July 16, 2008

भिशी

यावेळी माझंच नाव येऊदे बाई, मागची अगदी थोडक्यात हुकली’, ’माझंच नाव काढ गं, तुला बक्षिस देईन छानपैकी’ अशी वाक्य मागून येत होती. सगळ्यांची उत्कंठा अगदी ताणली वगैरे गेली होती..

प्रसंग आहे खूप खूप वर्षांपूर्वीचा- माझ्या मावशीकडे असलेल्या भिशीचा! भिशी हा प्रकार मी पहिल्यांदाच बघत होते. दिवसभर मावशी एकदम उत्साहात आणि गडबडीत होती. संध्याकाळी तिच्या कॉलनीतल्याच तिच्या मैत्रिणी नटूनथटून वगैरे आल्या. गप्पा, हास्यकल्लोळ आणि अर्थातच मस्तपैकी चटपटीत खाणं झालं. आणि शेवटी तो क्षण आला- पुढची भिशी काढण्याचा!! मी ’पाहुणी’ म्हणून तो ’सन्मान’ माझ्याकडे आला. मावशीनी एका मोठ्या तसराळ्यात चिठ्ठ्या टाकून आणल्या आणि मला एक उचलायला सांगितली. मी पटकन एक उचलली आणि त्यावरचं नाव वाचलं. अचानकच मोठे आवाज आले बायकांचे, जिला भिशी लागली होती तिचा आनंदाचा चित्कार, जिला ’आपल्यालाच भिशी लागावी’ अशी इच्छा होती, तिचा अपेक्षाभंगाचा आवाज वगैरे आणि जनरल कोलाहल. मग कॅलेंडर आणून भिशीची तारीख ठरली, त्यावर उहापोह झाला, जोरात ठासून ती तारीख सगळ्या बायकांना सांगून भिशी संपलीच एकदम. इतकी वर्ष झाली तरी हा प्रसंग अगदी लख्ख आठवतोय मला. माझी आई अश्या कोणत्याच भिशीत नव्हती. आणि आम्ही ’कॉलनीतही’ रहात नव्हतो. आम्ही आपले एका साध्या वाड्यातले भाडेकरू होतो.

मी घरी आल्यावर आईनी मला ’भिशी लागल्याचा इतका आनंद त्या बाईला का झाला?’ याच्यातली गंमत किंवा ’क्रक्स’ सांगितला- जिला भिशी लागते तिला त्या सर्व बायकांनी एक ठराविक रक्कम द्यायची असते, त्यामुळे त्या दिवशी ती बाई खूपच श्रीमंत होऊन जाते, तिला पाहिजे ते ती त्या पैश्यातून विकत घेऊ शकते म्हणूनच प्रत्येक बाईची अशी दिली ख्वाहिश असते की पुढची भिशी आपल्यालाच लागावी! हे ज्ञानामृत ऐकून मी धन्य झाले होते. सहाजिकच मी आईला विचारलं की तू का नाही असल्या भिशीत, तर माझ्या आईनी सिक्सरच ठोकला होता. ती सहजपणे म्हणाली, "मला जे हवंय ते मी बाबांना सांगते आणायला, त्यासाठी भिशी कशाला हवी? माझ्या मैत्रिणींनी कधीही यावं माझ्याकडे गप्पा मारायला, पैसे घेऊन नको." तेव्हा मला ’मैत्रीत व्यवहार’ वगैरे फारसं कळलं नव्हतं, पण आईची फिलॉसॉफी एकदम पटूनच गेली होती.

कालांतरानी आमच्याकडे ’नातेवाईकांची भिशी’ सुरु झाली. म्हणजे काय तर आजीच्या सर्व बहिणी, आणि त्यांच्या मुली आणि सूना यांची भिशी. ’वरचेवर भेटी होत नाहीत, आता कार्य पण नाहीत कोणाकडे, भिशीच्या निमित्तानी भेटूया’ असं मारे प्रीएँबल ठरलं भिशीचं. पहिल्या दोन-तीनच भिश्या काय त्या सुरळीत पार पडल्या असतील. पुन्हा ’ये रे माझ्या मागल्या’! एकेकीचे निरोप यायला लागले- ’जमत नाहीये यायला’चे, कोणतीही भिशीची तारीख ठरवली तरी किमान दोघींना त्यात काहीतरी प्रॉब्लेम असायचाच, मग आरोप-प्रत्यारोप, गटबाजी आणि भरीसभर की हिशोबाचे गोंधळ- कोणी, कोणाला, किती पैसे द्यायचे आहेत वगैरे.. मला वाटतं एक पूर्ण राऊंड न करताच ती भिशी बंद पडली. सगळ्यांनीच एकमेकींना पैसे देऊन ती मिटवूनच टाकली. मूळ भिशीचा- भेटण्याचा हेतू आणि नेहेमीच्या भिशीचा- पैसे घालवून पैसे मिळवण्याचा हेतूच असफल झाला! असो. नातेवाईकांमधे हे नेहेमीचे घोळ असतातच नाहीतरी.

त्यानंतर मी एक अफलातून भिशी ऐकली होती- ’सोन्याची भिशी’! या भिशीचे ’स्टेक’ अर्थातच ’हाय’ होते. नेहेमीची भिशी १०० रुपयांची असली तर ही किमान ५०० रुपयांची! पद्धत तीच, पण जिला भिशी लागेल तिने जमलेल्या पैश्यातून सोनंच घ्यायचं हा नियम आणि महत्त्वाचं म्हणजे पुढच्या भिशीत तो दागिना घालून यायचा! ऐकून मी चाट पडले होते! जर महिन्याला ५०० रुपये केवळ एका भिशीसाठी या बायका घालू शकत असतील तर साहजिकच यांच्या सांपत्तिक स्थितिवर संशय यायचं कारण नाही. यांना दागिनेही कमी नसणारच. तरीही अश्या भिश्यात भाग घेवून दागिन्यांचं प्रदर्शन करण्याची हौस मात्र दांडगी! मला वाटतं, पण सोन्याचे भाव अस्मानाला भिडल्यानंतर एकतर अश्या भिश्या बंद झाल्या असाव्यात किंवा ’स्टेक’ तरी किमान रु. १००० चा झाला असावा. सध्याचे रहाणीमान बघता दुसर्‍या शक्यतेची शक्यताच जास्त!

मीही एका भिशीची सदस्या आहे, पण आमची आहे ’शाळेची भिशी’. या भिशीतल्या आम्ही बायका रुढार्थानी मैत्रिणी नाही. आमची रीस्पेक्टीव्ह मुलं एकाच शाळेत आहेत आणि एकमेकांचे दोस्त आहेत. ’त्यांच्या आया’ म्हणून आमची ओळख झाली आणि पुढे मैत्री. या भिशीमधे मुलांचा अभ्यास, एकूण शालेय प्रगति आणि त्यांचा दंगा हाच मेन अजेंडा. आम्ही राहतो त्या भागातली अनेक मुलं एकाच शाळेत जातात, त्यामुळे आमची अशी भिशी जमून गेली. यात कटाक्षाने आम्ही पैसे आणलेले नाहीत. दुपारच्या वेळी चहाला भेटायचे, गप्पा मारायच्या. मुलं एकमेकांचे दोस्तच असल्यामुळे ती रमतात, धुडगूस घालतात आणि आम्हालाही गप्पा मारू देतात हाही फायदा. बालवाडीपासून मैत्री असेल तर ती सर्वात जास्त टिकते म्हणतात. बघू, या मुलांची टिकते का ते!

’महिला बचत गट’हीही एक प्रकारची भिशीच. पण याला भिशी म्हणणं अजिबातच योग्य ठरणार नाही. स्वत:च्या, आपल्या समाजातल्या घटकांच्या उन्नतीसाठी केलेलं विधायक काम ते, पण त्याची रूपरेशा भिशीसारखीच. दर महिन्याला जमेल तितकी लहान रक्कम सर्व बचत गटातल्या बायकांनी जमा करायची आणि ते पैसे गुंतवून त्याच्या व्याजावर व्यवसाय करायचा. ज्यांना ’पैसे बाजूला काढून ठेवणं’ ही चैन परवडत नाही, त्या मुद्दाम प्रयत्न करून पैसे जमवतात, त्यांच्याच कोणत्यातरी उद्योगात गुंतवतात आणि त्याचा फायदा सर्वांनाच मिळतो. भिशीसारखे ते पैसे व्यक्तिगत चैनीसाठी न वापरता संपूर्ण गटासाठी वापरले जातात.

मध्यमवर्गातील बायका ’माफक मजा’ म्हणून भिशीकडे बघतात, तर उच्चभ्रू, श्रीमंत बायकांच्या जीवनाचाच तो एक भाग आहे. बायकांना एकत्र जमून गप्पा मारायची, नवनवीन पदार्थ बनवायची, मिरवायची हौस असतेच. भिशीची कल्पना जिने प्रथम आणली तिला बरोब्बर बायकांची ही नस कळली होती. त्याबरोबरच मिळणार्‍या पैश्याचं प्रलोभन!! बायका या कल्पनेनी ’सोल्ड आऊट’ झाल्या यात काय नवल! एका बिल्डींगमधल्या, एकाच कंपनीतल्या नवर्‍यांच्या बायका, मैत्रिणी, मैत्रिणींच्या मैत्रिणी असे वेगवेगळे ग्रूप असतात भिशीचे. काही भिशी ग्रूप जाणूनबुजून काही वेगळेपणा आणायचा प्रयत्न करतात, पण त्यांची संख्या कमीच. बहुतांश भिश्यांमधे गप्पा, गॉसिप आणि नातेवाईकांच्या तक्रारी मांडायला एक व्यासपीठ हेच चालतं. एखादीनी नवीन कल्पना मांडली तर तिची खिल्ली उडवली जाते, किंवा ’कोणी सांगितल्यात नसत्या उठाठेवी’ असं म्हणलं जातं. बायका एकत्र जमून कितीतरी गोष्टी करू शकतात. पण दुर्दैवानी सुरुवातीला ’या निमित्ताने तरी नियमितपणे भेटत राहू’ अशी सुरु झालेली भिशी शेवटी व्यवहार आणि कुचाळक्यांचं रूप धारण करते.

पण म्हणजे बायकांनी मजा करूच नये का? जर एकत्र जमून हसलं, बोललं तर काय बिघडलं?- असं कोणी विचारेल. बिघडलं काहीच नाही, उलट बायकांना असा विरंगुळा हवाच. पण एकत्र यायला पैशाचं बंधन कशाला हवं? नुसतं भेटता येतं की. आपण हळदीकुंकू करतो तेव्हा पैसे असतात का त्यामधे? तसंच दर महिन्याला हळदीकुंकू आहे असं समजून भेटावं. बरं, पैसे हवेच असतील तर जमवलेले पैसे कपडे, दागिने, शोभेच्या वस्तू यांमधेच न खर्च करता कोणत्याही समाजपयोगी कामासाठी वापरावेत. एक/दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च म्हणा, अनाथाश्रम/ वृद्धश्रम यांना मदत म्हणा.. गरजू, चांगल्या संस्था काही कमी नाहीत आपल्याकडे, कमी आहे ती तळमळ आणि इच्छा! ’साधीसुधी भिशी ती काय आणि तिने काय तीर मारायचेत’ हा सूर!

अनेक प्रश्नांबद्दल आपण म्हणतो तसेच याहीबद्दल म्हणते, ’हे कधी बदलणार?’

3 comments:

Anonymous said...

भिशी पुराण छान!
"सोन्याची भिशी" आयडीया सॉलिड आहे:-)

Anonymous said...

छान लिहिलं आहेस पूनम.. माझ्याही आईच्या अश्या अनेक भिश्या लहानपणी पाहिल्या आहेत. पण एकही भिशी आई एका राऊंडवर चालू ठेऊ शकली नाही. कारण इतकंच की सुरुवातीला 'भिशी' म्हणून चालू केलेलं संमेलन नंतर नंतर 'किटी पार्टीचं' रुप धारण करायचं. कधी घरातलं सामान दाखवायची स्पर्धा, जसं कि महाग क्रोकरी, किचन अप्लायन्सेस इ. वस्तु, कधी पोशाखी स्पर्धा तर कधी खाद्यपदार्थांची स्पर्धा.... सगळ्यांचाच उद्देश एकच असायचा की मागचीपेक्षा मी वरचढ कशी ठरेन.
एका भिशीत तर फक्त पेयपदार्थ ठेवायचे असं ठरवलेलं होतं, म्हणजे कॉफी किंवा सरबत.. तर त्यातही कोणी मसाला दुध, कोणी लिचीचं सरबत वगैरे करून इतरांना दुय्यम ठरवण्याचे प्रयत्न केलेच. म्हणूनच की काय माहित नाही, पण आम्हालाही आहे तेच दाखवायची सवय लागली, आहे त्यापेक्षा जास्त नाही.

- manjud

Anonymous said...

छान लिहिलं आहेस पूनम.. माझ्याही आईच्या अश्या अनेक भिश्या लहानपणी पाहिल्या आहेत. पण एकही भिशी आई एका राऊंडवर चालू ठेऊ शकली नाही. कारण इतकंच की सुरुवातीला 'भिशी' म्हणून चालू केलेलं संमेलन नंतर नंतर 'किटी पार्टीचं' रुप धारण करायचं. कधी घरातलं सामान दाखवायची स्पर्धा, जसं कि महाग क्रोकरी, किचन अप्लायन्सेस इ. वस्तु, कधी पोशाखी स्पर्धा तर कधी खाद्यपदार्थांची स्पर्धा.... सगळ्यांचाच उद्देश एकच असायचा की मागचीपेक्षा मी वरचढ कशी ठरेन.
एका भिशीत तर फक्त पेयपदार्थ ठेवायचे असं ठरवलेलं होतं, म्हणजे कॉफी किंवा सरबत.. तर त्यातही कोणी मसाला दुध, कोणी लिचीचं सरबत वगैरे करून इतरांना दुय्यम ठरवण्याचे प्रयत्न केलेच. म्हणूनच की काय माहित नाही, पण आम्हालाही आहे तेच दाखवायची सवय लागली, आहे त्यापेक्षा जास्त नाही.

- manjud