July 27, 2007

सूपरवूमन

काल ऑफिसमधे लंच करत असताना एकीनी तिची आजी गेल्याची बातमी सांगितली.. ती दोन दिवस आली नव्हती, आज आल्यावर हे कळलं. खूपच धक्का बसला होता तिला.. आजी ८७ वर्षाची होती तिची, घरातच गेली.. काहीही आजार नव्हता, वृद्धापकाळानी आलेला क्षीणपणा फ़क्त. एकही व्याधी नव्हती आजींना- बीपी, डायबीटीस तर नाहीच, पण ७-८ दातही शाबूत होते.. कवळी सुद्धा नव्हती! सकाळी उठून त्यांनी सर्व आन्हिकं स्वत:ची स्वत: उरकली, आंघोळ केली, देवाला नमस्कार करायला वाकल्या आणि गेल्याच! बापरे.. आम्ही ऐकता ऐकताच शहारलो. लंच अर्थातच नंतर अबोलपणे संपला.

नंतर जागेवर आले आणि सहजच विचार करत होते.. काय होतं ना या बायकांचं आयुष्य! साधारणपणे ७०-७५ वर्षापूर्वी यांनी संसाराला सुरुवात केली असेल.. वय अगदी लहान- तेराव्या किंवा चौदाव्या वर्षी लग्न- शिक्षण असेल किंवा नसेलही, असलं तरी शालेयच. त्या वेळची कुटुंबही किती मोठी.. घरात सहज १५-२० माणसं. ही बिचारी नवं लग्न झालेली मुलगी त्या गोंधळात पार हरवून जात असेल. ती भांबावली तरी तिला जवळ घेणारे, समजून घेणारे हात सुद्धा नव्हते त्या काळी. नवर्‍याशी मोकळेपणी बोलायची पद्धत नाही, सासू-जावा ही नाती अशी की त्यात मोकळेपणा अजूनही नाही, त्या काळी तर शक्यच नाही. तर अश्या पूर्णपणे अनोळखी वातावरणात संसाराला सुरुवात करायची.. घराच्या रगाड्यात स्वत:ला जुंपायचे. मोठे कुटुंब असल्यामुळे सासू जे काम देईल ते निमूटपणे करायचे. दिवसरात्र तेच- स्वयंपाक, रांधणे, घराची स्वच्छता, आल्यागेल्याचं करणं, स्वत:ची बाळंतपणं, मुलांची आजारपणं! मुलं जितकी होतील तितकी- ८, ९, १० कितीही.. त्यातली किती जगली, किती आजारपणामुळे, उपचाराअभावी गेली याची खंत कोणाकडे बोलून दाखवायची? सासूरवास पण चिकार असायचा त्या काळी.. शारिरीक आणि मानसिकही. नवरेही त्याकाळी ’बायकोला समजून घेणारे’ वगैरे कमीच. पैसेही बेताचेच मिळायचे, त्यामुळे हौसमौज, बाहेर खाणं, हिंडणं-फिरणं, सिनेमे पहाणं तर अशक्य कोटीतल्या गोष्टी! एखादी जाऊ किंवा नणंद बरी असेल तर तिच्यापाशी मन मोकळं तरी करता येत असेल, नाहीतर कुढणं हेच नशीबी. अर्थात कालांतरानी यातलं सगळंच कमी झालं, या पिढीचा त्रासही कमी झाला. मुलं शिकली, परिस्थिती सुधारली.. पण ऐन तारुण्य तसं म्हणलं तर हालाखीचच. पण या बायका मनानी फारच खंबीर. संसारात जे पुढे आलं ते निमूटपणे सोसलं, आहे ते गोड मानून घेतलं. पुढे परिस्थिती बदलल्यानंतर ते बदलही स्वीकारले. नाती कमी झाली, मुलं परगावी गेली, तीर्थयात्रा घडल्या, थोडीफार हौसमौजही झाली. देवकृपेनी यातील बर्‍याच बायकांना दीर्घायुष्य मिळाले. अतोनात कष्टांपासून ते सुखासीन आयुष्यपर्यंत- किती मोठी स्थित्यंतरं आली आणि सगळीच पचवली त्यांनी.

आणि आज! मी आणि माझ्यासारख्या लाखो बायका स्वत:ला ’सूपरवूमन’ म्हणवण्यात धन्यता मानतो. कारण आम्ही शिकलेल्या आहोत, कमावत्या आहोत. घर, मुलं आणि ऑफिस सगळं व्यवस्थितपणे ’मॅनेज’ करतो. पण आम्हाला कितीतरी सोयी उपलब्ध आहेत, आणि म्हणून आम्ही उभ्या आहोत याचा विसर पडतो कधीकधी. कामवाली बाई माझं घर स्वच्छ करते, पाळणाघरात माझं मूल वाढतं, नवर्‍याचं तर प्रत्येक बाबतीत सहकार्य असतं. ऑफिसमधेही बॉस, कलीग्स अडचणी समजावून घेतात. सासूरवास आम्हाला नाहीच, कारण आम्ही मुळात स्वतंत्र रहातो, किंवा बरोबर रहात असलो तरी कोणतीच गोष्ट मनाविरुद्ध आम्ही सहन करत नाही. नातेवाईक, आलागेला ही संकल्पना तर आता जवळजवळ संपुष्टात आली आहे. कोणी आलं तरी आमची वेळ आणि सोय पाहून, फोन करून येतं. अश्या सर्व सोयी जेव्हा असतील तेव्हाच आणि त्यांच्याच बळावर आमचं आयुष्य सुरळीत सुरु असतं. यातलं एक जरी काही नसेल तर ’आमच्यावर अन्याय होतोय’ असं वाटतं आम्हाला.

मग असं असताना ’सूपरवूमन’ ही बिरूदावली मिरवायला आम्ही योग्य आहोत की या ३-४ पिढीपूर्वीच्या बायका?- माझ्या दृष्टीने याच बायका खर्‍या अर्थानी सुपरवीमेन. यांच्या कष्टांचं ना कधी चीज झालं आणि यांचं कर्तृत्व कायमच डावललं गेलं. They never got their due! ’तुम्ही काय विशेष केलं’ असा प्रश्न कदाचित आजही विचारला जाईल त्यांना. पण आपण कल्पनाही करू शकणार नाही अश्या प्रतिकूल परिस्थितीला, अनेक संकटांना यशस्वीपणे, स्वत:च्या हिंमतीवर तोंड दिलं त्यांनी. अत्यंत स्वावलंबी आणि कणखर होत्या या बायका. आणि मला खात्री आहे, त्यांना संधी मिळाली असती तर नक्कीच त्यांनी स्वत:च्या एकटीच्या बळावर उज्ज्वल यशही मिळवलं असतं.

या समस्त ’सूपरवीमेन’ना माझा प्रणाम!

7 comments:

मिलिंद छत्रे said...

पूनम : पटले खरोखर..
अजून थोडे विस्तृत लिहायला हवे होतेस असे वाटले

Mints! said...

punam, mast lihiley! malaa paN agadi tu mhaNates tech vaaTate. mast lihile aahes nehemipramaNe.

Parag said...

Poonam, mast lihilays ekdam..
Keep it up..!

-Parag

Abhijit said...

One of the best of your posts! This article should be published in a newspaper.

VichaarpravRutta karaNara lekh!
Abhinandan!

zulelal said...

सलाम... समस्त ‘सुपरवीमेन’ना!
- zulelal

ships09 said...

Chan lihile ahe
Vichar karayala lavel ase :)
Keep writting, I will keep reading

swapnil sahasrabuddhe said...

चांगले लिहिले आहे