#दिवाळी मध्ये मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे त्यानिमित्ताने घरात होणाऱ्या गप्पा आणि घडणाऱ्या चर्चा! ![]()
सध्या घरात अशी परिस्थिती की सर्व लोक सर्वकाळ प्रचंड बिझी...वीकेंड आणि सुट्ट्यांना सुद्धा! ![]()
अशावेळी घरात बोलणं होतं, पण "गप्पा" मारायला निवांत वेळच कोणाला नसतो.
"शनिवारी ही कामं करायला वेळ आहे का?"
"घरात जेवायला असणार आहे का?"
"रविवारी अमुक ठिकाणी जाऊया का?"
"त्यांना फोन करायचा राहिला आहे, तो वीकेंडला करून टाकू"...
हे आणि इतपतच संवाद एरवी सुरू असतात. Whatsapp वर निरोप दिले घेतील जातात, कामाच्या याद्या केल्या जातात, voice notes ही पाठवल्या जातात. पण तिथे गप्पा होत नाहीत! ![]()
पण दिवाळी आली की,
सुट्ट्या कोणाला कधी आहेत,
दिवाळीच्या कोणत्या सांगीतिक मैफिलींना जायचं,
कोणता फराळ घरी करायचा,
कोणता विकत आणायचा, कुठून आणायचा, किती आणायचा
आकाशकंदील गेल्या वर्षीचे लावायचे का नवीन, रोषणाई कुठे कशी करायची,
कपडे online घ्यायचे, का दुकानात जाऊन...
चर्चा करायला गप्पा मारायला कितीतरी विषय असतात. त्यानिमित्ताने घरात भरपूर बडबड केली जाते
मनात साचलेलं सगळं, मागच्या काही आठवणी, काही फसलेल्या गोष्टी, काही संस्मरणीय पार्ट्या, कार्यक्रम यांची उजळणी आपोआप होते
फराळाचे पदार्थ करताना तर निश्चितच nostalgia पण कढईत परतला जातो ![]()
![]()
बाहेरच्या जगात इतका नकोसा कोलाहल असताना, घरातली ही चहलपहल, ही गडबड, ही बडबड मात्र फार आवडते, हवीहवीशी वाटते ![]()
शिवाय लक्ष्मीपूजन सोडलं तर तसा कोणताही धार्मिक कार्यक्रम नसल्यामुळे टेन्शन नसतं. सगळ्यांनाच थोडीशी का होईना, उसंत दिवाळी देते.
वातावरणातला अंध:कार दिवाळीमुळे लाक्षणिकच दूर होतो, पण मनातला, घराघरातला अंध:कार मात्र दिवाळीमुळेच निश्चित दूर होतो!
ही दिवाळी सर्वांना शांतता आणि समाधान देणारी जावो


0 comments:
Post a Comment