July 31, 2008

बोलती बंद!

निवारपासूनच जाणवत होतं की आवाज बसणार आहे, पण उगाचच औषध घ्यायचं टाळलं. आणि रविवारी भल्या पहाटे उठून ट्रीपला गेले कर्जतला!! इतकी सुंदर पावसाळी हवा होती, आणि अनेक महिन्यांनी होत असलेली पावसाची बरसातही. ’ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा’ वगैरे स्टाईलची. मग काय, धमालच धमाल. आणि आमचा ग्रूपही थोडाथोडका नाही, तर ५० जणांचा होता!! गप्पा, गाणी, नकला, खेळ आणि भर पावसात पोहणे, रेन डान्स वगैरे.. पावसाचा आनंद पुरेपूर लुटून झाला, आणि मग मात्र आवाजानी माझी साथ सोडली. हळूहळू तो बसतोय हे लक्षात येत होतं माझ्या, पण या सगळ्यानंतर तर त्याचं कंबरडंच मोडलं बिचार्‍याचं! पार मान टेकली त्याने. आणि माझी झाली बोलती बंद!!

बंद म्हणजे बंदच. घश्यातून आवाजच फुटेना, अंगही कसकसल्यासारखं झालं. परततांना गप्पच होते, अगदीच अनिवार्य झालं तर कुजबूजत होते. कश्याबश्या घरी येऊन गुळण्या केल्या आणि झोपलेच. दुसर्‍या दिवशीही तीच अवस्था. औषध घेतल्यामुळे बाकी बरी झाले, पण स्वरयंत्र मलूलच. मग काय, ट्रीपला खेळलेले ’डंब शराड्ज’ घरीही चालू झाले. नवर्‍याशी, मुलाशी हातवार्‍याची भाषा सुरु झाली. मुलगा तसा लहानच आहे, त्याला पटापट समजत नव्हते मी नक्की काय म्हणतेय ते, पण त्याला सगळ्याची गंमतच वाटायला लागली. तोही माझ्याशी खुणेच्या भाषेत बोलायला लागला. नवरा तर जाम खुश झाला. ’दिवसभर माझी टकळी बंद’ हे त्याने स्वप्नातच कल्पिलेले चित्र आज प्रत्यक्षात अवतरले होते!! त्याने मनापासून एन्जॉय करत, माझी नक्कल करत, मला यथेच्छ त्रास देत माझे न बोलणे अगदी आनंदानी साजरे केले!

वास्तविक पाहता, माझा आवाज चांगला बुलंद, खडा वगैरे आहे हां. त्यावरून अनेक वेळा टोमणेही ऐकले आहेत मी. माझ्या मुलाचं ’पहिलं रडणं’ ऐकून ’बाकी काही नाही, तरी आवाज मात्र आईचा घेतलाय’ हे वाक्य तर नक्कीच पडलं होतं माझ्या कानावर! मोठ्या ग्रूपमधे बोलायला लागले की, ’माईक नको रे’ च्या आरोळ्या, ’अगं एक किलोमीटरवरच होतीस ना, मग फोन कशाला केलास? नुसती हाक मारायची, ऐकू आली असती’ अशी वाक्य, ’बरं झालं हं तुझा आवाज ’मोकळा’ आहे ते, फोनवर तू बोलत असतांना अचूक तुझ्या आवाजाचा माग काढत आले बघ मी’ असं म्हणत मैत्रिणीने माझ्याच ऑफिसात घेतलेली एन्ट्री!!! काय काय सांगायचं! आणि मी बोलतेही चिकार. म्हणजे आवाजही मोठा आणि एकदा सुरु झाला की बराच वेळ चालूही रहातो. मृदुभाषी आणि अल्पभाषी लोकांचा मला अचंबा वाटतो. त्याहून आदर मला फोनवर जे लोक तासनतास हळू आवाजात गुलूगुलू गप्पा मारतात ना, त्यांचा वाटतो. इतक्या हळू आवाजात कसे बोलू शकतात लोक?

आमच्या बिल्डींगमधे बरंका, माझ्या मुलाच्या वयाची बरीच मुलं आहेत. ती सगळीच सकाळी एकाच वेळेला शाळेत जातात. पण मला माझ्या मुलाच्या इतकं पाठी लागावं लागतं की ज्याचं नाव ते! तो उठल्यापासून माझा तोंडाचा दांडपट्टा चालूच असतो, तेव्हा कुठे तो थोडासा हलतो, आवरतो आणि कशीबशी शाळेची वेळ गाठतो. पण या बाकी मुलांच्या आया? त्यांचा कसा मला एकदाही चढलेला आवाज ऐकू येत नाही? त्यांची मुलं इतकी गुणी आहेत का की आईने एक हाक मारायचा अवकाश, की लग्गेच तयार होतात आपलीआपण? पण नाही, आत्तापर्यंत बरीच मुलं पाहिली आहेत मी, आणि ’आईचं न ऐकणे’ हा सगळ्यांचाच एककलमी कार्यक्रम असतो. मग मला भेडसावणारा प्रश्न असा की आख्ख्या बिल्डींगमधे माझा एकटीचाच आवाज कसा काय दुमदुमतो? मग माझा मीच काढलेला निष्कर्श असा की मुळात या बायकांचे आवाजच लहान हो. कितीही चढवला तरी फार तर फार पलिकडच्या खोलीत ऐकू जाईल. त्यांची ’रेंजच’ तोकडी! माझ्या आवाजासारखी बुलंद नाही काही!

पण गेले २-३ दिवस हा बुलंद आवाज सुनासुना झाला. अर्थात रूटीन चालूच होतं. पण बोलल्याशिवाय कामं कशी करायची? मुलाला शाळेत कसं पाठवायचं? नवर्‍याचं तोंड वर्तमानपत्रातून बाहेर काढून त्याला वर्तमानात कसं आणायचं? असंख्य प्रश्न! पण करते काय? न बोलता कृति चालू. मुलाला हाका न मारता, त्याच्या शेजारी जाऊन बसले आणि चक्क गदागदा हलवलं. त्याला आधी काही समजेनाच. मग तो लख्ख जागा झाल्यावर त्याला एकदाच सांगितलं, ’मला बरं नाहीये, बोलता येत नाहीये, तर पटापट आवर, मी मागे लागणार नाहीये!’ आणि काय आश्चर्य! खरंच आवरलंन की त्याने पटकन. अधूनमधून फक्त ’हं’ म्हणत ’एक्स्पीडाईट’ करायला लागलं. नवरा तर खुशच. ’अरे ऊठ’, ’अरे आवर, उशीर होतोय’ अशी कटकट नाही काही नाही.. ते नाही म्हणूनच की काय तर त्यानेही शहाण्यासारखं आवरलं. ऑफिसमधे तर बोलायचा प्रश्नच येत नाही! साहेब म्हणतील त्याला फक्त ’हो सर’ म्हणायचे असते, त्यामुळे तिथे काही फारसा त्रास नाही झाला. संध्याकाळीही सकाळचंच रूटीन- न बोलता काम. आणि खरं सांगते, कोणाचंही काही अडलं नाही मी बोलले नाही तर! ना मुलाचं, ना नवर्‍याचं, ना शेजारणीचं, ना मैत्रिणीचं, ना साहेबांचं!

मग मी विचार केला, की कशासाठी आपण दिवसभर टकळी चालू ठेवत असतो आपली? प्रत्येक गोष्टीवर मत प्रदर्शित केलं पाहिजेच का? काही काही गोष्टी सोडून दिल्या, दुर्लक्ष केलं तर नाही चालणार का? आज बोलताच येत नाहीये म्हणून किमान दोन वेळा मुलाला सूचना देता आल्या नाहीत- तर काय बिघडलं? तो बिचारा लहान आहे, माझं ऐकतो म्हणून त्याच्यावर सदोदित सुपरव्हिजन केलीच पाहिजे का? तो चुकेल, धडपडेल, चालायचंच. अगदीच अडला, तेव्हा आपली मदत घेऊन केलाच की त्याने अभ्यास. आज फॉर अ चेंज नवर्‍यापाशी आपल्याच ऑफिसमधल्या गप्पा न मारता, त्याच्याही ऑफिसमधलं गॉसिप, पॉलिटिक्स ऐकलं, बरं वाटलं ना त्याला? आणि स्वत:लाही? आज कधी नव्हं ते मैत्रिणीशी ’टू द पॉईंट’ बोलून फोन बंद झाला, काय बिघडलं? आणि या सगळ्यामधे किती शक्ती वाचली? मी कुठेतरी वाचलंय की माणूस वृद्ध होत जातो तशीतशी त्याची शक्ती क्षीण होत जाते, याचं पहिलं लक्षण म्हणजे त्याचा आवाज बारीक होतो. आज २ दिवस मी ठरवून कमी बोलत आहे, तर मी किती शक्ती वाचवली माझी? उलट दोन जास्तीची कामं झाली.

आणि खरं सांगते, हा साक्षात्कार होता माझाच मला. कमी बोलणारा माणूस गरज पडेल तिथेच बोलतो आणि लोकांनाही ते माहित असतं, त्यामुळे त्याचं बरोब्बर ऐकलं जातं. उलट बाष्कळ बडबडणार्‍या माणसाकडे हमखास दुर्लक्ष केलं जातं. तेव्हा ठरवलं आहे, की कमी बोलायचं. गरज असेल तितकंच आणि तेव्हाच बोलायचं. मुळात मी बडबडी. कित्येक वेळा माझंच मला जाणवलंय की मी फार बोलते. पण काय करू? गप्प तर बसता येत नव्हतं, कारण हा साक्षात्कार झाला नव्हता आजपर्यंत. इतके दिवस आवाज फुटतच नव्हता तेव्हा इलाज नव्हता, पण आवाज व्यवस्थित झाल्यावरही हे पाळता येईल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे! शक्तीचा अपव्यय करणं आणि आहे तीच शक्ती गरज असेल तेव्हा योग्य तिथेच वापरणं यातला फरक तर समजलाय. थीयरी नंतर प्रॅक्टिकलची खरी परीक्षा होणार आहे!

(पण ही परीक्षा तशी सोपी जाईल असं वाटतंय, कारण ई-बडबड चालू राहीलच- ब्लॉगिंग, मायबोली, चॅट इत्यादि! ;-))

13 comments:

धम्माधिकाली said...

हायली एन्लाईटन्ड!
प्रत्येक आईने, किंबहुना प्रत्येक इस्त्रीने वाचावा असा लेख! मस्त लिहिलाय लेख!

बाय द वे, तुझा खरा आवाज एकदा रेकॉर्ड करून पाठीव पाहू ...व्हॉईस मेल! :-)

साधक said...

Awesome !! khoopach sahi lihila ahe ....Liked the style.
Mazy badbad karnarya tamam maitrinnina ha lekh pathavnar ahe !!!

by kb! said...

me stranger..

liked :

"कमी बोलणारा माणूस गरज पडेल तिथेच बोलतो आणि लोकांनाही ते माहित असतं, त्यामुळे त्याचं बरोब्बर ऐकलं जातं. उलट बाष्कळ बडबडणार्‍या माणसाकडे हमखास दुर्लक्ष केलं जातं."

varnan karaychi style suparb..

and yes i will wait to listen urs ई-बडबड ;) keep blogging...

Deep said...

प्रत्येक आईने, किंबहुना प्रत्येक इस्त्रीने >>> kaa buva?? aamhee kaay ghod maarly? :-)

Baakee poonam phaar chaan lihilys! pn kaay aahe na "bolti band" ase phaar kami vela hot g aanee BADBADI manse botaatch! bagh naa aata me kiti badbad krtoy i mean tyiptoy te hehe! nywz keep writing good stuff!

Deep
"A Foolish man tells a woman to STOP talking, but a WISE man tells her that she looks extremely BEAUTIFUL when her LIPS are CLOSED"

Deep said...

mala ti CD kashee milel?? :)

Bhagyashree said...

mast ch lihliyes, mazya pan manatli vyatha!! :D malahi satat bollyashivay rahvat nahi.. mi jeva chidte tevach gappa aste.. so mi jar badbad kami keli tar navryala vatel mi chidliy.. tyamule saddhya tari ahe tech baray! hehe :D

मिलिंद छत्रे said...

पूनम मस्तच लिहिले आहेस. अगदी खुसखुशित झालंय..

पण तू आपली बोलत रहा बघू... नाहीतर मलाही वाटेल तू चिडली आहेस... :)

Monsieur K said...

hehehehehe :))
all the best!! but i sincerely hope u continue to talk a LOT :)

संदीप चित्रे said...

Poonam ... nice article... paN bolaayachee thaaMboo nakos... aga aapalyaa saarakhyaa bolatee chaaloo lokaaMuLech tar prachaMD vaaph nirmaaN hoUn waaphechyaa shaktichaa shodh laagalaa :)

Amol said...

मजेदार लिहीले आहे पूनम :)

Parag said...

jabari !!!
milya ani nachiket la kitiiiiiiiiii shanta ani sahi vatala asel.. :D

पूनम छत्रे said...

सगळ्यांचे आभार! :)
आज जवळपास महिना झाला ’बोलती बंद’चे ठरवून, आणि मुलाला येता-जाता टोकणं, सतत त्याच्यावर लक्ष ठेवणं कमी झालं आहे. बाकी ’कमी’ बोलणं जमतंय असं नाही, पण कुठेतरी जाणीव तरी होते, की ’कमी बोलायला हवंय!’ हेही नसे थोडके, नाही? :)

Anonymous said...

kathapournima.blogspot.com is very informative. The article is very professionally written. I enjoy reading kathapournima.blogspot.com every day.
fast cash loans
payday loans canada