रात्री ११.३० ला नवऱ्याचा फोन वाजला, १२.१० ला प्रचंड मोठे आवाज यायला लागले, सर्वत्र ’ब्लॅक आऊट’ झाला, स्टेशनवरच्या सैनिकापासून अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येक पुरुष सीमेवर तैनात झाला आणि मागे उरल्या त्यांच्या बायका आणि मुलं!
मृण्मयी आपटे लिखित “The Night in the Fish Pond” हे पुस्तक “ऑपरेशन सिंदूर” सुरू झालं, त्या रात्रीपासून सुरू होतं.
लष्करातल्या प्रत्येक घटकाला त्याच्या कर्तव्यासाठी प्रशिक्षण दिलेलं असतं. पण त्याच्या पत्नीला मात्र स्वत:लाच प्रशिक्षित करावं लागतं. तेही, परिस्थितीनुसार! त्यातून युद्धजन्य परिस्थिती असेल, तर सेकंदासेकंदाला अनिश्चितता असते. दूर गेलेल्या नवऱ्याच्या सुरक्षितेतेच्या प्रार्थनेपासून घरातल्या लहान मुलांना दूध कुठून आणायचं या चिंतेपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे तिलाच लक्ष द्यावं लागतं 
मृण्मयीचा पती ऑप. सिंदूरच्या वेळी त्या युनिटचा CO म्हणजे Commanding Officer होता. तो सिमेवर गेल्यानंतर त्याच्या कमांडखाली असलेल्या पुरुषांच्या मागे राहिलेल्या स्त्रिया आणि मुलांची जबाबदारी त्याच्या पत्नीकडे, म्हणजेच मृण्मयीकडे आली. ती आपसूकच झाली, "Mother of the Batallion".
वातावरण अतिशय तणावाचं होतं, आणि अनिश्चिततेचंही. बाहेर पडणं सोडाच, आतल्याआत स्टेशनमध्येही फिरायला बंधनं होती. स्टेशन सोडायचं होतं, पण निर्बंध होते. तिथेच रहायचं होतं, पण रोजच्या गरजांसाठी बाजारात जाणं शक्य नव्हतं. सीमेवरून काहीही बातमी येत नव्हती. केवळ स्वत:च्या आंतरिक विश्वासाच्या आधारावर काही दिवस आणि रात्रीही काढायच्या होत्या. कसे असतील हे दिवस? आपण केवळ कल्पना करू शकतो! कदाचित, तीही नाही करू शकत!
रात्रीची वेळ सगळ्यात बिकट होती. घरात थांबायला परवानगी नव्हती. बंकर कधी वापरायची वेळच आली नव्हती. त्यामुळे ते जुने झाले होते आणि सुरक्षित नव्हते. अशा वेळी घरासमोर केवळ सजावटीसाठी असलेल्या एका बुटक्या माशांच्या तळ्याने त्यांना आसरा दिला! That was, the Night in the Fish Pond! विचार करा, इतकासाही आवाज जीवावर बेतू शकला असता! अक्षरश: जीव मुठीत धरून लहानग्या मुलांसकट १३ जणी त्या एवढ्याशा जागेत रात्रभर कशा बसल्या असतील! 

हे आणि एकंदरितच कोणत्याही ’फौजी पत्नी”चं आयुष्य किती अवघड आणि अनपेक्षित घटनांनी भरलेलं असतं याची हेलावून टाकणारी कहाणी म्हणजे “The Night in the Fish Pond”.
मी या पुस्तकाचं संपादन केलं आहे. संपादन केलं म्हणजे नेमकं काय केलं? सिंदूरचा अनुभव अतिशय थरारक होता. मृण्मयीला तो सगळ्यांना सांगायचा होता. पण पुस्तक करण्याच्या दृष्टीने तेवढंच पुरेसं नव्हतं. मग मी मृण्मयीशी खूप गप्पा मारल्या. तिचे पती पहिल्यापासूनच नेहेमीच काश्मीर सेक्टरच्या विविध संवेदनशील पोस्टवर नियुक्तीला होते. साहजिकच मृण्मयीने याही आधी अनेकदा अशा कठिण प्रसंगांना तोंड दिले होते. मुंबईत अतिशय व्यग्र दिनक्रम असलेली ही मुलगी लग्न झाल्याझाल्या अतिशय दुर्गम लष्करी भागात गेली. ही transition तिने कशी स्वीकारली? त्या वेळेची मनोवस्था, अनुभव हेही पुस्तकाच्या दृष्टीने लक्षवेधक वाटले. कोणते अनुभव घेता येतील, कोणते नकोत हे आम्ही ठरवले. त्यानंतर त्या अनुभवांची एकमेकांशी सांगड घातली. सिंदूरवरचे लक्ष ढळणार नाही याची काळजी घेतली. मी संपादक आणि वाचक दोन्ही दृष्टींतून काम करत होते.
त्यानंतर तिने ’मॅटर’ लिहून पाठवल्यानंतर तो मी अनेकदा वाचला. मजकूर पूर्ण क्रमाने लावणे, गॅप्स शोधणे, त्या तिच्याकडून भरून घेणे, मजकूर सुसंगत करणे, काही पूरक लिहिणे हे कामही मी केले. एक वाचक म्हणून मला जिथे ज्या गोष्टी हव्यात, त्या तिला सांगितल्या, सूचना केल्या. आनंदाची गोष्ट अशी, की मृण्मयीने माझं सगळं ऐकलं. तिची लेखणी इतकी बोलकी आहे, इतकी सखोल आहे, की हे काम ’कामासारखं’ वाटलंच नाही. पटापट पूर्ण होऊन, पुस्तक प्रकाशितही झालं आहे 
मृण्मयीची आणि माझी आधीपासूनच ओळख नव्हती. पण ती इतकी उत्साही आणि पॉझिटिव्ह आहे, की तिच्याशी लगेचच मैत्री झाली. सुप्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांची ती मैत्रीण आहे. ती पुस्तक लिहित आहे, पण तिला एका चांगल्या एडिटरची गरज आहे, हे समजताच, त्यांनी माझं नाव तिला रेकमेंड केलं. मृण्मयीनेही माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला आणि हे आगळंवेगळं पुस्तक जन्माला आलं.
पुस्तक मुद्दामच इंग्रजीत लिहिलं आहे, कारण या ’फौजी वाईफ’ची कहाणी भारतभर पोचायला हवी, अशी इच्छा आहे. हे पुस्तक ऑप सिंदूरबद्दल नाही, तर या ऑपमुळे रातोरात लष्करी पत्नींवर आणि लहानग्यांवर काय परिस्थिती उद्भवली आणि त्यांनी त्यातून कसा मार्ग काढला, यावर आहे. अनेकदा ते वाचताना डोळ्यात पाणी येतं
. शेवटी, ऑपरेशन पूर्ण करून आपली माणसं घरी आली, तेव्हा मृण्मयीनं जे वर्णन केलं आहे, ते वाचून अंगावर काटा येतो 
आपण प्रत्येक जण काम करतच असतो. ते आवडतही असतं. पण एखादं काम आपल्याहातून पूर्ण होतं, तेव्हा एक वेगळा आनंद आणि समाधान मिळतं. ’या कामाचा मला अभिमान वाटतो’ असं फार थोड्या कामाबद्दल आपण म्हणू शकतो. “The Night in the Fish Pond” हे माझ्यासाठी तसं एक पुस्तक आहे 
मी केवळ त्याची संपादक आहे, तरीही हे पुस्तक मला अगदी माझ्या पुस्तकाइतकंच प्रिय आहे




0 comments:
Post a Comment