July 6, 2007

अंतर

"प्रिया, आम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळालय.. US चा क्लायंट आहे. मी हेड असेन त्याचा.."
"वा. छान बातमी आहे.."
"हो. काम चांगलं असेल, नवा अनुभव पण मिळेल.. रमणनी मोठ्याच विश्वासानी ही responsibility दिलीये.. पण I am happy and quite excited ! अगं पण एक होणारे.. US चा client असल्यामुळे मला शिफ़्ट ड्युटी असणारे.. "
"ई? खरच? म्हणजे किती ते किती?"
" mostly दुपारी २ ते १०"
"ही कसली वेळ रे? १० म्हणलं की सहज ११ तुला ऑफिसातच होतील.. पुन्हा जायला यायला अर्धा अर्धा तास.. आणि हे किती दिवस?"
"अगं दिवस कसले? ६-८ महिने तरी"
"शी फ़ारच बोर आहे हे.. तू कसं काय accept केलस हे? माझी शाळा सकाळी ७.३० ते १२.००.. मी जेमतेम घरी येते तोवर तू ऑफिसला जाणार.. आणि चिनुला तर कधी भेटणार तू? बोर होईल ती फ़ार.."
"अगं वीकेंड असेल ना आपलाच.. त्यात काय.. हे इतकं मोठ prestigious project मिळालं मला की हे असले विचार सुद्धा आले नाहित मनात माझ्या.. whats the big deal? चल, उद्या मस्तपैकी जेवायला जाऊ Goa express मधे celebrate करायला, ओके?"

--------------

"प्रिया, उठ.. अशी सोफ़्यावर का झोपलीयेस?"
"आलास का? अरे तुझी वाट पाहता पाहता झोपच लागली.. किती वाजले? पावणेबारा.. बापरे किती उशीर रे.."
"हो, एक महत्त्वाचे काम करायचे होते.. मग झाला उशीर.. पण तू अशी का झोपली आहेस?"
"हां! अरे अरविंदरावांना ऍडमिट केलय.. घरात घसरून पडले. प्लास्टर घातलय. उद्या त्यांना भेटून ये सकाळी. मी जाऊन आले आज संध्याकाळी. तुझा सेल का बंद होता रे? "
"बापरे! कसे काय पडले अचानक? या म्हातार्‍या लोकांच काही कळतच नाही.. आता आला ना ताप मावशीच्या डोक्याला?"
"ताप काय? ते काय मुद्दामहून पडले का? काहीतरीच बोलतोस! "
"बरं चल, कंटाळा आलाय फ़ार.."
"ते एक, आणि ईलेक्ट्रिकचं बिल पण भरशील का? त्याच बाजूला आहे ऑफिस.."
"मीच का? आयला, हे बर झालं तुला.. दिवसाची कामं पण मीच करायची, आणि रात्री ऑफिसात आहेच पुन्हा.."
"असं काय बोलतोस रे? त्या बाजूला आहे, तुला वेळही आहे म्हणून म्हणले.. नाहीतर मी शनिवारी भरते आहेच.. बघ तुला जमलं तर.."

----------------

"बापरे, फ़ारच उशीर झाला नाही?"
"उशीर तर उशीर, एवढ काय? पण मजा आली ना पार्टीला?"
"मजा आली रे, पण मी फ़ारस कोणाला ओळखत नाही ना..मला जरा एकटं पडल्यासारखं झालं.. चिनुनी एंजॉय केलं पण.. २-४ मुलं होती ना, आणि महत्त्वाचं म्हणजे तू होतास... "
"हो हो. आधी तर चिकटूनच होती मला.. म्हणलं ही अशी चिकटली तर कसं बोलणार मी कलीग्जशी.. पण ती मुलं होती म्हणून thank God ! आज मनोज आणि हरीशी चांगली ओळख झाली.. हे पण सीनीयर्स आहेत.. यांच्याकडे visibility असली की बरं असतं.. मग चांगली projects मिळतात. म्हणून असल्या पार्ट्या अटेंड करणं मस्ट झालय. एरवी कुठे वेळ असतो नाहीतर त्यांना.."

-----------------

"अरे वा, आज मॅडम चक्क जाग्या.."
" ह्म्म. तुझी वाट पहात होते रे..'चष्मेबद्दूर' लागलाय तो पहात पहात म्हणल तुझी वाट पहावी.."
"सिनेमे तसे रोजच असतात की, पण तु कधी जागी रहात नाहीस मी येईपर्यंत.."
"तसं नाही रे.. तुला आजकाल फ़ारच उशीर व्हायला लागलाय रे.. ११.३० नंतरच येतोस तू जवळपास रोज.. मला ५ला उठावच लागतं सकाळी माहिते तुला.. या तुझ्या शिफ़्टच्या आधी तरी कधी जागत होते मी? सकाळची शाळा, दुपारच्या शिकवण्या.. संध्याकाळी इतकं बोर होतं की तेव्हाच झोप येत असते खरतर, पण कशीबशी चिनु झोपेपर्यंत तरी थांबते"
"मग आज काय विशेष ते सांग"
"अरे काहीच नाही, अगदी सहज. सिनेमा लागला छान, म्हणल थांबून पाहू..येतोस तरी कधी ते.."
"हं काम फ़ारच आहे या प्रोजेक्ट मधे.. आणि co-ordination करायचे आहे ना तिकडच्या लोकांशी म्हणून असं शिफ़्टमधे काम करणं भाग आहे. मी रमणला जरा मस्का लावतोय की मीच जातो US ला म्हणजे हे सगळे त्रास नकोत!"
" USA ला? अरे बापरे.. म्हणजे तर तू दुर्मिळच होशील आम्हाला.. "
"अगं पण प्रोजेक्टची मागणी असेल तर जायलाच लागेल. लोक जाऊन जुनी झाली.. मस्त ऐश करतात.. मी इतकी वर्ष आहे इथे, पण मला एकदाही chance लागला नाही अजून.. तूही खुश व्हायला हवस खरंतर, पण तुझं काहीतरी तिसरच.."
"अजित, तसं नाही रे.. मी म्हणत होते की इथे एकाच घरात राहून आपण भेटत नाही, तर तू US ला गेल्यावर तर.."
"काही होत नाही गं... मी कायमचा जाणारे का? काही महिने फ़क्त. आणि benefits बघ ना.. increment, bonus, performance incentive, onsite experience, big dollars सगळे प्लसेसच प्लसेस आहेत.. हो की नाही? काम आहे या प्रोजेक्टमधे पण मी खुश आहे ते याचसाठी.."
--------------------


"अरे.. आज १०लाच आलास..! चिनु आत्ताच झोपली बघ.."
"हं, काम लवकर संपल म्हणून.. आता सेटल होतय ना हळूहळू.."
"वा! रोजच येत जा तू असा.. छान वाटतं"
"रोजचं मी सांगत नाही हं! आज आलोय तर तू लगेच सुरु झालीस की.."
"बरं बाबा जमेल तसं ये, पण ये.. हे बघ..."
"हे काय? ग्रीटींग? कोणी दिलं? तुला? का? आज काय विशेष? आज वाढदिवस तर नाही तुझा.."
"अरे आज शिक्षकदिन नाही का? शाळेतल्या मुलांनी दिलं ते आणि हे अजून एक शिकवणीच्या मुलांनी, आणि काळे सरांनी आज सगळ्यांना हे छोटे बुके दिले.. छोटा पण छान आहे ना?"
"वा, मजा झाली की मग तुमची आज.. आज मॅडम डीमांडमधे होत्या तर.. काळे सरांनी फ़क्त फ़ुलंच दिली का अजून काही पण? आमच्या तर लक्षातही नाहीत हे असले दिवस.."
"हो रे, तू फ़ार बिझी आहेस ना.. बरं मी काय म्हणते दिवाळीत जायचं का आपण कुठे फ़िरायला ४ दिवस?"
"काय वेडीबिडी आहेस का प्रिया? इथे मी गळ्यापर्यंत बुडालोय कामात आणि तुला फ़िरणं सुचतय?"
"अरे, आत्ताच म्हणालास ना की होईल सुरळीत म्हनून.. झाले ना ४ महिने आता असं काम करून.. आपण किती दिवसात मनमोकळं बोललो नाही, फ़िरलो नाही कुठे.. वीकेंडला कामच असतात इतकी.. पटकन येतो आणि जातो.."
"कबूल आहे मला सगळ.. पण सॉरी, नाही जमणार मला.. मे महिन्यात पाहू.."
-------------------


"बाबा आपल्याकडे दिवाळीच्या सुट्टीत अनुमावाशी, काका आणि अबोली, आभा येऊदेत?"
"कधी यायचा प्लॅन करत आहेत? आणि तू मला काही बोलली नाहीस प्रिया.."
"अरे काल संध्याकाळीच फोन आला होता.. चिनुला राहवेना....
" "सांगा ना बाबा.. दिवाळी झाली की मला सुट्टी आहे आणि आईलाही.."
"तुला सुट्टीतला अभ्यास नाही का चिनु? "
"तो मी करीन की बाबा.. युनिट्स मधले माझे मार्क पाहिलेत ना?"
"अजित, अरे करेल manage ती.. terminals चा पण अभ्यास मन लावून करतिये ती.. आपलं बाहेर जायचं बारगळलं त्यामुळे नाराज आहे, थोडी cheerup होईल.."
"म्हणजे तुम्ही ठरवलंच आहे सगळं.. येऊदेत की मग. पण मला दिवाळीत २च दिवस सुट्टी असेल हं. त्यांना मी वेळ नाही देऊ शकणार.. चालेल ना? मागाहून बोलायचे नाही की तू त्यांच्याशी बोललाही नाहीस म्हणून.."
"अरे, असं कसं म्हणीन.. मलाही दिसतंय ना तू किती बिझी आहेस ते.. तेही काही म्हणायचे नाहीत. दिवाळीचे दिवस संपले की येतील ४ दिवस. आम्हालाही change ..
"मला कधी change मिळणार काय माहित.."
"अरे मग काढ की तूही २ दिवस.. खूप मजा येईल"
"हो ना बाबा, घ्या की तुम्ही सुट्टी.."
"शक्य नाहिये ते, नाहीतर मलाही मजा करायला आवडली असतीच की.. चिनु, your baba is working on an important project, u know.. so नो सुट्टी, फ़क्त काम!! तुम्ही करा ऐश.."
------------

"हे काय, तू या ड्रेसमधे?"
"अरे आत्ताच येतीये बाहेरून"
"आत्ता या वेळेला कुठे गेली होतीस? आणि कोणाबरोबर? मला सांगितलं नव्हतंस काही.. आणि चिनु? तिला घेऊन गेली होतीस का एकटीच होती?"
"४ला फोन आला रे.."
"कोणाचा?"
"अरे सांगू तर देशील.. सुजाताचा फोन आला ४ ला.. ६.३०ला 'आयुष्यावर बोलू काही'चा प्रयोग होता आणि तिच्याकडे extra ticket होते, तर येतेस का अस विचारलं तिनी.."
"कसला प्रयोग हा म्हणे?"
"अरे मराठी कविता आणि गीतांचा संदीप खरे आणि सलील कुलकर्णींचा खूप फ़ेमस प्रोग्रॅम आहे. मीही ऐकूनच होते फ़क्त. जायची खूप इच्छा होती.."
"हो ना.. मला ते तसलं काही आवडत नाही.. माझ्यामुळे तुला जाता येत नाही असच ना?"
"असं म्हणलं का मी? "
"आणि चिनुला काय घरात कोंडून गेलीस की काय मग?"
"असं बोलवतं कसं तुला अजित? अशी जाईन मी? खाली आजी आजोबा राहतात. त्यांना सांगितलं एक दिवस.. त्यांनाही काही वाटलं नाही आणि चिनुलाही.. तुलाच का राग येतोय?"
"त्यांना वाटलं तरी काही बोलायचे नाहित ते.. आणि चिनु काय बोलणार तुझ्यापुढे?"
"त्यात बोलण्यासारख काहीच नाही म्हणून बोलले नाहीत ते. चुकुन कधीतरी मी एकटी बाहेर जाते, ते समजून घेतात. आणि आता चिनुकडे बघावं लागत नाही.. फ़क्त सोबत लागते तिला.. खालीच झोपलीये ती आज"
"पण इतकं काय अडलं होतं तुझं?"
"प्रश्न अडण्याचा नाहिये अजित.. हा कार्यक्रम छान असतो, तो अचानक बघायची संधी मिळाली, घरचं सगळं करून गेले मी, that's it . issue तू बनवतोयेस.. आज लवकर आलास म्हणून कळलं तुला, नाहीतर अजून तासानी आला असतास तर तुला मी सांगेपर्यंत काही कळलही नसतं"
"अच्छा! म्हणजे असं काय काय लपवलं आहेस तू माझ्यापासून? कुठे कुठे आणि कोणाबरोबर भटकत असतेस कळूदे तरी.."
"भटकत? काय बोलतोयेस, समजतय तुला? माझी शाळा, शिकवण्या आणि थोड्या मैत्रिणी या व्यतिरिक्त कुठे जाते मी? आणि जाईन असं वाटतय तुला? तुला काय suggest करायचंय? तू तुझ्या कामात कायम बिझी.. त्याबद्दलही काही म्हणणं नाही माझं, कारण शेवटी कामच आहे तुझं ते.. पण म्हणून मला काही आयुष्यच नाही का? फ़क्त तुझंच ऐकायचं का? तू का नाही असा विचार करत की कवितांमधे आपल्याला interest नाही तर हिला पाहुदे.. तू तुझ्या मित्रांसोबत जाऊन सिनेमे पाहतोस तेव्हा कधीतरी त्रागा केलाय मी? हे तुझं project सुरू झाल्यापासून तुझी चिडचिड वाढलीये.. आत्तापर्यंत काहीच बोलले नाही.. पण म्हणून तू काहीही बोलायला लागला आहेस. प्रत्यक्ष बायकोवर संशय? शी अजित! ’मी किती ग्रेट आहे, मी किती पैसे मिळवतो, ऑफिस मधे मला कसे विचारता” या पलिकडे तू जातच नाहियेस सध्या.. कधी माझी, चिनुची, तुझ्या आईबाबांची चौकशी तरी केलीस? माझ्या शाळेची वेळ तुझ्या सेकंड शिफ़्टशी clash होते म्हणून माझी नोकरी ’फ़डतूस’ असं म्हणाला होतास आठवतंय? पण तो माझा विरंगुळा आहे, मीही काही करू शकते हा आत्मविश्वास मला मिळतो असा विचार नाही करत तू.. इतका त्रास होतो तर तू का नाही बाहेर पडत या प्रोजेक्ट मधून? दुसरं प्रोजेक्ट सहज मिळेल तुला.. पण तुझा ईगो तुला परवानगी देत नाही ना.. त्याची सगळी चिडचिड माझ्यावर.. एक रविवार मिळतो आपल्याला.. पण तोही तू कधी एकदा ही सुट्टी संपतीये असं वागतोस.. ताणतणाव मलाही आहेत, पण विचारलेस कधी तू मला? तुझ्या रूटीनमधे काही आलेल चालत नाही तुला म्हणून तुझे मूड सांभाळून सगळं manage करते मी... सगळंच तुझ्या नजरे आड जातय अजित?"
"ओके ओके. I am sorry about that comment . पण म्हणून इतकं lecture कशाला देतेस? सवयच झालीये तुला बडबड करायची.. माझे frustrations कसे समजणार तुला? मी घरी यावं तर तू झोपलेली, सकाळी कोणी घरी नाही.. दुपारी जेवताना कितीसं आणि काय बोलणार.. promotion मिळवायचं असेल तर हे प्रोजेक्ट किती प्रतिष्ठेचं आहे हे तुला काय समजणार.. आणि the fat paycheck I bring in every month? तो बरा नजरेआड होतोय तुझ्या? आणि या पुढे असंच होणार.. मला तुमच्यासाठी वेळ नसणारे.. आणि आता इच्छाही होत नाही.. चिनु मोठी होतीये.. तुला तुझी शाळा, घरकाम आहे.. I feel lost out .. तुम्ही दोघी आणि मी एकटा अस विश्व झालं आहे.. मला ऑफिसचं कामच बरं वाटतं त्यापुढे.. lets accept these facts and live, ok? "

एकाच घराच्या एकाच खोलीत असूनही किती अंतर पडलं होतं दोघांमधे.. न भरून येणारं अंतर...


समाप्त

16 comments:

Anonymous said...

Mast kathaa Aahe. Aajkaalchya shaharatalya paishaacya maage dhavanaaryaa nueclear families madhye jaanavanaara motha problem

Majhi Duniya

Anamika said...

कथा खरच चांगली आहे पण एकदम घाईत संपवल्यासारखी वाटली. हा प्रोब्लेम आज जवळजवळ सगळ्याच घ्ररात आहे पण त्याच्यावर एकदम वेगळे होणे हा उपाय नाही हा विचार प्रत्येक व्यक्तीने केला पाहीजे. एकमेकांना समजून जर वागले तर कदाचित काही वावगे होणार नाही आणि त्याचा वाईट परीणाम्ही मुलांवर होणार नाही.

अभिजित said...

कथेचा विषय फार छान आहे. खर तर ह्या विषयाचा आवाका खूप मोठा आहे. तरी सुद्धा थोडक्यात पण छान मांडलाय विषय. :-)

शैलेश श. खांडेकर said...

फारच सुंदर कथा आहे! आधी माणूस पैश्याच्या पाठीमागे धावतो. नंतर पैसा पिशाच्चासारखा माणसापाठी धावतो.

पूनम छत्रे said...

माझी दुनिया, अनामिका, अभिजीत, शैलेश- प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद.

आयुष्यात खरंच कधीकधी अशी वेळ येते की दोन व्यक्तींमधले सगळे दुवेच निखळतात अचानक.. ’न सांधण्या पलिकडे’ जातात नाती. कळत-नकळत असं अंतर पडतं की ते पार करणं अशक्यच होतं. अश्या वेळी ते पडलेलं ’अंतर’ फ़क्त बघणं यापेक्षा आपल्या हातात काहीच रहात नाही.. ’इच्छा तेथे मार्ग’ हे खरे असले तरी कधीकधी ’इच्छाच’ नसेल तर....?

sangeetagod said...

छान रंगली आहे कथा. आजच्या काळाचं प्रतिबिंबही हुबेहुब उतरलं आहे.

Anonymous said...

Khup mast aahe katha! Agadi realistic aahe.... he aaj kal ghdatay aaju-bajula...

-Arati

vivek said...

Chhaan aahe katha. Aavadali

puzzled_life said...

khup chaan ahe tuzhi katha.. ekdum realistic.. pan khup ghai ghai ne sampavlya sarkhi vat te. kuthe tari swarna madhya ha nightoch.. ekdum koni tokala jaat nahii ase mala vat te...
keep up the good workk

कोहम said...

katha avadali...pan vishay ekangipane mandala aahe asa vatala....ajit la bad boy karun takala tumhi...pan generally ashya ashayachya kathanmadhe navara hach bad boy asto....so this is not trend breaking....pan overall hold hota likhanacha shevataparyanta....vachayala maja aali.

पूनम छत्रे said...

ह्म्म. सुवर्णमध्य जवळजवळ सर्व वेळी साधता येतो, पण तशी इच्छाच नसेल तर? कारण त्यात कराव्या लागतात तडजोडी- खूप आणि नेहेमी. तसं करणं आजकाल सोपं राहिलेलं नाहीये दुर्दैवानी :(

अनु said...

Do you write with name Sarvesh on manogat.com?
I found this today on manogat.
http://www.manogat.com/node/11010

पूनम छत्रे said...

nahi anu, me manogat war registered nahiye. me tu dilelya link war jaoon aale. pan 'access denied' aale. bahuda ti link delete keli ahe.
'sarvesh' ni hi katha post keli hoti ka tithe? tu tase manogat chya moderators na kalavale hotes ka? khoop khoop dhanyawaad tuze! :)

अनु said...

Nahi mi moderator la sangitale nahi but I had posted a comment asking whether that person is 'punam'(I was was sure he wasn't you) and giving link of your original blog post. Then that story was deleted within 5 minutes by admin.
Abhar kasale tyat One should protect good literature piracy.

Anonymous said...

hey khupach chan ahe katha.
Aaj kalachya 90% IT valyanchya gharat hech ghadat ahe. Jarur kashyachi ahe tar samjutdar panachi :)

Mahesh said...

Katha chan hoti...ithe sagalyana awadali ase watate karan pratek jan swatahala hya katheth pahato ahe.........pan ek gost ahe...kayam Purushanach wait dakhawale jate..hya kathemadhe Nayikela sagali sympathy miali ahe..... :)