July 16, 2007

सोयराबाई

श्रीमनयोगी’ आणि ’छावा’ ही पुस्तकं वाचल्यानंतर शिवाजीमहाराजांचा थोरपणा आणि संभाजीची तडफ याबरोबरच लक्षात येतो सोयराबाईचा सत्तेचा ध्यास आणि त्यापायी स्वराज्याच्या स्वप्नाचं झालेलं नुकसान. सोयराबाई शिवाजीमहाराजांची द्वितीय पत्नि. अप्रतिम लावण्यवती होती. तिचं माहेर म्हणजे मातब्बर सरदार मोहित्यांचं घराणं. सोयराबाई दिसायला जितकी सुंदर तितकीच मनानी कुरुप. जबरदस्त महत्त्वाकांक्षी स्त्री होती ती. ’सत्तापिपासू’ म्हणू शकू इथपर्यंत.

संभाजी दोन वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचा, सईचा अकाली मृत्यु झाला. त्यांचं पालन-पोषण त्यांची दूध-आई ’धाराऊ’ हिने केले आणि संस्कार जीजाबाईंनी. संभाजी स्वभावाने निर्मळ आणी संवेदनशील. वास्तविक तेव्हाच सोयराबाईने त्यांना ममतेनी जवळ घेऊन माया लावली असती तर कदाचित माराठेशाहीचं चित्र पुढे वेगळं दिसलं असतं. पण तिने कायमच संभाजीला ’सावत्र’ नजरेनी पाहिलं. शिवाजीमहाराजांचेच आदर्श त्यांच्यासमोर असल्याने ’रयतेचा राजा’ म्हणजे काय हे संभाजींना पुरेपूर ठाऊक होते आणि ते तसे आचरणही करत होते. मात्र हेच सोयराबाईला बघवले नाही.

मराठेशाहीला आकार दिला, वाढवले शिवाजीमहाराजांनी आणि तिची जोपासना करणे, तिचे साम्राज्य पूर्ण भारतात पसरवणे यासाठी संभाजी समर्थ होते. सुदैवाने मराठेशाहीचा योग्य असा दरारा चहूकडे निर्माणही झाला होता. खुद्द औरंगझेबाचं आसन तिथे दूर दिल्लीत अस्वस्थ झालं होतं. पण राज्याच्या हितापेक्षा स्वत:च हित जास्त मोठं ठरलं. सोयराबाईला येनकेनप्रकारे सत्ता हवी होती. तिने तिच्यासारखेच लोक हेरले, निवडले आणि पद्धतशीरपणे कामाला लागली. सर्वप्रथम शिवाजीमहाराज आणि संभाजी यांच्यात दुरावा आणणे अत्यंत जरूरीचे होते. एकदा का महाराजांच्या मनात संभाजीबद्दल किन्तु निर्माण झाला की संभाजीला एकटे पाडणे अवघड नव्हते.

पहिली संधी मिळाली सोयराबाईला ’गंगू’च्या निमित्ताने. गंगू ही आण्णाजी दत्तो सुरनिस यांची मुलगी. संभाजी आणि तिची भेट झाली होती राजगडाच्या देवळात. या एकाच गोष्टीचे भांडवल करून सोयराबाईने त्या दोघांबद्दल घाणेरड्या अफवा पसरवल्या. संभाजी हे रातोरात ’स्त्रीलंपट’ ठरले. ज्या महाराजांनी परस्त्रीकडे चुकूनही पाहिले नाही, खुद्द त्यांचाच मुलगा ’बाहेरख्याली’ ठरवला गेला. दुर्दैवानी हे असले आरोप सहन न झाल्यामुळे गंगूनी जीव दिला आणि समोरासमोर या आरोपांची शहानिशा होऊ शकली नाही. नाहीतर संभाजी आणि गंगूच्या मनात काहीच नव्हते हे सहज सिद्ध होऊ शकले असते. पण या सर्व प्रकाराने शिवाजीमहाराज कुठेतरी दुखावले गेलेच. पण याच प्रकरणामुळे आण्णाजी दत्तो यांच्या रूपात संभाजीला एक कायमस्वारूपी शत्रू मिळाला. हेच आण्णाजी दत्तो संभाजीराजेंच्या विरुद्ध केलेल्या प्रत्येक कटात सहभागी होते. पहिला कट फसून त्यांचे नाव उघडकीला आल्यानंतरही, संभाजींनी त्यांना माफ करून ’मुजुमदारी’ दिली होती. पण त्यांच्या मनातली द्वेष कमी झाला नाही. संभाजींच्याच जीवावर उठले ते. शेवटी हत्तीच्या पायाखाली त्यांचा अंत झाला. क्षणभरतरी त्यांनी सद्सदविवेकबुद्धीला स्मरून ’आपली मुलगी आणि प्रत्यक्ष युवराज असं करू धजतील का?’ इतक्या साध्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी शोधले असते तर पुढच्या बर्‍याच अप्रिय गोष्टी टळल्या असत्या.

सर्वात मोठं कारस्थान रचलं सोयाराबाईने जेव्हा शिवाजीमहाराज कर्नाटक स्वारीच्या निमित्ताने ३ वर्षं दूर होते. गडाच्या बातम्यांच्या निमित्ताने सतत संभाजींविरुद्ध बातम्या पुरवणे, पराचा कावळा करणे, खोट्यानाट्या अफवा पसरवणे हे तिने पद्धतशीरपणे केले. दिलेरखानाच्या गोटातून खोटे खलिते संभाजींच्या नावे पाठवणे आणि असे भासवणे की संभाजी आणि दिलेरची दोस्ती आहे, संभाजी महाराजांच्या जीवावर उठले आहेत अश्या अफवा पसरवणे यात ती आणि तिचे साथीदार पुढे होते. दुर्दैवाने महाराज जेव्हा परत आले तेव्हा त्यांचा या सर्वावर विश्वास बसला आणि त्यांनी संभाजीची भेट नाकारली. कधीकधी एक खोटं सातत्यानी खरं म्हणून समोर आणलं गेलं तर तेच खरं मानलं जातं त्यातलाच प्रकार हा. इथे जरका असे गैरसमजाचे वादळ पसरले नसते तर इतिहास बदलला असता का? खर्‍याखोट्याची शहानिशा झाली असती तर सोयराबाईचे पितळ उघडे पडले नसते? पण तसे होणे नव्हते. परस्पर गैरसमज इतक्या थरला गेले आणि परिस्थितीच अशी विचित्र झाली की संभाजी चक्क दिलेरखानाला जाऊन मिळाले. ही सर्वात मोठी आणि दुर्दैवी चूक संभाजींची. परिस्थिती कशीही असो, शत्रूला जाऊन मिळणे हा कधीही अक्षम्य अपराधच. त्या निमित्ताने सोयराबाईला एक नवीन अस्त्र मिळाले आणि संभाजींवर एक कायमचा डाग लागला.

नंतर संभाजींना पश्चात्ताप झाला आणि ते परत आले, महाराजांनीही त्यांना पुन्हा राज्यकारभारात सामावून घेतलं आणि सर्व काही सुरळीत होतंय असं वाटत असतानाच सोयराबाईनी पुन्हा विषप्रयोगाचं अस्त्र काढलं. शिवाजीमहाराजांवरचा पहिला विषप्रयोग असफ़ल झाला होता. पण तेव्हा संभाजी महाराजांबरोबर होते, नामांकित वैद्य सेवेस होते आणि समर्थ रामदासांचे शिष्यही तत्पर होते. दुसर्‍या वेळी तिने बरोब्बर डाव टाकला. संभाजी मोहीमेवर होते, मातब्बर आणि विश्वासू सरदारही असेच गुंतले होते. हीच वेळ साधून, महाराजांना एकटे गाठून तिने महाराजांवर दुसरा आणि अत्यंत घातक विषप्रयोग करवला. कल्पना करा ही स्त्री सत्तेच्या हव्यासापायी किती अंध झाली होती. प्रत्यक्ष नवर्‍यावर विषप्रयोग.. आणि तिचा नवरा काही साधासुधा, सामान्य होता का? राज्याभिषेकाचा संस्कार झालेले ’छत्रपति’ होते ते. एक स्वप्न उराशी बाळगून होते ते आणि ते स्वप्न स्वराज्याचं होतं. तिथे व्यक्तिगत हेवेदावे आणि अधिकारांना कुठे स्थान होतं? पण सोयराबाईला सत्तेपुढे सारंच गौण होतं. आणि सत्ता मिळवून असे करणार तरी काय होती? ना तिच्याजवळ दूरदृष्टी होती ना लोकांना बांधून ठेवण्याची हातोटी, ना राज्यकारभार चालवण्याची क्षमता.

सोयराबाईनी संभाजींना संपवण्यासाठी दोनदा कारस्थान केलं. दोन्ही वेळा ते फसलं. पहिल्याच वेळी, शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर लगेचच तिने त्यांची पुण्याई वापरून त्यांच्या निष्ठावान सरदारांना संभाजींविरुद्ध भडकवलं आणि त्यांचा पाठींबा मिळवला. पण संभाजी शेवटी शिवाजीचेच रक्त. ते तिच्या हाती आलेच नाहीत, उलट तिचा कट तिच्याचवर उलटला. हा कट फसल्यानंतर आणि दगाबाजांची नावं उघडकीला आल्यानंतरही संभाजीमहाराजांनी सगळ्यांना माफी दिली, इतकंच नाही तर राज्यातल्या जबाबदारीच्या जागाही दिल्या. यातही नवल म्हणजे सोयराबाईचे सख्खे बंधू ’हंबीरराव मोहिते’ हे शेवटपर्यंत स्वराज्याचे सच्चे सेवक राहिले. ते सोयराबाईच्या कटकारस्थानांना कधीही प्रोत्साहन दिले नाही. उलट ते कायम संभाजींबरोबर राहिले. ’सरलष्कर’ म्हणून त्यांच्या मावळ्यांचं नेतृत्त्व केलं त्यांनी आणि शेवटी लढाईच्या मैदानावरच त्यांच्या पराक्रमाला साजेसं वीरमरण आलं त्यांना. याच वेळी मराठेशाही अनेक पातळ्यावर सर्व शत्रूंशी झुंझत होती- इंग्रज, पोर्तूगीज, सिद्दी आणि सर्वात मोठा मुगल- औरंगझेब स्वत: दख्खनेत उतरला होता. या व्यवधानात संभाजींना घरून भक्कम पाठींबा हवा होता. पण बाहेरचे शत्रू परवडले असे हे घरातलेच शत्रू होते.

संभाजींविरुद्धचा दुसरा कटही उघडकीस आल्यानंतर मात्र संभाजींनी कोणाचीच गय केली नाही. सर्व सहभागी दगाबाज हत्तीच्या पायाखाली चिरडले गेले. सोयराबाई या त्यांच्या मातोश्री, आणि राज्याच्या महाराणीही. त्यांना अर्थातच अशी शिक्षा ते देऊ शकत नव्हते. अर्थात देहदंडाला ती तितक्याच ताठ मानेनी सामोरी गेली असती, पश्चात्तापाचा लवलेशही तिला कधी झाला नाही... तिची मान कायमच ताठ राहिली. शेवटी पूर्ण एकटी पडल्यानंतर आणि बाकी सगळे मार्ग बंद झाल्यानंतर सोयराबाईने आत्महत्या केली- तीही विष घेऊनच!! दैव, दुसरे काय! ज्या विषाने खुद्द शिवाजीमहाराजांचा जीव घेतला, जो विषप्रयोग संभाजींवर फसला, त्यानेच शेवटी सोयराबाईचाही घोट घेतला. पोएटीक जस्टिस म्हणतात हो हाच का?

सत्तेची आस या पलिकडे सोयराबाईने काय मिळवले? ’महाराणी’, ’पट्टराणी’ ती होतीच. शिवाजीमहाराजांच्या राणीवश्यावरही तिचा वचकही होता. मात्र सत्तेची हाव ठेवल्यामुळे सर्वच नातेसंबंधांपासून ती दूर झाली. अलोट प्रेम, माया अशी कोणावर तिने केली नाही, ना ही तिला कधी कोणाचे मिळाले. राजारामांनांही तिने स्वत:च्या तालमीत तयार केले नाही. उलट कायम तिच्या छायेखालीच राहिल्यामुळे ते मनानीही शरीराप्रमाणेच कमकुवत राहिले. आपल्या जवळच्या माणसांवर प्राणघातक हल्ले तेवढे करवले तिने. अगदी सत्ता तिच्या हाती आली असती तरी ती किती टिकली असती हाही एक प्रश्नच आहे. त्यापेक्षा तिने संभाजींना माया लावली असती तर त्यांनी आपणहोऊन सर्व सूत्र तिच्या हातात दिली असती, इतके ते हळवे आणि सत्तेचा मोह नसलेले होते. सोयराबाईची महत्वाकांक्षा आणि संभाजींचा पराक्रम यांनी मराठेशाही शिवाजीमहाराजांनंतर खूप पुढेही गेली असती कदाचित, कोण जाणे! पण अंतर्गत हेवेदावे आणि स्वार्थी वृत्ति यांनी मराठी लोकांना कायमच ग्रासले आहे. ज्या शिवाजीमहाराजांनी कधीही स्वत:ला राज्यहितापुढे, लोकहितापुढे मोठे पाहिले नाही, त्यांच्याच घरात अशी सत्तांध फांदी वाढावी याची खूप खंत वाटते. कोणीच ’सोयरा’ नसलेली आणि कशाचच ’सुतक’ नसलेली सोयराबाई खर्‍या अर्थानी मराठेशाहीची पहिली खलनायिका ठरली.

11 comments:

Chinmay said...

Absolutely right. She was truely first 'Khalanaayika' of Maratha history.

The last one being wife of Raghoba dada Peshwe.

Parag said...

Poonam,
Masta lihilays ekdam :)
vachlelya pustakanmadhun ajun kahi asech saglyanna mahit naslele prasang lihit raha..

-Parag.

Anonymous said...

सोयराबाईंबद्दल असे समज जरी प्रचलित असले तरी त्यात दंतकथांचाही बराच अंश असावा. ऐतिहासीक कादंबर्‍यांतील व्यक्तीचित्रण म्हणजे इतिहास नव्हे. माझ्या माहीतीप्रमाणे महाराजांवरील विषप्रयोगाच्या कल्पनेचे समकालीन कागदपत्रांतून खात्रीशीर समर्थन आढळत नाही.

उलटपक्षी संभाजीराजांनी केलेल्या एका दानपत्रात (बाकरे दानपत्र) सोयराबाईंचा उल्लेख त्यानी 'निर्मळ हृदयाच्या' असाच केला असून त्यांचे मन कलुषित केल्याचा दोष अमात्यांना दिलेला आहे. अमात्यमंडळ व संभाजीराजांत बेबनाव जुनाच होता. दक्षीण दिग्वीजयावर जाण्यापूर्वीही शिवरायांनी राज्याचे नियंत्रण संभाजीराजांकडे सोपवले नव्ह्ते ही बाब देखील सुचक आहे.

ऐतिहासीक व्यक्तींबद्दलची विधाने करताना कादंबरीकारांपेक्षा इतिहासकारांची मते ग्राह्य धरावी. प्रतीक्रियेत काही अधीक-उणे वाटल्यास क्षमा असावी ही विनंती.

- मृण्मय.

Mints! said...

गंगु हि अनाजी दत्तोंची मुलगी नव्हति तर त्यांची नातेवाईक होती असा उल्लेख संभाजी ह्या पुस्तकात वाचलाय.

कोहम said...

I agree with Mrunmay....apan Soyarabainaa Black karun takali ase vatte. She may not be all white but she cud be gray.

sangeetagod said...

मृण्मयच्या मताशी सहमत. ऐतिहासिक कादंबर्‍या म्हणजे इतिहास नाही.

Abhijit said...

ऐतिहासिक ललित आवडलं! थोडक्यात पण अगदी तपशिलात जाऊन लिहिलय.

poonam said...

सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे आभार :)
मृण्मय, कोहम, संगीता, मिन्ट्स- तुमच्या मताशी सहमत आहे. ऐतिहासिक कादंबर्‍या या ’कादंबरी’ म्हणून लिहिल्या असल्यामुळे त्यात दंतकथांचा अंश असण्याची शक्यता आहे. मी ’श्रीमानयोगी’ वाचलं होतं आणि ’छावा’ नुकतच वाचलं. दोन्ही पुस्तकांमधे ’संभाजी’ हे व्यक्तिचित्रण अगदी विरुद्ध आहे. पण सोयराबाईचे चित्रण साधारणपणे एकसारखच आहे. ती पूर्णपणे खलनायकी नसेलही, पण सत्तेची आस तिला होती, आणि त्याहूनही जास्त संभाजींवर राग तिचा होताच, कारण त्यामुळे तिचे पुत्र राजाराम यांच्यावर सतत दुय्यम स्थान घेण्याची वेळ आली. शिवाजीमहाराजांवर ’विषप्रयोग’ कोणी केले हे निर्विवाद सिद्ध झाले नसेलही, पण त्यांना दुर्दैवी मृत्यू आला हेही तितकच सत्य आहे. संभाजी तर तरूणच होते, आणि शिवाजींइतके परिपक्वही नव्हते. त्यांनीही त्या जोशात चुकीचे निर्णय घेतले असतील, पण महाराजांच्या कारकीर्दीत आणि त्यांच्या नंतरही मराठेशाहीत फूट पडलीच. त्याला अनेक कारणं आहेत, पण सोयराबाई हाही त्याचा एक छोटा कोपरा आहेच.
कादंबर्‍या वाचल्यानंतर उलट इतिहासातल्या बखरी वाचायची इच्छा जागृत झाली, नाहीतर मलातरी शिवाजी, संभाजी आणि मग एकदम पेशवे इतकीच माहिती होती ’आपल्या’ मराठेशाहीबद्दल. आपल्याला अगदी जगाचे इतिहास पाठ असतात, पण आपल्या मातीची किती माहिती असते? कादंबरीच्या निमित्ताने थोडीफारतरी ओळख झाली त्याची. आता इतिहास वाचून झाल्यावर पुन्हा एकदा ब्लॉग लिहीन :)
सध्या थांबते. ही कॉमेंट ब्लॉगपेक्षाही मोठी व्हायला लागली आहे!! :)

HAREKRISHNAJI said...

छान लेख

Monsieur K said...

This post is highly informative. It is indeed a great effort to read historical books - they will always be partly fictional - coz none of the people from that era exist - and history has always been written by the victorious.
So, the validity of the statements will always be doubted by many (as seen in the comments) - the commendable thing is that you have taken the effort of reading it up (as you say - how many of us know our own history as compared to world history), and then putting it up on your blog.
Truly commendable!
Aint sure if I had read your blog before - will keep surfing here from now on!
Thanks for your comment on my blog.

~Ketan

Tejaswini said...

chhan lihilays.. itihaas ani kadambari.doghanmadhehi kayamch farak uratoch!

itihas "masala" add karun lokana vachayla dyayacha asel tar pratyek goshtit ek "soyra" nirmaan hwavich lagate!