December 8, 2010

पराभव

"चि. सुधीर, सौ. विद्या, अनेक आशीर्वाद.
आशा आहे की आत्तापर्यंत पोलिसाची चौकशी पूर्ण झाली असेल आणि माझ्या दोन ओळींची चिठ्ठीने त्यांचं समाधान झालं असेल. पण मी हे पाऊल का उचललं त्यामागचा हेतू तुम्हाला विस्तारानं सांगणं हे माझं कर्तव्य आहे आणि तुमचा हक्कदेखील. म्हणून हे पत्र.

माझ्या आयुष्यात मी अनेक वृद्ध पाहिले. मी स्वतःही ६२ वर्षाची आहेच, म्हणजे म्हातारीच की. पण ह्याहीपेक्षा म्हातारे लोक- तुझ्या बाबांची आजी, माझी आजी, तुझे दोन्हीकडचे आजी-आजोबा आणि ह्यांच्या आणि माझ्या अनेक मावशा, काका-काकू आणि अगणित नातेवाईक. अपवाद वगळता, सर्वांना भरपूर आयुष्य लाभलं, लाभतं आहे. पंच्याहत्तर, ऐंशीच्या घरात पोचेपर्यंत सगळ्यांना आयुष्य लाभलं. मात्र सगळ्यांनाच आरोग्यपूर्ण आयुष्य लाभलं असं म्हणता येणार नाही, हे नक्की. पहिली उभारी गेल्यावर, वय सरल्यावर सगळे लोक थकत थकत, हळूहळू खंगत, जीर्ण होत, शेवटी असाध्य रोग जडून, वेदना सहन करत, मुला-नातवंडांवर अवलंबून राहून शेवटी गेले. सुटले हा शब्द जास्त योग्य राहील. तुझ्या पणजीचं उदाहरण तुझ्या अगदी डोळ्यासमोर आहे. मी लग्न होऊन आले ह्या घरात तेव्हापासून त्या अंथरूणावर खिळलेल्या, त्या तू सुमारे बारा वर्षाचा होईस्तो जगल्या.. त्यांचं वय घरात नक्की कोणालाच माहीत नाही. पण कसलं ते आयुष्य त्यांचं? अक्षरशः पडून असायच्या. सगळं अंथरूणातच. त्यामुळे की काय, पण जीभ महातिखट आणि लक्ष चौफेर! एक क्षण त्यांनी सासूबाईंना चैन पडू दिलं नाही आणि मलाही. शेवटी शेवटी तर त्यांचे अगदी हाल झाले. सर्व अंगभर चिघळलेल्या जखमा, त्यामुळे त्यांची होणारी तडफड, ते सहन न होऊन त्या विव्हळायच्या, आणि म्हणून त्यांना देत असलेली गुंगीची औषधं! असं वाटायचं की देव त्यांना ह्यातून सोडवूदे एकदाचा. अत्यंत कृश झालेला देह, अंगात औषधाचा परिणामही होईल इतकी शक्ती नाही. शेवटी डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांची औषधंही बंद केलेली. असो.

तुझ्या आण्णाआजोबांच्या नशीबीही थोडेफार हेच भोग आले, पण एक बरं, की दोनच वर्ष बिचारे अंथरूणावर होते. सासूबाई त्यांचं करून करून थकल्या बिचार्‍या. त्यांच्या मनाला तुझ्या आजोबांचं आजारपण मानवलंच नाही. दु:खी, कष्टी होत त्यांची सेवा करत, हवं-नको बघत त्यांनी त्यांचं केलं. आजोबा आधीच तापट, त्यातून सासूबाईंच्या हातून काही कमी-जास्त झालं की फार संतापायचे, हात-पाय काम देत नव्हते, त्यामुळे अजूनच रागावायचे. तेही असेच मृत्यूशी दीर्घ झुंज देत गेले. त्यांच्यानंतर सासूबाईंनी फार दिवस काढले नाहीत, त्या खचल्याच होत्या. तीन वर्ष कशीबशी काढली त्यांनी, पण तीही भ्रमिष्टावस्थेत! त्या झोपून नव्हत्या, पण सतत लक्ष ठेवावं लागायचं.. सतत धसका असायचा- ह्या आता काय करतील?

माझ्या माहेरीही थोडीफार हीच कथा. माधवदादा-अलकावहिनी, मनोहरदादा-वसुधावहिनी ह्यांनी खूपच केलं आई-बाबांचं. उपचार, औषध, डॉक्टर, सेवा कशालाच कमी पडू दिलं नाही. पण निसर्गनियमानुसार दोघे हळूहळू विझत गेले. आपल्या घरी सतत एक आजारी माणूस होतंच, त्यामुळे माझ्याकडून त्यांची फारशी सेवा होऊ शकली नाही. तेही दोघे शेवटच्या दिवसात बरेच दिवस आजारी पडून, हॉस्पिटलचा वार्‍या करत, तब्येतीचे रोजचे उतार-चढाव सोसत गेले.

ही झाली अगदी जवळची नाती. ह्या सगळ्यांची आजारपणं अगदी जवळून पाहिलेली, अनुभवलेलीही अर्थातच. सर्वात अचंबा मला तेव्हाही, आणि आत्ताही ह्याचा वाटतो, तो त्यांची जीवनाची आसक्ती पाहून! कितीही आजारी असले, त्रासात असले, तरी वैतागातून आलेला एखादा सूर वगळता, यातले कधीही कोणीही एकदाही म्हटले नाही, की बास आता हे जीवन. तुझ्या पणजीबाई तर खरंच कळस होत्या ह्या बाबतीत. संपूर्णपणे परावलंबी होत्या त्या, शरीराचा बोळा झालेला, इतके त्रास व्हायचे, तरीही कोणती आसक्ती त्यांना जगवत होती काय ठाऊक?

हे सगळं कळत-नकळत माझ्या मनावर कुठेतरी बिंबत होतंच. हसतं खेळतं घर आजारी माणूस असलं की कसं बघता बघता कोमेजतं हे आपण सगळ्यांनीच अनुभवलंय. आधी पणजीबाईंच्या आणि मग तुझ्या आजोबांच्या आजारपणामुळे आणि नंतर सासूबाईंवर लक्ष ठेवायच्या नादात माझं कितीतरी लक्ष त्यांच्याकडेच असायचं. ह्या भरात, तुझ्याकडे, सुनिताकडे, ह्यांच्याकडे माझं अनेकवेळा दुर्लक्ष झालं. अनेकवेळा त्यांच्यावरचे राग, दु:ख, अस्वस्थता तुमच्यावर मी काढत असे- तुम्हा मुलांवर रागावत असे, ह्यांच्यावर चिडत असे. हे चूक आहे, तुमच्यावर अन्याय आहे असं तेव्हाही उमजत होतंच, पण वळत नव्हतं. तुम्ही दोघंही खरंच गुणी पण. हेही. एका शब्दाने कधी उलटून बोलला नाहीत, की माझ्याशी अबोला धरला नाहीत. कोणताही छोटा-मोठा आनंदाचा क्षण असो, सण-समारंभ असो, त्यावर एक सावट सतत असे.. आजारी सावट. कुठेही जायचं असो, त्याची जमवाजमव कशी करता येईल, त्यासाठी घरी कोणाला बसावं लागेल, बाहेर काय सांगावं लागेल ह्यावर चर्चा आधी घडायची. स्वतंत्र, मोकळेपणाने, निर्भेळ आनंदाने कुठे गेलो आहोत, जिथे गेलो तिथे नि:शंक मनाने वावरलो आहोत, असे कधी घडले नाही, कारण निम्मं लक्ष घराकडे लागलेलं- तिथे सगळं आलबेल असेल ना? ही चिंता. पैशाची बाजू तेव्हा फारशी भक्कम नव्हतीच. कित्येकदा औषधांना, डॉक्टरच्या फीयांना पैसे द्यायचे म्हणून शाळेव्यतिरिक्त हौस म्हणूनदेखील तुमच्यावर खर्च करता आला नाही. तशा म्हटल्या तर छोट्या गोष्टी, पण खोल मनात घर करून बसणार्‍या.

अगदी तेव्हापासूनच मी निश्चय केला होता सुधीर, की आपण असं लोळागोळा होऊन आयुष्य फरपटत न्यायचं नाही. धडधाकट असताना, सर्व काही आलबेल असताना, समाधानाच्या शिखरावर असतानाच ह्या जगाचा निरोप घ्यायचा. मी आजारी आहे, म्हणून तू, विद्या, सुनिता, शेखरराव, मुलं सगळे चिंतातूर आहात हे मला कधीही सहन होणार नाही. जे माझ्या वाट्याला आलं, ते तुमच्या वाट्याला येऊ नये असा माझा हट्ट आहे. ह्याबद्दल मी एका शब्दानेही कोणाकडेही, अगदी ह्यांच्याकडेही वाच्यता केलेली नव्हती. पण मी मनातून ठाम आहे. काय त्या मृत्यूला घाबरायचं? आज मी ६२ वर्षाची आहे. सगळं सुरळित झालेलं आहे. तुम्ही मुलं तर गुणी होतातच, पण विद्या, शेखररावही लाखात एक मिळाले. भरलेलं घर आहे, हुशार, गुणी नातवंडं आहेत. अजून काय पाहिजे? आई म्हणायची, "आयुष्यात जसा प्रत्येक गोष्टीचा योग असतो, तसा मृत्यूचाही योगच असतो. तो मागून येत नाही, यायचा तेव्हाच येतो"- हे मला कधीच पटलं नाही! जसं माझं जगणं माझ्या हातात आहे, तसा मी मृत्यूही मला हवाय तेव्हाच आणेन.

शेवटी नशीबानेही साथ दिलीच. ही वेळ अचानक, अनपेक्षितपणे आली. पण मी तिला हसतमुखाने आणि अगदी शांततेने सामोरी जात आहे. तुझ्या बाबांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते दोनच दिवसांपूर्वी अचानकच काही कल्पना न देता गेले. खरंच सुखी जीव. आत्ता होते, आणि आता नाहीत! काही त्रास नाही, ना वेदना, ना दु:ख! एक क्षण मी स्तंभित झाले, चरकलेही. पण जाणीव होताच, सावरले. मी लोळागोळा होऊन पडलेय आणि हे माझ्या उशापायथ्याशी आहेत, ही कल्पना त्याहून भयंकर होती. त्यापेक्षा देवाने त्यांना योग्य वेळी नेले. त्यांचा तुम्हाला कधीच त्रास झाला नाही, आणि आता माझाही होणार नाही.

मी ठरवून आणि ठामपणे ह्या जगाचा निरोप घेत आहे सुधीर. मला वृद्ध होऊन तुमच्यावर ओझे होते जगणे अमान्य आहे म्हणून. मी अशी झाले असते, तरी तुम्ही माझा प्रेमाने सांभाळ केला असता, ही खात्री आहे. पण मीच असं जीवन नाकारत आहे. माझी कोणतीही इच्छा अपूर्ण नाही. अत्यंत समाधानाने मी हे जग सोडेन. हा आततायीपणा नाही. अगदी विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. मला आशा आहे, तुम्ही ह्या निर्णयाचा स्वीकार कराल.

तू, सौ. विद्या, चि. सानिका, चि. सोनवी, सौ. सुनिता, श्री. शेखर, चि. आशिष ह्यांना माझे अनेक अनेक आशीर्वाद.

तुझी,
आई."

पत्र वाचता वाचताच सुधीरच्या डोक्याला मुंग्या यायला लागल्या होत्या. त्याचं रक्त गोठलं, हातीपायी थिजलाच तो. कोणत्याही प्रकारचा कसलाही विचार करायची क्षमताच गमावून बसला होता तो.

इतक्यात, आपल्याला कोणीतरी हाक मारत आहे अशी पुसटशी जाणीव झाली त्याला. ते डॉ. बुधकर होते. खाडकन तो भानावर आला, येता येता उभा राहिला. आईचं पत्र हातातच होतं.

"Are you all right Mr. Deshpande? Don't worry. आम्ही सगळे टॉक्सिन्स काढले आहेत त्यांच्या शरीरामधून. She'll survive. But there is one sad news. See, she had consumed a lot of drugs. Those are dangerous ones and I fear, that she will be paralysed for life. बघू आपण. तसं ठोस काहीच सांगत नाही आत्ता. त्यांना critical care मध्ये ४८ तास आपण observe करू. Then lets see. आणि घाबरून जाऊ नका. फिजिओथेरपीने बरंच काही होऊ शकतं, don't worry. एक कॉम्प्लिकेशन मात्र झालेलं आहे. त्यांनी suicide note लिहील्यामुळे आणि आता आपण त्यांना वाचवल्यामुळे पोलिस केसही होईल. You will have to deal with the police too.. केस फाईल होणार नाही असं काहीतरी पहा, नाहीतर त्यांनाच त्याचा त्रास होईल.."

त्याच्या खांद्यावर थोपटून डॉ. बुधकर निघून गेले. सुधीर तसाच सुन्न उभा होता.. 'paralysed for life' हे शब्द त्याच्याभोवती पिंगा घालत नाचत होते.. त्याच्या बोटांमधून आईचं पत्र हळूच निसटलं आणि वार्‍यावर हेलकावे खात हलकेच जमिनीवर टेकलं..

-समाप्त.

21 comments:

Sneha Kulkarni said...

Poonam, changli lihili aahes! O Henry style twist ekdum. Guzarish after effect ka?

aativas said...

म्हणजे 'मरण' आपल्या हातात नसत तर!

भानस said...

वाट्याचे भोग भोगल्याशिवाय सुटका नसतेच हेच खरं...
कथेची गुंफण छान.

हेरंब said...

जब्बरदस्त !! शेवटचा ट्विस्ट तर कसला जबरदस्त !! भयंकर.. :(

poonam said...

धन्यवाद स्नेहा, आतिवास, भानस, हेरंब

स्नेहा, गुजारिश पाहिला नाहीये गं. त्याचा शेवट काय आहे? हृथिकला इच्छामरणाची परवानगी मिळते का?

आतिवास, भानस- अनुमोदन!

Mandar Kulkarni (मंदार कुलकर्णी) said...

chan katha aahe....

Anonymous said...

chaan katha aahe...kata aala aangavar

मुक्त कलंदर said...

कर्माचे भोग भोगल्याशिवाय मृत्यू येत नाही म्हणतात. खरे खोटे देव जाणे. पण ह्या कथेतून हेच अधोरेखित होतय...

मुक्त कलंदर said...

कर्माचे भोग भोगल्याशिवाय मृत्यू येत नाही म्हणतात. खरे खोटे देव जाणे. पण ह्या कथेतून हेच अधोरेखित होतय...

Jaswandi said...

kasa suchata? Changali post ahe.. aani shevatcha twist, kiti Krur ahe aga.. kharach kata ala angavar

Rakesh said...

वपुंची "दामले" नावाची कथा ऎकली होती. त्यात शेवटचं वाक्य आहे - " आज मला कळतंय कि गाव बदललं तरी नशिब बदलत नाही " - नशिबात असलेले भोग भोगवेचं लागतातं. या कथेत गावाचा काही संबंध नाही, पण ईम्पॅक्ट सेम.... वपुंशी तुलना झाल्यावर कथेबद्द्ल आणखी काहिही लिहायला नको...!!

Rakesh said...

वपुंची "दामले" नावाची कथा ऎकली होती. त्यात शेवटचं वाक्य आहे - " आज मला कळतंय कि गाव बदललं तरी नशिब बदलत नाही " - नशिबात असलेले भोग भोगवेचं लागतातं. या कथेत गावाचा काही संबंध नाही, पण ईम्पॅक्ट सेम.... वपुंशी तुलना झाल्यावर कथेबद्द्ल आणखी काहिही लिहायला नको...!!

Madhuri said...

katha changali aahe. hich katha tumhi maayboli war dekhil post keliye na? tithech comment takayacha prayatn kela hota pan kahi tari problem hota. mhanun tumachya blogwar comment taktey.

katha chhan aahe. wegali aahe. ekandaratich tumhi lihilelya katha chhan asatat. tyat ek maturity janawate. maayboliwar hya kathewar barach uhapoh jhalay. Pan fakt ek gosht patali nahi. Itakya samanjas lekhikene itar lekhakanna tokachi pratikriya ka dyawi? Tyanna discourage ka karawe? Phar nawal watate.

poonam said...

मंदार, अ‍ॅनोनिमस, मुक्त कलंदर, जास्वंदी, राकेश, माधुरी- अभिप्रायाबद्दल आभारी आहे. धन्यवाद.

जास्वंदी, नियती अनेक क्रूर आणि अकल्पित खेळ खेळत असते, आपण अजाण असतो, इतकंच.

माधुरी, मी टोकाच्या प्रतिक्रिया देते? लेखकांना डिसकरेज करते? :) मला उदाहरणं देणार का कृपया? तुम्हीही मायबोलीवर आहात असं दिसतं. तिकडेच बोलू मग सविस्तर. तुमचा मायबोली आयडी काय आहे? मला विपू करा कृपया.

THE PROPHET said...

जबरदस्त!
मी अजून शॉकमध्ये आहे! :-|

सुहास झेले said...

बाप रे एकदम सुन्न झालो वाचताना :(

राज जैन said...

बाप रे एकदम सुन्न झालो वाचताना :(

me too !

Vinayak Pandit said...

’सुखांत’ नावाचा चित्रपट आठवला.अतुल कुलकर्णी, ज्योती चांदेकर अभिनित आणि संजय सूरकर दिग्दर्शित.त्यातला नायकाचा (यातल्या सुधीरला समांतर जाणारा)प्रवास शेवटपर्यंत दाखवलाय.असहाय बाईचा उद्वेग असाच अंगावर येतो.

Anonymous said...

कथा फारच छान झाली आहे. कमीत कमी शब्दात नेमकी मांडली आहे.

प्रतिक्रियेत वाचले मरणसुद्धा लिहिलेले असते..त्याचाही योग असावा लागतो. मला नाही पटले हे. जर खूप आतून खूप खोलवर इच्छा केली तर माणूस जागच्या जागी मरू शकतो आणि हे आधुनिक शास्त्र देखील मान्य करते.

Prashant Khapane said...

does remind me of sukhaant. however wonderfully written.

shubhangi said...

kave, mast lihili aahes. kharach janm aani maran tumkacya haatat nasat kitihi ichcha asali tarihi.
aavadali
gubbie