या नावाचा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे, मी पाहिला नाहीये, रिव्ह्यू वाचले. ते पाहून-वाचूनच मी इतकी वैतागले… शिकलेल्या सुनेकडून सासू-सासरे-नवरा यांनी स्वयंपाकाची, नव्हे चविष्ट स्वयंपाकाची अपेक्षा आता कोण ठेवतं? आणि ठेवली, तरी ती थोडीच ऐकणार आहे? ती लावेल की कामाला बाई. सासऱ्यांना ठणकावून सांगेल, की मला मदत हवीये, मी ती घेणार. प्लंबर स्वत:च बोलावेल की. कितीतरी बायका करतात हे. आताच्या काळातली नायिका इतकी पिचलेली आहे, हेच मला बोअर वाटलं.
हेच सगळं एका मैत्रिणीशी बोलले, तीही सहमत असेल असं वाटालं होतं. पण मी चमकले. ती म्हणाली, “अगं, इतकं सोपं नसतं. पुरुषप्रधान समाज अजूनही प्रबळ आहे, सासर या प्रकाराचं सुनांना टेन्शन येतं. मुलींना अजूनही सूनपणाचं दडपण असतं. सासूचं सहकार्य नसेल, तर संसाराची सुरूवात केल्याकेल्या कोणी इतके बदल लगेच करू शकत नाही. सिनेमात दाखवलेलं कसं चुकीचं आहे आणि त्यावर तिने काय करायला जवं होतं, हे आपण “आज” बोलतोय, पण आठव आपले संसाराचे सुरूवातीचे दिवस! कमीअधिक प्रमाणात हाच माझाही अनुभव आहे. पंचवीस वर्षापूर्वी माझं लग्न झालं. तोलामोलाचं स्थळ. दोन्ही बाजू संस्कारी, कुटुंबवत्सल, प्रगतीशील वगैरे. नवऱ्यापेक्षा माझं शिक्षण थोडं अधिकच होतं, लग्नाआधीच मी उत्तम नोकरी करत होते. पण ’ऑन पेपर’ प्रगतीशील असलेल्या सासरी माझ्या शिक्षणाचं कौतुक नव्हतं. सासऱ्यांना आणि त्यामुळे सासूलाही टिपिकल सूनच हवी होती. मी ऑफिसला जाण्याआधी केर काढले का, पोळ्या केल्या का, भाजी कशी केली याकडे त्यांचं रोज काटेकोर लक्ष असायचं. चवीत जरा जरी बदल झाला, तर लगेच नापसंती दर्शवली जायची. मला कुठे स्वयंपाक येत होता? पण ते कधीच कोणी समजून घेतलं नाही. सकाळी वर्तमानपत्र वाचण्यासाठी दोन कामं बाजूला ठेवली, तर टोमणे मारले जायचे. संध्याकाळी घरी आल्याबरोबर कूकर, कोशिंबीर, उद्याची तयारी, भाजी, पथ्य… चक्र सुरूच. एकदाही त्यांनी मला, “तुझं काम काय असतं”, “ऑफिसमधले लोक कसे आहेत, तिथे काय चॅलेंजेस असतात”, हे विचारलं नाही. कारण, ते त्यांच्या दृष्टीनं महत्वाचं नव्हतंच. महत्त्वाचं होतं, मी घरी आल्याबरोबर स्वयंपाक करणं!
सासूबाई घरीच असायच्या. पण, ’सकाळी गडबड असते तेव्हा तू कर स्वयंपाक, संध्याकाळी तू दमून येतेस, तेव्हा मी बघेन’, असं कधी ऑफरसुद्धा केलं नाही! कारण स्वयंपाकाचं काम सुनेचं ना! कधी मला ऑफिसमधून कामामुळेच घरी यायला उशीर झाला, तर त्यांची चिडचिड व्हायची, कारण त्या दिवशी त्यांना काम करावं लागायचं. पण मला सहानुभूती नाही मिळाली कधी. ’कामाचं लोड असेल, तर घरचं टेन्शन घेऊ नकोस, आम्ही आहोत’, असा पाठिंबा कधी मिळाला नाही. आमच्याकडे पाहुणे सतत यायचे, मुक्कामीच यायचे. आत्ताप्रमाणे स्वयंपाकाला बायका नव्हत्या, आयते डबे मिळत नव्हते. सासूबाईंचीही अपेक्षा, की मी आयुष्यभर पाहुण्यांचं केलं, सुनेनेही त्यांचं सगळं केलंच पाहिजे. करियर करणारी कर्तबगार मुलगी म्हणून ना त्यांनी, ना त्यांच्या एकाही नातेवाइकाने कौतुकाचा चकार शब्द कधी काढला असेल! उलट, ’पाहुण्यांना नमस्कारच केला नाही’, ’नुसतं वरणच केलं, आमटी नाही केली’, ’कोशिंबीरीत कांदा घातला’, ’नेहेमी भाताचे प्रकारच करते, म्हणजे पोळ्या करायला नकोत’, असे ताशेरे मात्र ओढले. सतत गिल्ट द्यायचे. “तुला आवडणारे दोन पदार्थ “कधीतरी” करत जा, “स्वत:पुरते” इतकी सूट मात्र मोठ्या मनाने दिलेली होती! एखाद्या रविवारी कंटाळा आला, सुट्टीच्या दिवशी स्वयंपाकालाही सुट्टी देऊ, सगळेच बाहेर खाऊ वगैरेची मुभा नव्हती. मला माझा संसार नव्हताच, मत नव्हतं, संसार त्यांचा होता आणि तो फक्त त्यांच्याच पद्धतीने पुढे न्यायचा होता. मीही किती निरागस आणि बावळट होते. मला राग आला, नकोसं वाटलं तरी मीही तेवढ्यापुरतं बोलले, पण कायमस्वरूपी बदल करू शकले नाही.
अचानक माझ्या नवऱ्याची बदली झाली, मलाही बदलीच्या जागी नोकरी मिळाली आणि मी तिथून बाहेर पडले. स्वत:चं बिऱ्हाड केल्यावर मग मला कुठे थोडं भान आलं. स्वयंपाक करायला माझा कधीच आक्षेप नव्हता, आक्षेप होता तो कंपल्शनला, त्यात नसलेल्या स्वातंत्र्याला. सासरी चर्चेला वावच नव्हता, प्रयोगशीलतेला परवानगी नव्हती. माझ्या घरी, माझ्या स्वयंपाकघरात मग मी रमले. मला काय येतं, जमतं, करावंसं वाटतं, करावंसं वाटत नाही हे माझं मी ठरवायला लागले. नवऱ्याची भूमिका आधीही तटस्थ होती आणि आता त्याला बोलण्याचा काही अधिकारच मी दिला नाही. तशीही त्याला तक्रारीला जागा कुठे होती? त्याला आयतं जेवायला मिळत होतंच. माझ्या मनावरचं स्वयंपाकाचं दडपणच गेल्यावर मी नोकरीही बिनधास्त करू शकले. माझ्या मुलांना मी स्ववलंबी केलं. पण विचार कर. मी स्वतंत्र संसार थाटू शकले नसते तर? तरचा विचार करूनही मी शहारते. कारण मी नक्कीच बंड केलं नसतं. त्यांच्याच मनाप्रमाणे फक्त स्वयंपाक, सण, मुलं, आला-गेला हेच करत बसले असते, हे अगदी नक्की. कदाचित दोन मुलं झाल्यावर संसाराच्या वाढीव अपेक्षांखाली मी नोकरीही सोडली असती आणि आता पस्तावले असते! सुदैवाने, यातलं काही झालं नाही. योग्य वेळी बाहेर पडालो बाबा! संसार, नोकरी, मुलं सगळं नीट निभावलं, देवाची कृपा.”
मी गप्पच झाले. तिच्या बोलण्यात तथ्य होतं. सून ही सूनच असते. ती बाहेर काय करते, यापेक्षा ती घरात काय करते यालाच महत्त्व असतं. तिला सूट मिळत नाही, सहानुभूती मिळत नाही. एखादं काम केलं नाही, तर ’तसं का’ हे समजून घेण्यात कोणालाही रस नसतो. मीही हे अनुभवलेलं आहे.
आता दिवस बदललेल्त. किमान शहरातल्या घरांतून सुनेचं भरपूर कौतुक होतं, लाड होतात, करियरची कदर होते. मुलगेही संसारात सहभाग घेतात. तरी सासरच्या लोकांकडून अपेक्षांचा अदृश्य धागा असतोच, तक्रारीसाठी काही ना काही सापडतंच. म्हणूनच आजच्या काळातही “मिसेस”सारखे केवळ स्वयंपाकघराभोवती फिरणारे, रिग्रेसिव्ह वाटणारे सिनेमे इतक्या बायकांना जिव्हाळ्याचे वाटतात.
आपण त्यातून काही बोध घेतो का, हे अधिक महत्त्वाचं आहे. आता नात्यांमध्ये संवाद सहजपणे होऊ शकतो. सूनेकडून काय आणि किती अपेक्षा आहेत, हे सासू सुनेला सांगू शकते. तिला त्या पूर्ण करणे शक्य आहे का नाही, हे ती सासूला सांगू शकते. एक सून म्हणून तिला कोणती कर्तव्य करायला आवडतील आणि कशासाठी स्वातंत्र्य हवं आहे, हेही ती सासूला सांगू शकतो. गैरसमज न होता, इमोशनल ब्लॅकमेल न करता, उलट या संवादसेतूचा फायदा घेऊन त्याप्रमाणे दोन्ही बाजूंनी आचरण करणं आवश्यक आहे. कारण, यशस्वी संसारासाठी कर्तव्य आणि स्वातंत्र्य ता दोन्हीचा बॅलन्स महत्त्वाचा असतो. नाहीतर, कोणतीतरी एक बाजू नेहेमीच लंगडी राहील आणि हे असे सिनेमे पुढेही येतच राहतील.
0 comments:
Post a Comment