रुंग्ली रुंग्लियॉट : सुनीताबाई देशपांडे आणि जी. ए. कुलकर्णी यांच्यामधल्या हृद्य पत्रसंवादाचे माधुरीताई पुरंदरे आणि गिरीश कुलकर्णी यांनी केलेले अभिवाचन- असे या प्रयोगाचे एक वाक्याचे वर्णन करता येईल. पण इतकी मोठी चार नावे एकत्र आली असतील, तर खचितच तो प्रयोग, तो अनुभव एका वाक्यात न मावणारा आहे, हे सांगणे न लगे!
“प्रिय जीए” हे सुनीताबाईंनी जी.एंना लिहिलेल्या पत्रांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. तसेच, जी.एंनी वेगवेगळ्या साहित्यिकांना आणि स्नेह्यांना लिहिलेल्या पत्रांचे “जी.एंची पत्रे” या नावाचे पुस्तक आहे. त्यात त्यांनी सुनीताबाईंना लिहिलेलीही पत्र आहेत. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी या दोन पुस्तकांतला परस्परपूरक मजकूर एकत्र करून, सर्वोत्तम दोन अभिनेते निवडून आणि त्यांना अप्रतिम प्रकाश, ध्वनी आणि नेपथ्याची जोड देऊन एक अद्भुत प्रयोग बसवला आहे.
स्वत:च्या कार्यक्षेत्रात अतिशय व्यग्र असतानाही, विशेषत: वैचारिक अस्वस्थता अस्सल कलावंताला/ साहित्यिकाला शांत बसू देत नाही. आपण जे वाचतो, जे लिहितो, जे ऐकतो, त्यावर विचार करतो ते कोणालातरी आसूसून सांगावेसे वाटते. त्याचे त्यावरचे मत ऐकावेसे वाटते. पण अशी देवाणघेवाण करण्याच्या पातळीवरचे लोक आसपास असतातच, असे नाही. अशा वेळी प्रचंड घुसमट होते.
एकमेकांचा आदर ठेवूनही घमासान चर्चा, वाद करता येऊ शकतात, हे आताच्या काळात घडणे अशक्यच आहे, पण सोशल मीडियापूर्व काळातही ते अवघड होते. कारण तेच- मतांतरे असली, तरी पूर्वग्रह बाजूला ठेवून मनमोकळी चर्चा करणे, गप्पा मारणे यासाठी समानशील व्यक्ती, मित्र, कुटुंबीय आसपास असतीलच असे नाही. पण तेव्हा लोकांकडे एक सुंदर, प्रभावी माध्यम होते- पत्र! पत्र लिहिणे म्हणजे हृदयाचा एक कप्पाच उघडा करणे! कित्येक भावना, विचार, म्हणणे दुसऱ्यापर्यंत पोचवण्याचे अतिशय सुंदर साधन!
जीए आणि सुनीताबाई या उच्च वैचारिक पातळीवरच्या दोन व्यक्ती. पण जीए कमालीचे संकोची आणि सुनीताबाई कमालीच्या परखड. त्यामुळे ही वैचारिक घुसळण शेअर करण्यासाठी त्यांना जवळ योग्य व्यक्ती सापडली नसणार. ही उणीव त्यांच्या पत्रव्यवहाराने भरून काढली. एकमेकांप्रती असलेल्या कमालीचा आदरातून, कौतुकातून, भिन्न मतांतून तरीही उत्तम ते एकमेकांना सांगण्याच्या इच्छेतून सुनीताबाई आणि जीए यांची पत्रमैत्री बहरली. या मैत्रीला स्वत:कडूनच गालबोट लागणार नाही याचीही काळजी त्यांनी घेतली. चुका झाल्या तेव्हा माफी मागितली, अधिक-उणा शब्द लिहिला गेला, तेव्हा त्याचे स्पष्टीकरण दिले आणि महत्त्वाचे म्हणजे, रुंग्ली रुंग्लियॉट, अर्थात कुठे थांबायचे, हे त्यांना समजले. म्हणून या पत्रमैत्रीचे मोल अधिक आहे.
मराठी साहित्य, जीए आणि सुनीताबाई या तिघांवर किंवा कोणत्या एकावरही ज्याचे प्रेम आहे, त्याला हा प्रयोग आवडणारच आहे! पण माझ्यासाठी दोन-तीन विशेष कारणे - सुनीताबाईंच्या अनेक मुलाखती आणि लेखनातून त्यांचा स्वभाव, त्यांची मते, आयुष्य जगण्याची त्यांची फिलॉसॉफी मला परिचित होती. पण मी जी.एंच्या फक्त कथा वाचल्या आहेत. त्यामुळे त्यांचा अभ्यास, त्यांची वैचारिक सखोलता, कोणत्याही मतापर्यंत येण्याचा त्यांचा प्रवास, त्यामागची भूमिका याची मला काहीही कल्पना नव्हती. त्याची झलक या प्रयोगातून मिळाली आणि जीए “जीए” “का” होते, याचे अंशत: आकलन झाले. किती बुद्धीमान माणूस होता हा! ’मी आता का लिहित नाही’, यावरचे त्यांचे भाष्य अगदी कान देऊन ऐकण्यासारखे आहे! त्यांच्याबद्दल अपार आदर वाटतो! हॅट्स ऑफ, सलाम मोमेंट होती ती.
दुसरे म्हणजे, प्रयोगाची शिस्त्त! माधुरीताई आणि गिरीश कुलकर्णी- दोघेही कितीऽऽऽऽऽऽ वर्ष काम करत आहेत, केवढे तरी सकस काम दोघांनी केले आहे. त्या अर्थी, दोघेही ’सिनियर’ आहेत, पण काय शिस्तीने प्रयोग सादर करतात! दुसरा वाचन करत असताना, पहिलादेखील मान खाली घालून संहिता वाचत असतो! ते एक क्षणही प्रयोगातले लक्ष ढळू देत नाहीत. ना ते प्रेक्षकांमध्ये बघतात, ना आळस देतात, ना मोबाईल बघतात. ही एकनिष्ठता किती दुर्मीळ आहे!
संगीत आणि नेपथ्य थक्क करणारे आहेत. विशेषत:, शेवट चर्र करणारा आहे, आणि त्याचा परिणाम दृश्यमाध्यमाने काय उंचावला आहे! वाह. विशेष दाद, केवळ त्या नेपथ्यासाठी.
पत्रलेखन हा माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. पत्रमैत्रीचे मोल, तिचे सौंदर्य, तिची गरज मी अगदीच ओळखून आहे. त्यामुळे ही पत्रमैत्री त्या दोघांच्या दृष्टीने काय असेल, हे मला अगदी नेमकेच समजू शकते. जेव्हा ही मैत्री संपुष्टात आली, तेव्हा सुनीताबाईंना काय वाटले असेल… कल्पना करू शकते.
जेव्हा तुम्हाला संधी मिळेल, तेव्हा हा प्रयोग बघाच. साहित्यिक, वैचारिक मेजवानी आहे ही. सर्वार्थाने समृद्ध करणारा प्रयोग- रुंग्ली रुंग्लियॉट. #RungliRungliyotPlay #MarathiPlay #रुंगलीरुंग्लियॉट #अभिवाचन


0 comments:
Post a Comment