानं किमान पाचव्यांदा राजूला परत तोच प्रश्न विचारला आणि आता आता मात्र राजू भडकला.."आता तिकडं गेलं की समजलंच की.. सार्ख काय आं? गप र्‍हा. अर्धा तासात कितीवेळा त्येचत्येच.."

त्याचं बोलणं ऐकून हरबा वरमला आणि तोंड पाडून बाहेरचं बघत बसला मुकाट.. 'म्यॅडम'चा फोन आल्यापासून हरबाच्या तोंडचं पाणी पळालेलं आणि उलट राजूला कसलीच फिकीर दिसत नव्हती.. आपल्या तरण्याताठ्या पोराकडे पाहून एकाच वेळी हरबाला त्याचा अभिमानही वाटला आणि त्याच्या बेदरकार स्वभावाची काळजीही.. 'म्यॅडमनी अचानक का बोलावलं असावं? काई उमगत न्हाई.. राजूपन एक शबद धड बोलत न्हाई.. सगला कारभार एकट्यानी बघतो, बा तर नकोच अस्तू.. मी लाख प्रस्न इचारनार, लोकांबरूबर नीट वाग, नीट बोल म्हननार.. आनि ह्यो- रग अन मस्तीनं भरलेला.. कदी काय डोस्क्यात घील अन कोनालाबी कसंबी बोलंल.. ल्हान बगनार न्हाई, मोटं बगनार न्हाई.. अवगड हाय.. आता म्यॅडमनापन असंच कायतरी बोलून आला अस्नार.. त्या त्याचा वचपा माज्यावर काडणार.. गप मुन्डी हलवून कबूल कराचं जे काय असंल ते.. माजं काई ऐकत न्हाई पोरगं असं म्हटलं तर पटनार न्हाई त्यास्नी..'

उभं आयुष्य हरबाचं माळीकाम करण्यात गेलं.. मालकासमोर सतत दबून रहायची सवय होती त्याला.. मान वर करून मालक-मालकिणीशी बोलावं असा स्वभावच नव्हता त्याचा.. त्या म्हणतील ते गप ऐकायचं, चुकीचं असेल तर चाचरत दोन शब्द बोलायचे, नाहीतर गप बसून आपलं काम तेवढं करायचं.. शहरात अनेक घरात माळीकाम करून आयुष्यभराची कमाई जमेल तितकी कमावल्यानंतर त्याला राजूने आता घरात बसवलं होतं.. घरातलाच पसारा खूप वाढला होता, त्यातच हरबा जमेल तसे सल्ले द्यायचा.. सगळा कारभार झटक्यात राजूने आपल्या हातात घेतला होता.. माळीकाम तर कोणी करत नव्हतं आता, पण नवीन उद्योग सुरू केले होते. राजूचं एकूण बरं चाललं होतं सगळं ह्याचंच समाधान होतं..पोरगं हुन्नरी होतं, खटपटं होतं, बापासारखंच अबोल होतं, पण मनात सतत विचार चालू असंत.. बापापेक्षा मोठं व्हायचं, नाव कमवायचं मग त्यासाठी कितीही कष्ट घ्यावे लागले तरी चालतील असा खाक्या होता..

गाडीच्या गतीने राजूचेही विचार धावत होते.. आपल्या ओम्नी गाडीकडे मोठ्या अभिमानाने त्याने पाहिलं.. सहज म्हणून मागल्या सीटवर आरशामधून बघितल्यासारखं केलं, आणि त्याची अन गौरीची नजरानजर झाली! झटक्यात गौरीनं नजर फिरवली, तसं राजूच्या ओठावर बारिक हसू आलं.. गौरी, स्मिता दोघी बाहेरचं बघत होत्या, मध्येच मध्ये ठेवलेल्या फुलांचं पॅकिंग नीट आहे ना ह्याची खात्री करत होत्या.. करता करता गाडीच्या तालावर डुलतही होत्या.. 'चान्गली चालत्ये की सेकन्डहॅन्ड असली तरी गाडी.. ओम्नीमधून माल न्यायला कसं झकास वाट्टं, नायतर एमेटी तुडवत पाच वर्ष गेलो.. पाठ, कंबरंची वाट लागली! हा म्हन्जे नुस्ता आराम! फुलंबी टिकून र्‍हातात, जास्तीची डिलीव्हरीपन घेता येते अन फेर्‍याबी करता यीतात कितीबी.. आता बिजनेस वाढला की अजून असल्याच दोन गाड्या घ्यायच्या.. म्यॅडमनी बोलावलंय, त्ये बरंच झालं, आता समोरासमोर काय हे हूनच जाऊद्ये! पन म्हातार्‍याला उगाच बलिवलं! म्हातारा उगा मग काईपन हो ला हो करतो अन मुकाट ऐकून घितो.. मी फुकट काय ऐकून घिनार नाय.. आपल्या मालाची खोटी होते, तेंच्या मालकिनिचं काय जातंय?' विचारातच राजूनं मान झटकली आणि तो पुढचा रस्ता पाहू लागला.. आलंच शहर.. निम्माशिम्मा तासाचा प्रवास.. ओन्मीनं काय वेळ लाग्तोय? परत एकदा तो खुशालला..
--------

’कला नर्सरी’मध्ये कलाताई कधीच्या फ़ेर्‍या मारत होत्या.. गेल्या तीन-चार महिन्यात त्यांच्या चेहर्‍यावरची टवटवी जाऊन चेहरा सुकला होता, वय दाखवत होता.. विचारात त्या आपल्याच प्रवासाचा वेध घेत होत्या..
घरातल्या शोभेच्या बागेपासून ते आज दिमाखात उभ्या असलेल्या 'कला नर्सरी'चा प्रवास अगदी स्वप्नवत होता. कानिटकर म्हणजे बडं प्रस्थ. वडिलोपार्जित कारखानदार. घरात संपत्ती पाणी भरत होती. शशिकलाबाईंचं माहेरही तोलामोलाचं. लग्न झाल्यानंतर वेळ जावा म्हणून त्यांनी बंगल्याभोवतालच्या मोठ्या, भव्य बागेत लक्ष घातलं आणि त्यांना अपघातानेच स्वतःमधलं टॅलेन्ट सापडलं. हरबा तिथे तेव्हा माळीकाम करत असे, म्हणजे झाडांना पाणी घालणं, खतं घालणं, थोडीफार छाटणी वगैरे. पण शशिकलाबाईंचं लक्ष जसं बागेत वाढलं, तसं त्यांना हरबाचा हातगुण, त्याची समज कळली आणि तिथेच कला नर्सरीची बीजं पेरली गेली.

मग सुरू झाले शशिकलाबाईंचे प्रयोग आणि हरबाचे कष्ट.. Landscape Gardeningचं प्रस्थ त्याकाळी इतकं नव्हतं, तरी त्या दोघांनी बाग अक्षरश: नटवली.. बंगल्याच्या दर्शनी भागातल्या बागेत हरेक प्रकारची फुलझाडं, शोभेची झाडं, हिरवळ, काही औषधी रोपटी, काही फळंझाडं, वेली, एक छोटं तळं, त्यात वॉटर लिली, बाजूने बाक.. मागच्या बाजूला मोठी झाडं- नारळ, चाफा, आंबा, प्राजक्त अशी छोटी-मोठी झाडे, अधूनमधून बाक, आंब्याच्या झाडाला तर झोपाळाही बांधला होता.. ओळखीच्यांकडून, प्रदर्शनांमधून, चक्क दुसर्‍या गावातूनही शशिकलाबाई रोपं आणत आणि हरबा त्यांची काळजी घेई.. शशिकलाबाईंना चांगली सौंदर्यदृष्टी होती, सजावटीची आवड होती.. हळूहळू त्यांच्या बागेचा लौकिक सर्व परिचितांमध्ये पसरला.. संध्याकाळच्या पार्टीज मुद्दाम बागेत केल्या जाऊ लागल्या.. कित्येकांनी त्यांच्याकडच्या बागेतली रोपं नेली की ती कशी रुजवावी ह्यावर शशिकलाबाई आवर्जून, मनापासून मार्गदर्शन करत.. वेळ पडल्यास हरबाला त्या त्यांच्याकडे मदत करायला एकदोनदा जायला परवानगी देत..

हरबाही मनापासून ह्या कामात रमला होता.. ’म्यॅडम’ त्याच्याकडून चिक्कार काम करवून घ्यायच्या खर्‍या, पण त्याचं काम त्यांना आवडायचं.. त्यांच्याच ओळखीने हरबाला अजून दोनतीन प्रतिष्ठितांकडे बागकामाचे काम मिळाले होते. पण अर्थातच मुख्य काम म्यॅडमकडेच. हरबावर माळीकामासाठी अनेक लोकांचा डोळा आहे हे जाणूनच त्याला अधूनमधून पैशाची मदत करणं, त्याच्या मुलांना त्यांच्या मुलांच्या महागाच्या पण जुन्या वस्तू देणं, बायकोला साड्या, सणासुदीचं फराळाचं देणं वगैरे करून हरबाला त्यांनी बांधून घेतलं होतं.

हरबाची स्वत:ची एक जमिन होती गावात, तिथेच तो रहायचाही.. पण तिची माती फारशी सुपीक नव्हती, पाऊसही ठीकठीक होता.. अगदी धो-धो नाही आणि अगदी दुष्काळही नाही.. विहीरी अगदीच कोरड्या पडायच्या नाहीत, इतकंच. संपूर्ण कान्हा गावातच ही स्थिती होती म्हणा.. हरबाप्रमाणेच खरंतर सगळे माळीकामात तरबेज.. सगळे पैशाच्या बाबतीत मात्र खचलेले.. हळूहळू सगळ्या जमिनी पडीक झाल्या आणि हरबाप्रमाणे सगळेच लोक पोटासाठी शहरात आले.. हरबाप्रमाणे काही लोक माळीकाम करत, काही ड्रायव्हर म्हणून, काही चक्क चपरासी म्हणून गुजारा करू लागले.. जसजसं म्यॅडमबरोबर हरबा विविध प्रयोग करायला लागला, तसे तो काही प्रयोग स्वत:च्या जमिनीतही करायला लागला, अर्थातच म्यॅडमच्या परवानगीनेच.. बागेतून रोपं आणून त्याच्या जमिनीत ती लावून त्याची कलमं करून तो परत बागेत नेत असे.. कधी कधी काही कलमं शहरातल्या बागेत होत नसत, पण गावात रूजत.

ह्या सगळ्याचा साक्षी लहानगा राजू होता.. हरबाला त्याच्या आधीच्या दोन मुली होत्या, राजू शेंडेफळ. राजू लहानपणापासूनच एकदम तल्लख बुद्धीचा, अबोल, पण वेळ आली की जोरात बोलणारा, एकदम एक्साईट होणारा असा होता.. हरबा जेव्हा घरी यायचा, तेव्हा त्याच्या प्रयोगात राजू त्याला लागेल ती मदत करायचा.. बाप नक्की काय करतोय, कसं करतोय, एखादं रोपटं जगलं नाही तर काय कारणं शोधतोय, आजूबाजूच्या सग्यांकडून काय सल्ले घेतोय- सगळ्यावर लक्ष ठेवून असायचा तो.. वारशाने मातीचे, झाडाझुडुपांचे प्रेम त्याच्याकडेही आले होते..
-----

सूनेची आवड आणि धडपड पाहून शशिकलाबाईंच्या सासर्‍यांनी शहराबाहेर असलेला त्यांचा एक छोटा जमिनीचा तुकडा होता तो त्यांना दिला आणि सुरू झाली ’कला नर्सरी’. अनेक छोटीमोठी फुलझाडं, रोपं, कलमं, माती, औषधं, थोडंफार Landscape designing अशी सुरूवात झाली. हरबाच्या हाताखाली काम करणारे अनेक लोक आले. हरबा त्यांचा मुख्य झाला, पण म्यॅडमचा तो नोकरच राहिला.. शशिकलाबाईंच्या बागेचे कौतुक त्यांच्या वर्तुळात होत होतेच.. आता त्यांच्या कौशल्याचा बोलबाला सामान्यातही होऊ लागला.. रोपांची अशी वेगळी नर्सरी असणं वगैरे कल्पनाच नवीन होती, त्यामुळे 'कला नर्सरी'ला त्याचा भरपूर फायदा झाला. ’माधवराव कानिटकरांची पत्नी’ इतकीच स्वत:ची ओळख न ठेवता ’शशिकला कानिटकर’ म्हणून त्यांनी स्वत:चं स्थान कमावलं.
----

शशिकाबाई बघता बघता कमालीच्या व्यस्त झाल्या नर्सरीत. मध्यंतरीच्या काळात त्यांना दोन मुलेही झाली- सुरेन्द्र आणि कलावती. नर्सरीचा व्याप वाढत होता. आजूबाजूलाही झपाट्याने बदल होत होते. लोकांच्या बागेच्या कल्पना बदलत होत्या. लोक जास्त जागरूक होत होते. ’कला नर्सरी’ने आता स्वत:ची मॉडेल बाग उभारली होती.. लोक तिथे फिरायला येत आणि हमखास परत जाताना रोपं घेऊन जात. अनेक प्रदर्शनात कला नर्सरी भाग घेत असे आणि जिंकतही असे. आजूबाजूच्या कुंभारांबरोबर टाय-अप करून नर्सरीच्या एक भागात विविध प्रकारच्या कुंड्या आणि माती त्यांनी विकायला ठेवली. जो माणूस नर्सरीत येईल, त्याची नर्सरीसंबंधी प्रत्येक इच्छा, गरज पूर्ण व्हायला हवी ह्याकडे शशिकलाबाई लक्ष ठेवत. नर्सरी आता स्थिरावली, तरी शशिकलाबाई कधी स्थिरावल्या नाहीत.. सतत काहीतरी नवीन शिकणं, करणं हेच त्यांचं टॉनिक होतं. मात्र सर्व कारभार एकहाती होता.. अगदीच आर्थिक वगैरे सल्ले लागले तर शशिकलाबाई नवर्‍याचा सल्ला घेत.
------

अशात वीस वर्ष सरली. कला नर्सरीचा शहरात दबदबा वाढला. आता नर्सरी असे नाव असले, तरी एक प्रकारचे फुलांचे होलसेल मार्केटच झाले होते ते.. नर्सरीमधून देवळांना, मोठ्या हॉटेल्सना, पार्टी हॉल्सना फुलं ’सप्लाय’ होत होती. शेवंती, झेंडू, झर्बेरा, देशी गुलाब, ग्लॅडियोला ह्याला हक्काचं, रोजचं गिर्‍हाईक होतं. कित्येक फूलविक्रेते होलसेल मार्केटमधून फुलं घेण्याऐवजी नर्सरीमधून माल घेऊन जात होते. एक महत्त्वाची बाब म्हणजे आता हरबाच्या कान्हा गावात सगळे फुलशेती करू लागले होते. लालजर्द, पिवळाधमक, गर्द शेंदरी असे मोठमोठे झर्बेरा गावच्या मातीत जोमानं रुजतील असा हरबाचा होरा होता. सुरूवातीच्या प्रयोगांमध्ये झेंडूवर त्याने भर दिला होता. गावातली माती मध्यम प्रकारची होती, शेती त्यावर शक्य नव्हती, पण कमी दिवस लागणाती फुलशेती करता येईल असं हरबाला वाटत होतं. म्यॅडमची नर्सरी जोमात चालायला लागल्यावर त्याने घरच्या जमिनीत प्रथम प्रयोग केले.. खरंतर कर्ज घेऊन ह्या प्रयोगाला हात घालायला मन कचरतच होतं, पण थोडं खत, थोडी पावसाची मेहेरबानी, सिंचनामधून पाणी, बरीचशी काळजी ह्यामुळे एकाच हंगामात हातात भरपूर फुलं आली.. प्रयोग यशस्वी झाला होता.. झेंडू, शेवंतीसारखेच मग महाग असणारे, पण लक्ष वेधून घेणारे आणि जास्त टिकणारे, टवटवीत दिसणारे झर्बेराही लागतील का अशा विचाराने हरबाने झर्बेराचे कंद नर्सरीमधून आणून लावले. थोड्या प्रयोगांनंतर तेही रुजले.
शशिकलाबाईंचा ह्या प्रयोगाला अर्थातच पाठिंबा होता.. त्यांना हक्काचा सप्लायर मिळत होता, शिवाय तो फारशा मागण्या न करणारा होता.. त्यांनी हरबाला उदार मनाने फुलशेती करायची परवानगी दिली. हरबाचे पाहून त्याच्या गाववाल्या लोकांनीही त्याच्या सल्ल्याने घाबरत घाबरत का होईना सुरूवात केली.. अनेक वर्षांनी गावच्या शिवारात बी-बियाण रुजलं, मशागतीमुळे काळी आई प्रसन्न झाली. झेंडू, शेवंती आणि झर्बेराने शेतं तरारली. गावचे लोक अनेक वर्षांनी आपल्या शेतात राबायला लागले, स्वत:च्या हक्काच्या जमिनीची कमाई मिळवू लागले. फुलांना प्रचंड मागणी होती.. बाजारपेठ तयार होती. पोत्यानं फुलं कला नर्सरीत पोहोचत होती. काही अडलं, तर हरबा सांगा-विचारायला होताच. कर्जाची भीती न वाटता, उलट आलेला पैसा परत जमिनीतच घालायची इच्छा व्हायला लागली होती.

राजूचा ह्या सगळ्यात सिंहाचा वाटा होता. दहावीनंतर त्याने विद्यापीठाच्या ’Diploma in Horticulture'च्या कोर्सची पदविका त्याने घेतली. बापाचे प्रयोग तो पहात होताच, पण नवीन पिढीला संघटित करायचे मोठेच काम त्याने केले होते. गावातले त्याचे सगळे मित्र, भाऊ ह्यांचा तो अघोषित नेता झाला. सगळ्यांना फुलशेती करायचे त्याने प्रोत्साहन दिले. 'आपले बापदादे लोकांचे नोकर म्हणून जगले, पण आपण आपल्या मनचे राजे होऊ, कष्ट करू आणि हक्काचं कमवू' अशी इच्छा त्याने त्याच्या वागण्याबोलण्यातून सगळ्यांमध्ये जागवली.. जिथे हरबाच्या पिढीतले लोक थकत होते, तिथे राजूसारखं तरूण रक्त परत मातीकडे वळणं गरजेचं होतं. पण आता आमिषं जास्त होती. शेतीतले कष्ट दिसत होते. पावसाचं लहरीपण, नुकसानी, अनिश्चित कमाई ही शेतीची दुसरी बाजू फारशी आकर्षक नव्हती. शिवाय, शहर जवळच होतं, तिचे वारेही गावच्या हवेला लागत होते.. मोठे लोक, राजकारणी जमिनी विकत घेत होते, शेतीची जमिन जाऊन त्यावर बंगले बांधण्याचे घाटत होते.. विनासायास पैसा दारात यायची संधी होती.. ह्या पार्श्वभूमीवर तरूणांना घरच्या व्यवसायातच गुंतवून ठेवायला राजू अग्रेसर होता. त्याच्यात एक तारुण्यसुलभ जोश होता, उसळतं रक्त होतं.

त्याने शहरातल्या अजून कोणत्या ठिकाणी फुलं सप्लाय करता येतील ह्याचा आढावा घेतला होता, अनेकांशी ‘कॉन्टॅक’ सुरू केले होते. फुलांचा धंदा बसला, हंगाम हाती लागले नाहीत, तर पर्यायी व्यवस्था म्हणून कोणता जोडधंदा करता येईल ह्याचीही चाचपणी सुरू होती. राजूचं क्षितिज मोठं होतं, मनात अनेक योजना होत्या, पण पैशाचं वेडं धाडस करायला अजून मन कचरत होतं आणि भक्कम मार्गदर्शनाअभावी दिशा नक्की करता येत नव्हती.

त्याचा शशिकलाबाईंवर त्याचा राग नव्हता, पण त्यांनी बापावर अन्याय केलाय, त्याला मोठा होऊ दिला नाहीये असं त्याचं मत होतं. हे जे दिवस त्याला दिसत होते ते त्यांच्यामुळेच हेही तो जाणून होता.. त्याचं इमान त्यांच्याकडे झुकलेलं होतं, पण बांधलेलं, लाचार नव्हतं. बाईंचा ’मी मालक, तुम्ही नोकर' असं सगळ्यांशी वागणं त्याला पटत नसे. त्यांनी त्यांच्याइतकाच दर्जा त्याला, हरबाला आणि गावातल्या प्रत्येकाला द्यावा अशी त्याची अपेक्षा होती. घरचा धंदा सुरू झाल्याझाल्या त्याने हरबाचं नर्सरीत जाणं आधी बंद करून टाकलं आणि त्यानंतर तो फक्त नर्सरीचा ’सप्लायर’ झाला. मॅडमशी जास्त संबंध त्याने जाणीवपूर्वक ठेवले नव्हते.
-------

एक सफाईदार वळण घेऊन ओम्नी कला नर्सरीत शिरली. गौरी आणि स्मिताला फुलांच्या डिलिव्हरीचं काम देऊन राजू आणि हरबा मॅडमच्या ऑफिसात शिरले. त्या त्यांचीच वाट पहात होत्या..
"या.. काय हरबा, कसा आहेस? आज बरेच दिवसांनी आलास.."
"जी.." हरबानं नुसतीच मान डोलावली आणि तो अवघडून उभाच राहिला..
राजू मात्र सहजपणे मॅडमसमोरच्या खुर्चीत बसला आणि क्षणभरच उभ्याच असलेल्या बापाकडे पाहून त्याच्या कपाळावर आठी पडली. इतकी वर्ष झाली, आता तर हरबा नोकरही नव्हता, तरी मालक-नोकर संबंधांमधून मॅडम आणि हरबा दोघेही बाहेर पडत नव्हते. त्याने जरा जोरातच शेजारची रिकामी खुर्ची ओढली आणि हरबा कसंनुसा होत त्यात संकोचून बसला..शशिकलाबांईंनी नजरेनंच सारं टिपलं.
"मॅडम, ऑर्डर घेऊन आलोय.. पन्नास बंडल लाल, आणि पन्नास ऑरेंज आणि पिवळे मिळून." राजूनं विषय काढला.
बाईंनी हिशोब केला. ही फुलं जेमतेम पुरली असती आज, कदाचित कमीही पडली असती. "एवढीच? झेंडू? ग्लॅडिओला नाहीत? तुला माहित नाहीये, रोजची ऑर्डर काय असते ते?" त्यांचा आवाज चढला.
राजूनं ताडकन उत्तर दिलं, "मॅडम, आजची ऑर्डर कुटं दिलिये? काल व्हती ती कालच पोचवली. आज नव्हतीच काई ऑर्डर. ही मी अशीच घेऊन आलोय, तुमी बोलिवलं म्हनून.. आज पंध्रा दीस झाले, रोजची ऑर्डर नाहीच्चे. कधी अस्ती, कधी नस्ती.. कुलकर्न्याला विचारा की. दोन-तीन दीसांनन्तर येकदमच पोत्यानं घेतोय आता फुलं.. तुमाला म्हाईत न्हाई?"

राजूने अचानक जाबच विचारल्यासारखं केलं आणि बाई वरमल्या. पण राजूला नेमकं ह्याचसाठी आपण बोलावलंय हे त्यांना आठवलं.."कुलकर्णींनी ऑर्डर दिली नाही, की तुला ऑर्डर सप्लाय करायची नाहीये राजू?" त्यांनी तीव्र स्वरात विचारलं..त्यांच्या प्रश्नामुळं आणि त्यातल्या गर्भित अर्थामुळं हरबा दचकलाच एकदम. ताडकन मान वर करून त्याने म्यॅडमकडे पाहिलं.."इतकं दचकायला काय झालं हरबा? जसं काय तुला माहितच नाही!" बाईंचा स्वर आता कुत्सितपणाकडे झुकला..
"नाय नाय, आसं नाही हुयाचं म्यॅडम.. काय बोलताव? काय रे राजू? आं?" हरबा अचानक झालेल्या भडिमारामुळे गोंधळलाच!
"मीही हाच प्रस्न विचारला तर मॅडम?" राजूचा धारदार आवाज आला. "मी जे बोल्लो त्यातला एकनएक शब्द खरा हाय. आजकाल आमाला रोजची ऑर्डर नस्ती. दोन-तीन दिसांनी ऑर्डर अस्ती. तुमी ऑर्डर बुक बघा की तुम्ची. मग आता मी म्हनलं, की तुम्हालाच आम्हाला ऑर्डर द्याय्ची न्हाई, तर?"

हरबा आता मात्र घाबरला. "ये राजू, आरं गप. काय बोलतूस? त्येही म्यॅडमसमोर? अरारा. तू रोज देत न्हाय इकडे फुलं? माला बोल्ला न्हाईस कधी त्ये.. अरे रोज जातात कुठं मन्ग फुलं? आं?"

"मी सांगते ना! 'रावजी गार्डन'कडे जातात तुमच्या गाड्या रोज!" मॅडम बोलल्या.. "तुमच्याच नाही, तर संपूर्ण कान्हा गावच्या गाड्या सगळी फुलं घेऊन रावजीकडे टाकतात.. 'कला नर्सरी'ला उरकीसुरली, रिजेक्ट केलेली फुलं येतात, काय राजू? बरोबर ना?" राजूकडे एक जळजळीत कटाक्ष फेकत, त्याला काहीही बोलायची संधी न देता बाई पुढे बोलायला लागल्या.."रावजी आपला सर्वात मोठा कॉम्पेटिटर. माझ्यानंतर तो ह्या बिझनेसमध्ये आला.. माझ्यासारखंच सगळं त्याने कॉपी केलं.. मी जिथे गेले तिथे तो पाठीपाठी आला आणि लाचारासारखी माझ्याकडे कामं मागितली.. आणि वर माझ्याच पाठीत सुरा खुपसून माझी माणसं चोरली, माझी कॉन्ट्रॅक्ट्स हिसकावली.. हरबा हे सगळं तुला माहित नाही? राजूला हे सगळं नवीन आहे? तरी! तरी आज मी काय पहाते? तर 'कला नर्सरी'ने ऑर्डर दिली की राजूशेठ म्हणतात, फुलं नाहीयेत, सगळी बूक झालीयेत! 'कला नर्सरी'साठी फुलं नाहीत हां राजू? रावजीसाठी मात्र पंचक्रोशीतली सगळी फुलं हजर! अरे वा! नवलच झालं म्हणायचं! आमच्या जुन्या, निष्ठावंत नोकरांची ही कहाणी, तर नव्या लोकांना मी काय बोलणार? आणि नवे लोक येंणार तरी कोण? राजू एकटाच त्यांचा लीडर. तो बोलेल तिथे डोळे झाकून माल जाणार ना! राजू, किती जास्त पैसे देतो रे तो नालायक रावजी तुम्हाला आं? तेवढे पैसे शशिकला कानिटकरांना परवडणार नाहीत बहुतेक, हो ना? अरे, तुमच्यावर विश्वास ठेवला म्हणून एकही नवीन सप्लायर पाहिला नाही, त्याचे हे पांग फेडलेत? आज मला अडचणीत आणता? नवीन कॉन्ट्रॅक्ट हवं होतं, पैसे वाढवून हवे होते, तर सरळ बोलायचं ना? असे पाठीमागून वार करता? हरबा, विसरलास सगळं मागचं? काय कमी पडू दिलं मी तुला? जरा माझं लक्ष दोन महिने इकडून कमी झालं, तर एकेकाचे खरे रंग दिसायला लागले! बोल ना हरबा! काय राजू? की राजूशेठ म्हणायचं? बोला ना आता. का गप्प झालात?"

बाईंच्या तोंडातून वाग्बाण वार करत होते, तसतसा हरबा खचत होता, आणि राजूचा तोल ढळत चालला होता.
हरबा गोंधळलाच. "म्यॅडम, आईच्यान सांगतू, मला ह्ये कायबी म्हाईत न्हाय! कदी ह्यानं हे सग्ळं केल्य, पांडुरंगा?! आर्डर न्हाई येत तर काही बोल्ला बी न्हाई.. कदी सग्ळी प्वारं गोळा केली, कधी रावजीला सप्लाय कराय्चं ठरविलं.. काय पत्त्या लागू देत न्हाईत! रावजीला का दिली रे बाबा फुलं आं? आरं नालायक मानूस तो.. अरे बापाला अडगळीतच टाकलंस की रं पोरा.. येकदातरी इचाराय्चं, सांगाय्चं! आरं, आरं काय केल्यास हे? आं? म्यॅडम पोर हाय, माफी करा. आता पुन्ना असं न्हाई होनार.. काय रं राजू आं? बोल की" हरबा पोराच्या एकतर्फी निर्णयानं व्यथित झाला खरोखर! आजवर म्यॅडमकडून एक वाकडा शब्द ऐकून घ्यायला लागला नव्हता त्याला.. आणि आज राजूमुळे मान अगदीच खाली घालावी लागली होती! चक्क म्यॅडमना सप्लाय न करता रावजीला ऑर्डर?

राजू मात्र धुमसत होता.. शशिकलाबाईंचा एकेक शब्द टिपला होता त्याने. त्यांच्या बोलण्यातले 'मी', 'माझं', 'माझी नर्सरी', 'नोकर', जुने उपकाराचे दाखले आणि आता बापाने काहीच न शहानिशा करता त्यांची मागितलेली सपशेल माफी! बाईंनी हरबाला कधीच समान दर्जा दिला नव्हता, त्या आजही त्याला नोकरच समजत होत्या आणि हरबाला त्यात काहीच वावगं वाटत नव्हतं ह्याचा त्याला जास्त राग येत होता! आपल्या गरीब स्वभावाच्या बापाचा बाईंना कसा बरोब्बर अंदाज आहे, आणि म्हणूनच आज त्यालाही ह्या सगळ्याचा साक्षीदार त्यांनी करायचा डाव आखलाय हे त्याला बरोब्बर समजलं! आज आता सोक्षमोक्ष लावूनच टाकू असं त्याने ठरवलं.

"माफी कसली? आमचं काय चुकलंच नाह्य, तर कस्ली माफी? माज्या बापाचा इथे काईयेक सम्बन्द नसताना, त्याला का बोलता मॅडम? आम्ही बरे इझ्झी भेटतो तुमाला तुम्चा राग काडाय्ला ते. तुमी तुम्च्या मान्सांना इचारा की एकदा.. दोन महिनं तुमी इथे लक्ष दिलं न्हाईये, तर तुमच्या लक्षात फक्त आम्च्या न दिलेल्या ऑर्डरी आल्या, पन तुमी तुम्च्या ऑफिसात चवकशी केली का कदी? कलावतीताई अचानक गेल्या.. आमालाबी लई दुख झालं.. तुमाला तर खूपच होनार. पन त्या दुखाचा चुकीचा वापर आमी केल्येला न्हाई मॅडम. आमी मानूसकी असनारी मानसं आहोत. तुमी दोन महिनं झालं, बंगल्यावं. ना कोनाशी बोलत ना भेटत. कुल्कर्नी हितला मेन. तुमच्यानंतर त्योच. आता त्याला कुटलं झेपतंय, नवीन ऑर्डरी देनं, घेनं, हिशेब ठेवनं, मान्सं बघनं, नर्सरी बघनं? एक काम हाय होय? आमी आम्ची ऑर्डर आनायची, आणि हिकडे आल्यावर त्यानं सांगायचं आज ऑर्डर न्हाईच! आज फुलं नगतच म्हनं! कालची शिल्लक हायेत म्हनं! अशा वक्ताला आमी आमच्या मालाचं काय करावं? तुम्चा जसा भरोसा आम्च्यावर, तसा आम्च्यावरबी टाकलाय की आम्च्या लोकान्नीबी. आज मी पुरत्या तीन गावान्ची फुलं फक्त कला नर्सरीला सप्लाय कर्तोय.. उद्या तुमी अचानक काई न सांगतासवरता फुलं नगतंच म्हन्ता, मी काय समजाय्चं आनि माझ्यावर भरोसा ठिवून त्येंची फुलं माला देनार्‍यांना काय सांगाय्चं ते सांगा? एक्दा बघितलं, दोन्दा बघितलं आनी मन्गच ठरविलं, की आता जो घील त्येला द्यायाची फुलं! मी माजं नुक्सान सोसनबी, पर दुसर्‍याचं कसं करू? आमाला बी पोट हाय, अन आमचा हा एकच धंदा हाय मॅडम. असं फुकटचं नुक्सान आमी कसं सोसावं? मग रावजीला इचारलं, त्येला हवीच होती, दरबी तुमी देता तोच दिला, तरीबी परत येकदा कुल्कर्न्याला इचारलं. त्येनं परत 'आज नाय, उद्या बगू' केला, आनि मगच दिलीयेत फुलं रावजीला.. आनि तो घील तवर देनारच, ह्येबी आत्ताच क्लियर कर्तो. नायतर तुमी तुम्या ऑर्डरी परत फिक्स द्या आमाला. आमी माल तुमालाच देऊ आदी, पन जो काय वेवहार, तो फिक्स पायजे."

राजूचं बोलणं संपलं आणि ऑफिसमध्ये एक विचित्र शांतता पसरली. बाई आणि हरबा दोघेही सुन्न अवस्थेत बसून राहिले. बाईंना बसलेला धक्का फार मोठा होता.. राजू आणि हरबा उठून त्यांच्यासमोरून कधी निघून गेले, हेही त्यांना कळलं नाही.
---------

शेवटी काहीच न सुचून शशिकलाबाईंनी माधवरावांच्या कानावर सगळं घातलं.. मुळात त्यांना आपले अंदाज चुकले, आपण आपल्याकडून शहानिशा करण्यात कमी पडलो, प्रॉब्लेमच्या मुळाशी न जाता तुलनेनं हरबा-राजूचं सॉफ्ट टार्गेट आपण पकडलं हे समजायला, पचवायला वेळ लागला. बर वर हा कालचा मुलगा आपल्याला व्यवहार शिकवतोय, आपल्याचकडून कमिटमेन्ट मागतोय हे तर त्यांच्या कल्पनेपेक्षाही फार जास्त होतं!

"पण तो म्हणतोय त्यात काय चूक आहे शशि?" माधवरावांनी सगळं शांतपणे ऐकून घेऊन त्यांना विचारलं.. "कुलकर्णी नाही म्हटलं तरी क्लर्क लेव्हलचेच आहेत. तुझ्यात असलेली निर्णयक्षमता त्यांच्यात कुठेय? तुझं लक्ष नाही म्हटल्यावर lapses हे येणारच होते. तू पार कोशातच गेली होतीस.. आणि ते बरोबरही होतं.. नैसर्गिक होतं.. पण त्याचं सगळं खापर राजूवर फोडणं, हे मात्र चुकलंच, असं अजूनही नाही वाटत आहे तुला? Be honest! अगं, नवीन पिढीचा आहे तो.. स्वतःचं नुकसान कसं आणि का करून घेईल तो? कोणताही उद्योजक नाही करून घेणार! आणि तेही फुलांसारख्या perishable goodsमध्ये! He needs to survive! आणि ते करताना तो फक्त नफाच बघणार. हरबाची loyalty विरळ उदाहरण! खरं सांगू का, आता तू ह्या पूर्ण नर्सरीचाच नव्याने विचार करायला हवा आहेस माझ्या मते. सुरेन्द्रला त्यात काही गम्य नाही, तो आपल्या बिझनेसमध्ये मस्त सेटल झालाय आणि सुरूचीचाही कल आणि background engineering आहे.. तीही तिकडेच रमली आहे. कला! ह्म्म. तिने काहीतरी केलं असतं नक्की.." कलावतीचं नाव निघताच दोघंही स्तब्ध झाले.

त्यांची वीस वर्षाची लाडकी लेक.. तिला आईसारखीच सौंदर्यदृष्टी होती.. आईबरोबर काम करायलाही लागली होती ती.. पुढे जाऊन ती नर्सरी सांभाळणार ह्यात किंचितही शंका नव्हती.. पण! अफाट संपत्ती, हातापायाशी माणसं, उत्तमोत्तम सेवा उपलब्ध असूनही माणूस निसर्गापुढे कसा हतबल असतो, ह्याचं साक्षात उदाहरण म्हणजे कलाचा झालेला अपघाती मृत्यू!

मित्रमैत्रिणींबरोबर ट्रिपला गेलेली कला परत आलीच नाही.. परतायच्या वाटेत त्यांच्या बसला अपघात झाला आणि चार मुलांचा बळी गेला, ज्यात एक कला होती.. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. कानिटकर कुटुंबाला बसलेला हा सर्वात मोठा आणि भीषण आघात होता.. आत्तापर्यंत अपयश माहितच नसलेल्या शशिकलाबाई तर उन्मळून पडल्या ह्या आघाताने.. आता नर्सरी हे एकमेव टॉनिक होतं त्यांचं! पण त्यातही कटकटी उद्भवत होत्या..

"नव्याने विचार म्हणजे? नर्सरी आहे, म्हणून मला स्वतःला रमवायला काहीतरी आहे.. माझं स्वतःचा अस्तित्व आहे ते.. ती बंद करू म्हणताय? मला झेपायचं नाही का आता ती बघायला?" बाई पॅनिक झाल्या..

"च्च! तसं नाही. 'नव्याने विचार कर' म्हणजे 'बंद कर' असं कसं होईल शशि? But, learn to delegate. Create a hierarchy, set systems, make it into an organisation, be professional.. नर्सरीचा व्याप मोठा आहे.. नाव आहे, बाजारपेठ आहे.. ते टिकवून ठेवायला काय करता येईल? सगळं तुझ्या एकटीवरच ठेवून चालणार नाही.. कला असतानाचे प्लॅन्स वेगळे होते.. पण आता ते सगळंच नव्याने बघायला हवं ना? तरूण रक्ताची गरज आहे नर्सरीला. आणि तरूण लोक आता खूप व्यावहारिक आहेत. I like Raju and his approach. तडफ आहे त्याच्यात, एक positive energy आहे.. संपूर्ण गावाची नाही म्हटलं, तरी सव्वाशे-दिडशे एकर जमीन आज तो जवळपास कन्ट्रोल करतोय.. आज ह्या तरूणांना भरकटायला काय वेळ लागतोय? पण तो वेगळा आहे, लबाड नाहीये हे मुख्य.. जे काय असेल, तोंडावर बोलेल, self-made आहे.. आणि आज त्याने रावजीला किंवा अजूनही कुठे सप्लाय केला असला, तरी तो मनाचा चांगला आहे.. He needs to be given an assurance that he is wanted.. his positive energy needs to be channelised.. पण त्यासाठी तुलाही थोडा aaproach बदलावा लागेल.. बघ, विचार कर.."
--------

त्यानंतरचे शशिकलाबाईंचे आठदहा दिवस बरेच व्यस्त गेले.. आधी स्वतःला सावरून, मग नर्सरीला सावरायचं होतं.. कॅन्सल झालेल्या ऑर्डरींचे, गेलेल्या बिझनेसचे हिशोब, पुन्हा इतर सप्लायर्सशी, कस्टमर्सशी, ज्यांचीज्यांची खोटी झाली त्यांच्याशी समेट, परत बिझनेसची गाडी मार्गी लावणं, नर्सरीतल्या माणसांना परत वठणीवर आणणं.. खरंच शेकडो व्याप होते.. कोणाचीतरी भरीव मदत झाली असती तर हवीच होती.. माधवरावांच्या बिझनेसमधला shrewdness आपल्यात थोडातरी हवा होता असं त्यांना वाटून गेलं.. आता त्या एकहाती निर्णय न घेता, त्यांच्या कानावर सगळं घालूनच पावलं उचलू लागल्या.. त्याचंच पुढचं पाऊल म्हणजे आज त्यांनी परत राजूला बोलावलं होतं, ह्या वेळेस- एकट्यालाच.

राजूला तसं काही टेन्शन नव्हतं, पण आपण गेल्या वेळी तोंड जरा सैलच सोडलं का अशी शंका येत होती..

"ये राजू, बस.. आता परत ऑर्डरचा काही त्रास नाही ना?"
"नाह्य, आता नाह्य काय.. आता रोज्ची ऑर्डर येतीये पयल्याप्रमानं. यंदा पावसामुळं हंगामबी भर्पूर येतोय.."
"वा! हे बरं झालं.. त्याप्रमाणे आपल्याला प्लॅनिंग करता येईल.. माझ्या डोक्यात अजूनही काही प्लॅन्स आहेत, पण ते फुलांच्या सप्लायवरच अवलंबून आहेत.. त्यासाठी तुमचं सहकार्य हवं.."
"आता, ते हायेच मॅडम.."
"तू गेल्यावेळी म्हणालास, त्यावर मी विचार केला राजू. तुझं बरोबर होतं तेव्हा. तुझं नुकसान करून तू फुलं द्यायला नकोच होतीस. इथला सगळाच कारभार भोंगळ झाला होता.. आता मी लक्ष घालून मार्गावर आणलंय सगळं. मी साहेबांशीही बोलले ह्याबद्दल.. राजू, मी तुला अगदी लहान असल्यापासून बघतेय.. माझ्या डोळ्यासमोर मोठा झालायेस तू.. तूच रावजीसारख्या माणसाला मला माल न देता सप्लाय करावास हे सहन झालं नाही, म्हणून इतकं बोलले.. पण ते फारसं बरोबर नव्हतं.. हे आता कळतंय.. मला म-माफ कर.." बोलताबोलता बाईंचा आवाज कापला..

राजूलाही कसंतरीच वाटलं.. 'बाईंचं असलं बोलनं कदी ऐकलंच न्हाई.. माफी कस्ली मागती येवढी मोठी बाई! अर्र, ह्ये चुकलंच हां आप्लं.. बाईंनाबी आप्ला नवा प्ल्यॅन सांगावा काय?'
"नर्सरीबद्दल मी मोठे प्लॅन्स केलेत राजू.. पण मी आधी म्हटलं तसं, ते सगळेच सप्लायवर अवलंबून आहेत. रावजीसारखी माणसं टपून बसलेलीच आहेत गैरफायदा घेण्यासाठी. आज नर्सरीचा तू मुख्य आणि सर्वात मोठा सप्लायर आहेस. तुझ्याकडून फुलं आली तरच ती पुढे कार्यालयांकडे, हॉटेल्सकडे आणि इतर विक्रेत्यांकडे जाऊ शकतील. एका अर्थाने तुझ्यामुळे नर्सरी चालते, असं म्हणूया.. तुमच्याकडे हंगाम उत्तम असेल, तर इतर ठिकाणीही तुम्ही विक्री करावी, त्याबद्द्ल काहीच म्हणणं नाही, पण इथे मुख्य सप्लाय यायलाच हवा.. ह्या सगळ्या backgroundवर मी तुला ३०% पार्टनरशिप ऑफर करतेय ह्या नर्सरीत.. तुलाही सुरूवातीला थोडे पैसे घालावे लागतील, पण नंतर तू सप्लायरही असशील आणि थोडा मालकही 'कला नर्सरीचा'.. बघ, आहे कबूल?"

राजूचे डोळे विस्फारले! 'काय? पार्टनर? म्हन्जी मालक? ह्या नर्सरीचा?जिथे आपला बाप मरस्तवर खपला, तितं आपन मालक? पैसा लय मिळ्तोय, पर मालकी? बाईंबरूबर? तिच्यामारी! ह्ये काय आनि? सपान तर न्हाई?'
"खरं बोल्ताव ना मॅडम? हे म्हन्जी..."
"अरे! खरंच. खूप विचार करून ही ऑफर तुला देतेय मी.. तू तरूण आहेस, हा व्यवसाय तुला माहित आहे, तुला काम करायची इच्छा आहे, लोक माहितीचे आहेत.. काय हरकत आहे? पैशाला मी तुला कमी करणार नाही, पैसे मारणारही नाही. मात्र जबाबदारी मोठी आहे, राजू. कधीकधी सगळे प्लॅन नीट पूर्णही करता येणार नाहीत, नुकसानही होईल..त्यामुळे विचार करून सांग तू.. हरबाचाही, इतर मोठ्यांचाही विचार घे.. हो म्हणालास तर आनंद होईल मला.. तुझ्या डोक्यातही काही कल्पना असतील, आपण दोघे मिळून ह्या नर्सरीला वाढवू शकू.."
"हां, माज्याकडे एक प्ल्यॅन हायेच.. स्मिती- माझी ताई, आम्च्या गावातच दिलीये तिला आनि गौरी- माजी बायको दोगीबी फस्क्लास डेकोरेशन शिकल्यात इकडे यून.. आपला झर्बेरा आन ग्लॅडियोलाचं फर्मास डेकोरेशन करत्यात, दारांवर, छोट्या परड्या, तोरणं, स्टेजच्या मागं वगेरे.. माज्या डोक्यात काय होतं, की आपण हाटेलात सप्लाय देतो तवा, त्यांना डेकोरेशनचीबी इचारना करू.. त्येंच्या म्हाग लोकांपेक्षा आपन नक्कीच कमी पैशात तेवडंच तोलामोलाचं द्यू.. आम्च्या गावच्या सगल्या बाया शिकतील आन जातील की त्येंच्याबरूबर.. सगल्या तशा रिकाम्याच अस्तात.. कपडेबिपडे झ्याक घात्लं की झालं.. झालंच तर इथेबी आपन स्टाल लावू शकू..परत गौरी कुल्कर्न्यालाबी मदत करू शकंल.. आता पारटनर म्हन्जी येवडं करायलाच हवं! तीबी धावी झालीये, बुकं नीट ठेवंल तेच्याबरूबर, म्हन्जी तो नसंल, तरी गोंधळ नगं, काय?" राजूच्या आनंदाला पारावार उरला नाही.. तो उत्साहानं कायकाय बोलायला लागला..

त्याचा उत्साह, चमकणारे डोळे पाहून क्षणभर शशिकलाबाईंना तीव्रतेने आपल्या लेकीची आठवण आली.. त्याच्याजागी तिचाच चेहरा त्यांना दिसू लागला.. नकळत त्यांच्याही ओठांवर हसू आलं.. त्यांचं स्वप्न पुढे नेणारा, वाढवणारा योग्य आणि सक्षम हात त्यांना मिळाला होता.. एका फसफसणार्‍या धबधब्याला योग्य अशी वाट आपण दाखवू शकलोय, ह्याचं समाधानही होतं..

10 comments:

aativas said...

Very nice story. Liked the egalitarin values you have tried to highlight in the story.

आश्लेषा said...

very nice. I agree with aativas. the concept of "equality" is good.

Unique Poet ! said...

सुंदर ! खुप दिवसांनी एक छान कथा वाचायला मिळाली ! कथेची संकल्पना , ओघवती भाषाशैली , नेमकी शब्दरचना आवडली !
सदीच्छा ! लिहीते रहा ! :)
- समीर पु. नाईक

poonam said...

धन्यवाद आतिवास, अश्लेषा, युनिक पोएट :)

प्राजकताची फुले............ said...

poonam , khoop aavadali katha

kebyaa said...

kharach khupach chaan katha aahe..

Dhananjay said...

good post!

Anonymous said...

chan , khup divasani tuzi katha vachali..
Diwali chya hardik shubbhecha!!!

Shilpa

गौरी said...

खूप सुंदर आहे कथा. बरेच दिवसांनी तुझा ब्लॉग वाचला. छान वाटले...

दीवाळिच्या हार्दिक शुभेछा!

Bhagyashree said...

e hi katha navti vachli mi..
avadli ekdam!!